‘सध्या कोणाचाही मृत्यू झाला की, आपल्याकडे RIP लिहून श्रद्धांजली वाहण्याची प्रथा चालू झाली आहे. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या ‘फॅशनचे बळी’ झाले आहेत.
१. प्रत्येकाला त्याच्या धर्म-पंथाप्रमाणे श्रद्धांजली वहा !
कृपया हिंदु माणसाला त्याच्या मृत्यूवर ‘RIP’ लिहून श्रद्धांजली वाहू नका ! ज्यांना मृत्यूनंतर भूमीत गाडले जाते, त्या मुसलमान आणि ख्रिस्ती पंथाच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. RIP म्हणजे ‘Rest In Peace’ ! कृपया हिंदु माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका !
‘जगात कोणीही असो. एकदा तो वारला की, त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे, हा त्या ‘जाणार्याचा’ हक्क आहे ! हे कोणाचे उदगार आहेत ? ठाऊक आहे ? छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशा वेळी शिवरायांनी विरोध केला. ‘अफझलखान मेला, तेव्हा त्याच्याशी शत्रुत्व संपले. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरिराला जाळून त्याची विटंबना करू नका’, अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुसलमान धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझलखानाला भूमीत गाडून त्यावर त्याची मुसलमान परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत, ‘प्रत्येक मृत शरिराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी, हा प्रत्येक मृताचा हक्क आहे.’
२. REST IN PEACE चा अर्थ !
REST IN PEACE म्हणजे ‘शांतपणे पडून रहा !’ ‘हे मृतात्म्या, तुझ्या शरिराला आम्ही भूमीत ‘गाडले’ आहे, तेव्हा ‘कयामत’च्या दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल, तर आता तू भूमीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा ! हे असे का म्हणतात, कारण ‘गाडणारे’ आणि ‘ज्याला गाडले तो जीवंतपणी’, कोणीच पुनर्जन्म मानत नाहीत. कयामतपर्यंत मेलेल्याची गाडलेल्या जागेतून सुटका नाही, असे त्यांचा धर्म सांगतो.
३. हिंदु धर्म आणि अन्य पंथांमधील भेद !
भेद नीट समजून घ्या ! हिंदु धर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत, तर जाळतात. (टीप – मृत व्यक्तिच्या वय, आध्यात्मिक अधिकार आणि त्यांचा आध्यात्मिक मार्गाला अनुसरून मृत्योत्तर क्रियांमध्ये पाठभेद असू शकतो.) या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात पुनर्जन्मासाठी ! हिंदू त्याला RIP कसे म्हणतील ? कारण आत्मा सद्गतीस गेला, असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. त्याचा पुढील जन्मासाठीचा प्रवास नीट होवो, असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत, तर मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढील जन्म घ्यावा म्हणून; पण इतर धर्म जे ‘गाडतात’ ते मृतात्म्याला ‘भूमीत शांत पडून रहा’ असे सांगून ! ‘कयामतपर्यंत तुझी सुटका नाही !’, असे सांगतात.
हिंदूंनी यासाठी गरूड पुराण वाचावे. ते ‘मृत्यू’संदर्भात आहे.
४. हिंदु मृतात्म्यास सद्गती मिळो, अशी प्रार्थना करा !
हिंदूंनी ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ म्हणावे. ‘देव मृतात्म्यास सद्गती देवो’, असे म्हणावे. म्हणजे ही जी व्यक्ती वारली आहे, ती पुण्यगतीस पावावी. त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडो ! एवढेच कशाला ? एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो, तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म-मरणाचा म्हणजेच पुनर्जन्माचा फेरा न देता ‘मुक्त’ करावे, अशीही प्रार्थना करता येते.