स्त्रियांनी घरी वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन करणे (सूक्ष्म-परीक्षण)
झाडापासून त्याची फांदी वेगळी केल्यास ती निर्जीव बनणे
आणि त्यामुळे वडाच्या झाडाच्या फांदीच्या पूजनाचा फारसा लाभ न होणे
झाडापासून त्याची एखादी फांदी वेगळी केली असता तिच्यातील सजीव धारणा संपते आणि ती फांदी निर्जीव बनते. वटपौर्णिमेच्या दिवशी काही स्त्रिया बाजारातून वडाच्या झाडाची फांदी आणून तिचे पूजन करतात; परंतु स्त्रियांना त्याचा फारसा लाभ होत नाही. असे पूजन करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अवयव वेगळा करून तिच्या त्या अवयवाचा वापर करणे होय.
१. वडाच्या झाडाच्या फांदीत तत्त्वस्वरूपात थोड्या प्रमाणात चैतन्य वलयस्वरूपात कार्यरत असणे
२. पूजन करणार्या सामान्य स्त्रीमध्ये भाव नसल्यामुळे कर्मकांड केल्याप्रमाणे केवळ करायची म्हणून कृती केल्याने तिच्यामध्ये भावनेचे वलय निर्माण होणे
३. वडाच्या झाडाच्या फांदीतील सजीवत्व संपल्यामुळे तिच्यात रज-तमप्रधान वलय निर्माण होणे
४. या वलयातून वातावरणात तमोगुणी प्रवाहांचे प्रक्षेपण होणे
५. वातावरणात तमोगुणी कणांचे प्रक्षेपण होणे
६. फांदीतील रज-तमप्रधान वलयातून पूजन करणार्या स्त्रीच्या दिशेने तमोगुणी प्रवाहाचे प्रक्षेपण होणे
७. स्त्रीमध्ये रज-तमप्रधान वलय निर्माण होणे
८. फांदीच्या वाळणार्या पानांवर वायूमंडलातील वाईट शक्तींनी आक्रमण करणे
व्यक्तीला स्वतःच्या सोयीनुसार देव हवा असतो; पण ते शक्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे पूजन करून कोणाला फारसा लाभ होत नाही.
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, रामनाथी, गोवा. (ज्येष्ठ शु. ८, कलियुग वर्ष ५१११ (३१.५.२००९))
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
वटपौर्णिमा या व्रताचे महत्त्व
अ. जीव-शिव एकरूपतेची अनुभूती येण्याची शक्यता
‘या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्त्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते. शक्तीरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असता जीव-शिव एकरूपतेची अनुभूती येऊ शकते. वायूमंडलातील शिवरूपी लहरींच्या गोलाकार भ्रमणामुळे देहात वैराग्यभावाची निर्मिती होऊ शकते. यामुळे माया त्यागातून होणारे ईश्वराचे अनुसंधानात्मक स्मरण शिवरूपी अधिष्ठानातून जिवाला मिळण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१)
आ. वडाच्या खोडाला सुती धाग्यांनी गुंडाळल्यामुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन ते दिवसभर वायूमंडलात प्रक्षेपित होत रहाणे
वट हा शिवरूपी आहे. वडाच्या खोडात गर्भशाळूंकेचा वास असतो. वडाच्या खोडाच्या उभ्या छेदावर जी सूक्ष्म-वलये असतात, त्या वलयांमध्ये सुप्त लाटांरूपी लहरींचे प्रमाण अधिक असते. या लहरी ब्रह्मांडातील शिवतत्त्व आकृष्ट करून घेतात आणि आवश्यकतेप्रमाणे वायूमंडलात प्रक्षेपित करतात. वटपौर्णिमा या तिथीला ब्रह्मांडात येणार्या शिवतत्त्वाच्या लहरी या क्रियाशक्तीशी निगडित असतात. ज्या वेळी वडाच्या खोडाला मध्यभागी सुती धाग्यांनी गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावऊर्जेप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात आणि सुती धाग्यांमध्ये संक्रमित होऊन बद्ध होतात. सुती धागा हा पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी निगडित असल्याने या सुती धाग्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन ते दिवसभर वायूमंडलात प्रक्षेपित होत रहाते. कालांतराने या लहरी भूमीतून दूरवर संक्रमित होतात. यामुळे संपूर्ण भूमी चैतन्यमय बनते.
शिवरूपी वडाची पूजा करणे, म्हणजे त्या वडाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची करूणामय भावाने पूजा करणे होय. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ति आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला लाभ मिळण्यास साहाय्य होते; म्हणून या दिवशी वडरूपातील शिवाला स्मरून पतीला दिर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करून कर्माला शक्ति-शिव यांची जोड देऊन ब्रह्मांडातील शिवतत्त्वाचा यथायोग्य लाभ करून घ्यायचा असतो.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १४.५.२००५, दुपारी १२.२९)
इ. वटपौर्णिमा या व्रताच्या पूजनामध्ये पाचच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र
‘कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्व दर्शक असल्याने पाच फळांच्या समूच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी अल्प कालावधीत जिवाच्या कोषांपर्यंत झिरपू शकतात. यामुळे जिवाला देवतेच्या चैतन्य लहरींचा खोलवर आणि दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते; कारण जिवाचा देह हाही पृथ्वी आणि आपतत्त्वात्मक आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, कलियुग वर्ष ५११०, १०.८.२००५, सायं. ६.३५)
ई. ‘सात जन्म एकच पती मिळावा’, असे व्रत करणे म्हणजे अनेकातून एकात आणि एकातून शून्यात जाणे
१. ‘स्त्री ‘सात जन्म हाच (एकच) पती मिळो’, असे व्रत करते. याचा अर्थ ती स्त्री अनेकातून एकात आलेली असते. तसेच एकपत्नीव्रत घेतलेला पुरुष अशा स्त्रीच्या जीवनात येण्याची शक्यता असते. अशा जोडीची देवाण-घेवाण एका जिवाशीच रहाते. तसेच अनेकातून एकात आल्याने साधनेद्वारे शुद्ध पुण्य मिळवून सुख-दुःखाच्या पलीकडे जाणे तिला शक्य होते. एकात आल्याने तिला पती (पतितांचा उद्धार करणारा), म्हणजे गुरु जीवनात येतात. त्यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत जीव-शिव ऐक्य साधणे शक्य होते.
या पूर्वीच्या युगात पतीच गुरुपदाचा अधिकारी असल्याने पती आणि गुरु एकच असत; मात्र सध्याच्या कलियुगात अन्य देहधारी गुरु जीवनात येतात. यासाठी व्यवहार करतांना पतीने पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे आणि आध्यात्मिक उत्कर्षासाठी पत्नीने पतीचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच एकपत्नीव्रत किंवा एकपतीव्रता पाळणारे पुरुष किंवा स्त्रिया काही प्रमाणात केवळ भारतामध्येच आढळतात. यावरून भारताचे साधना किंवा आध्यात्मिक उत्कर्ष यांसाठी किती महत्त्व आहे, हे लक्षात येते.
२. अनेकातून एकात आलेल्या जिवांना एकातून शून्यात जाण्यासाठी आणि स्त्रीला (शिष्य किंवा कुंडलिनीला) पतीची (म्हणजे शिवाची) आवश्यकता असते. एकनिष्ठेद्वारे एकत्वातून शून्यात प्रवेश शक्य असतो. वटसावित्री व्रत हे स्त्रियांसाठी (कुंडलिनी शक्तीसाठी) एकनिष्ठेतून (एकातून) शून्यात (सहस्रारमध्ये) प्रवेश करण्यासाठीचा मार्ग असतो.’
– आधुनिक वैद्य (डॉ.) चारुदत्त पिंगळे (सनातनचे २२ वे संत) यांच्या माध्यमातून, १०.९.२००६, दुपारी १२.१०