कर्नाटकातील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची साधकाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

‘हळदीपूर (जिल्हा उत्तर कन्नड), कर्नाटक येथील श्रीसंस्थान हळदीपूरचे मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी १९.९.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमास भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचा रामनाथी आश्रम दाखवतांना माझ्या लक्षात आलेली त्यांची स्थूल आणि आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

 

१. शिकण्याची तीव्र तळमळ असणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

आश्रमदर्शनाच्या आरंभी चित्रीकरणाच्या दृष्टीने साधकांनी त्यांना ध्वनीक्षेपक (माईक) लावण्याची प्रार्थना केली. या वेळी प.पू. स्वामी यांनी ‘मी इथे मार्गदर्शनाला नाही, तर  शिकण्यासाठी आलो आहे. मला तुम्हा सर्व साधकांकडून पुष्कळ शिकायचे आहे.’, असे पुष्कळ नम्रपणे आणि प्रेमाने सांगितले. त्यांचे सांगणे केवळ वरवरचे किंवा शाब्दिक नव्हते. पुढील प्रसंगांतून त्याची प्रचीती येते.

अ. आश्रमदर्शन करतांना त्यांनी ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’(टीप) उपकरण कसे कार्य करते ? संशोधन कशा प्रकारे केले जाते ? दैवी बालकांना कसे ओळखायचे ?, असे अनेक प्रश्‍न जिज्ञासेने विचारून त्याची माहिती घेतली.

(टीप : ‘यु.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाचे निर्माते डॉ. मन्नम मूर्ती यांनी त्यांच्या संकेतस्थळावर ‘यु.टी.एस्.’ या उपकरणाचे संबोधन पालटून ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ असे केले आहे.)

आ. आश्रमात आपोआप उमटलेल्या ‘ॐ’ रूपी दैवी चिन्हांवर साधकांचे चुकून पाय पडू नयेत, म्हणून त्यांना रिंग लावण्यात आली आहे, तसेच धार्मिक विधी केलेले स्थानाच्या ठिकाणी ‘कृपया पाय ठेवू नये’, अशा सूचना लिहिण्यात आल्या आहेत. याचे कारण प.पू. स्वामीजींनी आवर्जून विचारले.

इ. आश्रमात विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि अन्य सूचना त्यांनी लक्षपूर्वक वाचल्या. मूलतः ते केरळचे असल्याने त्यांना हिंदी भाषा वाचण्यात अडचण येत होती, तरी त्यांनी फलक वाचून न कळलेल्या शब्दांचे अर्थ जिज्ञासेने समजून घेतले.

ई. सर्व भक्तांना माहिती कळावी म्हणून त्यांनी आरंभी मराठी भाषेत आश्रमदर्शन करायला सांगितले. मी मूलतः भोपाळ, मध्यप्रदेश म्हणजे हिंदी भाषिक क्षेत्रातून आहे, असे त्यांना समजल्यावर स्वतःला हिंदी शिकता यावी म्हणून त्यांनी हिंदी भाषेत मला आश्रमदर्शन करायला सांगितले.

 

२. प्रेमाने आणि आपुलकीने साधकांची चौकशी करणारे
अन् त्यांच्यावर लक्ष ठेवणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

श्री. निषाद देशमुख

प.पू. स्वामी यांनी आश्रमदर्शन करतांना साधकांची प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली. आश्रमदर्शन करतांनाही त्यांचे लक्ष साधकांकडे होते. या संदर्भातील काही प्रसंग पुढे दिले आहे.

अ. काही वर्षांपूर्वी प.पू. स्वामी यांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी भेटलेले साधक त्यांना आश्रमदर्शनाच्या वेळी परत भेटल्यावर त्यांनी आपुलकीने त्यांची चौकशी केली. यांतून प्रेमामुळे काही वर्षांपूर्वी भेटलेल्या साधकांनाही त्यांनी स्मरणात ठेवले आहे, असे लक्षात आले.

आ. सूक्ष्म ज्ञान-प्राप्तकर्ते साधक आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांना भेटतांना त्यांनी त्यांचे मूळ गाव कुठले ? किती वर्षांपासून साधनेत आहेत ? कुटुंबात कोण कोण आहे ?, अशा आस्थेने चौकशी केली.

इ. मोठ्या संख्येत साधक आश्रमात रहात असल्याचे कळल्यावर त्यांनी ‘तुम्हाला निवास किंवा जेवणाच्या काही अडचणी नाही ना ?’, अशी विचारपूसही केली.

ई. भावसत्संगात काही कारणास्तव विलंब होत होता, त्या वेळी त्यांनी चित्रीकरणासाठी उभ्या असलेल्या साधकांना आवर्जून बसण्यासाठी सांगितले. ‘सेवा असतांना तुम्हाला उभे रहायचे आहेच, आता वेळ असतांना तुम्ही बसा. आपण सगळे एक आहोत, त्यामुळे औपचारिकता नको’, असे त्यांनी पुष्कळ प्रेमाने सांगितले. त्यांचे आज्ञापालन म्हणून साधकही खाली बसले.

 

३. परेच्छेने वागणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

आश्रमदर्शन करतांना प.पू. स्वामी परेच्छेने वागत होते. त्यांना आम्ही जशी प्रार्थना केली, तसे ते वागत होते. त्यांना दुसर्‍या कार्यक्रमासाठी जाण्याची घाई होती. असे असतांनाही त्यांनी शांतपणे आणि जिज्ञासेने आश्रमदर्शन, तसेच साधकांशी चर्चा केली. आश्रमदर्शन झाल्यावर त्यांनी ‘साधकांचे समाधान झाले, हेच मला हवे होते’, असे सांगितले. यांतून त्यांना स्वेच्छा नसून परेच्छेने त्यांचे पूर्ण वागणे असल्याचे लक्षात आले.

 

४. क्षमाशील प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

एका प्रसंगात आम्हा साधकांकडून त्यांना निरोप सांगतांना चूक झाली, त्या वेळी त्यांनी योग्य प्रकारे त्या चुकीची जाणीव करून दिली. साधकांनी झालेल्या चुकीच्या संदर्भात त्यांची क्षमायाचना केल्यावर त्यांनी हसून प्रतिसाद दिले आणि पुढे कुठेही साधकांना वेगळेपणा जाणवू दिला नाही.

 

५. स्वतः शिकण्याच्या स्थितीत असून त्यांच्या
भक्तांनाही शिकण्याच्या स्थितीत ठेवणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

पूर्ण आश्रमदर्शन घेतांना प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी स्वतः शिकत होते. यासमवेत त्यांचे इतर भक्तही शिकत आहेत ना ? याकडे कटाक्षाने लक्ष देत होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. मी माहिती सांगतांना ‘त्यांच्या समवेत आश्रमदर्शन करणार्‍या भक्तांपैकी कोणी अनुपस्थित नाही ना ?’, याकडे ते कटाक्षाने लक्ष द्यायचे. सेवेनिमित्त काही भक्त आले नसल्यास त्यांना आल्यावर ते माहिती सांगायला सांगायचे.

आ. माझ्याकडून माहिती सांगून झाल्यावर सर्व भक्तांना ‘माहिती कळली ना ?’, असे ते स्वतः विचारायचे. भक्तांना माहिती सुस्पष्ट झाली नसल्यास ते स्वतः त्यांना माहिती सांगायचे.

इ. आश्रमाच्या भोजनकक्षातील चुकांच्या फलकावर एका साधिकेने संत सेवेत तिच्याकडून झालेली चूक लिहिली होती. त्यांनी ती चूक पूर्णपणे वाचली, तसेच त्यांच्या भक्तांनाही त्यांच्याकडूनही अशीच चूक होत असल्याची जाणीव करून दिली. यासमवेत चुका टाळण्यासाठी अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आचरणात आणण्यासाठी सांगितले.

ई. जन्मतः संत असलेले पू. (चि.) भार्गवराम प्रभु आणि पू. (चि.) वामन राजंदेकर यांच्या संदर्भात माहिती घेतांना त्यांनी त्यांच्या संपर्कातही अशाच प्रकारे एक दैवी बालक असल्याचे सांगून त्याच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती सांगितली.

यांतून ते स्वतः शिकण्याच्या स्थितीत असून त्यांच्या भक्तांनाही शिकण्याच्या स्थितीत ठेवत असल्याचे लक्षात आले.

 

६. भक्तांना मानसिक स्तरावर न ठेवता
आध्यात्मिक स्तरावर वागणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते भक्तांना मानसिक स्तरावर न ठेवता आध्यात्मिक स्तरावर त्यांच्याशी वागत होते. या संदर्भात लक्षात आलेले काही प्रसंग पुढे दिले आहे.

अ. काही वर्षांपूर्वी आश्रमाला भेट दिल्यावर प.पू. स्वामी यांनी त्यांच्या भक्तांना आश्रमात येऊन शिकण्यासाठी सांगितले होते, तसे त्यांच्या भक्तांकडून झाले नाही. याची जाणीव त्यांनी अन्य एका संतांच्या समोर सुस्पष्टपणे त्यांच्या भक्तांना करून दिली. या वेळी त्यांच्यातील मनमोकळेपणा गुणही लक्षात आला.

आ. प.पू. स्वामी यांच्या भक्तांनी आश्रमात त्यांच्या लक्षात आलेली एक चूक साहाय्य म्हणून सांगितली. ती चूक साधकांनी स्वीकारून चूक लक्षात आणून दिल्याविषयी भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी प.पू. स्वामी यांनी त्यांच्या भक्तांना ‘स्थुलातील चुकीकडे लक्ष देण्याऐवजी साधक चूक नम्रतेने कशा प्रकारे स्वीकारतात ?’, हे शिकण्यासाठी सांगितले.

 

७. अल्प अहंभावामुळे गुरुस्वरूप असूनही
शिष्यत्वाने वागणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी त्यांच्या अनेक भक्तांसाठी गुरुस्वरूप आहेत. सर्वसाधारणतः संत गुरुस्वरूप झाले, तर शिष्यांना शिकवण्यासाठी त्यांच्यातील अहं जागृत होतोे. यामुळे त्यांना शिष्यावस्थेत रहाण्यास अहंचा अडथळा निर्माण होते. अत्यल्प संत त्या अहंवर मात करून शिष्यभावाने वागू शकतात.

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. खडतर व्यष्टी साधनेने त्यांनी त्यांच्या अहंवर मात केली आहे. त्यांच्या अल्प आणि सात्त्विक अहंभावामुळे गुरुस्वरूप असूनही शिष्यत्वाने वागणे अन् इतरांकडून शिकणे त्यांना शक्य होते.

 

८. प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांची सूक्ष्म स्तरावरील अन्य गुणवैशिष्ट्ये

अ. प.पू. स्वामींमधील ब्राह्मतेजाच्या प्रगटीकरणामुळे त्यांच्या चेहर्‍याभोवती सूक्ष्मातून पिवळ्या रंगाची मोठी प्रभावळ सतत कार्यरत असते.

आ. प.पू. स्वामी यांचा चेहरा पुष्कळ तेजस्वी आहे. याचे कारण सूक्ष्मातून त्यांच्या चेहर्‍यावर कार्यरत तेजोमय प्रकाश असून त्याचे स्रोत त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी आहेत. धर्म आणि गुरुपरंपरा यांवरील निष्ठा अन् ईश्‍वराशी असलेले आंतरिक अनुसंधान यांमुळे त्यांचे अनाहतचक्र जागृत असून त्याच्या तेजामुळे त्यांचा चेहरा तेजस्वी दिसतो.

इ. सूक्ष्मातून प.पू. स्वामी यांच्याकडून ७-१० फूट अंतरापर्यंत केशरी रंगाची शक्ती सतत प्रक्षेपित होत असते. त्यांनी केलेल्या त्यागपूर्ण व्यष्टी साधनेमुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या धर्मशक्तीचे हे प्रतीक आहे.

ई. प.पू. स्वामींकडून चैतन्य आणि आनंद मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. यामुळे त्यांच्या जवळ गेल्यावर मन निर्विचार होऊन आनंदाची अनुभूती येते.

उ. प.पू. स्वामी यांच्यातील परेच्छा आणि शिष्यत्व यांमुळे त्यांना विश्‍वमनाकडून विचार ग्रहण करून तसे वागता येते.

ऊ. प.पू. स्वामी साधक किंवा भक्त यांना आशीर्वाद देण्यासाठी हात वर करतात, त्या वेळी त्यांच्या हातातून तेजतत्त्वप्रधान शक्ती प्रक्षेपित होते. यामुळे साधकांना सगुण आणि निर्गुण दोन्ही स्तरांवर त्यांच्या आशीर्वादाचा लाभ होतो.

ए. प.पू. स्वामी यांच्यात पुष्कळ प्रमाणात असलेल्या प्रीतीमुळे अन्य संतांच्या तुलनेत त्यांच्या डोळ्यांतून १० टक्के अधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होते.

– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

सूक्ष्मातील ज्ञान असणारे प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी

‘प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांना सूक्ष्मातील ज्ञानही आहे. पुढील प्रसंगांतून याची प्रचीती मिळाली.

१. आश्रमाच्या स्वागतकक्षात साधकांच्या उत्कट भावामुळे जागृत झालेल्या श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे बघून त्यांनी ‘धर्मसंस्थापनेसाठी प्रत्यक्ष श्रीकृष्णच अवतरला आहे’, असे सांगितले.

२. आश्रमातील यज्ञकुंडाच्या ठिकाणी एका संतांकडून नियमित पूजा आणि हवन करण्यात येत आहे. प.पू. स्वामी यांच्या आगमनामुळे यज्ञकुंडाची रचना पालटण्यात आली होती. त्यामुळे तिथे पूजन होते, हे स्थुलातून कळणे कठीण होते, तसेच हवन होऊनही ३-४ घंटे (तास) झाले होते. असे असतांनाही पूजा आणि हवन यांच्या ठिकाणी प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामी उभे राहिल्यावर ते स्थान उष्ण असल्याचे त्यांनी सांगितले.’

– श्री. निषाद देशमुख
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment