अन्न आणि रोग यांचा संबंध, तसेच पचनशक्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण विवेचन

Article also available in :

आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !

वैद्याचार्य सद्गुरु वसंत बाळाजी आठवले

 

१. जिभेवर नियंत्रण नसणे, हेच रोगाचे कारण !

जनावरांना काय खावे, काय खाऊ नये, याची उपजत बुद्धी असते. गाय, बकरी इत्यादी प्राणी विषारी वनस्पतींची पाने खात नाहीत. मनुष्याला अन्नाविषयी उपजत बुद्धी अतिशय अल्प असते; पण मनुष्य हा बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे. आयुर्वेदाने प्रत्येक अन्नपदार्थाचे शरिरातील वात, पित्त आणि कफ हे दोष, धातू, मळ अन् अवयव यांच्यावर काय परिणाम होतात, हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्या शास्त्रांचा अभ्यास करून प्रत्येकाने आपली प्रकृती, वय, ऋतू, पचनशक्ती इत्यादींचा विचार करून किती प्रमाणात खावे, हा विचार करून आहार घेतल्यास माणूस निरोगी राहील; परंतु ‘कळते पण वळत नाही’, अशी माणसाची अवस्था आहे; कारण त्याचे आपल्या जिभेवर नियंत्रण नाही. पोटातील आम्लता (अ‍ॅसिडिटी) वाढलेली असतांना समोर आलेली भेळपुरी खाल्ल्यास पोट दुखेल, हे ज्ञात असूनही व्यक्ती ताव मारणे सोडत नाही. यालाच आयुर्वेदात प्रज्ञापराध (बुद्धीचा अपराध) आणि सर्व रोगांचे मूळ कारण असे म्हटले आहे.

 

२. नैसर्गिक अन्नापासून दूर !

आदिमानव निसर्गात मिळणारी कंदमुळे, फळे आणि प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खात असे. निसर्गातील स्वच्छ हवा, झर्‍याचे पाणी आणि नुकतेच बनवलेले अन्न यामुळे तो निरोगी असे. आता माणसांची संख्या पुष्कळ वाढलेली आहे. जंगले आणि झाडे अल्प झाली आहेत. कारखान्यांचे धूर आणि रासायनिक पदार्थ, वाहनांचे नाद (आवाज) अन् माणसांची गर्दी यांमुळे वातावरण अन् पाणी प्रदूषित झाले आहे. व्यापारी अन्नात भेसळ करतात. फळे, धान्ये आणि भाज्या यांना कीड लागू नये; म्हणून कीटकनाशकांचा सर्रास वापर चालू आहे; म्हणून भाज्या अन् फळे स्वच्छ धुऊन न घेतल्यास कीटकनाशक विषारी द्रव्यांचे शरिरावर अनिष्ट परिणाम होत आहेत. प्राण्यांना त्यांची भूक आणि वजन वाढावे; म्हणून ‘कॉर्टिकोस्टिरॉइड’सारख्या हार्मोनच्या गोळ्या दिल्या जातात. अशा प्राण्यांचे मांस खाल्ल्याने त्या हार्मोनचे दुष्परिणाम मनुष्यालाही भोगावे लागतात.

मिठाचा शोध लागण्याआधी अन्नपदार्थात मीठ वापरत नसत. त्यामुळे रक्तदाब, हृदयाचे विकार, सूज येणे असे विकार क्वचित आढळत. आता अन्नपदार्थ चवदार करण्यासाठी मिठाचा वापर पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे रक्तदाब, हृदयविकाराचा झटका या विकारांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.

साखरेचा शोध लागल्यावर पदार्थात साखर घालून गोड केलेली जिलेबी, बासुंदी, श्रीखंड, मुरांबे, पेढे, बर्फी यांचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे स्थूलता, रक्तदाब, मधुमेह इत्यादी रोगांचे प्रमाणही वाढले आहे. चहा-कॉफीसारखी उत्तेजक पेये, लोणची आणि मसाल्याचे पदार्थ यांचा वापर वाढल्यामुळे अ‍ॅसिडिटी, अल्सर इत्यादी रोग वाढले आहेत. अन्नपदार्थ कुजू नयेत किंवा आंबू नयेत; म्हणून बाटल्यांतून मिळणार्‍या टोमॅटो केचअप, शीतपेये आणि इतर अन्नपदार्थांतील रासायनिक परिरक्षकाचाही (प्रिझर्व्हेटिव्हज) शरिरावर अनिष्ट परिणाम होतो.

विमान वाहतुकीमुळे निरनिराळ्या देशांतील अंतर उणावत चाललेे आहे. त्यामुळे इतर देशांतील विविध अन्नपदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांचाही आपल्या आहारात समावेश होऊ लागला आहे. आता चायनीज डिश, मेक्सिकन डिश इत्यादी सर्व देशांतील पदार्थ सर्वत्र मिळू लागले आहेत. अन्नाचे वेगवेगळे नवीन प्रकार अधिक चवदार आणि चमचमीत बनवल्याने अन् आकर्षक पद्धतीने वाढल्याने जिभेवर नियंत्रण ठेवणे अशक्य होत चालले आहे. यंत्राचा शोध लागल्यावर लोक ऊस आणि इतर फळांचे रस पिऊ लागले. आयुर्वेदाने फळे खावी, ऊस खावा; पण त्यांचे रस पिऊ नये, असे सांगितले आहे. कारण ऊसाचे करवे किंवा फळे खातांना ऊस किंवा फळे आत किडली असल्यास आपण फळे किंवा किडलेला भाग टाकून देतो; पण यंत्रात रस काढतांना किडलेल्या भागाचा रसही त्यात मिसळतो.

कृत्रिम चवीची सवय लागल्याने सफरचंदासारख्या चवदार फळांनाही मीठ किंवा मसाला लावून लोक खाऊ लागले आहेत. शितकपाटामध्ये अन्नपदार्थ ठेवण्याची सोय झाल्याने रविवारी विकत घेऊन आठवड्याच्या भाज्या शितकपाटामध्ये साठवल्या जातात आणि बनवलेले अन्नपदार्थही शितकपाटामध्ये साठवले जातात. याउलट आयुर्वेदाने एकदा थंड झालेले अन्नपदार्थ पुन्हा उष्ण करून खाऊ नये, असा नियम सांगितला आहे. नैसर्गिक अन्नातून जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोह (आयर्न) इत्यादी मिळवण्यापेक्षा टॉनिकच्या गोळ्या घेण्याची प्रथा आली आहे. जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोह इत्यादी खनिज पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास त्यांचे शरिरावर दुष्परिणाम होतात.

बर्‍याच वेळा काळ अन् परिस्थिती यांमुळे पालटणार्‍या सवयीने दुष्परिणाम लगेच लक्षात येत नसले, तरी कालांतराने लक्षात येण्याचा संभव असतो; म्हणून निसर्गात मिळणारे अन्नपदार्थ शक्यतो नुकतेच बनवलेले खाल्ल्यास आणि आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवल्यास माणसास आरोग्यसंपन्न जीवनाचा आनंद उपभोगता येईल.

 

३. पचनशक्ती न्यून-अधिक असण्याची कारणे कोणती ?

जेवणावळीत, पंगतीत ५० लाडू खाऊन सहज पचवणारे खवय्ये अजूनही आपणाला आढळतात; तर काही वेळा एक ग्लास दूध प्यायल्यावर जुलाब होणारे तरुणही आढळतात. हा भेद पचनशक्तीतील भेदामुळे आढळतो. विविध पाचकरसांचे प्रमाण आणि गुणवत्ता यांवर पचनशक्ती अवलंबून असते. प्रत्येकाची पचनशक्ती आनुवंशिकतेवर अवलंबून असते.

३ अ. आनुवंशिक : काही कुटुंबांत सर्वांचीच पचनशक्ती चांगली किंवा अल्प असते. पचनशक्ती आनुवंशिकतेवर अवलंबून असते. आईच्या दुधावरच पोट भरत असलेल्या काही मुलांना प्रतिदिन ८ ते १० वेळा संडासला होते, तर काही मुलांना तीन-तीन दिवस संडासला होत नाही.

३ आ. प्रकृती : सम आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची पचनशक्ती चांगली असते; परंतु वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींची पचनशक्ती अल्प असते.

३ इ. वय : मुले आणि तरुण माणसे यांत पचनशक्ती चांगली असते. म्हातारपणी पचनशक्ती अल्प होते.

३ ई. अन्न : अती प्रमाणात, अल्प प्रमाणात किंवा असंतुलित आहार घेणे आणि अनियमित वेळी आहारसेवन, यामुळे पचनशक्ती अल्प होते. पचावयास जड, आंबलेले, कुजलेले, शिळे अन्न, अस्वच्छ आणि अर्धवट शिजवलेले अन्नही पचनशक्ती अल्प करते.

३ उ. पोषकतत्त्वांची न्यूनता : आहारात प्रथिने किंवा ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे अल्प पडल्यास पचनशक्ती उणावते.

३ ऊ. पचनेंद्रियांचे रोग : जठर, आतडी, यकृत आणि स्वादुपिंड यांच्या रोगामुळे पचनशक्ती अल्प होते.

३ ए. रोग : प्रत्येक रोगात पचनशक्तीवर परिणाम होत असतो. कोणत्याही रोगाच्या प्रथमावस्थेत आणि यकृत अन् आतड्याच्या रोगात अन् क्षयरोग यांसारख्या जीर्ण रोगांत पचनशक्ती अल्प होते.

३ ऐ. सवय : काही लोकांना दुधाची सवय नसेल, तर त्यांना दूध घेतल्यास जुलाब होतात; परंतु त्यांची इतर पदार्थ पचवण्याची क्षमता जास्त असते. केरळमध्ये जन्मलेली व्यक्ती तांदूळ आणि मासे, तर पंजाबमध्ये जन्मलेली व्यक्ती गहू आणि मांस सहज पचवू शकते.

३ ओ. मानसिक रोग : मानसिक तणाव, क्रोध, भीती, चिंता यांसारख्या मानसिक रोगांत भूक आणि पचनशक्ती अल्प होते.

३ औ. व्यायाम : व्यायामामुळे भूक आणि पचनशक्ती वाढते. निरोगी व्यक्तीला भूक चांगली लागते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘योग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन (असंतुलित आहारामुळे होणार्‍या विकारांवरील आयुर्वेदीय उपचारांसह)’; लेखक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले.) 

Leave a Comment