सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली यांसह कर्नाटकातील बेळगाव, दक्षिण कन्नड येथील पूरग्रस्तांना साहाय्य !

लोकहो, भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा !

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत अती प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले आहेत, तर कोट्यवधी रुपयांची हानीही झाली आहे. पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत आणि त्या आपापल्या परीने सर्व साहाय्य करत आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचाही मोठा सहभाग आहे. या संघटनांकडून अन्नदान, धान्य, कपडे, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंसह औषधे आणि अन्य वैद्यकीय साहाय्यही केले जात आहे. या साहाय्यासह सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून पूरग्रस्तांना साधना, तसेच नामजप यांचेही महत्त्व सांगण्यात येत आहे.

नवीन इंगळी (कोल्हापूर) या वसाहतीमधील पूरग्रस्तांना साहाय्य करतांना आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर – १० ऑगस्टला नवीन इंगळी या वसाहतीमधील ८० पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साहाय्य करण्यात आले. या पूरग्रस्तांना भोजनाची पाकिटे घरोघरी जाऊन देण्यात आली. यात सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, किरण दुसे, सागर हंकारे, प्रथमेश गावडे यांसह धर्मप्रेमी श्री. राजाराम माने आणि श्री. उमेश उपस्थित होते. या वेळी इंगळी गावातील २०० पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. या पूरग्रस्तांना समितीच्या वतीने साधनेचे महत्त्व, तसेच नामजपाचे महत्त्व सांगण्यात आले. या वेळी काही पूरग्रस्तांनी शंकानिरसनही करून घेतले.

 

कोल्हापूर येथे पाण्यात अडकलेल्या १४ लोकांची
हिंदु जनजागृती समितीचे संतोष सणगर यांनी केली सुटका

‘तुम्ही देवासारखे धावून आलात !’ – पूरग्रस्तांनी व्यक्त केले आभार

हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर आणि अन्य एक सहकारी श्री. जोतिराम शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या इमारतीत तळ मजल्यावर ५ फूटापर्यंत पाणी साचलेले होते. तेव्हा वरील मजल्यावरील सदनिकांमधील १४ लोकांना इमारतीच्या बाहेर काढले. तेव्हा लोकांनी तुम्ही देवासारखे धावून आलात अन्यथा आमचे खरे नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

 

सांगली येथे आरोग्य साहाय्यता समितीच्या वतीने पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी

सांगली येथे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करतांना आरोग्य साहाय्यता समितीचे कार्यकर्ते

सांगली – हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत आरोग्य साहाय्यता समितीच्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी विश्रामबाग येथील सावरकर प्रतिष्ठान, तसेच शंभरफुटी रस्ता येथे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि औषधेही देण्यात आली. ही तपासणी आधुनिक वैद्य श्रीमती मृणालिनी भोसले यांनी केली. या सेवाकार्यात सनातनच्या सौ. कल्पना थोरात, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीश पुजारी, श्री. संतोष देसाई, आणि श्री. अक्षय थोरात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment