अनुक्रमणिका
५. हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. केवळ मानवाच्या जगण्याचा विचार केला, तर यातील ‘अन्न’ ही सर्वांत मुख्य आवश्यकता आहे. मानवी शरिराचे भरण-पोषण ‘अन्ना’मुळे होते. वेद-उपनिषदांमध्ये अन्नाचा उल्लेख सापडतो. आपण त्याविषयी थोडक्यात पाहू.
१. व्युत्पत्ती
सस्यं क्षेत्रगतं प्राहुः सतुषं धान्यमुच्यते ।
आमं वितुषमित्युक्तं स्विन्नमन्नमुदाहृतम् ।। – शब्दकल्पद्रुम
अर्थ : शेतातील पिकाचे कणीस म्हणजे ‘सस्य’. तूसयुक्त असते, ते ‘धान्य’. तूस काढल्यावर त्याला ‘आम (कच्चे अन्न)’ म्हणतात, तर ते शिजवले असता त्याला ‘अन्न’ असे म्हणतात.
२. व्याख्या
अ. अद्यते अस्मै इति अन्नम् । – विग्रहकोश
अर्थ : ज्याला खाल्ले जाते, ते ‘अन्न’ होय.
आ. ‘ज्या द्रव्यांची चव आणि वास चांगला असून जे दिसायला आकर्षक आहेत अन् जे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले असता पचन अन् शोषण झाल्यावर शरिराच्या पेशींची झालेली झीज भरून काढू शकतात, नवीन शरीरघटक निर्माण करू शकतात, शरिराला लागणारी शक्ती उत्पन्न करतात आणि मनाला तृप्ती अन् आनंद देतात, अशा द्रव्यांना ‘अन्न’ म्हणतात.’
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अन्नं ब्रह्म । : खंड १’
इ. ‘चित्ताला कारक वासनांची पूर्ती करणार्या घटकाला ‘अन्न’ म्हणतात. अन्नामुळे जडाचे (शरिराचे) पोषण होते.
समाधान : जेव्हा अन्नलहरी जिवाचे पोषण करतात, तेव्हा जिवाची तृप्ती होते, त्याला लौकिक अर्थाने ‘समाधान’ म्हणतात.’ (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून, भाद्रपद शु. सप्तमी, कलियुग वर्ष ५१११, २६.८.२००९ सकाळी ११.५६)
३. अन्नाचे महत्त्व
‘संपूर्ण विश्वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते. हे पाचही मिळविण्यासाठी आपण अन्नवान झाले पाहिजे आणि इतरांना अन्नवान केले पाहिजे.’ – तैतरीय उपनिषद
४. अन्नाचे सर्वसाधारण महत्त्व
१. अन्नमयं हि सोम्य मनः । – छांदोग्योपनिषद, अध्याय ६, खंड ६, वाक्य ५
अर्थ : मन हे अन्नाचे बनते.
२. ‘अन्न हे धातू, इंद्रिये, बल, तेज, संतोष, प्रतिभा आणि आरोग्य देते.
३. अन्न हे जीवन आणि शरिराचा प्राण आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, वडाळामहादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर.
४ अ. स्थूल शरीरधारणेसाठी अन्न अत्यंत आवश्यक असणे
१. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । – कुमारसंभव, सर्ग ५, श्लोक ३३
अर्थ : साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे माध्यम आहे. अशा शरिराच्या धारणेसाठी अन्न अत्यंत आवश्यक आहे.
४ आ. जीवनावश्यक क्रियांसाठी लागणारी ऊर्जा अन्नापासून मिळणे
‘मानवी शरिराला प्रत्येक क्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. चालणे, बोलणे, श्वासोच्छ्वास, अन्नपचन, हृदयगती, विचार करणे इत्यादी जीवनावश्यक क्रियांसाठी लागणारी ऊर्जा अन्नापासून मिळत असते.’
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अन्नं ब्रह्म । : खंड १’
४ इ. सुख देणारे, सुख निर्माण करणारे, द्वेषरहित आणि अद्वितीय मित्र असणारे अन्न !
हिंदूंना अन्नाचे महत्त्व फार प्राचीन काळापासून कळलेले आहे. अन्नाविषयी वेदांत ठिकठिकाणी प्रार्थना केलेली आढळते. हिंदूंची अन्नविषयक भावना भव्य आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात ‘अन्नस्तुती’ नावाचे स्तोत्र आहे. या स्तोत्रात ‘अन्न हे सुख देणारे, सुख निर्माण करणारे, द्वेषरहित आणि अद्वितीय मित्र असते’, असे अन्नाचे महत्त्व सांगितले आहे. वेदकाळात ‘सातू’ या धान्यावर विशेष भर होता. दही, तूप आणि मध हे पदार्थही ‘अन्न’ अन् ‘परम अन्न’ म्हणून सांगितले आहेत.
४ ई. मनुष्यात सर्व तत्त्वे येण्यासाठी ईश्वराने अन्नाचे माध्यम दिलेले असणे
मनात आलेला विचार : देवाने मनुष्याला केवळ वायूवर (हवेवर) जगू शकतो, असे का केले नाही ?
आतून आलेले उत्तर : प्रत्येक माणूस हा ईश्वराचा अंश असतो. ईश्वरामध्ये केवळ वायूतत्त्व नसते, तर सर्व तत्त्वे विलीन असतात; म्हणून प्रत्येक जिवात ती तत्त्वे विलीन होण्यासाठी ईश्वराने अन्नाला माध्यम केले आहे. ही सर्व तत्त्वे जिवाच्या साधनेसाठी पोषक असतात.’
– कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२००५, दुपारी १.२०)
५. हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व
१. ‘अन्नं न निंद्यात् । तद्व्रतम् । – तैत्तिरीयोपनिषद, भृगुवल्ली, अनुवाक् ७
अर्थ : अन्नाची निंदा करू नये, ते व्रत आहे.
२. अन्नं न परिचक्षीत । तद्व्रतम् । – तैत्तिरीयोपनिषद, भृगुवल्ली, अनुवाक् ८
अर्थ : अन्न टाकू नये, ते व्रत आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
५ अ. धान्य निर्माण करणे, त्याचे रक्षण करणे आणि ते पुढे
मिळण्याची सोय करणे, यांतून निरनिराळे सण अन् उत्सव यांची निर्मिती होणे
मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शेती करणे. शेती करून निर्माण झालेले धान्य उदरनिर्वाहासाठी वापरण्यात येते. अन्नसंचय हीच मानवाची प्राथमिक संपत्ती मानली गेली होती. धान्य निर्माण करणे, त्याचे रक्षण करणे आणि ते पुढे मिळण्याची सोय करणे, या अन्नधान्यविषयक चक्रातून काही सण अन् उत्सव यांची निर्मिती झाली. त्यांतून अन्नाचे महत्त्व गायले जायचे. आजही काही उत्सवांतून अन्नाचे महत्त्व गायले जाते. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत केले गेले. तेव्हापासून व्रजमंडलात अन्नकुटाचा उत्सव साजरा होतो. या दिवशी देवापुढे मिठाईच्या पदार्थांची रास उभारली जाते. या दिवशी राजस्थानमधील नाथद्वारा आणि काशी येथीलश्री अन्नपूर्णादेवीचे देऊळ या ठिकाणी भाताचे डोंगर रचतात, तर राजस्थानमधील उदयपूरमध्ये मिरवणूक काढली जाते. तसेच हत्तींची साठमारी दाखवली जाते आणि अग्नीक्रीडाही (दारूकामही) केली जाते.
५ आ. स्वतःचे शरीर हे ईश्वरप्राप्तीपर्यंत जाण्यासाठीचे
धर्मसाधन मानून त्याची काळजी घेण्यासाठी अन्न आवश्यक असणे
‘जीव साधनामार्गात मार्गक्रमण करू लागल्यावर ‘शरीरमाद्यं खलु धर्र्मसाधनम् ।’ म्हणजे ‘साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे माध्यम आहे’, हे धर्मवचन त्याच्या लक्षात येते. साधक जिवाचे ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च ।’ म्हणजे ‘स्वतःचा मोक्ष आणि जगाचे कल्याण’ हे ध्येय साध्य करेपर्यंत ईश्वरी कृपेने प्राप्त झालेले मानवी शरीर हे त्याचे धर्मसाधन असते. त्यामुळे तो स्वतःचे आरोग्य चांगले ठेवणे, हे परमकर्तव्यच समजतो. त्यासाठी तो शरिराला आवश्यक असे अन्न घेतो.’ – स्वामी विवेकानंद (श्री. धनंजय राजहंस यांच्या माध्यमातून, १४.१२.२००६, रात्री ९)