श्री दुर्गादेवी
श्री दुर्गादेवीची आरती संतरचित असल्याने ती मुळातच ‘चैतन्यमय’ आहे. या आरतीतील चैतन्याचा अधिक लाभ व्हावा, यासाठी शब्दांचा उच्चार कसा असावा, आरतीची गती कशी असावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. या आरतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला आहे. ‘सनातन’मधील ईश्वराप्रती भाव असलेल्या म्हणजे देवाच्या अस्तित्वाविषयी दृढ श्रद्धा असलेल्या साधकांनी ती म्हटली आहे, त्यामुळे ती अधिकच भावपूर्ण झाली आहे. ती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्यानेही आपल्यात जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल. आरती योग्य प्रकारे म्हटल्यामुळे त्या त्या देवतेचे तत्त्व कार्यरत होऊन आपल्याला तिची शक्ती मिळते.
आता आपण ऐकणार आहोत, श्री दुर्गादेवीची आरती …..
श्री दुर्गादेवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। धृ० ।।
त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।
अर्थ : श्री दुर्गादेवीच्या आरतीमधील काही कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया. शब्दार्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते. १. ‘वारी वारी जन्ममरणाते वारी’ यामधील ‘वारी’ या शब्दाचा अर्थ आहे ‘सोडव’ २. ‘चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही ।’ या ओळीचा अर्थ आहे की, देवीच्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले आणि सहा दर्शनेसुद्धा या विवादाच्या प्रवाहात वाहून गेली, म्हणजे त्यांनाही वर्णन करणे शक्य झाले नाही. अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो, अशी देवीच्या चरणी प्रार्थना आहे.
धार्मिक प्रथांमधील गैरप्रकार रोखणे ही समष्टी उपासना होय !
हिंदुद्वेष्टे आणि हिंदुद्रोही हे देवतांचे विडंबन विविध माध्यमांतून करत असतात. धार्मिक उत्सवांचे पावित्र्य बिघडवले जात असते. देवतांच्या आरत्या चित्रपटांतील गाण्यांच्या उडत्या चालींवर म्हणणे; सार्वजनिक धार्मिक उत्सवांत बळाने वर्गणी गोळा करणे, असे वाईट प्रकार होतांना दिसतात. या अपप्रकारांमुळे धार्मिक प्रथांना बाजारू स्वरूप आले आहे. हे गैरप्रकार रोखणे, ही त्या त्या देवतेची समष्टी उपासना करणे होय. असे करणे ही काळानुसार सर्वांत महत्त्वाची उपासना आहे.
छान माहिती दिलीत आपण धन्यवाद