अनुक्रमणिका
१. अन्नसेवनाला शास्त्राने यज्ञाचे स्थान दिल्यामागील कारण आणि ‘अग्नी’ अन् ‘वन्ही’ यांचा अर्थ
२. वैश्वानर अग्नीचे स्मरण करण्याची आवश्यकता
३. ‘ईश्वरी प्रसाद’ म्हणून ग्रहण केलेले अन्न शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते !
हिंदु धर्मशास्त्रात नामजपासहित सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ‘यज्ञकर्म’ केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि प्राणशक्ती मिळते. तेलकट आणि तिखट असे तामसिक अन्न खाण्यापेक्षा सात्त्विक अन्न खाण्याने मनुष्याचे आध्यात्मिक बळ वाढून त्याला ईश्वरी अनुसंधानात रहाणे शक्य होते.
१. अन्नसेवनाला शास्त्राने यज्ञाचे स्थान
दिल्यामागील कारण आणि ‘अग्नी’ अन् ‘वन्ही’ यांचा अर्थ
‘अन्नातून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म-वायूमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होऊन आपल्या कार्याला बळ, म्हणजेच तेजतत्त्वात्मक ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेलाच स्थूल आणि सूक्ष्म रूपांमध्ये अनुक्रमे ‘अग्नी’ अन् ‘वन्ही’ असे म्हणतात.
अ. ‘अग्नी’ हे तेजाचे स्थूल-रूप आहे, तर ‘वन्ही’ हे तेजाचे सूक्ष्म-रूप आहे.
आ. स्थूल कार्यासाठी आवश्यक ऊर्जा ‘अग्नी’ पुरवतो, तर शरिरातील रज-तमात्मक बिजांचे विघटन घडवण्यासाठी लागणारी सूक्ष्म-ऊर्जा ‘वन्ही’ पुरवतो. पंचप्राणांच्या गतीतून उत्पन्न होणारी ऊर्जा ही सूक्ष्म, म्हणजे वन्हीरूपात असल्याने तिच्यामुळे सूक्ष्मदेहांचीही शुद्धी होते. म्हणून शास्त्रात नामजपासहित सात्त्विक अन्नसेवनाला ‘यज्ञकर्म’ म्हटले आहे. ही ‘अग्नी’ची आणि ‘वन्ही’ची एक उपासनाच आहे. म्हणूनच तेलकट आणि तिखट असे तामसिक अन्न खाण्यापेक्षा सात्त्विक अन्न खाण्याने मनुष्याचे आध्यात्मिक बळ वाढून त्याला ईश्वरी अनुसंधानात रहाणे शक्य होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१.२००५, दुपारी १२.५९)
२. वैश्वानर अग्नीचे स्मरण करण्याची आवश्यकता
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।। – श्रीमद्भगवद्गीता १५.१४
अर्थ : सर्व प्राणीमात्रांच्या देहांमधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण आणि अपान वायूंशी संयोग साधतो. अशा या वैश्वानर अग्नीचे स्मरण करून अन्नाचे सेवन केल्यास अन्नाचे पचन सहज होते.
३. ‘ईश्वरी प्रसाद’ म्हणून ग्रहण
केलेले अन्न शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते !
‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।
हा समर्थ रामदासस्वामींचा श्लोक सर्वांनाच ठाऊक आहे. अन्नाचे सेवन करतांना नामजप केल्याने अन्नाचे सहज पचन होते आणि असे सात्त्विक अन्न प्राणशक्ती देते. अन्नालाच ‘पूर्णब्रह्म’ म्हटलेले आहे. अन्न ग्रहण करणे, हे नुसते ‘उदरभरण’ नसून ‘यज्ञकर्म’ आहे, असाही उल्लेख यात केला आहे. ‘ईश्वरी प्रसाद’ म्हणून सेवन केलेले अन्न हे ब्रह्मस्वरूप असून ते शरिराला पुष्टी आणि तुष्टी देते.’
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४. अन्नसेवन करतांना ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’
या सूत्राचे पालन न केल्याने आणि पाश्चात्त्य रितीचा अवलंब केल्याने होणारे दुष्परिणाम
अ. अन्नसेवनाचे नियम न पाळता पाश्चात्त्य
पद्धत अवलंबल्याने आरोग्यावर अनिष्ट परिणाम होणे
‘अन्नसेवन करणे हा दिनचर्येतील महत्त्वाचा भाग आहे. हिंदु धर्मातील ‘अन्नसेवन’ या आचारात सांगितलेले नियम सृष्टीच्या पालनाशी निगडीत आहेत. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत शरिराचे पोषण व्हावे आणि आरोग्य टिकून रहावे, यादृष्टीने अन्नसेवनाचे नियम घालून दिले आहेत. सध्याच्या रज-तमात्मक वातावरणात अन्नसेवन करतांना पाश्चात्त्य पद्धतीचे अनुसरण करून दूरचित्रवाणी पहाणे, एकमेकांशी बोलणे, लिहिणे, वाचणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. या सगळ्याचे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात.
आ. पाश्चात्त्यांच्या पद्धतीने अन्नसेवन केल्यास होणारी हानी
१. शरीर ईश्वरी चैतन्याचा स्रोत थेट ग्रहण करू न शकणे : अन्नसेवन करतांना बालपणापासूनच ‘वदनि कवळ घेता’चा संस्कार मनावर केला जातो. अन्नसेवन करतांना प्रत्येक घास आहुती दिल्याप्रमाणे ग्रहण केल्यास शरीर ईश्वरी चैतन्याचा स्रोत थेट ग्रहण करू शकते. अन्नसेवन करतांना वर उल्लेखिलेल्या कृती केल्यास आपण चैतन्याच्या स्रोताला मुकतो.
२. जेवतांना बोलल्याने अन्नपचनात बाधा येणे : ‘जेवतांना बोलू नये’, असे सांगितले आहे. अन्नसेवन करतांना बोलल्यास शरिरामध्ये जे रस निर्माण होतात, त्यात अडथळा निर्माण होऊन अन्नपचनात बाधा निर्माण होते.
३. जेवतांना रज-तमात्मक विचारांचे प्राबल्य असल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होणे
पूजितं ह्यशनं नित्यं बलमूर्जं च यच्छति ।
अपूजितं तु तद्भुक्तमुभयं नाशयेदिदम् ॥
– मनुस्मृती अध्याय २, श्लोक ५५
अर्थ : अन्न सदैव प्रेमादराने सेवन करणे हे बल आणि ओज (तेजस्विता, उत्साह) वाढविणारे होते. अनादराची वा तिरस्काराची भावना ठेवून अन्न खाल्ले असता ते बल आणि ओज यांचा नाशच करते.
अन्नसेवन करतांना मनात जेे विचार असतील, त्यांचा संस्कार मनावर होतो आणि त्यातून वृत्ती निर्माण होते. मनात रज-तमात्मक विचारांचे प्राबल्य असल्यास त्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो. पर्यायी शरिरात रज-तम गुण वाढतात. त्यामुळे अन्नसेवन करतांना केवळ अन्नसेवनाकडेच लक्ष केंद्रित करावे. (संदर्भ : मनुस्मृतीवरील स्वामी वरदानंद भारती यांचे भाष्य, पृष्ठ क्र. ६९)
इ. अन्नसेवन करतांना बोलण्यामुळे कार्यरत होणारे घटक
आणि आध्यात्मिक पातळीनुसार व्यक्तीवर होणारा परिणाम
संत आणि परात्पर गुरु यांची सर्व कर्मे ईश्वरेच्छेशी निगडित असल्याने त्यांच्या माध्यमातून सदैव चैतन्य प्रक्षेपित होत रहाते आणि त्याचा लाभ त्यांच्या सहवासात येणार्या व्यक्तींना होतो.
टीप १ : परात्पर गुरु आणि ईश्वर एकरूपच असल्याने त्यांच्यामध्ये त्रिगुण कार्यरत होत नाहीत.
टीप २ : ईश्वराशी एकरूप असल्याने त्यांच्याकडूनच चैतन्य प्रक्षेपित होत असते.
टीप ३ : विदेही असल्याने परिणामांचा संभव नाही.
टीप ४ : सर्व ईश्वरेच्छेनुसारच घडते.
ई. अन्नसेवन करतांना नामजप करणे श्रेष्ठ !
रज-तम गुणांचा प्रभाव सर्व देहांवर होत असल्याने शक्यतो नामजप करत अन्नसेवन करणे इष्ट असते. त्यामुळे अन्य गोष्टींचा संस्कार मनावर होत नाही. मनाचा सत्त्वगुण टिकून राहिल्यास पचनक्षमता वाढते. त्यामुळे बोलणे टाळायला हवे. समष्टी साधना करतांना पुष्कळ वेळा साधकांशी व्यष्टी साधना किंवा समष्टी कार्य यांच्या संदर्भात चर्चा करावी लागते. त्या वेळी ईश्वराला ‘अन्नसेवनाचा पूर्ण लाभ मिळू दे’, अशी प्रार्थना करावी.
प्रार्थना : ‘द्रष्ट्या ऋषिमुनींनी कलियुगात मानव अधःपतित होऊन रज-तम गुणांनी युक्त होईल, हे आधीच जाणले आणि संपूर्ण समाजाला लाभ व्हावा, यादृष्टीने धर्मशास्त्रात प्रत्येक कृतीचे नियम सांगून ठेवले आहेत. त्यांचे मानवजातीवरचे हे ऋण केवळ धर्माचरण करून आणि संपूर्ण समाजाला धर्माचरणाकडे वळवून अल्पांशाने फेडण्याचा प्रयत्न होवो, अशी गुरुचरणी प्रार्थना !’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०१३)
५. ‘आपल्याजवळ अन्न थोडे असले, तरी त्यातील काही
भाग दारी आलेल्या अतिथीला द्यावा’, हे औदार्य शिकवणारी हिंदु संस्कृती !
‘पूर्वी शिजवलेले अन्न विकत नसत. तेव्हा भोजनालये नव्हती, तर धर्मशाळा होत्या. जे पांथस्थ यात्रा करीत, ते मध्यान्हीला जेथे असत, तेथेच ‘अतिथी’ या नात्याने `ॐ भवति भिक्षां देहि । (हे माते, मला भिक्षा वाढ.)’ अशी प्रार्थना करायचे. ‘आपल्याजवळ अन्न थोडे असले, तरी त्यातील काही भाग दारी आलेल्या अतिथीला द्यावा’ हे औदार्य भारतियांमध्येच सापडते; मात्र या आमच्या औदार्याचा वेळोवेळी अनुचित लाभ घेतला गेला आणि कित्येक घरांमध्ये दुराचारी अतिथींनी प्रवेश करून घरच्या गृहिणीला लुबाडले, उदा. रामाच्या वनवासाच्या काळात अतिथीरूपाने येऊन रावणाने सीतेचे अपहरण केले.’ – धर्मभूषण सु.ग. शेवडे
अ. आपल्याजवळ अन्न थोडे असले, तरी त्यातील काही भाग
दारी आलेल्या अतिथीला दिल्यास त्याचा आशीर्वाद, तसेच पुण्य मिळणे
शास्त्र : ‘हिंदु संस्कृतीत अतिथीला देवासमान मानलेले आहे. ‘दारात आलेल्या अतिथीला अन्नाचा काही भाग देणे, म्हणजेच पुण्यसंचय करणे’, असे मानले जाते. अन्नाच्या तृप्तीतून जिवाची आत्मशक्ती जागृत होण्यास साहाय्य होत असल्याने आत्मशक्ती जागृत झालेल्या अतिथीस्वरूप जिवाकडून अन्न देणार्या जिवाला आशीर्वाददर्शक सदिच्छा मिळतात. या सदिच्छा इच्छाशक्तीच्या स्तरावर फलद्रूप होतात आणि अन्न देणार्या जिवाच्या मनोकामना पूर्ण करून देणार्या ठरतात, म्हणून अतिथीला अन्नदान करून त्याच्या आत्मशक्तीच्या आशीर्वादातून सदिच्छारूपी विचारसदृश प्रक्रियेतून त्या त्या स्तरावर ऊर्जा प्राप्त करून पुण्यसंचय करण्यासाठी जवळ अन्न थोडे असेल, तरी अतिथीला अन्न द्यावे, असे म्हटले आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण द्वादशी ४.३.२००८)
६. अन्न ‘ब्रह्मस्वरूप’ असणे
‘हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।
हें जीवनहेतुकारण । विश्वा यया ।। – श्री ज्ञानेश्वरी ३.१३३
संत ज्ञानेश्वर सांगतात, ‘अन्न हेच ब्रह्मस्वरूप आहे.’ जसे सर्व विश्व ब्रह्मातून उत्पन्न होते, ब्रह्मावरच जगते आणि ब्रह्मातच विलीन होते, तसेच सर्व प्राणीमात्र अन्नापासूनच उत्पन्न होतात, अन्नावरच जगतात अन् अन्नातच विलीन होतात.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अन्नं ब्रह्म। : खंड १’
अ. सात्त्विक अन्नसेवनातून निर्माण होणार्या देहातील
प्रदीप्त अग्नीतून पंचप्राण जागृत होऊन ते जिवाला ब्रह्मप्राप्तीचा
आनंद मिळवून देऊ शकत असल्याने अन्नाला ‘ब्रह्मस्वरूप’ म्हटले जाणे
शास्त्र : ‘सात्त्विक अन्नसेवन आणि पचनातील क्रियेने जठराग्नी प्रज्वलित आणि प्रदीप्त होतो. या तेजरूपी अग्नीच्या स्पर्शाने नाभीस्थित पंचप्राण जागृत होतात. या पंचप्राणांच्या जागृतीने देहातील अंतर्गत पोकळ्या निर्गुण स्तरावर कार्यरत होतात. हे पंचप्राण हळूहळू ऊर्ध्वगामी पद्धतीने कार्यरत होऊन अन्नातील सात्त्विकतेचे देहात प्रसारण करून जिवाच्या सुषम्ना नाडीला जागृती देतात. ही जागृती ब्रह्मस्वरूप, म्हणजेच अद्वैताचा आनंद देणारी असते. सात्त्विक अन्नसेवनातून निर्माण होणार्या देहातील प्रदीप्त अग्नीतून पंचप्राण जागृत होऊन ते ऊर्ध्वगामी पद्धतीने जिवाला सुषुम्ना जागृतीच्या टप्प्यातून अद्वैताकडे नेऊ शकतात, म्हणजेच ब्रह्मप्राप्तीचा आनंद मिळवून देऊ शकतात; म्हणून अन्नाला ‘ब्रह्मस्वरूप’ म्हटले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण द्वादशी ४.३.२००८, रात्री ९.५१)
७. अन्नदेवता
अ. अन्नदेव
अन्नदेव ही कृषीदेवता आहे.
आ. श्री अन्नपूर्णा
श्री अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्य पुरविणारी देवता. ही पार्वतीचा अवतार आहे. काशी नगरीमध्ये श्री अन्नपूर्णेचे देऊळ असून ‘त्या क्षेत्रातील समस्त जनता जेवल्याविना ती अन्नग्रहण करत नाही’, असे समजले जाते. चांद्रसेनीय कायस्थ समाजात गृहिणी आपला पती प्रवासाहून घरी येण्याच्या वेळी हिची पूजा करतात. हिच्या मस्तकावर पिवळ्या अक्षता वहातात आणि ‘घरी येणार्या थोर पाहुण्याचे (पतीचे) रक्षण कर’, अशी प्रार्थना करतात.
(श्री अन्नपूर्णादेवीविषयी अधिक ज्ञान ‘स्वयंपाकाशी संबंधित आचार’ या ग्रंथात दिले आहे.)
इ. श्रीविष्णु
श्रीविष्णु
१. श्रीविष्णु हा सृष्टीचा पालनकर्ता असल्याने तोच अन्नरसदेवता आहे.
(श्रीविष्णुविषयी अधिक ज्ञान सनातनच्या ‘श्रीविष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण’ या ग्रंथात दिले आहे.)
२. ‘विष्णुसहस्रनामातील श्रीविष्णूच्या नावांपैकी १४२ वे नाव ‘भोजन’, तर १४३ वे नाव ‘भोक्ता’ असे आहे, म्हणून ‘भोजनाय नमः’ आणि ‘भोक्त्रे नमः’, म्हणजेच ‘अन्नाला नमस्कार’ आणि ‘अन्न खाणार्याला नमस्कार’, असे म्हटले आहे.’