ज्योतिषशास्त्रासंदर्भात सर्वसाधारण प्रश्न

जन्मतिथी कशी ठरवतात ?

व्यक्तीची जन्मतिथी ही प्रत्यक्ष जन्माच्या वेळी असणारी तिथी मानावी. समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म दुपारी २ वाजता झाला आहे आणि त्या दिवशी षष्ठी ही तिथी सकाळी ९ वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर सप्तमी ही तिथी लागते; म्हणून त्या व्यक्तीची जन्मतिथी सप्तमी होय.

जुन्या आणि नव्या जन्मतिथीनुसार संपूर्ण भविष्यात कोणताही पालट होत नाही. तिथी पालटल्याने केवळ तिथीचे फल पालटते.

सुबोध भृगुसंहिता (जातक खंड) या ग्रंथामध्ये राणा प्रताप यांची जन्मतिथी सूर्योदयाची न घेता त्यांच्या जन्मवेळेची घेतली आहे. तिथीविषयी शास्त्रीय कारण असे की, सूर्योदयाला असणारी तिथी दान, अध्ययन, धर्मकार्ये यांना उक्त, म्हणजे अनुकूल असते.

व्यक्तीची वर्षश्राद्ध तिथी ही त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळच्या तिथीवरून पहातात.

संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाहून उपवास सोडण्याचे महत्त्व असल्याने चंद्रोदयाला असणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात. इतर सर्व वेळी सूर्योदयाला असणारी तिथी ग्राह्य धरतात.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, रामनाथी, गोवा.

 

शुभकार्यासाठी मुहूर्त का पहावा ?

‘सृष्टीतील प्रत्येक गोेष्ट स्थळ, काळ आणि वेळ यांच्याशी बांधलेली असते. काळानुसार प्रत्येक गोष्टीचे स्थळ आणि त्यानुसार ती कृती घडण्यासाठीची वेळ ईश्‍वर नियोजित असते. अशुभ मुहूर्ताच्या वेळी भूमंडल, भूगर्भाचा भाग आणि वायूमंडल या ठिकाणी अनिष्ट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे आपण योजलेल्या कार्यात त्या अडथळे निर्माण करतात. त्यामुळे योजलेल्या कार्यात फलप्राप्ती होत नाही. फलप्राप्ती होण्याची गती मंदावते अथवा प्राणहानी, वित्तहानी होण्याची शक्यता असते. कार्य अशुभ मुहूर्तावर केल्यामुळे जिवाला वाईट शक्तींच्या होणार्‍या त्रासात वाढ होते. शुभ मुहूर्ताच्यावेळी भूमंडलाची शुद्धी झालेली असल्यामुळे देवतांची तत्त्वे भूमंडलावर येण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचा लाभ जिवाला होऊन इच्छित फलप्राप्ती होते. अधिकतम कार्य हे देवतेच्या आशीर्वादात्मक स्पंदनांमुळे होते. त्यामुळे मानवाची ऊर्जा अल्प वापरली जाते आणि कार्य पूर्ण होते. प्रत्येक कृती ही त्या मुहूर्तावर करणे, हा आचारधर्म पालनातील एक घटक आहे, उदा. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणे आदी. मुहूर्त काढणे आणि त्या अनुसार कृती करणे, हे त्या कृतीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या घटकांशी निगडित असते. ज्योतिषविद्येच्या माध्यमातून मुहूर्त काढणे शक्य असते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०११)

 

कुठल्या लग्नराशीला कुठला वार शुभ असतो ?

जन्मकुंडलीनुसार लाभस्थानातील राशी अधिपतीचा वार शुभकारक असणे

‘कुंडलीत अकराव्या स्थानाच्या (लाभस्थान) राशी-अधिपतीचा जो वार असतो, तो नेहमी शुभकारक असतो. त्या वारी कोणतेही कार्य करणे लाभदायक असते. कुंडलीत बिंदू दाखवलेल्या स्थानातील रास ही लग्नरास असते.’

लग्नराशी मेष वृषभ  मिथुन  कर्क सिंह कन्या
लाभदायक वार शनिवार गुरुवार मंगळवार शुक्रवार बुधवार सोमवार
लग्नराशी तूळ वृश्चिक  धनु मकर कुंभ मीन
लाभदायक वार रविवार बुधवार शुक्रवार मंगळवार गुरुवार शनिवार

 

नववधूने विशिष्ट मासात सासरी न रहाण्याविषयीचा समज आणि वास्तव !

प्रश्‍न : ‘विवाहानंतर येणार्‍या पहिल्या आषाढ मासात नववधू पतीच्या घरी राहिली, तर सासूला ते वाईट असते; म्हणून ‘सासूचे तोंड पाहू नये’, असे म्हटले जाते. अशाच प्रकारे ‘ज्येष्ठ मास वडील दिराला वाईट’, ‘पौष मास सासर्‍यांना वाईट’, ‘अधिक मास पतीला वाईट’; म्हणून नववधूने ‘त्यांचे तोंड बघू नये’, अशी प्रथा सांगितली जातेे. हे सर्व खरे आहे का ?

उत्तर : या प्रथेला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. पूर्वीच्या काळी मुलींचे विवाहाचे वय ८ ते १२ वर्षे इतके असायचे. इतक्या लहान वयात मुलींना संसाराचे ओझे पेलणे कठीण जात असे. त्यातच तिला माहेरची ओढ असल्याने ‘त्या मासात (महिन्यात) माहेरी जाऊन आईकडून काही गोष्टी शिकता याव्यात’, तसेच ‘विवाहानंतर आरंभी काही काळ माहेरी, तर काही काळ सासरी रहाता यावे’, यासाठी ती केलेली व्यवस्था होती. यासाठी तसे सांगितले जात होते. सध्याच्या काळात मुलींचे विवाहाचे वय, त्यांची नोकरी, व्यवसाय आदींचा विचार करता त्या मासभर माहेरी राहू शकत नाहीत. त्यामुळे वरील गोष्टी पाळण्याची आवश्यकता नाही. ‘या प्रथेत लौकिक अर्थाने स्त्रीचा विचार करून ‘तिला काही कालावधीसाठी आराम मिळावा’, या हेतूने तिला माहेरी पाठवण्याचे प्रयोजन आहे’, असे दिसून येते.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, रामनाथी, गोवा.

Leave a Comment