आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्रीकृष्ण या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।
अर्थ : सर्व दुःखांचे हरण करणार्या, भक्तांच्या पीडा, क्लेष दूर करणार्या, शरणागतांना अभय देणार्या अन् निस्सीम भक्तांना आनंद प्रदान करणार्या, वासुदेव कृष्णाला माझा नमस्कार असो !
या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाची निरनिराळी गुणवैशिष्ट्ये स्मरून त्याला नमन केले आहे. असे केल्याने भक्ताचा श्रीकृष्णाप्रती भाव निर्माण होऊन तो त्याच्या कृपेस पात्र होतो.
श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !
कुशल राजनीतिज्ञ, महान तत्त्ववेत्ता, समाजरक्षण हेच ध्येय असणारा, सामाजिक कर्तव्यांबाबत दक्ष असणारा, सर्वकाही इतरांच्या कल्याणासाठीच करणारा, अन्याय सहन न करणारा, दुर्जनांचा नाश करणारा आणि अर्जुनाला गीता सांगणारा, ही श्रीकृष्णाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
‘श्री’ या अक्षराचा अर्थ
‘श्रीकृष्ण’ या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय अथवा संग्रह. आपल्या नावाच्या आधी ‘श्री’ लावतात. त्यात ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम असतो; कारण ते ‘श्रीयुत’चे संक्षिप्त रूप आहे. आपण श्रीयुत असतो, म्हणजे ‘श्री’ ने युक्त असतो, म्हणजेच आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट ‘श्रीकृष्ण’ या नावामध्ये ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम नाही; कारण ‘श्रीकृष्ण’ हा स्वतःच भगवंत आहे.
श्रीकृष्णाची पूजा कशी करावी ?
भगवान श्रीकृष्णाच्या पूजेपूर्वी उपासकाने स्वतःला मध्यमेने, म्हणजे मधल्या बोटाने उभे दोन रेषांचे गंध लावावे किंवा भरीव उभे गंध लावावे़ श्रीकृष्णाच्या पूजेत त्याच्या प्रतिमेला गंध लावण्यासाठी गोपीचंदन वापरतात. श्रीकृष्णाची पूजा करतांना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्रीकृष्णाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहावे. अंगठा आणि अनामिका जोडून तयार होणार्या मुद्रेमुळे पूजकाच्या शरीरातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.
श्रीकृष्णाला तुळस का वहातात ?
देवतेची पवित्रके म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण. ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा वस्तू त्या देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेच्या मूर्तीत देवतेचे तत्त्व येते आणि त्यामुळे देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. तुळशीमध्ये कृष्णतत्त्व भरपूर प्रमाणात असते. काळी तुळस हे श्रीकृष्णाच्या मारक तत्त्वाचे, तर हिरव्या पानांची तुळस हे श्रीकृष्णाच्या तारक तत्त्वाचे प्रतीक आहे. यासाठीच श्रीकृष्णाला तुळस वहातात.
श्रीकृष्णाला कोणती फुले वहावीत ?
कृष्णकमळाच्या फुलांमध्ये श्रीकृष्णाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत अधिक असल्याने ही फुले श्रीकृष्णाला वाहावीत. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार श्रीकृष्णाला फुले वहातांना ती तीन किंवा तीनच्या पटीत अन् लंबगोलाकार आकारात वाहावीत. श्रीकृष्णाला अत्तर लावतांना चंदनाचे अत्तर लावावे.
श्रीकृष्ण म्हणजे ‘पूर्णावतार’ !
श्रीकृष्ण हा एकाच वेळी इच्छा, क्रिया अन् ज्ञान या तीनही शक्तींच्या स्तरांवर कार्य करू शकतो; म्हणून त्याला ‘पूर्णावतार’ असे म्हटले आहे.
श्रीकृष्णाला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?
श्रीकृष्णाला किमान चार किंवा चारच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक प्रदक्षिणा घालायच्या झाल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणांच्या संख्येच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते.
जगद्गुरु कृष्ण
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । म्हणजे जगद्गुरु कृष्णाला वंदन करतो. सर्व देवांत फक्त कृष्णालाच जगद्गुरु संबोधले आहे. याचे कारण हे की, त्याने कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग इत्यादी योगमार्ग शिकवलेले आहेत.
खुप छान माहीती.
Man Prasanna zale. khup aanand zala.
First time ashi chan puja keli.- A.D.kasar.