विज्ञान आणि तंत्रज्ञान यात आतापर्यंत एवढी प्रगती झाली की, आपण भारतियही चंद्रावर यान पाठवू शकलो. असे असूनही कोणत्या भागात अतिवृष्टी होणार, हे विज्ञान किंवा तंत्रज्ञान नेमकेपणाने सांगू शकले नाही. हवामान खात्याच्या सूचनेविषयी तर सार्वजनिकरित्याच टिंगल केली जाते, एवढे हवामान खात्याचे अंदाज चुकतात. हवामान खात्यापेक्षा नंदीबैल बरा, अशी मोहीमही यंदा महाराष्ट्रात एका व्यक्तीने चालू करून ती व्यक्ती गावोगावी नंदीबैल घेऊन जावून हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्वास ठेवल्यास काय चूक ?
अचानक आलेल्या पुराने सर्वत्र थैमान घातलेले असतांना संभाव्य पूरस्थिती ओळखून काही मेंढपाळांनी सांगली-कोल्हापूर येथून स्थलांतरित होऊन स्वतःचा बचाव केल्याची घटना सामाजिक संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. त्या मेंढपाळांनी सांगितले की, यंदा रजक घरात पाऊस असल्याने पुष्कळ पावसाची शक्यता त्यांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी स्थलांतर करून सांगोला येथे झोपड्या टाकल्या. रजक म्हणजे परीट ! पंचांगात पान ५ वर शेवटून ७ व्या ओळीत मेघनिवास परिटाचे घरी असून पाऊस पुष्कळ पडेल, असे दिले आहे. रुईकर पंचांगात श्रावण मासफल या अंतर्गतही हवेच्या दाबामुळे उत्तर-पूर्व बाजूस अतिवृष्टी संभवते. पिके जलमय होतील. नद्यांना महापूर येतील. वाहतूक विस्कळीत होईल, असे भाकित वर्तवले आहे. यावरून ज्योतिषशास्त्राचे आणि पारंपरिक ज्ञान अन् नैसर्गिक जाणिवा यांचे महत्त्व लक्षात येते. ज्योतिषशास्त्र हे भविष्यातील घटनांविषयी १०० टक्के योग्य अंदाज बांधेलच, असे नाही; पण ग्रहमानावरून भविष्यकालीन घटनांचा वेध नक्कीच घेतला जाऊ शकतो आणि भविष्यातील संकट दूर होण्यासाठी उपाययोजनाही काढल्या जाऊ शकतात. या घटना ही त्याचीच उदाहरणे आहेत. या प्राचीन ज्ञानाची ओळख नवीन भारताला करून देणे आवश्यक आहे.
भाकणुकीचे अचंबित करणारे अंदाज !
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना प्राण्यांना प्रथम येते; कारण त्यांच्या नैसर्गिक किंवा उपजत जाणिवा प्रगल्भ असतात. आधुनिक शिक्षणाने मात्र मनुष्याच्या नैसर्गिक किंवा उपजत जाणिवा छाटून टाकल्या आहेत. त्यामुळे बुद्धीहीन जनावरेही निसर्गाचे संकेत समजू शकतात; पण बुद्धीवान मनुष्य मात्र यासाठी कोणत्या तरी अॅलर्टवर अवलंबून असतो. हे दुर्दैव आहे. आजही काही गावांमध्ये भाकणूक होते. गावांमध्ये स्थानिक जत्रेमध्ये कोणत्याही शास्त्राचा आधार न घेता केली जाणारी भाकणूक ही वास्तवाशी मेळ साधणारी असते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबाच्या यात्रेत, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अप्पाची वाडी येथे हाल सिद्धनाथ यांची भाकणूक होते. या भाकणुकीवरून स्थानिक शेतकरी पावसापाण्याचा अंदाज घेऊन शेतीविषयक निर्णय घेतो. पुरंदर जिल्ह्यातील भाकणुकीच्या वेळी धान्याच्या पुड्या चार दिशेला टाकून दुसर्या दिवशी सोडल्या जातात. ज्या धान्याला कोंब फुटले आहेत, त्या दिशेला चांगला पाऊस पडणार, असा अर्थ घेतला जातो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. हवामान खात्यालाही लाजवेल, असा हा ज्ञानाचा अचंबित करणारा ठेवा आहे. महागडी उपकरणे, उपग्रह, सिद्धांत हाताशी असूनही हवामान खात्याचे अंदाज किती योग्य येतात, याची प्रत्येकाला कल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचांगामध्ये दिलेल्या पावसापाण्याच्या वर्णनाचे, गावांमध्ये होणार्या भाकणुकीचे, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात असणार्या लोकांचे ठोकताळे अधिक परिपूर्ण असतात, हे महत्त्वपूर्ण आहे.
पक्ष्यांच्या वर्तनावरूनचे ठोकताळे !
केवळ एवढेच नाही, तर पक्षांच्या वागण्यावरूनही पावसाचे अंदाज बांधले जातात. जसे कावळ्याने झाडावर पूर्वेला घरटे बांधले, तर पाऊस चांगला पडतो आणि पश्चिमेला बांधले, तर अल्प पाऊस पडतो. झाडाच्या टोकावर कावळ्याने घरटे बांधले, तर दुष्काळ पडतो. पावशा पक्षाचे आगमन झाले की, पाऊस पडतो आणि धोबी पक्षी आला की, पाऊस थांबतो. आजही ग्रामीण भागांत पक्ष्यांच्या हालचालींवरून शेतीचे ठोकताळे बांधले जातात.
पुरोगाम्यांचा अवैज्ञानिकपणा !
या परंपरागत ज्ञानाची जोपासना आणि त्यावर संशोधन होणेही अपेक्षित आहे. विदेशात झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार व्यक्ती गायीच्या सान्निध्यात राहिली, तर तिचे मानसिक ताणतणाव अल्प होतात. आज विदेशामध्ये अनेक लोक शुल्क देऊन काही घंटे गायींच्या सान्निध्यात व्यतित करत आहेत; पण ही गोष्ट भारतात प्राचीन काळापासून चालत आली आहे. भारतात पूर्वी जवळपास प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच. थोडक्यात भारताच्या ज्या प्रथा, चालीरिती, परंपरा, प्राचीन ज्ञान, निसर्गाचा अभ्यास होता, तो किती वैज्ञानिक होता, हे पंचांगातील भाकिते, भाकणूक, नैसर्गिक घटकांविषयीची निरीक्षणे, किंवा गोसान्निध्याचे आताचे संशोधन यांवरून सिद्ध होत आहेत; पण अंनिस, पुरोगामी अन् कथित विज्ञानवादी लोक मात्र धर्म अन् ज्योतिष यांना थोतांड ठरवण्यातच धन्यता मानत आहेत. या वैज्ञानिक जाणिवावाल्यांच्या अवैज्ञानिकतेची कीव करावी तेवढी थोडीच आहे.