अंकलखोप (जिल्हा सांगली) येथे जीवनावश्यक वस्तू आणि औषध यांचे वाटप
अंकलखोप (जिल्हा सांगली) – ११ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंकलखोप (जिल्हा सांगली) गावातील सूर्यवंशी मळ्यात पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. मदन सावंत आणि श्री. अनिल कडणे, सनातन संस्थेचे श्री. सुरेंद्र भस्मे, श्री. रवि घाडगे, कराडमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. रवि साठे आणि संतोष सरंदकर उपस्थित होते.
या वेळी पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ, कांदा, बटाटा, चटणी, तेल, गव्हाचे पीठ, काडेपेटी, बिस्कीटे, कपडे, साखर, चहा पावडर, टॉवेल-टोपी, चटई, साड्या, लहान मुलांचे कपडे अशा जीवनावश्यक साहित्यांसह औषधेही देण्यात आली. आष्टा येथील न्यू इंग्लिश गर्ल्स स्कूल येथील पूरग्रस्तांनाही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
चावरे (हातकणंगले) येथे केलेे अन्नदान
चावरे (हातकणंगले) – ११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शरदिनी कोरे आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. या वेळी चावरे गावातील श्री. शिवाजी गुरुप, उपसरपंच श्री. भगवान पाटील, पोलीस पाटील श्री. दिलीप घोडके हेही उपस्थित होते.
या ठिकाणी ४०० हून अधिक पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक आणि अन्य ठिकाणांहूनही साहाय्याचा ओघ चालू आहे.
धारवाड (कर्नाटक) जिल्ह्यातील गदग येथे पूरग्रस्तांना भोेजन आणि कपडे वाटप
धारवाड जिल्ह्यातील गदग येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी आणि सनातन संस्थेचे साधक यांनी मलाप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे पीडित होळेअल्लूर गावातील पूरग्रस्तांना तांदूळ, भोजन आणि कपडे गोळा करून दिले. या समवेतच गदग येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मंगला बेलारी यांचे पती श्री. मंजुनाथ बेलारी यांनी गदगपासून ३५ किमी लांब असलेल्या कोन्नूर येथील पूरग्रस्तांना अन्न आणि कपडे वितरित केले. गोकाक येथे सनातन संस्थेच्या साधिकांनी पूरग्रस्त नागरिकांसाठी दुकानांमधून नित्योपयोगी वस्तू गोळा करून वितरित केल्या.
कोल्हापूर येथे कपडे आणि धान्य यांचे वर्गीकरण
जुना बुधवार पेठेतील नागरिक आणि सोल्जर ग्रुप यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अर्पण आलेले कपडे, धान्य आदी वस्तूंचे वर्गीकरण श्री शाहू प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक १४ येथे काही दिवसांपासून करण्यात आले. यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी आणि सौ. जान्हवी अमोल कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. विश्वनाथ पंडित यांनीही दोन दिवस उत्स्फूर्तपणे या कार्यात सहभाग घेतला.