महापुरासारख्या भीषण आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी साधना करून आत्मबळ वाढवा !

Article also available in :

‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, तिसरे महायुद्ध अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जाते आणि तिचे मनोधैर्यही खचते. काही प्रसंगी ती अयोग्य कृती करण्याची वा निर्णय घेण्याचीही शक्यता असते. अशा स्थितीला धैर्याने सामोेरे जाण्यासाठी दैनंदिन जीवनात नामजपादी साधनेचे प्रयत्न करून आत्मबळ निर्माण करणे आवश्यक असते.

‘आपत्कालीन स्थितीतही साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येतील ?’, याविषयीची सूत्रे खाली दिली आहेत.

 

१. देवाला प्रार्थना करणे

भगवान श्रीकृष्ण, ग्रामदेवता, स्थानदेवता आणि वास्तूदेवता यांना प्रत्येक १५ मिनिटांनी किंवा अर्ध्या घंट्याने मनोभावे प्रार्थना करावी, ‘हे देवते, आम्ही तुला शरण आलो आहोत. तूच आम्हाला तारून ने. माझ्याकडून तुझा नामजप सातत्याने होऊ दे. मी, माझे कुटुंबीय आणि माझे घर यांच्याभोवती तुझ्या नामजपाचे संरक्षक-कवच निर्माण होऊ दे.’

 

२. अधिकाधिक नामजप करणे

दिवसभरातील अधिकाधिक वेळ भगवान श्रीकृष्ण वा कुलदेवता अथवा इष्टदेवता यांचा नामजप करावा. कलियुगात ‘देवतेचे नाम हाच आधार’ असल्याने मनातल्या मनात नामजप चालू ठेवावा. नामजप लावण्याची सोय असल्यास भ्रमणभाषवर वा स्पीकरवर नामजप लावावा. यामुळे नामजप करण्याची आठवण राहील.

 

३. इतरांना सहकार्य करतांना भाव कसा ठेवावा ?

या आपत्तीमध्ये सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, तसेच मानसिक आधार देऊन भगवंतावरील श्रद्धा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘सामाजिक बंधुत्व पाळणे’, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्यच आहे; पण इतरांना साहाय्य करतांना ‘मी साहाय्य करत नसून देवच माझ्याकडून हे करून घेत आहे’, या भावाने नामजप करत साहाय्य करावे. त्यामुळे आपल्या मनात कर्तेपणाचे विचार येणार नाहीत, तसेच त्या व्यक्तीशी देवाणघेवाण हिशोबही निर्माण होणार नाही.

 

४. स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची तीव्रता न्यून होण्यासाठी प्रयत्न करणे

अशा परिस्थितीत लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकटीकरण होण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते.

४ अ. काळजी वाटत असल्यास पुढील स्वयंसूचना घेता येईल ! (‘अ २’ स्वयंसूचना पद्धत)

प्रसंग : अतीवृष्टीमुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले आहे.

स्वयंसूचना : ज्या वेळी शहरातील पूरस्थिती पाहून ‘आता आपले आणि घराचे काय होईल ?’ असे काळजीचे विचार माझ्या मनात येतील, त्या वेळी ‘मी वर्तमानकाळात राहिल्यास या समस्येला तोंड देऊ शकणार आहे. भगवंतालाही तेच आवडणार आहे. घरातील साहित्य पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, तसेच कुटुंबियांना साहाय्य करणे आणि आधार देणे, हे वर्तमानकाळातील माझे कर्तव्य / साधना आहे’, याची मला जाणीव होईल अन् मी कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेळोेवेळी शिकायला मिळालेल्या सूत्रांचा अवलंब करून नामजप करत योग्य ती कृती करीन.

४ आ. भीती वाटत असल्यास पुढील प्रकारे प्रसंगाचा सराव करणे आवश्यक ! (‘अ ३’ स्वयंसूचना पद्धत)

ज्या प्रसंगाची भीती वाटते, त्या प्रसंगाला सामोरे जाण्यापूर्वी ‘अ ३’ या स्वयंसूचना पद्धतीनुसार प्रसंगाचा सराव करावा. या स्वयंसूचनेचे उदाहरण खाली दिले आहे.

प्रसंग : ‘बर्‍याच शहरांत पूरग्रस्त स्थिती आहे’, याविषयीची वृत्ते मी दूरचित्रवाणी संचावर पाहिली. त्यानंतर ‘आमच्या घराजवळही नदी आहे, तर त्या नदीलाही पूर येईल. पूर आल्यास आम्हाला सुरक्षित ठिकाणी जायला सांगतील. इतरत्र स्थलांतरित होणे मला जमेल का ?’, या विचाराने भीती वाटली.

१. आमच्या घराजवळ असलेल्या नदीला पूर आल्याने नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी आम्हाला दुसरीकडे स्थलांतरित होण्यास सांगितले आहे.

२. ‘या स्थितीतून मला सुखरूप बाहेर काढ’, अशी मी देवाला आर्ततेने प्रार्थना करत आहे.

३. मी आवश्यक तेवढे साहित्य घेऊन कुटुंबियांसह घरातून बाहेर पडत आहे.

४. ‘आपत्कालीन परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे ?’, याचे ज्ञान असलेले काही सहकारी माझ्यासह आहेत. त्यांच्या साहाय्याने मी पुराच्या पाण्यातून वाट काढून पुढे पुढे जात आहे. जेथे जास्त पाणी आहे, तेथे सतर्क राहून मी मार्ग काढत आहे. मी मनातल्या मनात प्रार्थना आणि नामजप करत आहे.

५. ज्या वेळी मला काही समस्या उद्भवत आहेत, त्या वेळी सहकार्‍यांचे साहाय्य लाभून देवाची कृपा अनुभवता येत आहे. त्यामुळे मन आश्‍वस्त होऊन माझी देवावरील श्रद्धा वाढत आहे.

६. भगवंताच्या कृपेमुळे मी सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित पोचत आहे.

७. देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी सर्व साहित्य व्यवस्थित लावत आहे.

स्वयंसूचनांच्या संदर्भातील अधिक माहिती सनातनच्या स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया या ग्रंथमालिकेत दिली आहे. स्वभावदोष-निर्मूलन ग्रंथमालिका पहाण्यासाठी खालील मार्गिकेवर भेट द्या.

व्‍यक्‍तीमत्त्व-विकास

 

भगवंतावर भक्त प्रल्हादासारखी अढळ निष्ठा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा !

भगवंतावर श्रद्धा असेल, तर कोणत्याही संकटातून तारून जाण्याचे बळ मिळते. भक्त प्रल्हादाचे उदाहरण सर्वश्रुत आहे. मोठमोठी संकटे ओढवूनही प्रल्हादाची देवावरील श्रद्धा यत्किंचितही ढळली नाही. प्रत्येक वेळी तो अतिशय श्रद्धेने ‘नारायण, नारायण’ असे आळवत राहिला. त्याची आर्त हाक ऐकून प्रत्यक्ष भगवंत त्याच्यासाठी नृसिंहाचे रूप घेऊन धावून आला.

‘मनुष्याची भगवंतावर किती अतूट आणि अढळ श्रद्धा असायला हवी’, हे या उदाहरणावरून लक्षात येते. भक्तीची अशी उच्च स्थिती गाठण्यासाठी साधनेविना पर्याय नाही. नित्यनेमाने साधनेचे प्रयत्न करणे, ही भगवंतावर अढळ श्रद्धा निर्माण होण्याची पहिली पायरी आहे. प्रल्हादासम अढळ निष्ठा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करून सर्वांनी भगवंताच्या अपार कृपेची अनुभूती घ्यावी.

Leave a Comment