सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाले, अशी आनंदवार्ता ८ जुलै या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात देण्यात आली.
डॉ. शिवकुमार ओझा काही दिवसांसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आले आहेत. यानिमित्त एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे तथा सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी ही आनंददायी घोषणा केली. सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांनी पू. (डॉ.) ओझा यांचा हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू अर्पण करून सन्मान केला. याप्रसंगी सनातन संस्थाचे संत आणि साधक उपस्थित होते.
पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांची वैशिष्ट्ये
१. ‘भक्तीयोग्यांची साधना आरंभी मनाच्या स्तरावर असते, तर ज्ञानयोग्यांची साधना बुद्धीच्या स्तरावर असते; म्हणून ज्ञानयोगानुसार साधना करणे कठीण असते, तरी पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांनी ती केली.
२. बहुतेक ज्ञानयोग्यांमध्ये ज्ञानाचा अहं असतो; परंतु पू. (डॉ.) शिवकुमार ओझा ज्ञानयोगी असूनही त्यांच्यात अहं नाही.
३. ‘शब्दजालं महारण्यं चित्तभ्रमणकारणम् ।’, म्हणजे ‘शब्दांचे जाळे हे मोठ्या अरण्याप्रमाणे असून ते चित्त भरकटण्यास कारण ठरते.’ असे सुभाषित असले, तरी पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांनी शब्दांच्या जाळ्यात न अडकता त्यातून योग्य तेच घ्यायला त्यांच्या ग्रंथांतून समाजाला शिकवले आहे.
४. ‘त्यांच्यातील प्रीती या गुणामुळे त्यांच्याकडे असलेले ज्ञान सर्वांपर्यंत पोचावे’, अशी त्यांना तळमळ आहे. असे ‘डॉ. शिवकुमार ओझा संतपदाला पोचले’, यात आश्चर्य ते काय ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. अशी झाली संतपदी विराजमान झाल्याची घोषणा !
कार्यक्रमाच्या आरंभी श्री. नागेश गाडे यांनी पू. (डॉ.) ओझा यांनी भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. श्री. गाडे म्हणाले, ‘‘डॉ. ओझाजी धर्मसंशोधक आहेत. त्यांना धर्माविषयी आवड आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ ज्ञानाचे भांडार आहेत. ज्ञानशक्तीद्वारे हिंदुत्वासाठी निरपेक्षपणे कार्य करणारे डॉ. ओझा खर्या अर्थाने ‘भारतरत्न’ आहेत. अध्यात्माचा अभ्यास करून ज्ञान आत्मसात करणे, त्याप्रमाणे आचरण करणे, तसेच त्या ज्ञानाचा प्रसार करणे, ही तिन्ही अंगे ज्ञानमार्गात अंतर्भूत आहेत. डॉ. ओझाजी यांनी या तिन्ही अंगांचे योग्य प्रकारे पालन केले. त्यामुळे ते जलदगतीने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. कलियुगात असलेल्या रज-तमाच्या प्रभावामुळे ज्ञानमार्गानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती करणे कठीण असते; परंतु निर्मळता, जिज्ञासा आणि वैदिक धर्मावरील दृढ श्रद्धा यांमुळे डॉ. ओझा यांनी अशक्य गोष्ट शक्य केली. या विविधांगी गुणांमुळेच डॉ. ओझाजी संतपदी विराजमान झाले आहेत. ज्ञानमार्गानुसार साधना करून संतपदापर्यंत मार्गक्रमण करण्याचे कलियुगातील दुर्लभ उदाहरण डॉ. ओझाजी यांच्या माध्यमातून आपण अनुभवत आहोत.’’
२. पू.(डॉ.) ओझा यांनी व्यक्त केलेले मनोगत
२ अ. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, तर स्वभाषेविषयी प्रेम जागृत होईल ! – पू. (डॉ.) ओझा
२ अ १. ‘न्यायदर्शन’ या ग्रंथाचे नावही बहुतेक अधिवक्त्यांना ठाऊक नसणे
हिंदूंमध्ये धर्माविषयी पुष्कळ अज्ञान आहे. अधिवक्त्यांनाही धर्माचे शिक्षण नाही. महर्षि गौतम यांनी रचलेल्या ‘न्यायदर्शन’ या ग्रंथात ‘खरा न्याय काय आहे’, याविषयी लिहिण्यात आले आहे. या ग्रंथाचा अभ्यास करणे, तर लांब राहिले, त्याचे नावही बहुतेक अधिवक्त्यांना ठाऊक नाही. आज ‘प्रमाणांवर आधारित निर्णय देणे’ अशीच न्यायाची व्याख्या केली जाते.
२ अ २. स्वभाषेचे ज्ञान नसल्यामुळे ज्ञानाचा स्तर घसरत आहे !
आमच्या विद्वानांचा हिंदु धर्माचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यांची विद्वत्ता न्यून झाली आहे. स्वभाषेत शिक्षण न घेतल्याने विद्यार्थ्यांना अल्प प्रमाणात ज्ञान मिळत असून त्यांचीही विद्वत्ता न्यून होत चालली आहे. स्वभाषेचे ज्ञान नसल्यामुळे ज्ञानाचा स्तर घसरत आहे. जीवनाशी संबंधित अनेक संस्कृत शब्दांचा अर्थ ठाऊक नसल्याने लोकांना जीवनाचा अर्थही कळत नाही. भारतीय भाषा बोलल्या, अभ्यासल्या जाऊ लागल्या, तर मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळून आमचा आत्मविश्वास वाढेल. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, तर स्वभाषेविषयी प्रेम जागृत होईल. भारतीय संस्कृती जर ‘आयआयटी मुंबई’ मध्ये अभ्यासली जाऊ शकते, तर अन्य ठिकाणीही शिकवली जाऊ शकते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, तर स्वत:विषयी आत्मविश्वास वाढेल. भाषा देशाची संस्कृती दर्शवते. स्वभाषेतील अक्षर आणि शब्द यांना अर्थ आहे. आजच्या पिढीला आधिभौतिक आणि आधिदैविक गोष्टींचे शिक्षण द्यायला हवे.
३. पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांची विनयशिलता !
‘संतपदी विराजमान झाल्यावर तुम्हाला काय वाटते ?’, असे विचारल्यावर पू. (डॉ.) ओझाजी म्हणाले, ‘‘मी अज्ञानी आहे. मला कोणतीही गोेष्ट योग्य प्रकारे ठाऊक नाही. ऋषि-मुनी, महात्मे यांनी जे लिहून ठेवले, ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. त्यामुळे हिंदु राष्ट्र निश्चित येईल.’’
४. विहंगम गतीने आध्यात्मिक उन्नती करणारे पू. (डॉ.) ओझा !
वर्ष २०१६ मध्ये रामनाथी, गोवा येथे झालेल्या पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त पू. (डॉ.) ओझा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर वर्ष २०१७ मध्ये त्यांची पातळी ६२ टक्के आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ३ टक्क्यांनी वाढून म्हणजे ६५ टक्के झाली होती. आता वर्ष २०१९ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के, म्हणजे ६ टक्क्यांनी वाढली आहे. एवढ्या विहंगम गतीने झालेल्या उन्नतीमुळे त्यांचे धर्माप्रती असलेले समर्पण किती उच्च स्तराचे आहे, हे लक्षात येतेे.
५. साधकाने व्यक्त केलेले मनोगत !
५ अ. पू. (डॉ.) ओझाजी यांच्यात नवीन शिकण्याची
पुष्कळ तळमळ असून त्यांच्यात विनम्रता आहे ! – श्री. रूपेश रेडकर
पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालीकांविषयी माहिती देतांना श्री. रुपेश रेडकरमला पू. (डॉ.) शिवकुमार ओझा यांना आश्रम दाखवण्याची सेवा मिळाली. इतर वेळी संपूर्ण आश्रम दाखवण्यासाठी २ घंटे लागतात; परंतु पू. (डॉ.) ओझाजी यांना आश्रम पहायला ३ घंटे लागले. त्यांच्यात नवीन शिकण्याची पुष्कळ तळमळ आहे. जे जे नवीन दिसेल, त्याविषयी प्रश्न विचारून ते अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सनातन संस्थाचे बालसंत पू. भार्गवराम यांची भेट झाली. पू. भार्गवराम केवळ २ वर्षांचे आहेत. असे असतांनाही ‘ते संत आहेत’ म्हणून पू. ओझा यांनी त्यांना लगेच नमस्कार केला, तसेच त्यांच्या आईलाही ‘त्या संतांच्या आई आहेत’ म्हणून नमस्कार केला. सनातन संस्थाचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांच्याशी भेट झाल्यावरही पू. ओझाजी यांनी त्यांना भावपूर्ण नमस्कार केला. या दोन्ही प्रसंगातून त्यांच्यात असलेली नम्रता दिसून आली.
६. भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी आयुष्य समर्पित करणारे पू. (डॉ.) शिवकुमार ओझा !
६ अ. पू. (डॉ.) ओझा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे
‘आयआयटी मुंबई’ मध्ये ‘भारतीय संस्कृती’ हा विषय शिकवला जाऊ लागणे
पू. (डॉ.) शिवकुमार ओझा ‘आयआयटी, मुंबई’ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय दायित्व सांभाळले, तसेच विदेशातही अध्यापनाचे कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर ‘भारतीय संस्कृती’ जाणून घेण्याविषयी त्यांची विशेष रूची वाढली. त्यानंतर भारतीय संस्कृती हेच त्यांचे अध्ययन आणि अध्यापन यांचे क्षेत्र बनले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘भारतीय संस्कृती’ हा विषय ‘आयआयटी, मुंबई’मध्ये शिकवला जाऊ लागला. तसेच या विषयावर स्वत: अध्यापन करून त्यांनी तेथील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी रूची निर्माण केली. पू. ओझाजी जितका काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, तितक्या कालावधीत ‘भारतीय संस्कृती’ हा विषय शिकणार्यांची संख्या प्रतिवर्षी वाढतच होती.
६ आ. पू. (डॉ.) ओझा यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वैशिष्ट्य !
पू. (डॉ.) ओझा यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘भारतीय संस्कृती महान आणि विलक्षण’ या नावाचा त्यांचा ६६० पृष्ठांचा ग्रंथ सनातन वैदिक संस्कृतीचा साररूपी ग्रंथ आहे.
६ इ. पू. (डॉ.) ओझाजी आणि सनातन संस्था !
पू. (डॉ.) ओझाजी यांना सनातन संस्थेच्या कार्याविषयी विशेष आस्था आहे. ते नेहमी सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा करतात, तसेच त्यांच्या सहवासात येणार्या साधकांनाही ते पितृतुल्य प्रेम देतात. या ऋणानुबंधामुळे ते आता सनातन परिवारातीलच एक सदस्य वाटतात. सनातन संस्थेवरील या प्रेमापोटी त्यांनी वर्ष २०१८ मध्ये त्यांच्या काही ग्रंथांचे गोवा येथील सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये लोकार्पण केले होते.