कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥ लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ॥ सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥
संसारातील कर्तव्ये विठ्ठलरूप स्मरून करत रहाणे, यालाच संत सावता महाराज ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।’ म्हणतात. सावता माळी यांनी ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तिसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ति होऊ शकते असे म्हणणार्या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.
संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत रहाणे, हीच खरी ईश्वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत ! वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले.
फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय ! ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. ‘ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतांनाच काया-वाचे-मने ईश्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’, असे ते म्हणत. धार्मिक प्रबोधनाचे आणि ईश्वरभक्तीच्या प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने अन् ‘व्रत’ म्हणून आचरले.
सावता महाराजांनी पांडुरंगाला लपवण्यासाठी खुरप्याने आपली छाती फाडून बालमूर्ती ईश्वराला हृदयात दडवून ठेवून वर उपरणे बांधून ते भजन करीत राहिले. पुढे संत ज्ञानेश्वर, नामदेव पांडुरंगाच्या शोधात सावता महाराजांकडे आले, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावतोबांच्या छातीतून निघाले. ज्ञानेश्वर, नामदेव पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य झाले. सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख नि आनंद आहे. तीच विश्रांती आहे.
सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा l
जेणे मुक्ती द्वारा ओळंगती ll
समरसता आणि अलिप्तता यांतील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तीमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग सध्या उपलब्ध आहेत.
धर्म की विजय हो..
रामकृष्ण हरी
संत सावता महाराज