परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत आणि त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाणारच आहे ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश

रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात कॅनडा येथील विश्‍व
या संघटनेचे संस्थापक जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांचा सन्मान !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेच्या आश्रमातील वास्तव्यात मी जे साधकांना शिकवले आणि येथे जे शिकलो, त्याचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. सनातनचा आश्रम म्हणजे चैतन्याचा सागर आहे. सनातनच्या आश्रमात चालू असलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे; मात्र साधकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी प्रयत्न केले, तरी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानेच त्यांच्यामध्ये परिवर्तन होत आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते जेथे आहेत, तेच तीर्थक्षेत्र आहे. डॉ. आठवले यांनी सर्व जाणले आहे. त्यामुळे त्यांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा, १४ विद्या आणि ६४ कलांचे ज्ञान सर्वांना देण्याचे कार्य हाती घेतले आहे. हे कार्य पूर्णत्वास जाणारच आहे, असे भावपूर्ण मार्गदर्शन कॅनडा येथील विश्‍व या संघटनेचे संस्थापक  जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांनी येथे केले.

सनातन संस्थेच्या येथील आश्रमात १६ ऑगस्ट या दिवशी जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश आणि त्यांच्या शिष्या डॉ. प्रीती मिश्रा यांचे आगमन झाले. १९ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी कुंकूम तिलक लावून, पुष्पहार घालून आणि श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांचा सन्मान केला. त्यानंतर पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांच्या शिष्या डॉ. प्रीती मिश्रा यांचा सन्मान महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभाग समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी केला. त्यानंतर योगऋषी डॉ. स्वामीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना वरीलप्रमाणे भावपूर्ण उद्गार काढले.

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. आम्ही त्यांच्याकडून शिकणार आहोत. आमचे साधक शिकण्यासाठी आश्रमात पाठवणार आहोत. संगीतविषयक मार्गदर्शन करतांना जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांनी काही अप्रचलीत रागांची माहिती सांगून काही राग गाऊनही दाखवले. याविषयी ते म्हणाले की, मी पुढच्या वेळी जयंत नावाचा नवीन राग तयार करीन आणि तो आठवले या नवीन तालात असेल.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जगद्गुरु
योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांच्याविषयी काढलेले उद्गार

१. जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश हे भगवंताचे रूप आहेत. त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळत आहे. त्यांनी जे २ – ३ दिवसांत शिकवले आहे, ते ज्ञान मिळवायला आम्हाला १० वर्षे लागली असती.

२. जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश आणि त्यांच्या शिष्या डॉ. प्रीती मिश्रा यांच्या माध्यमातून गुरु आणि शिष्य यांचे चांगले नाते बघायला मिळाले. स्वामींच्या सहवासात सर्वांना चांगल्या अनुभूती येतात.

 

शिष्या डॉ. प्रीती मिश्रा यांचे सनातन संस्थेच्या आश्रमाविषयीचे उद्गार

आश्रम खूपच चांगला आहे. येथे केवळ ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष कृती करून घेतली जाते. समाजात आपल्यातील स्वभावदोष आणि अहं सांगणे कठीण जाते. सहसा कोणी सांगत नाही; परंतु आश्रमात साधक जाहीरपणे फलकावर दोष आणि अहंचे पैलू लिहितात. सनातन संस्थेमध्ये थेट स्वभावदोष आणि अहं यांच्यावरच आघात केला जातो, हे विशेष आहे. असे करून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. आमच्या आश्रमातील साधकांनाही ही प्रक्रिया शिकवायची आहे. येथे संगीताविषयी तळमळ आहे. प्रत्येक जण सकारात्मक आहे.

 

डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांची श्री. निषाद
देशमुख यांच्या लक्षात आलेली सूक्ष्म स्तरावरील वैशिष्ट्ये

श्री. निषाद देशमुख

कॅनडा येथील विश्‍व या संघटनेचे संस्थापक जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश मागील काही दिवसांपासून सनातनच्या रामनाथी आश्रमात साधकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे. त्यांची लक्षात आलेली सूक्ष्म स्तरावरील गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

१. ज्ञानयोगी डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

स्वामीजी ज्ञानयोगी असल्याचे जाणवले. ज्ञानयोग्यांच्या बोलण्याचा परिणाम बुद्धीवर होऊन शंकानिरसन होते. स्वामीजींच्या मार्गदर्शनातून प्रक्षेपित होणारी स्पंदने डोक्याभोवती फिरतांना जाणवली.

२. योग्यांप्रमाणे तळमळीने साधना करणारे डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

स्वामीजी योग्यांप्रमाणे तळमळीने साधना करतात. त्यांची व्यष्टी योगानुसार साधना असल्याने ते घंटोन्घंटे एकाच स्थितीत बसून साधकांना मार्गदर्शन करतात. या वेळी सूक्ष्मातून त्यांचे मनही विषयावर एकाग्र आणि स्थिर रहाते अन् शरिराची कोणतीही हालचाल नसते.

३. योग्यांप्रमाणे अद्भूत स्मरणक्षमता असणारे डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

जिवाने पृथ्वीतत्त्वावर विजय साध्य केल्यावर त्याला अनेक सूत्रे लक्षात ठेवता येतात. यासाठी कठोर साधना लागते. स्वामीजींची स्मरणक्षमता तशीच आहे. अनेक विषयांवर बोलतांना ते संस्कृत श्‍लोकांचा उल्लेख करतात आणि मग त्यांचे अर्थ स्पष्ट करतात. विशेष हे की, वयाच्या ७० व्या वर्षामध्ये त्यांना बोलण्यासाठी समोर कागद धरावा लागत नाही. यातून त्यांची अद्भूत स्मरणक्षमता लक्षात येते.

४. व्यष्टीकडून समष्टीकडे देवाच्या इच्छेने जाणारे डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

स्वामीजी आतापर्यंत परेच्छेने वागणे, या स्तरावर राहून व्यष्टी साधना करत होते. आता ईश्‍वर त्यांना ईश्‍वरेच्छेने समष्टी साधना करणे या टप्प्याकडे नेत आहेे. सूक्ष्मातून ईश्‍वर करत असलेल्या या कृतीमुळे त्यांनी सनातन संस्थेच्या आश्रमात येऊन साधकांना मार्गदर्शन करणे चालू केले आहे. यांतून त्यांचा व्यष्टीकडून समष्टीकडे होणारा प्रवास लक्षात आला.

५. डॉ. स्वामीजी यांची अन्य वैशिष्ट्ये

अ. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत होतो, तसेच अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवरही सहजतेने प्रभाव होतो.

इ. स्वामीजी मार्गदर्शन करतांना कधी-कधी जागृत ध्यानावस्थेत असतात.

ई. स्वामीजींच्या मार्गदर्शनातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी स्वर्गलोकापर्यंत प्रक्षेपित होतात.

६. कृतज्ञता

ईश्‍वराच्या कृपेने स्वामीजींची काही वैशिष्ट्ये लक्षात येऊन त्यांचे टंकलेखन करता आले. यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांच्या गायनाचे श्री. राम होनप यांनी केलेेल सूक्ष्म परीक्षण

श्री. राम होनप

१९.८.२०१९ या दिवशी महर्षि अधात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी आश्रमात आयोजित कार्यक्रमात कॅनडा येथील विश्‍व या संघटनेचे संस्थापक जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांच्या संगीतविषयक अभ्यासाचे आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर विविध संगीत-प्रयोग घेण्यात आले. या वेळी स्वामीजींनी सप्तचक्र आणि त्याच्याशी संबंधीत स्वर अन् बीजमंत्र, विविध राग आणि भक्तीगीते गायली. त्यांचे सूक्ष्म परीक्षण, तसेच स्वामीजींची जाणवलेली अन्य आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

१. स्वामीजी बोलतात, तेव्हा ज्ञान प्रगट होते आणि ते गातात तेव्हा भक्ती प्रगट होते. ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम, म्हणजे डॉ. स्वामीजी होय.

२. स्वामीजी गात असतांना श्री सरस्वतीदेवीचे स्मरण आपोआप होते, तसेच त्यांच्या माध्यमातून साक्षात् सरस्वतीदेवीच गात आहे, असे जाणवते.

३. स्वामीजींच्या गायनात आध्यात्मिक मधुरता नेहमी जाणवते. ही मधुरता का आहे ?, असा मला प्रश्‍न पडला, तेव्हा सूक्ष्मातून उत्तर मिळाले, मनुष्याची कधी इडा-नाडी, तर कधी पिंगळा-नाडी चालू असते. स्वामीजींची नेहमी सुषुम्ना नाडी चालू असते. त्यामुळे त्यांच्या वाणीत दैवी मधुरता आलेली आहे.

४. स्वामीजींना हिंदी, संस्कृत काव्यांचे स्फुरण होते आणि हे काव्य ते संगीतबद्ध करतात. स्वामीजींची प्रज्ञा अलौकिक असून ती जागृत असल्याने त्यांना या गोष्टी सहज साध्य होतात, असे जाणवते.

५. स्वामीजींच्या गायनाचा चौथ्या पाताळापर्यंत परिणाम होतो. तेथपर्यंतच्या वाईट शक्तींना स्वामीजींच्या गायनातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा त्रास होतो.

६. स्वामीजींनी काही वेळ शिवतांडव स्तोत्र गायले. तेव्हा सूक्ष्मातील वाईट शक्तींनी शिवाचे ध्यान लावण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वामीजींच्या भक्तीमुळे मांत्रिकांचे ध्यान लगेच भंग पावत होते.

७. सात स्वरांमध्ये २२ श्रृती आहेत. स्वामीजी गायन करतांना मला सूक्ष्मातून काही श्रृती स्त्री रूपात नृत्य करतांना दिसल्या. त्या स्त्रिया तरुण असून त्यांच्या अंगावर पांढरा पोशाख होता. त्यांनी सोनेरी अलंकार परिधान केले होते. त्यांच्या डोक्यावर सोनेरी मुकुट दिसत होता. स्वामीजींच्या गायनाच्या तालासमवेत त्या श्रृती नृत्य करतांना दिसल्या. स्वामीजींना या श्रृती प्रसन्न असल्याचे हे दर्शक आहे.

८. स्वामीजी भावपूर्ण गायन करत असल्यामुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचाही भाव जागृत होत होता किंवा त्यांची भाववृद्धी होत होती. त्यामुळे साधकांच्या शरिरातील काळी शक्ती मेण वितळल्याप्रमाणे वितळतांना दिसत होती.

९. स्वामीजींनी प्रत्येक कुंडलिनीचक्राशी संबंधित बीजमंत्रांचे ७ – ८ वेळा उच्चारण केले. तेव्हा त्याचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या त्या त्या कुंडलिनीचक्रांवर परिणाम होऊन तेथील काळी शक्ती न्यून होतांना जाणवली.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment