जळगाव – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य दैवी असून त्याद्वारे वैदिक सनातन हिंदु धर्म जागृत ठेवण्याचे कार्य होत आहे. गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याविषयीचे सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अॅप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे. सनातन संस्थेच्या वतीने आरती कशी करावी ?, श्री गणेशाची उपासना, पूजा, विसर्जन कसे करायचे ? यांविषयी शास्त्रीय परिभाषेतील माहिती मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड या भाषांत उपलब्ध असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्यातील फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची नुकतीच भेट घेण्यात आली. या प्रसंगी श्री जनार्दन महाराज यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून कार्याला आशीर्वाद दिले. भारतवर्षातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव चालू असून कोणताही उत्सव धर्मशास्त्र आणि संस्कृती यांना अनुसरून साजरा केल्यानेच सर्व संकटे दूर होतात, म्हणून धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सण साजरा करा, असा संदेश स्वामीजींनी या वेळी दिला. समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या राष्ट्र-धर्मकार्याविषयी माहिती दिली. या वेळी समितीचे सर्वश्री ब्रह्मा अंकलेकर, धीरज भोळे, सौ. छाया भोळे उपस्थित होत्या.