दासबोध आणि सावरकर

क्रांतीकारकांचे मुकुटमणी म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आसेतुहिमाचल गुणगौरव केला जातो. केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगात तात्यांचा नावलौकिक आहे.

श्री. विद्याधरपंत नारगोलकर

 

१. ब्राह्मतेजाच्या जोडीला क्षात्रतेजाच्या उपासनेची शिकवण

श्री समर्थ रामदासस्वामी हा एक विरक्ती, वैराग्य, त्याग, भगवद्भक्ती, कठोर कर्मयोग, देशभक्ती, धर्मभक्ती, समर्पण, सूर्यप्रकाश यांचा न आटणारा गंगौघ आहे. समर्थांनी सरस्वतीच्या व्यासपिठावरून कालीमातेचीही उपासना केली आहे. समर्थ सांगतात,

देवद्रोही तितुके कुत्ते । मारून घालावे परते ।
देवदासही पावती फत्ते । यदर्थी संशयो नाही ॥ श्रीराम ॥

स्वातंत्र्यवीरांनी पण सरस्वतीच्या व्यासपिठावरून सारस्वतांच्या समोर कालीमातेला आवाहन केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना ते म्हणाले, ‘‘आम्ही एक पिस्तूल जवळ बाळगले; म्हणून आम्हास तुरुंगवासाची शिक्षा झाली; पण आता सरकार तुम्हांस रायफल देत आहे. ती चालविण्याचे शिक्षण देत आहे. वर वेतनही देत आहे. तेव्हा बंदुका शिका ! त्यांची तोंडे कुठे करावयाची ते मग ठरवू ! म्हणून म्हणतो लेखण्या मोडा बंदुका घ्या.’’ त्याचा परिणाम म्हणजे इंग्रजांना भारत सोडावा लागला. ब्रिटीश पंतप्रधान चर्चिलने लंडनच्या संसदेतील भाषणात हे सांगितले.

 

२. स्वकियांशी जवळीक !

छत्रपती शिवाजी महाराज देहली येथे जाण्याआधी समर्थशिष्य दिवाकर गोसावी यांनी महाराजांची भेट घेतली आणि समर्थांचा निरोप सांगितला. ते म्हणाले, ‘‘आपण दूरदेशी जात आहात. तेथे स्वकीय कोणी नाही. औरंग्या कपटी आहे. समस्या निर्माण झाल्यास तेथे स्वकीय असणे श्रेयस्कर ! त्यासाठी तिकडच्या मठपतींची ही नामावली. आपली आणि स्वामींची सुंदरमठी भेट झाल्यावर तिकडील मठपतीकडे स्वामी स्वतंत्र खलिते पाठवतील.’’ देहलीस जाण्यापूर्वी सुंदर मठात गुरु-शिष्य यांची भेट झाली. सांगणारा पूर्ण ज्ञानी ! ऐकणारा श्रेष्ठ पुरुषोत्तम ! साक्षीला होता उंचावरून स्वःताला झोकून दिलेला रामरूप जलप्रताप… समर्थ सांगतात,

सत्याचा तो स्वाभिमान । तो जाणावा निराभिमान ।
न्याये अन्याये समान । कदापि नव्हे ॥ श्रीराम ॥

या कारणे मुख्य मुख्य । तयासी करावे सख्य ।
येणे करिता असंख्य । बाजारी मिळती ॥ श्रीराम ॥

वोळखीने ओळखी साधावी । बुद्धीने बुद्धि बोधावी ।
नितीन्याये वाट रोधावी । पाषांडांची ॥ श्रीराम ॥

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची भेट मुंबईला झाली. त्या भेटीत त्यांचे काय बोलणे झाले, ते सरदारगृहाच्या केवळ भिंतींना ठाऊक ! पण जपानमधील सावरकरांचे सहकारी आणि हिंदूसभेचे नेते रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्रांना जपानमध्ये साहाय्य केले.

समर्थांच्या दासबोधाचे आम्ही केवळ पारायण करणारे आहोत. समर्थांचा दासबोध आचरणात आणणारे केवळ दोघेजण ! पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे डॉ. हेडगेवार !

 

३. सावधपण !

समर्थ आपल्या दासबोधात लिहितात,

पहिले ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण ।
तिसरे ते सावधपण । सर्व विषयी ॥ श्रीराम ॥

स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असतांना देशातील पुष्कळ क्रांतीकारक त्यांच्या मार्गदर्शनासाठी भेटून जात. याच क्रांतीकारकांतील एक क्रांतीकारक म्हणजे वासुदेव बळवंत गोगटे. (हे पुढे पुण्याचे महापौर झाले.) वा.ब. गोगटे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतांना त्या वेळचे पुण्याचे जिल्हाधिकारी हॉटसन हे महाविद्यालयाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या जनतेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ गोगटे यांनी त्यांच्यावर महाविद्यालयात गोळ्या झाडल्या. ‘बोलावलेल्या पाहुण्यावर असे आक्रमण केले’; म्हणून महात्मा गांधींनी या कृत्याचा निषेध केला. ही वार्ता सावरकरांना समजल्यावर सावरकरांनी आपल्या सहकार्‍यांना लगेच स्वतःचे प्रवचन करण्याचा कार्यक्रम ठरविण्यास सांगितले. प्रवचनाचा विषय होता -‘शिशुपाल वध’ ! प्रवचनात तात्यांनी सांगितले, ‘‘पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा त्यांनी शिशुपालालाही बोलावले होते. श्रीकृष्ण पण उपस्थित होते. तेथील प्रसंगात उर्मट शिशुपालाचे शंभर अपराध भरले; म्हणून श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले; कारण तो ‘वासुदेव’ होता, तो ‘बळवंत’ होता. त्या प्रसंगी त्या सभागृहात भीष्म, द्रोणाचार्य इत्यादी वरिष्ठही उपस्थित होते; पण कोणीही श्रीकृष्णाचा निषेध केला नाही.’’ हा इतिहास सांगून स्वातंत्र्यवीरांनी जनतेला योग्य संदेश देऊन प्रवचन संपविले. दुसर्‍या दिवशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. लाड यांनी सावरकरांना बोलावले आणि विचारले ‘‘तुम्ही राजकारणावर का बोललात ? तुमच्यावर राजकारणावर बोलण्यास बंदी आहे.’’ सावरकर म्हणाले, ‘‘मी राजकारणावर बोललो नाही. मी धार्मिक प्रवचन केले असून हिंदूंच्या महाभारतातील प्रसंग सांगितला.’’ त्यावर लाड म्हणाले, ‘‘मग तुम्ही गोगट्याचा निषेध का केला नाही ?’’ सावरकर म्हणाले, ‘‘मी राजकारणावर कसा बोलणार ?’’ लाड हसून म्हणाले, ‘‘सावरकर तुम्ही बॅरिस्टर आहात. तुम्ही कुठे सापडणार नाहीत. तुम्ही जाऊ शकता.’’

म्हणून समर्थ म्हणतात,

सावध चित्ते शोधावे । शोधोनी अचूक वेचावे ।
वेचोनी उपयोगावे । ज्ञान काही ॥ श्रीराम ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

– श्री. विद्याधरपंत नारगोलकर
(आगामी ‘स्वातंत्र्यवीर- साम्यस्थळे’ या पुस्तकातून)

1 thought on “दासबोध आणि सावरकर”

  1. माझे ही गाणें माझे ही जिणे . समर्पण होऊदे राष्ट्रीय कार्यास.

    Reply

Leave a Comment