सनातन आश्रम, देवद (पनवेल) – पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी २३ जून २०१९ या दिवशी सायंकाळी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली. ४ दिवसांच्या वास्तव्यात प.पू. आबांनी आश्रमातील संत, साधक, तसेच दैनिक सनातन प्रभातशी संबंधित सेवा करणारे साधक यांची भेट घेतली. त्यांच्या आगमनामुळे साधकांना आध्यात्मिक चैतन्य लाभल्याचे जाणवले. सनातन संस्थेचे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन प.पू. आबांचा सन्मान केला. २७ जून या दिवशी त्यांनी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी प्रयाण केले. आश्रमातील वास्तव्य प.पू. आबा यांना पुष्कळ आवडले आणि ‘मी आश्रमात पुन:पुन्हा येईन’, असे त्यांनी साधकांना निघतांना सांगितले.
आश्रमातील वास्तव्यात प.पू. आबा उपाध्ये यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती करून घेतली. या वेळी त्यांनी त्यांच्याकडील दैवी विभूती प्रार्थना करून साधकांना लावली. आश्रमातील साधक आणि संत यांना मार्गदर्शन करून त्यांचे शंकानिरसनही केले. प.पू. आबा यांनी सनातन संस्थेच्या आश्रमाजवळील सनातन संकुलातील सनातन संस्थेच्या सद्गुरु (श्रीमती) फडकेआजी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या खोलीचेही दर्शन घेतले. प.पू. आबा यांनी त्यांच्या आश्रमभेटीच्या कालावधीत सर्व साधकांना पुष्कळ प्रेम आणि आनंद दिला. प.पू. आबा यांच्यासह त्यांचे नातेवाईकही आश्रमात आले होते. त्यांनाही आश्रम पाहून प्रसन्न वाटले.
प.पू. आबा उपाध्ये यांच्या आश्रमभेटीतील काही क्षणमोती
१. शिवमंदिरात प.पू. आबा उपाध्ये यांनी केलेली ध्यानधारणा !
देवद येथील सनातन संस्थेच्या आश्रमाजवळील शिवमंदिरातील गाभार्यात प.पू. आबा बराच वेळ बसले. त्या वेळी त्यांनी शंकराला प्रार्थना केली, टाळ्या वाजवून भजन म्हटले आणि ध्यान लावले. तेव्हा ‘संतांच्या आगमनामुळे मंदिरातील शक्ती आणि चैतन्य यांमध्ये वाढ झाली’, याची अनुभूती साधकांना आली.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार केल्यावर प.पू. आबांची झालेली भावजागृती !
आश्रमातून निघतांना त्यांनी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला भावपूर्ण नमस्कार केला. ते त्यांच्याशी बोलले. तेव्हा ५ मिनिटे त्यांना भावाश्रू येत होते. त्यांच्या तोंडवळ्यावर कृतज्ञताभाव जाणवत होता. हे दृश्य पहातांना ‘चैतन्याच्या दोन सागरांचे (प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. आबा उपाध्ये यांचे) मीलन होत आहे’, असे वाटून उपस्थित साधकांचाही भाव जागृत झाला.
३. सनातनच्या संस्थेच्या आश्रमात प्रत्येक ४ मासांनी येणार असल्याचे प.पू. आबांनी सांगणे
देवद आश्रमात आणखी वास्तव्य करण्याविषयी साधकांनी प.पू. आबा यांना प्रार्थना केल्यावर ते म्हणाले, ‘‘मला येथे पुष्कळ आवडले. प्रत्येक ४ मासांनी ४ दिवसांसाठी मी येथे येत जाईन.’’
प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडे असलेल्या विभूतीच्या डब्याचे वैशिष्ट्य
प.पू. आबा त्यांच्याकडे असलेल्या विभूतीच्या डब्यातील दैवी विभूती साधकांना लावतात. ही विभूती वापरून कितीही अल्प झाली, तरी काही दिवसांनी या डबीत ही विभूती पुन्हा आपोआप निर्माण होते. विभूतीच्या डब्यात एक शिवपिंडी आहे. ती प.पू. आबा यांना त्यांचे गुरु प.पू. सदानंद स्वामी यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे दिली आहे.
प.पू. आबा उपाध्ये यांच्या कन्या श्रीमती संध्या कोठावळे आश्रम पाहून झाल्या प्रभावित !
आश्रमात पाणी काटकसरीने वापरण्यासाठी केलेली व्यवस्था, प्रत्येक साधकाने धर्मशास्त्रानुसार लावलेला कुंकवाचा टिळा, तसेच आश्रमातील अन्य व्यवस्था इत्यादी पाहून प.पू. आबांच्या कन्या श्रीमती संध्या कोठावळे प्रभावित झाल्या. त्या म्हणाल्या, ‘‘गोरेगाव येथील आमच्या शाळेच्या संचालक मंडळात साधक व्यक्ती हवी, म्हणजे शाळेची व्यवस्था चांगली होईल. आश्रमात आल्यामुळे प.पू. आबांची प्रकृती सुधारली. साधकांच्या सेवाभावामुळे हे सर्व झाले. असे कार्य कोठेच होत नाही.’’
प.पू. आबा यांनी आश्रमातील साधकांना केलेले मार्गदर्शन
१. सनातन संस्थेचे साधक आदराने प्रथम नमस्कार करतात, तर बाहेरचे लोक शेवटी ‘नमस्कार’ म्हणतात !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात मी ५-६ वर्षांपूर्वी गेलो होतो. सनातन संस्थेच्या आश्रमातील प्रत्येक साधकाची वागणूक चांगली आहे. मी मोठा नाही, तरी मला साधक ‘नमस्कार, परम पूज्य आबा’, असे म्हणतात, तर बाहेर मला ‘आबा नमस्कार !’, असे म्हणतात. सनातन संस्थेचे साधक भेटल्यावर प्रथम आदराने नमस्कार करतात, तर बाहेरचे लोक शेवटी ‘नमस्कार’ म्हणतात. हा भेद आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका साच्यातून चांगले साधक सिद्ध केले आहेत’, असे वाटते. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ याही सारख्याच आहेत.
२. सनातन संस्थेची नदी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात उगम पाऊन पुष्कळ मोठी होत आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालज्ञानी आहेत. त्यामुळेच त्यांनी सनातन संस्थेचे कार्य वाढवले. संस्था गरुडझेप घेत आहे. सनातन संस्थेची नदी परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात उगम पावून ती पुष्कळ मोठी होत चालली आहे.
३. अध्यात्म हे वाचून शिकण्यापेक्षा अध्यात्माची वाटचाल करणार्याकडून अध्यात्म शिकणे चांगले होय.
पुरोगामी आणि निरीश्वरवादी यांचा प.पू. आबांनी केलेला सडेतोड प्रतिवाद
१. पुरोगामी विचारांचे प.पू. आबांनी केलेले खंडण !
मनुष्य जेव्हा मोठा, हुशार आणि बुद्धीमान होतो, तेव्हा त्याला शत्रू निर्माण होतात. त्याची निर्भत्सना केली जाते. त्याच्या कार्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याप्रमाणे सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मी अंनिस, जयंत नारळीकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव यांच्या पुरोगामी विचाराचे खंडण केले आहे, उदा. त्यांना विचारले होते, ‘‘विज्ञानाच्या जोरावर तुम्ही आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेथे पाऊस पाडू शकता का ? तसेच तुम्ही पाहिजे तेव्हा आणि पाहिजे त्या ठिकाणचा पाऊस थांबवू शकता का ?’’
२. देवाच्या अस्तित्वाविषयीचे बोलणे ऐकून देवाला न मानणारी व्यक्ती निरुत्तर झाली !
एकदा अंनिसच्या एका व्यक्तीने मला सांगितले, ‘‘मी देवाला मानत नाही; कारण मी देव पाहिला नाही.’’ मी त्याला म्हटले, ‘‘तू तुझ्या वडिलांना, आजोबांना आणि पणजोबांना पाहिले; म्हणून ते होेते म्हणायचे; मात्र पणजोबांचे वडील, त्यांच्या वडिलांचे वडील, त्यांच्या वडिलांचे वडील आदींना तू पाहिले नाहीस; म्हणून ‘ते नव्हते’, असे म्हणायचे का ? त्यामुळे देव पाहिला नाही, म्हणजे ‘तो नाही’, असे म्हणणे चुकीचे आहे. देव पहाण्यासाठी साधना करावी लागते.’’ तेव्हा ती निरुत्तर होऊन परत गेली. पुण्याचे डॉ. प.वि. वर्तक यांनी अंनिसचे शाम मानव यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार केल्यावर शाम मानव यांना शिक्षाही झालेली आहे.
प.पू. आबा उपाध्ये यांचे गुरु प.पू.
सदानंद स्वामी यांनी त्यांना सांगितलेली अध्यात्मातील ५ सूत्रे !
१. सत्य बोलावे. सत्याला दरवाजे उघडे असतात. बंद दरवाज्यात असत्य चालते.
२. समजा दोन शेजार्यांचे चांगले चालत असेल, तर तिसरी लांबची व्यक्ती येते आणि एका शेजार्याला सांगते, ‘‘तुमचा दुसरा शेजारी चांगला नाही; मात्र मी हे सांगितले, हे सांगू नका.’’ अशा तिसर्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
३. सत्य बोलण्यात आणि वागण्यात सातत्य हवे. समजा आपण १५ दिवस सातत्याने खरे बोललो, तर १६ व्या दिवशी आपोआपच आपल्याकडून खरे बोलले जाईल.
४. आपण जे काही करतो, त्याचे आपल्याला समाधान वाटले पाहिजे.
५. आपण वर्षानुवर्षे खरे बोललो, तर आपल्याला समाधी लागते आणि त्यातून ब्रह्मानंद मिळतो.
प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून
परात्पर गुरु पांडे महाराज हेच भेटायला आल्याचे साधकांना जाणवणे !
नुकतेच देहत्याग केलेले परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत प.पू. आबा उपाध्ये यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या विविध कृती आणि बोलणे यांतून साधकांना ‘प.पू. आबा यांच्या माध्यमातून परात्पर गुरु पांडे महाराज हेच साधकांना पुन्हा भेटण्यासाठी आले आहेत’, असे जाणवले. प.पू. आबा यांनी ‘आश्रमात राहून पुष्कळ आनंद मिळाला आणि उत्साही वाटले’, असे सांगितले.