सात्त्विक आहार
ज्या अन्नग्रहणामुळे व्यक्तीला सात्त्विकता मिळते, त्या अन्नाला सात्त्विक आहार समजले जाते. सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो.
सात्त्विक आहाराचे महत्त्व
‘सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो. आहार हा तमोगुणी असेल, तर या तमोगुणी ऊर्जेवर चालणारा देह हाही पापयुक्त कर्माला बळी पडतो. पापयुक्त कर्म वातावरणात मोठ्या प्रमाणात आपली सूक्ष्म स्पंदने सोडून त्या त्या स्तरावर या स्पंदनांना घनीभूत करून त्यांचे विशिष्ट कार्यकारी केंद्रात रूपांतर करते. योग्य आणि सात्त्विक आहाराच्या मुशीतून घडलेले जीव हे सज्जन असतात आणि विचारांच्या योगे सत्त्वशील मार्गाचे आचरण करणारे असतात. पूर्वीचे ऋषीमुनी यांचा आहारावर विशेष कटाक्ष असे. सात्त्विकतेचे वर्धन करणारा योग्य तेजदायी आहार देहात एक प्रकारची तेजस्वी कंपने निर्माण करून त्या त्या स्तरावर त्या त्या जिवाला योगी बनवतो. आहारावर नियंत्रण ठेवणे, म्हणजेच जिभेचे चोचले न पुरवणे, हे अतिशय अवघड असते. रसना आणि वाणी यांच्यावर नियंत्रण मिळवणारा जीव ‘योगी’ या पदाला प्राप्त होतो.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ दर्श अमावास्या ७.३.२००८, दुपारी १२.४२)
सात्त्विक अन्नसेवनाने पंचप्राण कार्यरत होऊन ते शरीरभर संक्रमित होणे
‘आपले शरीर हे एक ईश्वरचलीत यंत्र आहे. अन्नसेवनाने शरिरात निर्माण होणारी ऊर्जा ही यज्ञातून निर्माण होणार्या तेजतत्त्वाच्या ऊर्जेशी संबंधित आहे. अन्नसेवनातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे शरिरातील नाभीस्थित पंचप्राणांच्या कार्याला गती मिळते. जोपर्यंत आपण आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करत नाही, तोपर्यंत आपल्या शरिरात सुप्त असणार्या पंचप्राणांची शुद्धी होत नाही; परंतु सात्त्विक अन्नसेवनाने पंचप्राण कार्यरत होऊन ते शरीरभर संक्रमित केले जातात. म्हणूनच अन्नाला ‘पूर्णब्रह्म’, म्हणजेच ‘पाचही प्राणांची शुद्धी करण्याची क्षमता असलेले’, असे म्हटले जाते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१.२००५, दुपारी १२.५९)
सात्त्विक आहार घेतल्यास देवतेचे तत्त्व ग्रहण होण्यास साहाय्य होणे
प्रश्न : आवडत्या देवतेच्या वारी मांसाहार का करू नये ?
मनातील उत्तर : ‘आवडत्या देवतेच्या वारी संबंधित देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. ते तत्त्व ग्रहण करणे सुलभ व्हावे, यासाठी त्या दिवशी रज-तमात्मक अन्न ग्रहण न करता सात्त्विक आहार घ्यावा.’
– श्री. प्रसाद हळदणकर, बेळगाव