वास्तूशास्त्र – सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

Article also available in :

अनुक्रमणिका

हिंदु वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना, कोणार्क येथील सूर्यमंदिर

हिंदु वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना, कोणार्क येथील सूर्यमंदिर

‘वास्तूरचना करणे हे अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचे कार्य आहे. अनेक गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास, नैसर्गिक वातावरण, भूप्रदेश, तसेच वास्तूमालकाच्या आवश्यकता यांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच एखाद्या वास्तूचा आराखडा, ठराविक जागेवर विशिष्ट पद्धतीने बांधण्याचा विचार केला जातो. या प्रक्रियेत एक मूळ संकल्पना असते; तसेच इतर बारकाव्यांविषयी सविस्तर संकल्पना असतात. सर्वसामान्य ज्ञान, अनुभव, आवड आणि आवश्यक तेव्हा योग्य ते कार्य करूनच वास्तूची निर्मिती होत असते; परंतु हे पुरेसे नाही. वास्तूशास्त्रानुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्रे, पृथ्वी, तसेच अनेक ऊर्जास्रोतांचा वास्तूवर आणि वास्तू उपभोगल्यावर होणार्‍या इष्ट आणि अनिष्ट परिणाम यांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमतः समाजहिताचे असते.’

सहस्रो वर्षांपूर्वी निसर्ग, वास्तू आणि शरीर यांच्यामधील ऊर्जासंतुलन वास्तूशास्त्राच्या माध्यमातून साधण्याची कला महान द्रष्ट्यांना अवगत होती. घरातील प्रत्येक वस्तू कशी असावी आणि ती कुठे ठेवावी, याचा बारकाईने विचार करणारे श्रेष्ठ असे विवेचन हिंदु वास्तूशास्त्रात केले आहे. ‘घरात देवघर कुठे असावे, दागिन्यांचे कपाट कुठे ठेवावे, या आणि अशा अनेक बाबींवर निश्‍चित मार्गदर्शन करण्यात आले आहे.’

 

१. भारतीय वास्तूशास्त्राने केलेला विचार अन्य देशांत प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात नाही !

‘परदेशात प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात वास्तूच्या भक्कमपणावर भर देण्यात आला आहे, तर भारतीय वास्तूशास्त्रात भक्कमपणाबरोबरच त्या घरात रहाणार्‍या व्यक्ती, त्यांची मानसिक अवस्था आणि त्या व्यक्तींचे देवाशी असलेले नाते या गोष्टींचाही विचार केलेला आहे. दोन वास्तूशास्त्रांत मूलतः हा फरक असल्याचे सांगून अधिवक्ते वझे म्हणाले, ‘‘आपल्या वास्तूशास्त्राला सूर्यापासून निघणारे किरण, चुंबकीय आकर्षण आणि प्रमुख दिशा-पोटदिशा या तीन गोष्टींचा आधार आहे.’’’

– (दिशाचक्र, पृ. ८३, प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)

 

२. पाश्‍चात्त्य पद्धतीनुसार उभारलेल्या वास्तू १० वर्षांत कोसळतात
आणि भारतातील सहस्रो वर्षांपूर्वीची मंदिरे अद्यापही जशीच्या तशी आहेत !

पुरातन रामसेतू वा आजचे पूल
पुरातन रामसेतू वा आजचे पूल

कुठे सहस्रो वर्षांनंतरदेखील समुद्रात टिकणारा ‘रामसेतू’ बांधणारा स्थापत्यविशारद वानरयंत्रज्ञ नल, तर कुठे बांधकाम पूर्ण होण्याआधीच कोसळणारे पूल आणि अन्य इमारती बांधणारे आजचे भ्रष्ट स्थापत्यविशारद !

 

३. वास्तूकलेचा इतिहास !

भारतात वास्तूशास्त्र वेदकाळापासून अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे मिळतात. गृह्यसूत्रात वास्तूशास्त्राचे अनेक सिद्धान्त आढळतात. शुल्बसूत्रात यज्ञवेदीची रचना करतांना कोणत्या विटा वापराव्यात, हे सांगितले आहे. वाल्मीकि रामायणात नगरे, तट, किल्ले यांची वर्णने जागोजागी आढळतात.

वेदकाळापासूनच वास्तूशास्त्र विकसित झाल्याचा पुरावा म्हणून भारतातील देवालयांकडे पहाता येईल. या देवालयांचा इतिहास अभ्यासपूर्ण तपासला, तर असे आढळून येईल की, या देवालयांच्या निर्मितीमध्ये वेदान्त, योगशास्त्र यांखेरीज भूगोल, भौतिक, गणित, भूमिती आदी शास्त्रांचा, तसेच गुरुत्वाकर्षणादी नियमांचा वापर केलेला आहे. वैज्ञानिक तत्त्वांचा कलापूर्ण वापर करणारी ही देवालये ब्रह्मज्ञानप्राप्तीसह समाजधारणाही करत होती किंबहुना ‘देवालये’ ही त्या काळी समाजजीवनाच्या केंद्रस्थानी होती, असे आढळून येते.

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी

 

४. वेदकाळापासून विकसित झालेले वास्तूशास्त्र आणि
विज्ञान यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘हिंदूंची देवालये’ !

वेदकाळापासूनच वास्तूशास्त्र विकसित झाल्याचा पुरावा म्हणून भारतातील देवालयांकडे पहाता येईल. या देवालयांच्या निर्मितीमध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घातलेली आढळते. देवालयांच्या वास्तूशास्त्राचा अभ्यास करून त्याचे अवतरण समाजात करणे, हेच आजच्या विज्ञानयुगातील वास्तूशास्त्रज्ञांना मोठे आव्हान आहे.

 

५. चुंबकशक्तीचा वापर करून मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना करणे !

देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील सोमनाथ मंदिरातही चुंबकशक्तीचा वापर करून शिवलिंग अधांतरी ठेवण्यात आले होते, असे म्हणतात. कोणार्क येथील सूर्यमंदिर खूप भव्य होते. या मंदिरात चुंबकशक्तीचा वापर करून सूर्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंदिरातील चुंबकशक्तीचा सागरातील जहाजांवर परिणाम दिसून येत असे.

 

६. प्राचीन शिव-देवालयांचे वैशिष्ट्य !

शिव-देवालयाची रचना नैसर्गिकरीतीने वायू-निबद्ध (एअर कंडिशनिंग) केलेली आढळते. देवालयातील गाभारा खोल भूमीत निर्माण केलेला आढळतो.

६ अ. सूर्यकिरणांनुसार रचना – वेळेचा अंदाज देणारी कोणार्कच्या सूर्य मंदिराची चाके !

वेदान्त, योगशास्त्र यांखेरीज भौतिकशास्त्राचाही देवालयाच्या वास्तूनिर्मितीत विचार केलेला आढळतो. काही देवालयांमध्ये उत्कृष्ट दिक-बंधन (देवालयातील मूर्तीवर एका ठराविक दिवशीच सूर्योदयाची पहिली किरणे पडतील, अशी वास्तूरचना करणे) केलेले दिसते. काही देवालयांसमोर लहान लहान झरोके असे आहेत की, कोणत्याही ऋतूत सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात. पुण्याजवळील यवतजवळच्या टेकडीवर असे शिवमंदिर आहे.

कोणार्कचे सूर्य मंदिर ओडिशातील मध्ययुगीन वास्तूकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. एक विशाल रथासारखे प्रतित होणारे कोणार्कच्या सूर्य मंदिराला चाकांच्या १२ जोडया लागलेल्या आहेत. या भव्य रथाला ७ धष्टपुष्ट घोडे ओढत असल्याचे दिसते. रथाला लावलेली ही चाके घडयाळाचेसुद्धा कार्य करतात. ही चाकं साधारण नसून योग्य वेळ दाखवणारी घडयाळे आहेत. या चाकांच्या आसाची छाया अशी पडते की मास, तिथी आणि वेळ या बिनचूक कळू शकतात.

 

कोणार्क येथील सूर्यमंदिरातील चक्र
कोणार्क येथील सूर्यमंदिरातील चक्र

६ आ. वेरूळ

वास्तूशास्त्राच्या दृष्टीने वेरूळचे कैलास लेणे बघितले, तर आपल्या लक्षात येईल की, कशा रीतीने ते उभारले आहे. शिखरापासून खाली एका दगडामध्ये ते कोरत गेलेले आहेत, म्हणजे त्या वास्तूशिल्पींना कोणत्या स्तरापर्यंत त्या वास्तूरचनेचा विचार करावा लागला असेल ? त्यांना मोजमापनाच्या काय पद्धती वापराव्या लागल्या असतील आणि कशा रीतीने त्यांनी ते केले असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही, इतके हे भव्य आहे.

वेरूळ येथील कैलास लेणे
वेरूळ येथील कैलास लेणे

६ इ. नादशास्त्रावर आधारलेले देवालयाचे स्तंभ

कन्याकुमारीच्या देवालयात एका बाजूला सप्तस्वरांचे दगडी स्तंभ आहेत, तर दुसर्‍या बाजूला मृदुंगाचे ध्वनी स्तंभात बसवलेले आहेत. दगडाचा नाद विशिष्ट स्वरातच यावा, यासाठी याचा परीघ केवढा घ्यावा लागेल, दगडाला आतून किती पोकळ करावे लागेल, याचे बिनचूक गणित आणि शास्त्र त्यामागे आहे.

६ ई. हेमाडपंती देवालये

चिरा एकमेकांमध्ये बसवून केलेला हा वास्तूरचना-कौशल्याचा ठळक प्रकार आहे.

मयसभा म्हणजे भ्रम उत्पन्न होऊन जल न दिसता ‘भूमी आहे’, असे वाटत असे. ‘अगस्ति संहितेत सोन्याचे पाणी देण्याची विद्या (गोल्ड प्लेटिंग) सांगितलेली आहे.’ महाभारतात याचा उल्लेख आहे.

– डॉ. पद्माकर विष्णू वर्तक, मासिक भाग्यनिर्णय

६ उ. वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षा व्यवस्था असलेला गोवळकोंडा येथील किल्ला !

गोवळकोंडा किल्ला

‘मी एका किल्ल्यातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशास्त्राच्या संदर्भात आलेला एक अनुभव सांगतो. हैद्राबाद येथे गोवळकोंडा भागात एक किल्ला आहे. तेथे पूर्वी राजा रहात होता. किल्ल्याभोवती ४ – ५ संरक्षक भिंती आहेत. त्या फार उंच आहेत. शत्रूने आक्रमण केल्यावर त्यातील २ – ३ भिंती तोडल्या, तरी किल्ला सुरक्षितच रहात असे. शेवटी चौथ्या भिंतीच्या आत शत्रूने हळूच पाय ठेवला, तरी त्या भिंतीच्या सर्वांत वरच्या बाजूला धडधड असा नाद येत असे. त्यामुळे शत्रू किती जवळ आला आहे, याचा राजाला अंदाज घेता येऊन अन्य सुरक्षित ठिकाणी जाणे किंवा आक्रमण करणे यांविषयी निर्णय घेता येत असे.’ – श्री. विनोद यादव, वैशाली, बिहार

६ ऊ. उपग्रहाच्या ‘रेंज’मध्ये येऊ न शकणारे स्थळ – शिवथरघळ !

शिवथरघळ

‘नेटवर्क’ असूनही शिवथरघळ येथून भ्रमणभाष करता येत नाही. ‘सिग्नल’ मिळूनही भ्रमणभाष का करता येत नाही ?’, यावर एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय शास्त्रज्ञाने एक आठवडा शिवथरघळ येथे राहून संशोधन करून लेख लिहिला आहे. तो पुढे थोडक्यात दिला आहे.

‘शिवथरघळ येथील मोकळ्या आकाशाखाली जर्मन, चिनी, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची ‘रेंज’ येईना. हा चमत्कारच होता. उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते; पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते, म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते, जे उपग्रहांच्या ‘फ्रिक्वेन्सिज्’खाली पोचू देत नव्हते. ते यंत्र हाताळणारी व्यक्ती म्हणाली, ‘‘मी पूर्ण जग फिरलो, परंतु जराही ‘फ्रिक्वेन्सी’ नसलेली अशी केवळ हीच एक जागा पाहिली.’’ ‘समर्थ रामदासस्वामी यांनी किती सूक्ष्म स्तरावर अभ्यास करून ही जागा निवडली आहे !’, याची प्रचीती येते.

(सौजन्य : सोशल मीडिया)

६ ए. किरणोत्सव होऊ शकेल अशी श्री महालक्ष्मी मंदिराची रचना !

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात प्रतिवर्षी २ वेळा किरणोत्सव होतो. मंदिराची उभारणी करतांना पृथ्वीच्या गतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आलेला आहे. सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा अचूक अभ्यास केलेला आहे. सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण प्रारंभाच्या वेळी होणारा किरणोत्सव हा पुरातन काळातील प्रगत स्थापत्य आणि खगोल शास्त्राचा एक अभूतपूर्व असा सुरेख संगमच आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गरूड मंडपापासून गर्भगृहात १८५ मीटर आत असणार्‍या महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर सूर्यास्ताची किरणे पडतात. या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्ताची किरणे देवीच्या पायापर्यंत, दुसर्‍या दिवशी मध्यापर्यंत आणि तिसर्‍या दिवशी पूर्ण मूर्तीवर विराजमान होतात.

अधिक माहिती वाचा… श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील किरणोत्सवाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

 

६ ऐ. आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असलेले आणि
सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘आयुरगृह’, म्हणजे आयुर्वेदीय घर !

आयुरगृह

‘मनुष्याचे आयुष्य काही वर्षांचे असते, तर देवता चिरंतन आहेत. त्यामुळे भारतात प्राचीन काळापासून मनुष्यासाठी काही दशके वा शतके टिकू शकतील अशी मातीची घरे बनवण्यात येत असत, तर देवतांच्या मूर्तींची स्थापना सहस्रो वर्षे टिकू शकणार्‍या दगडी मंदिरांमध्ये केली जात असे. मातीची घरे बनवतांनाही आयुर्वेद, वास्तूशास्त्र आदी शास्त्रांत दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असे. अशा घरांना केरळमध्ये ‘आयुरगृह’ म्हणतात. घरे बनवण्यासाठी वापरायच्या मातीमध्ये काही वनस्पतींचा वापर केला जात असे. ही घरे आरोग्यासाठी पूरक असल्याने त्यांना ‘आयुरगृह’ म्हणतात.

अधिक माहिती वाचा…आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असलेले आणि सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘आयुरगृह’, म्हणजे आयुर्वेदीय घर !

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment