नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे देवद येथील सनातन आश्रमातील सदाशिव सामंतआजोबा संतपदी विराजमान !

सनातन संस्थेच्या संतांच्या मांदियाळीत १०३ वे संतपुष्प विराजमान !

संतपदी विराजमान झालेले पू. सदाशिव सामंतआजोबा

देवद (पनवेल) – भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांनी संतपद गाठल्याची शुभवार्ता गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी म्हणजेच १६ जुलैला सर्व साधकांना मिळाली होती. तो चैतन्यानंदाचा वर्षाव साधक अनेक दिवस अनुभवतच होते. त्या वर्षावाची वृद्धी व्हावी, असेच श्रीकृष्णाला वाटत असावे; म्हणून त्याने ९ ऑगस्टला आणखी एक संतरत्न देऊन आश्रमातील साधकांवर कृपेची उधळण केली. आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या भाववाणीतून उलगडल्यावर साधकांनी पुन्हा भावानंद अनुभवला. जणू पुन्हा आपण गुरुपौर्णिमेचा सोहळाच अनुभवत आहोत, असे सर्वांना वाटत होते.

या प्रसंगी पू. सामंतआजोबा यांच्या पत्नी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. दिनप्रभा सामंत आणि त्यांची मुलगी सौ. माधुरी मंद्राल याही उपस्थित होत्या.

साधनामार्गातील वाटचालीत ८२ वर्षे सरली वयाची । 
अंतर्मनी सदैव ओढ असे ती भगवद्प्राप्तीची । 
अंतरीचा कृतज्ञभाव जाणिला परात्पर गुरुदेवांनी । 
आयुष्याचे सार्थक करवून घेतले संतपद प्रदान करूनी ॥

पू. सदाशिव सामंतआजोबा यांचा सन्मान करतांना पू. शिवाजी वटकर
परात्पर गुरु डॉ. आठवले

श्री. सामंतकाका पूर्वी एका औषधी आस्थापनात व्यवस्थापक (मॅनेजर) या मोठ्या पदावर काम करत होते. ते अनेकदा परदेशातही जाऊन आले आहेत; मात्र नम्रता आणि अहं अल्प असणे या गुणांमुळे ते सहजतेने वागतात.

आज्ञापालन या गुणामुळे सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांनी नाम, सत्संग, सेवा, त्याग आणि प्रीती या सर्व टप्प्यांंनुसार साधना केली. त्यांना सेवेची अत्यंत तळमळ असून या वयातही त्यांना सतत सेवेचाच ध्यास असतो. मागील ३ वर्षांपासून ते सनातन संस्थेच्या देवद आश्रमात रहात आहेत. आश्रमजीवनाशीही ते चांगल्या प्रकारे समरस झाले आहेत. देहबुद्धी न्यून असलेले आणि देेवावर दृढ श्रद्धा असलेले सामंतकाका अखंड भावावस्थेत असतात.

या सर्व गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. आजच्या शुभदिनी श्री. सदाशिव सामंत यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते सनातन संस्थेच्या १०३ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या पत्नी सौ. दिनप्रभा सदाशिव सामंत यांची आध्यात्मिक पातळीही ६५ टक्के असून त्याही पू. सामंतकाकांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रगती करत आहेत.

पू. सदाशिव सामंत यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. सामंतआजोबा यांनी संतपद गाठल्यानंतर व्यक्त केलेले कृतज्ञतारूपी भावोद्गार !

कृतज्ञताभावत असलेले पू. सामंतआजोबा

मी संत होण्याच्या योग्यतेचा नसतांनाही गुरुमाऊलींनी मला संत केले !

मी संत होईन, असे वाटले नव्हते. मला माझी आध्यात्मिक प्रगती होत असल्याचे जाणवायचे; परंतु हे सर्व एवढ्या जलद गतीने होईल, असे वाटले नव्हते. (आजोबांची गुरुपौर्णिमा २०१९ या दिवशी आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती.) मी संत होण्याच्या योग्यतेचा नाही; परंतु गुरुमाऊलींनी मला संत केले. मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. त्यांनी मला असेच कृतज्ञतेच्या भावात ठेवावे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

गुरुमाऊलींनी आतापर्यंत जे काही दिले आहे, त्यासाठी मी जन्मोजन्मी कृतज्ञ राहीन !

सेवा मन लावून केली की, देव आनंद देतो. आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद घेतांनाही मला पुष्कळ आनंद मिळतो. याची तुलना अन्य कोणत्याच अन्नासमवेत होऊ शकत नाही. मी नोकरी करतांना उच्च पदावर होतो. मला सर्व मिळाले होते; परंतु आता गुरुमाऊली देत असलेला आनंद मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. परात्पर गुरु डॉक्टरांनी आतापर्यंत मला जे काही दिले आहे, त्यासाठी मी जन्मोजन्मी कृतज्ञ राहीन.

सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातून गुरुदेवच माझी काळजी घेतात, असा माझा दृढ संकल्प आहे !

आश्रमामध्ये प्रतिदिन सकाळी सद्गुरु राजेंद्रदादा मला भेटायचे. मी त्यांना नमस्कार करायचो. तेव्हा माझ्यावरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होऊन मला चैतन्य मिळत होते. माझ्या अडचणी दूर व्हायच्या. त्यांना केलेला नमस्कार गुरुदेवांपर्यंत पोचतोे. त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच माझी काळजी घेतात, असा माझा दृढ विश्‍वास आहे. (पू. सामंतआजोबा यांचा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याप्रती भाव आहे. – संपादक)

मी अत्यंत लहान आहे !

माझ्याकडून प्रतिदिन नामजप व्हायचा. मी आरती करत होतो, हे सर्व गुरुदेवांनीच माझ्याकडून करवून घेतले; म्हणून व्हायचे. माझ्याकडून हे झाले नसते; कारण मी अत्यंत लहान आहे.

 

पू. सामंतआजोबा यांचा साधकांना संदेश

दिवसभर मन लावून सेवा करायला हवी. सेवेतून आनंद मिळतो. या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यास सर्वांची आध्यात्मिक उन्नती होणारच आहे. प्रार्थना, कृतज्ञता आणि सर्वांमध्ये गुरुमाऊलींचे रूप पहाणे, अशा प्रकारे प्रयत्न केल्यास गुरुमाऊलींच्या कृपेमुळे प्रगती होणारच आहे. जय गुरुदेव ! जय गुरुदेव ! जय गुरुदेव !!

 

कुटुंबियांनी पू. सामंतआजोबांच्या विषयी विविध प्रसंग सांगून त्यांच्या गुणांचे घडवले दर्शन

पू. सदाशिव सामंत, सौ. दिनप्रभा सामंत (पत्नी) आणि सौ. माधुरी मंद्राल (मुलगी)

सौ. दिनप्रभा सामंत (पू. सामंतआजोबा यांची पत्नी)

लहानपणापासूनच सद्वर्तनी असणारे पू. सामंतआजोबा !

पू. सामंतआजोबा हे लहानपणापासून सद्वर्तनी होते. कोणत्याही परिस्थितीत आनंद कसा शोधायचा, हे ते पहायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. आजोबांना एकूण ८ भावंडे होती. पू. आजोबा सर्वांत मोठे असल्याने त्यांनी लहान भावंडांना शिकवले. शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेतांना स्वतः शिकत असूनही लहान भावंडांचे सर्व सांभाळून आईलाही घरकामामध्ये साहाय्य केले.

लहानपणापासूनच प्रेमळ आणि अहं अल्प असणे

लहानपणापासून ते सर्वांचे लाडके होते. त्यांची सर्व भावंडे उच्च शिक्षित आहेत; परंतु त्या सर्वांना मी शिकवले, असे ते कधीच म्हणत नाहीत. त्यांना शिकवल्याचा अहं आजोबांमध्ये नाही. त्यांनी कोणत्याच गोष्टीचा कर्तेपणा स्वतःकडे कधीच घेतला नाही. त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच अतिशय प्रेमळ होता.

ते सर्वतः चांगले आणि सुंदर आहेत !

वयाच्या ८२ व्या वर्षीही ते आश्रमात पुष्कळ सेवा करतात. वयाचा किंवा प्रकृतीचा विचार न करता ते करत असलेली सेवा पाहून त्यांना काहीतरी शारीरिक त्रास होईल, याची भीती वाटते; पण आता मी सर्व गुरुदेवांवर सोपवले आहे. ते सर्वत: चांगले आणि सुंदर आहेत. त्यांच्या आधारामुळे मी संसारात टिकू शकले.

(सौ. दिनप्रभा सामंतआजी यांना पू. आजोबांविषयी पुष्कळ कौतुक वाटत होते. आजोबांनी लहानपणापासून किती कष्टात दिवस काढले, याविषयी सांगतांना आजींचा भाव दाटून आला होता.)

पू. सामंतआजोबा

आमच्या संसारात सौ. सामंतआजींचा सहभाग पुष्कळ मोठा आहे !

आजींनी मनोगत व्यक्त केल्यानंतर पू. सामंतआजोबा आजींविषयी एक प्रसंग सांगतांना म्हणाले, आमचा विवाह झाल्यानंतर घरामध्ये लाईट (वीज) आली. (सौ. आजींकडे पाहून) खर्‍या अर्थानेही लाईट आली. संसारामध्ये आजींचा सहभाग पुष्कळ मोठा आहे, हे मला अंतर्मनातून वाटते. पहिल्यापासून परात्पर गुरुदेवांचे आमच्याकडे लक्ष होते, हे आता जाणवते; कारण त्यांनीच सर्व गोष्टी करवून घेतल्या आहेत. परिस्थिती आपण पालटू शकत नाही, ती स्वीकारावी लागते. मीही याप्रमाणेच जीवनातील सर्व कृती केल्या.

सौ. माधुरी मंद्राल (पू. सामंतआजोबांची कन्या)

बाह्य परिस्थिती कशीही असली, तरी आतून आनंदी आणि स्थिर असायला हवे, हे प्रसंगातून शिकवणारे बाबा (पू. आजोबा) !

उपस्थित संत आणि साधक यांच्या समोर पू. सामंतआजोबांविषयी काय सांगायचे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्या वेळी त्यांनी देवाला प्रार्थना केल्यावर देवाने त्यांच्या लहानपणीचे दोन प्रसंग लक्षात आणून दिले. ते पुढील दोन प्रसंग त्यांच्या जीवनातील लाईफ लेसन (आयुष्यासाठी धडा) झाले. प्रसंग ऐकल्यानंतर ते सर्वांसाठीच लाईफ लेसन झाले.

मी लहान असतांना बाबांसमवेत वरळी येथे जाण्यासाठी निघाले. पाऊस पुष्कळ पडलेला असल्याने सर्वत्र पाणी साठले होते. त्या वेळी माझ्या कमरेपर्यंत पाणी होते. दादर स्थानकातून बाहेर चालत असतांना पाणी पाहून मी घाबरले आणि बाबांना म्हणाले, एवढ्या पाण्यातून कसे जायचे ? त्यावर बाबा म्हणाले, काळजी करू नकोस. आपण कुसुमाग्रजांची कविता म्हणत जाऊया. त्याप्रमाणे आम्ही दोघे मोठ्याने कविता म्हणत त्या पाण्यातून वरळीपर्यंत ६ किमी अंतर पार करत चालत कसे पोचलो, हे समजलेच नाही. बाबांनी माझा हात घट्ट पकडला होता. त्या प्रसंगातून बाह्य परिस्थिती कशीही असली, तरी आतून स्थिर असायला हवे, हे मी शिकले. एवढ्या भीतीदायक प्रसंगातही आम्ही आनंदात गेलो. या प्रसंगाने बाबांनी मला आयुष्यभरासाठी प्रत्येक परिस्थितीत स्थिर रहावे हा धडा दिला. माझे पती सैन्यदलात आहेत. आमच्यावर अनेक कठीण प्रसंग येतात. तेव्हा मला हा प्रसंग आठवून मी स्थिर होते.

आपल्या लोकांसाठी करतांना आनंदच मिळतो, याची शिकवण बाबांनी दिली !

लहानपणी आमचे एकत्रित कुटुंब होते. त्या वेळी बाबा दोन्ही हातांत १०-१० किलो भाजीच्या पिशव्या स्वतः उचलून आणायचे. मी त्यांना विचारायचे, तुम्हाला दमायला होत नाही का ? तेव्हा ते सांगायचे, आपल्या माणसांसाठी आपण काही करतो, तेव्हा दमायला होत नाही, तर त्यातून आनंदच मिळतो. लहानपणी मला या उत्तरातून काही समजले नव्हते; परंतु आता मीही जेव्हा आपल्या लोकांसाठी करते, तेव्हा आनंदच मिळतो, हे लक्षात आले. कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता करत रहायचे, असा बाबांचा स्वभाव आहे. आपल्या मनात जेवढे प्रेम अधिक असते, तेवढा आपल्या आयुष्यात आनंद असतो, हेच बाबांकडून मला शिकायला मिळाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment