हिंदु धर्मात ‘गोग्रास’ पुण्यप्रद मानला जातो. सणासुदीला गोग्रास दिल्याविना भोजन न करणारे हिंदू आहेत, तसेच नियमित गोग्रास दिल्याविना भोजन ग्रहण न करणारे हिंदूही आज आहेत; मात्र हा ग्रास गायीलाच भरवला जात आहे ना, हे मात्र पहाण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील अनेक मंदिरांजवळ पैसे घेऊन गोग्रास देण्यासाठी गायी बांधलेल्या असतात; मात्र यांतील ९९ टक्के गायी नसून जर्सी जनावरे आहेत.
आपण जिला जर्सी गाय समजतो, ती गाय नसून युरोपातील ‘होल्स्टेन फ्रीजीयन’ हा प्राणी आहे. हा प्राणी गायीसारखा दिसतो म्हणून भारतातील भाषांतरकारांनी त्याला इंग्रजीमध्ये ‘काऊ’ म्हणायला प्रारंभ केला. त्यामुळे हा प्राणी आता गाय म्हणून भारतात ओळखला जातो. अनेकांना याविषयी माहिती नाही आणि जे हे जाणतात, त्या हिंदूंकडे अन्य पर्याय नाही. त्यामुळे अज्ञान आणि हतबलता या दोन्ही कारणांमुळे हिंदू या जर्सी प्राण्याला ग्रास देऊन गोग्रास दिल्याचे समाधान मानत आहेत; मात्र घोडा अन् गाढव यांमध्ये जो भेद आहे, तेवढाच भेद देशी आणि जर्सी गायीमध्ये आहे.
भारतीय गाय ही मुळातच सात्त्विक आणि शांत असते. तिचे हंबरणे श्रवणीय असते, झोपणे शांतपणे असते; मात्र जर्सी गायीचे ओरडणे अश्रवणीय असते. ती डुकरासारखी पाय ताणून झोपते. देशी गायीचे दूध प्रथिनेयुक्त असते. तसेच देशी गायीचे दूध, तूप, लोणी, शेण, गोमूत्र यांपासून केले जाणारे पंचगव्य औषधी असते. या उलट जर्सी पाण्याचे दूध विषासमान असते. या दुधामुळे दमा, अस्थमा, हृदयविकार आदी रोग संभवतात; मात्र याविषयी माहिती नसल्यामुळे बहुतांश जण गाय समजून जर्सी प्राण्याला पाळत आहेत. भारतीय वंशाच्या गायीच्या सान्निध्यात राहिल्याने तणाव निघून जातो, याविषयी आता विदेशात संशोधन चालू आहे. भारतात मात्र या अमूल्य कामधेनूंची संख्या झपाट्याने न्यून होत आहे. धर्मांधांच्या लांगूलचालनामुळे गायींच्या मानेवर फिरणारे सुरे काँग्रेसने रोखले नाहीत. गाय हा केवळ हिंदूंच्या श्रद्धेपुरता मर्यादित विषय नसून राष्ट्राच्या समुद्धीचे द्योतक आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गाय आणि गोवंश यांच्या हत्येच्या बातम्या नियमितपणे ऐकायला येतात. गुजरातमध्ये गिर गायींची संख्या वाढवण्यासाठी केंद्रशासन ब्राझील देशाकडून १ लाख भारतीय वंशाच्या गोवंशाचे वीर्य मागवणार आहे. भाजप शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. भारतीय वंशाच्या गायींच्या संवर्धनासाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवेत; मात्र गोसंवर्धन करतांना गोमातेच्या मानेवर सुरा फिरवणारे हात रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.