ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा

 

 महान गुरु लाभल्यावर पत्रिका बघायची आवश्यकता
नसल्याचे आणि पत्रिकेत सर्व ग्रह ‘गुरु’च असल्याचे ज्योतिष्यांनी सांगणे

‘६.१२.२००७ या दिवशी मी, माझा भाऊ आणि वडील नाशिक येथील प्रख्यात ज्योतिषी डॉ. समेळ यांच्याकडे पत्रिका दाखवण्यासाठी गेलो. मी प्रथमच कोणा ज्योतिषाकडे पत्रिका दाखवण्यासाठी जात होते. मनात मात्र विचार येत होते की, ‘कर्ते-करविते संतच आहेत. तेच सर्वकाही करतात, मग पत्रिका कशाला दाखवायची ?’ तेव्हा गुरूंना प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असे सर्वकाही होऊ दे.’

डॉ. समेळ यांची भेटीची वेळ ठरवतांना ‘आम्ही साधक आहोत’, हे त्यांना सांगितले होते. त्यांच्याकडे पोहोचल्यावर त्यांनी प्रथम भावाची पत्रिका बघून त्याच्या वर्तमानस्थितीचे तंतोतंत वर्णन केले. त्याला काही उपाय सांगून प्रतिदिन ध्यानसाधना करण्यास सांगितले. त्यानंतर वडिलांनी माझी पत्रिका त्यांच्याकडे दिली आणि मी साधना करत असल्याचे सांगितले. हे ऐकताच त्यांनी माझी पत्रिका बंद केली आणि म्हणाले, ‘‘महान गुरु लाभल्यावर पत्रिका कशाला बघायची. तुझ्या पत्रिकेत सर्व ग्रह ‘गुरु’च आहेत.’’

यानंतरही भावाने दोन वेळा त्यांना माझी पत्रिका बघण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘महान गुरु तुम्हाला लाभले आहेत, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.’

– एक साधिका

(संबंधित ज्योतिषांचा गुरूंविषयी असलेला हा भाव आहे. – संपादक)

 

साधकांचा योगक्षेम ईश्‍वर वहात असल्याने ‘व्यवहारातील
मापदंड साधना करतांना पालटतात’, या वाक्याची आलेली प्रचीती !

‘‘संक्रांत येणे’ म्हणजे ‘संकट येणे.’ संक्रांत एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसर्‍या दिशेला जाते आणि त्या वेळी तिसर्‍या दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते, त्या दिशेला समृद्धी येते आणि ज्या दिशेला जाते अन् पहाते, त्या ठिकाणी संकट कोसळते. काही जणांच्या मते संक्रांत ज्या वयाची आहे, त्या वयाच्या व्यक्तींवर संकटे (मृत्यू) येतात. ज्या वर्षी ‘संक्रांत वयाने प्रौढ आहे’, असे म्हटले आहे. त्या वर्षी सनातन संस्थेच्या वयाने प्रौढ असणार्‍या काही साधकांची ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाल्याचे कळल्यावर मनात विचार आला, ‘व्यवहारातील मापदंड साधना करतांना पालटतात; कारण साक्षात् गुरु आणि ईश्‍वर त्यांचा योगक्षेम वहात असतो.’

व्यवहारात एकत्रित व्यवसाय करतांना, विवाहाच्या वेळी ‘एकमेकांच्या राशींमध्ये मृत्यू षडाष्टक नाही ना ?’, हे आवर्जून पहातात. मृत्यू षडाष्टक योग असल्यास प्रतिकूल घडते; परंतु अनेक साधकांच्या राशींचे मृत्यू षडाष्टक असूनही त्यांची आध्यात्मिक मैत्री असल्याचे आढळले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ.

व्यवहारातील व्यक्तींना साडेसातीत अनेक प्रतिकूल अनुभव येतात. ‘आपल्या राशीला साडेसाती येणार’, या विचारानेच अनेकांच्या पोटात गोळा येतो; परंतु साडेसातीत स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे प्रयत्न योग्य पद्धतीने केलेल्या अनेक साधकांची ६० प्रतिशत ते ७० प्रतिशत आध्यात्मिक पातळी झाली आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, गोवा. (२५.१.२०१७)

 

विविध ज्योतिषांनी विवाहाच्या संदर्भात नकारात्मक
सूत्रे सांगणे; मात्र संतांनी स्थळ चांगले असल्याचे सांगणे

नाडीवाचनतज्ञांनी ‘२ वेळा विवाहयोग असतांना मी त्याचा त्याग केला असल्याने आता योग नाही’, असे  सांगितले होते. एका ज्योतिषांनी सांगितले की, तुला साधक मिळणे कठीण आहे. तुला विवाह करायचाच असल्यास नातेवाइकांत शोधू शकतेस. अन्य एका ज्योतिषाने ‘वास्तूशांती झाल्याविना विवाह होणार नाही’, असे सांगितले होते. त्यानंतर मला साधकाचे स्थळ आले. एका ज्योतिषाने सांगितले की, २ महिनेच त्याच्यासोबत चांगले जाणार. एका संतांनी सांगितले, ‘‘कलियुगात १० टक्के आणि आपत्काळात ८ टक्के मन जुळण्याचे प्रमाण असते; पण तुमचे ३० प्रतिशत जुळते. म्हणजे चांगले आहे. हा दैवी योग असून प्रारब्धामुळेच जुळून आले आहे.’’ यावरून ज्योतिषाच्या मर्यादा आणि संतांचे महत्त्व लक्षात येते. – एक साधिका

 

परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नामजप आणि
स्वसंमोहन उपचार केल्याने वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होणे; पण
‘अधिवक्ता होणे, हे भाग्यातच नव्हते’, असे प्रख्यात ज्योतिषांनी सांगणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेले संमोहन उपचार आणि कुलदेवतेचा नामजप केल्यामुळे श्री. राजेंद्र पाटणे हे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी त्यांची जन्मपत्रिका पुणे येथील प्रख्यात ज्योतिषी श्री. म.दा. भट यांना दाखवली. तेव्हा श्री. भट म्हणाले, ‘‘तुम्ही अधिवक्ता आहात; पण तुमच्या पत्रिकेत तसा योगच नाही, तुम्ही काय केले ?’’

– कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

ज्योतिषशास्त्राचे निष्कर्ष हे कधीच १०० टक्के खरे होत नाहीत

व्यक्तीचा स्वभाव आणि उपजत असलेल्या मनोवृत्तींची अन् गुणांची थोडीफार कल्पना ज्योतिषशास्त्र देते. जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून जन्मकुंडली म्हणजे पत्रिका सिद्ध केली जाते. त्यावरून मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची थोडीफार कल्पना येते.

पत्रिका सिद्ध करण्याच्या आणि त्याचे निष्कर्ष काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे यावरून, तसेच निरनिराळ्या ग्रहांच्या कोणत्या स्थानावर आणि ग्रहावर दृष्टी आहे, यावरून सहस्रो विविध प्रकारचे निष्कर्ष काढणे शक्य होते; म्हणून ज्योतिषशास्त्राचे निष्कर्ष हे कधीच १०० टक्के खरे होत नाहीत.

९९ टक्के ज्योतिष वर्तवणार्‍यांनी ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला नसतो; म्हणून त्यांचे बरेचसे निष्कर्ष चुकीचे ठरतात. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आपले बाळ (जन्मापूर्वी)’ )

 

ज्योतिषशास्त्राने अस्त्राचेही काम करणे

सुप्रसिद्ध हुकूमशाहा हिटलरने ‘नॉस्ट्रॅडॅमस’च्या भविष्याचा हवा तसा अनुवाद करून जर्मनीत सर्वत्र प्रसार केला होता. त्यामुळे शत्रूपक्षाच्या सैनिकांचे मनोबल संपले आणि त्यांना पराजित करणे फारच सोपे झाले. सैनिक ९० टक्के मनोबलावरच जगत आणि लढत असतो; म्हणून सैनिकांचे मनोबल खच्चीकरण करायला ज्योतिष आणि भविष्य हे शास्त्र अस्त्रांपेक्षाही मोठे काम करू शकतात. याचा इतिहासकाळात मोठ्या प्रमाणात अनुचित वापर झाला आहे आणि आता होत आहे. हिटलरच्या तोडीस तोड म्हणून इंग्लंडनेही नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्याचा स्वतःला हवा तसा अर्थ काढून तो प्रसिद्ध करून विमानातून पत्रिका वाटल्या. हिटलरने कसा चुकीचा अर्थ काढला, त्याचा दुरुपयोग कसा केला आणि आमचे कसे खरे आहे, हे सप्रयोग पुराव्यासह इंग्लंडने पटवून दिले. त्यामुळे हिटलरच्या सैनिकांचे मनोबल खचले आणि समर्थकांचे मनोबल वाढले. शेवटी हवे तेच घडले. जर्मनी हरली. हिटलरला आत्महत्या करावी लागली. शास्त्र हे अस्त्राचेच काम करते; म्हणून लोक त्याचा हवा तसा उपयोग करतात. त्यामुळे ते तेवढेच घातकही आहे.

(साभार : पाखांड प्रश्‍नोत्तरी, लेखक : वटेमोड महाराज, नांदेड; प्रकाशक : शिवाजी प्रकाशन, नवी मुंबई.)

 

 

काही त्रुटी अथवा उणिवा असल्यास भाकिते चुकू शकणे

‘ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या कुंडलीचे भाकीत वर्तवतांना अनेक मर्यादा असतात. अनेक नियम असतात. यांमध्ये काही त्रुटी अथवा उणिवा असल्यास भाकिते चुकू शकतात; परंतु अध्यात्मातील संत त्यांच्या साधनेने अचूक भविष्य वर्तवू शकतात, उदा. स्थानांचे समष्टी प्रारब्ध : ‘जी शहरे आता (वर्ष १९९७ मध्ये) खूपच भरभराटीला आली आहेत, त्या शहरांमध्ये कालांतराने अरण्ये निर्माण होतील. ज्या शहरांमध्ये सर्व तर्‍हेचा अभाव आणि गरिबी दिसून येत आहे, ती सर्व शहरे कालांतराने भरभराटीला येतील.’

– श्रीस्वामी दत्तावधूत (संदर्भ : अगम्य वाणी, पृ. २३)

 

गिर्‍हाईकाचा चांगले ऐकण्याचा आग्रह असल्याने ज्योतिषाने तसेच सांगणे

‘काही लोक यश मिळाले नाही; म्हणून ज्योतिषाकडे धाव घेतात. त्यांचा दैवावर अधिक विश्‍वास असतो. ज्योतिषी जे भविष्य सांगतील, त्यावर त्यांचा विश्‍वास बसतो. ‘भविष्यात चांगले दिवस लवकर येतील’, हे वाक्य त्या ज्योतिषाकडून वदवून घेतल्याविना त्यांचे समाधान होत नाही. ज्योतिषीही स्वतःची लवकर सुटका करून घेण्यासाठी गिर्‍हाईकाशी गुळगुळीत द्विअर्थी भाषा वापरतो.’

वाईट शक्ती आणि ज्योतिषी : वाईट शक्ती कधी कधी ज्योतिषाची दिशाभूल करतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment