वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र पंडित धर्मनारायण शर्माजी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन

‘२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या वेळी मथुरा येथील साधक श्री. राजकुमार जग्गी, श्री. सिद्धार्थ जग्गी आणि कु. स्वाती जग्गी उपस्थित होते.

पंडित धर्मनारायण शर्माजी

 

१. पंडित शर्मा यांनी सनातन संस्थेचे कार्य
शांततामय मार्गाने चालू असल्याचे सूक्ष्म ज्ञानाद्वारे ओळखणे

श्री. राम होनप : (सनातन संस्थेची माहिती सांगितली.)

पंडित शर्माजी (एका भक्ताला उद्देशून) : सनातन संस्थेचे कार्य शांतता मार्गाने चालू आहे. (सनातन संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचे सर्व उपक्रम शांतता मार्गाने, म्हणजे सनदशीर मार्गाने चालू असतात. याविषयी मी किंवा अन्य कुणी पंडित शर्माजी यांना सांगितले नव्हते, तरीही त्यांनी ते अचूक ओळखले होते. तेव्हा हे ‘सूक्ष्म ज्ञान असलेले संत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला. त्याची प्रचीती त्यांच्या पुढील प्रत्येक उत्तरांतून येत गेली. – श्री. राम होनप)

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प्रथम भारतात आणि
त्यानंतर विश्‍वात हिंदु राष्ट्र आणण्याचे ध्येय पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद देणे

श्री. राम होनप : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०२३ मध्ये प्रथम भारतात आणि त्यानंतर विश्‍वात हिंदु राष्ट्र आणण्याचे ध्येय आहे. या कार्यासाठी आपले आशीर्वाद हवेत.

पंडित शर्माजी : मनोरथ पूर्ण होईल. सनातन संस्थेचे शांतता मार्गाने कार्य चालू आहे. हीच मोठी शक्ती आहे. सनातन संस्था करत असलेले कार्य समाजाला कळत नाही. पुढे जात रहा. यात्रा पूर्ण होईल. (म्हणजे ध्येयप्राप्ती होईल.)

 

३. परात्पर गुरु डॉक्टरांवरील वर्ष २०१९ मधील महामृत्यूयोगाचे संकट टळणार असणे

श्री. राम होनप : परात्पर गुरु डॉक्टरांवर वर्ष २०१९ मध्ये महामृत्यूयोगाचे संकट असल्याचे अनेक संत आणि नाडीज्योतिषी यांनी सांगितले आहे.

पंडित शर्माजी : तुम्ही परात्पर गुरु डॉक्टरांसाठी ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांच्या निवास कक्षात बसून प्रार्थना केली आहे. त्यामुळे महामृत्यूयोगाचे संकट टळेल. त्यांना काही होणार नाही. (त्यासाठी त्यांनी एक आध्यात्मिक उपाय सांगितला.)

 

४. साधकांनी धर्मकार्य करतांना होत असलेल्या
त्रासांतून पुढील वाटचाल करून लक्षप्राप्ती करायची असणे

श्री. राम होनप : धर्मकार्य करतांना साधकांना आध्यात्मिक त्रास होत आहे. तसेच विविध खोट्या आरोपांखाली साधकांना पोलिसांकडून त्रास दिला जातो. साधकांची अकारण चौकशी केली जाते.

पंडित शर्माजी : या त्रासांतूनच पुढे जायचे आहे आणि ध्येयप्राप्ती करायची आहे. या त्रासातच भगवंताला पहायचे आहे. (‘कष्ट में इष्टको देखना है ।’) धर्मकार्य करतांना यापूर्वीही अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे.

 

५. साधकांना होणारे त्रास हळूहळू अल्प होणार असणे

श्री. राम होनप : साधकांना होत असलेेले सर्वप्रकारचे त्रास कधी न्यून होतील.

पंडित शर्माजी : हळूहळू अल्प होतील.

 

६. आगामी भीषण संकटकाळात ईश्‍वर सर्व साधकांचे रक्षण करणार असणे

श्री. राम होनप : आगामी भीषण संकटकाळात देश-विदेशांतील साधकांचे रक्षण व्हायला हवे. त्यासाठी काय करायला हवे ?

पंडित शर्माजी : ईश्‍वर साधकांचे रक्षण करील. हनुमानाची उपासना करा.

 

७. परात्पर गुरु डॉक्टरांचा महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय स्थापन करण्याचा
संकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचा आशीर्वाद असणे

श्री. राम होनप : परात्पर गुरु डॉक्टरांचा महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय स्थापन करण्याचा संकल्प आहे. हे कार्य लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपला आशीर्वाद हवा.

पंडित शर्माजी : ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचा आशीर्वाद आहे.

 

८. हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे संघटन कालांतराने होणार असणे

श्री. राम होनप : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे संघटन होणे आवश्यक आहे. त्यात अनेक अडथळे येत आहेत.

पंडित शर्माजी : हळूहळू वाटचाल करत रहा. लक्षप्राप्ती होईल.

वरील संभाषण चालू असतांना साधकाला आलेली अनुभूती : ‘पंडित शर्मा यांचे बोलणे ऐकतांना त्यांचे प्रत्येक वाक्य, म्हणजे ईश्‍वरी ज्ञान असून प्रत्यक्ष देवच त्यांच्या माध्यमातून बोलत आहे’, असे वाटत होते.’

– श्री. राम होनप, मथुरा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment