व्रतांचे प्रकार

व्रतांचे उद्देशानुसार, काळानुसार, आवश्यकतेनुसार निरनिराळे प्रकार असतात. व्रतांचे प्रकार आणि त्याविषयीचे विश्लेषण खालील लेखातून समजून घेऊया.

 

१. सकाम (काम्य) आणि निष्काम

अ. सकाम (काम्य)

एखाद्या विशिष्ट कामनेसाठी केलेल्या व्रताला ‘सकाम व्रत’, असे म्हणतात. पुराणात आणि तंत्रग्रंथांत कोणत्या कामनेसाठी कोणती उपासना करावी, हे दिलेले असते. सकाम उपासना ही नैमित्तिक उपासना असते. सकाम उपासना मुहूर्त आणि दिनशुद्धी पाहून ठराविक तिथीलाच करतात. ‘सत्यनारायण आणि सत्यदत्त ही व्रते कामना लवकर पूर्ण करणारी आहेत’, या समजुतीने बरेच जण करतात. व्रतामुळे त्या त्या व्रताची अधिष्ठात्री देवता प्रसन्न होते आणि तिच्या कृपेमुळे व्रताचे फळ मिळते. काम्य व्रतांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

अ १. धर्म (साधना म्हणून)

रामनाम व्रत, भागवत सप्ताह आदी नैमित्तिक व्रते

अ २. अर्थ (धन)

अनंत, कोजागिरी.

अ ३. काम (इच्छापूर्ती)

शनिप्रदोष, श्री गुरुचरित्र पारायण, हरिवंशश्रवण, सोळा सोमवार (पुत्रप्राप्तीकरिता).

अ ४. मोक्ष

सोळा सोमवार

आ. निष्काम

निष्काम हा शब्द ‘व्यावहारिक गोष्टींविषयी कामना नसणे’ एवढ्याच संदर्भात आहे. निष्काम उपासनेतही ईश्वरप्राप्तीची किंवा मोक्षाची इच्छा असते.

२. नित्य आणि नैमित्तिक

अ. नित्य व्रते

वर्णाश्रमानुसार करायची कर्तव्ये, उदा. ब्रह्मचर्य, पूजा, संध्या इत्यादी. ही प्रतिदिन करायची असतात.

आ. नैमित्तिक व्रते

ही व्रते ठराविक तिथींनाच करतात, उदा. वटपौर्णिमा, मंगळागौर, हरितालिका, श्री गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, कोजागिरी इत्यादी.

 

वटपौर्णिमा व्रत

वटपौर्णिमा व्रत

३. आवश्यकतेनुसार

अ. अत्यावश्यक (प्रायश्चित्त)

प्रायश्चित्त म्हणून करायची व्रते, उदा. कृच्छ्र, अर्धकृच्छ्र, चांद्रायण इत्यादी.

आ. आवश्यक (कर्तव्य)

वर्णाश्रमाप्रमाणे करायची कृत्ये आणि आचरण, उदा. ब्रह्मचर्य, संध्या, अतिथीसत्कार इत्यादी.

इ. ऐच्छिक

विशिष्ट उद्देशाने केलेली व्रते, उदा. सकाम व्रते.

४. इंद्रियानुसार

अ. कायिक (शारीरिक) व्रते

उपवास करणे, एकभुक्त रहाणे, हिंसा न करणे इत्यादी.

आ. वाचिक व्रते

नामजप करणे, सत्य बोलणे, मृदूभाषण करणे इत्यादी.

इ. मानसिक व्रते

ब्रह्मचर्य पाळणे, मनानेही हिंसा न करणे, क्रोध टाळणे इत्यादी.

५. कालानुसार

अ. व्रत कधी करतात, त्या काळाला अनुसरून व्रतांचे अयन, संवत्सर, मास, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण इत्यादी वर्ग पडतात.

अ १. मासव्रते

वैशाख, भाद्रपद, कार्तिक आणि माघ या मासांतील व्रतांना ‘मासव्रते’ म्हणतात.

अ २. पक्षव्रते

शुक्ल आणि कृष्ण पक्षांमधील व्रतांना ‘पक्षव्रते’ म्हणतात.

अ ३. तिथीव्रते

चतुर्थी, एकादशी, भानुसप्तमी, त्रयोदशी आणि अमावास्या ही तिथीव्रते समजण्यात येतात.

अ ४. वारव्रते

सोम, मंगळ, शुक्र आणि शनि या दिवशींची व्रते वारव्रते होत.

अ ५. नक्षत्रव्रते

श्रवण, अनुराधा आणि रोहिणी नक्षत्रांमधील व्रतांना ‘नक्षत्रव्रते’ म्हणतात.

अ ६. इतर व्रते

व्यतिपातासारखे योगव्रत, भद्रासारखे करणव्रत अशीही व्रते आहेत.

आ. बहुतेक व्रते शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी किंवा अष्टमीपर्यंत असतात; कारण तेव्हापासून चंद्र अधिक वाढत जातांना दिसतो, तसेच व्रताचा उद्देश साध्य होण्याची संधीही उत्तरोत्तर वाढत जाते.

६. देवतेनुसार

उपासना करायच्या देवतेला अनुसरून गणेशव्रत, सूर्यव्रत, शिवव्रत, विष्णुव्रत, देवीव्रत अशी व्रते असतात.

७. वैयक्तिक आणि सामूहिक

बहुतेक सर्व व्रते वैयक्तिक असतात. चैत्रातील श्रीराम नवमी, श्रावण मासातील कृष्णाष्टमी, भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थी इत्यादी सामूहिक व्रते होत.

८. स्त्री-पुरुष भेदानुसार

बहुतेक सर्व व्रते स्त्री आणि पुरुष या दोघांना करता येतात; परंतु हरितालिका, वटसावित्री यांसारखी काही व्रते केवळ स्त्रियांसाठीच आहेत.

९. वर्णानुसार

काही ठराविक व्रते ही केवळ राजे लोक किंवा क्षत्रिय अथवा वैश्य यांनी करायची असतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment