पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर घरी जाण्यापूर्वी पुढील काळजी घ्या !

Article also available in :

पूरग्रस्त नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती

काही जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळेे पूरग्रस्त स्थिती झाली होती. यामुळे सहस्रो नागरिकांची घरे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पाणी ओसरू लागल्याने स्थलांतरित झालेले नागरिक घरी परतत आहेत.

या नागरिकांनी घरी जाण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी ? घराचे निर्जंतुकीकरण कसे करावे ? आरोग्याची कशी काळजी घ्यावी ?, यांसंदर्भातील महत्त्वपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

 

१. घरी जाण्यापूर्वी प्रथम हे करा !

अ. आपले क्षेत्र वा गाव पुनर्वसनासाठी सुरक्षित आहे, असे प्रशासनाने जाहीर केल्यानंतरच घरी जावे.

आ. मातीचे घर असल्यास ते सुरक्षित आहे का ?, याची बांधकाम तज्ञांकडून निश्‍चिती करून घेणे आवश्यक आहे.

इ. इमारतीतील वा आजूबाजूच्या परिसरातील वीजवाहक तारा तुटल्या असतील, तर त्यांना स्पर्श करू नये.

 

२. घरी गेल्यावर करावयाच्या कृती

२ अ. महापुरामुळे हानी झालेली वास्तू आणि साहित्य यांच्या विम्याच्या संदर्भात

१. वास्तूची दुरुस्ती आणि साहित्याची आवराआवरी करण्यापूर्वी हानी झालेली वास्तू (घर) अन् साहित्य यांची छायाचित्रे काढावीत. विमा किंवा शासकीय साहाय्य मिळण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.

२. वाहने, विद्युत् उपकरणे, तसेच घरातील साहित्य नवीन असल्यास आणि त्यांचा विमा (इन्शुअरन्स) उतरवलेला असेल आणि वॉटर डॅमेज किंवा नैसर्गिक आपत्ती यांमुळे झालेली हानीभरपाई मिळणार असेल, तर त्या दृष्टीने विमा प्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्यावे.

२ आ. वीजप्रवाह आणि विद्युत् उपकरणे यांच्या संदर्भात काय करावे ?

१. घराच्या भिंती, विद्युत् उपकरणे (पंखे, धुलाई यंत्र, मिक्सर), तसेच कळफलक (स्वीचबोर्ड) ओला असतांना वीजप्रवाह चालू करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे विजेचा धक्का (शॉक) बसू शकतो. घर कोरडे झाल्यानंतर, तसेच विद्युत् तज्ञाने (इलेक्ट्रिशियनने) तपासणी केल्यानंतरच विद्युत्प्रवाह चालू करावा.

२. भ्रमणभाष, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांसारखी उपकरणे भिजली असल्यास आणि बंद असल्यास त्यांची बॅटरी काढून ठेवावी.

३. उपकरणे भिजली; म्हणून थेट भंगारात न देता तज्ञ व्यक्तीला दाखवून दुरुस्ती होऊ शकते कि नाही ? याची निश्‍चिती करून निर्णय घ्यावा.

२ इ. घराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे

१. अनेक दिवस पाणी साठून राहिल्यास पाण्यात जंतूंचा प्रादुर्भाव होतो. लादी साबण आणि चांगले पाणी किंवा लायझॉलसारख्या जंतूनाशक रसायनाचा वापर करून धुवून वा पुसून घ्यावी अन् नंतर कोरडी करावी.

२. कडुनिंबाची पाने आणि कापूर जाळून घरात धूप दाखवावा. यामुळे वातावरण शुद्ध होऊन घराचे निर्जंतुकीकरण होईल.

३. घरातील दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. यामुळे घरात शुद्ध हवा खेळती राहील आणि भिंतींवरील ओल न्यून होण्यास साहाय्य होईल.

२ ई. घरातील साहित्य हलवतांना घ्यावयाची काळजी

१. सिलिंडरमधून गॅसची गळती होत असल्यास विद्युत्प्रवाहाचे मुख्य बटण (मेन स्विच) बंद करावे. सिलिंडर वार्‍याच्या संपर्कात येईल, अशा ठिकाणी (उदा. आगाशीत) ठेवावा. घरात गॅसचा वास पसरला असल्यास विद्युत् कळ दाबू नये. घराच्या खिडक्या आणि दारे उघडावीत.

२. पुराच्या पाण्यासह साप, विंचू किंवा उंदीर असे प्राणी घरामध्ये येण्याची शक्यता असते. अडगळीत असलेले साहित्य काळजीपूर्वक हलवावे. साप, विंचू आदींना बाहेर काढण्यासाठी प्राणीमित्र संघटनेचे साहाय्य घ्यावे.

३. घरामधील चिखल स्वच्छ करतांना आणि त्यांतील साहित्य हलवतांना पायांमध्ये जाड बूट घालणे, हातमोजे घालणे इत्यादी काळजी घ्यावी. जेणेकरून धारदार वस्तू (कात्री, सुरी) असल्यास दुखापत होणार नाही.

४. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेल्या वस्तू (उदा. लाकडी फर्निचर, कपडे, भांडी इत्यादी) यांचा वापर करण्यापूर्वी त्या स्वच्छ पुसून वा धुवून घ्याव्यात. घरातील लोखंडी साहित्याला (कपाट, पलंग, आसंद्या इत्यादींना) गंज येऊ नये, यासाठी ते कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यावे. साहित्याला रंगकाम करण्याचा निर्णय कालांतराने उन्हाळ्यात घेऊ शकतो.

२ उ. पाणी आणि अन्नपदार्थ यांच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता

१. पूरग्रस्त परिसरात विहीर असल्यास तिच्यातील पाणी पिऊ नये. या पाण्यात जंतूंचा संसर्ग असण्याची दाट शक्यता असते.

२. घरात साठलेले वा साठवलेले पाणी असल्यास वापरू किंवा पिऊ नये.

३. पाण्याचे पिंप, कळशी इत्यादी साबण लावून घासावे. नंतर स्वच्छ पाण्यात धुऊन कोरड्या कापडाने पुसावे आणि त्यात पाणी साठवावे.

४. स्वयंपाकासाठी, तसेच दात घासण्यासाठीही शुद्ध पाण्याचा वापर करावा. पिण्याचे पाणी प्रतिदिन १० मिनिटे उकळून घ्यावे.

५. कोणतेही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.

६. पुराच्या पाण्याचा संपर्क आलेले अन्नपदार्थ आणि भाज्या यांचा वापर करू नये. शीतकपाटातील पदार्थ चांगले आहेत का ?, याची निश्‍चिती करूनच वापरावेत.

 

३. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या  !

अ. महापुरामुळे प्रामुख्याने साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग (कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), अतिसार (डायरिया) इत्यादी) होऊ शकतात.

आ. डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार होऊ शकतात. परिसरातील डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यास मच्छरदाणीचा किंवा डास येऊ नयेत, यासाठी डास प्रतिबंधक उदबत्ती इत्यादींचा वापर करता येईल.

इ. साचलेल्या पाण्यात लहान मुलांना खेळू देऊ नये.

ई. घरातील औषधांचा वापर करण्यापूर्वी आधुनिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.

या काळात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याविषयी कोणत्याही तक्रारी उद्भवल्यास वैद्यांशी किंवा सरकारी रुग्णालयाशी त्वरित संपर्क करावा.

 

 सूचना पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुढीलप्रमाणे घराची शुद्धी करा !

पूर ओसरल्यानंतर साधकांनी घराची प्रथम सर्व स्वच्छता करावी. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराबाहेर उभे राहून खालीलप्रमाणे घराची दृष्ट काढावी आणि त्यानंतर अन्य खोल्यांची दृष्ट काढावी.

१. नारळ किंवा लिंबू यांनी घराची दृष्ट काढणे

शक्यतो ३ दिवस नारळाने घराची दृष्ट काढावी. नारळाची शेंडी बाहेरच्या दिशेने राहील, अशाप्रकारे नारळ ओंजळीत धरावा. प्रत्येक खोलीत घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने (उजवीकडून डावीकडे) फिरून दृष्ट काढावी. त्यानंतर घराबाहेर जाऊन नारळ फोडावा किंवा विसर्जित करावा. नारळाने दृष्ट काढणे शक्य नसेल, तर लिंबाने दृष्ट काढावी. प्रत्येक खोलीच्या दाराबाहेर उभे राहून प्रथम घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ३ वेळा आणि उलट दिशेने ३ वेळा लिंबू फिरवावे. नंतर ते विसर्जित करावे. लिंबाने दृष्ट काढतांना प्रत्येक खोलीत जाण्याची आवश्यकता नाही. खोलीच्या दाराबाहेरून उभे राहून दृष्ट काढू शकतो.

२. यानंतर गोमूत्र शिंपडून आणि उदबत्ती फिरवून नेहमीप्रमाणे घराची शुद्धी करावी.

भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध स्तरांवर काय सिद्धता करावी हे जाणून घेण्यासाठी येथे CLICK करा ! 

Leave a Comment