ज्योतिषशास्त्र – वेदांचे अंग !

Article also available in :

आकाशस्थ ज्योतीसंबंधीचे शास्त्र म्हणजे ‘ज्योतिषशास्त्र’

 

१. समानार्थी शब्द

कालविधानशास्त्र

 

२. महत्त्व

ज्योतिष हे एक वेदांग आहे. ‘ज्योतिषामयनं चक्षुः’ म्हणजे ज्योतिष हा वेदांचा डोळा आहे, असे म्हटले आहे.

 

३. व्युत्पत्ती आणि अर्थ

‘ज्योतिष’ हा शब्द ज्योत + ईश असा बनला आहे. ‘ज्योत’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘ईश’ म्हणजे ‘देव’; म्हणून ‘ज्योतिषशास्त्र’ शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाच्या तेजाने युक्त असे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.’

 

४. ब्रह्मदेवनिर्मित शास्त्र !

विनैतदखिलं श्रौतस्मार्तं कर्म न सिद्धति ।
तस्माज्जगद्धितायेदं ब्रह्मणा रचितं पुरा ॥ – नारदसंहिता

अर्थ : ज्योतिषावाचून श्रौतस्मार्त कर्मे सिद्ध होत नाहीत; म्हणून कालज्ञानाच्या रूपाने जगाच्या हितासाठी हे ज्योतिषशास्त्र प्राचीन काळी ब्रह्मदेवाने निर्माण केले.

 

५. चार लक्ष श्‍लोकांचे शास्त्र !

‘चतुर्लक्षं तु ज्यौतिषम्’ म्हणजे ज्योतिषशास्त्र हे चार लक्ष श्‍लोकांचे शास्त्र आहे. या शास्त्राचा उपयोग बहुतांश सर्वच श्रद्धाळू व्यक्ती आपल्या जीवनात करत असतात आणि त्यांतील कित्येकांनी त्याची अनुभूतीही घेतली आहे.

 

६. ज्योतिषशास्त्राचे महत्त्व

आद्य मुनी नारदांनी ज्योतिषशास्त्राचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

सिद्धान्तसंहिताहोरारूपस्कन्धत्रयात्मकम् ।
वेदस्य निर्मलं चक्षुर्ज्योतिःशास्त्रमनुत्तमम् ॥

अर्थ : ज्योतिषशास्त्र हे श्रेष्ठ असून तो वेदांचा निर्मळ असा डोळा आहे. या शास्त्राचे सिद्धान्त, संहिता आणि होरा असे तीन स्कंध आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले
‘ज्योतिषशास्त्र ‘प्रारब्धानुसार काय होणार आहे ?’, एवढेच सांगत नाही, तर ‘ते टाळण्यासाठी काय करावे’, हेही सांगते, म्हणजे प्रारब्धावर मात करायला कोणते क्रियमाण कर्म वापरायचे, हेही शिकवते.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

ज्योतिषशास्त्र खोटे म्हणजे ‘वेद खोटे’ असे म्हणण्यासारखे !

सहा वेदांगांपैकी ज्योतिष हे एक अंग आहे. ऋग्वेदात ज्योतिषशास्त्राचे ३६, यजुर्वेदात ४४, तर अथर्ववेदात १६२ श्‍लोक आहेत. यावरून ज्योतिषशास्त्राचा वेदांशी दृढ संबंध आहे, हे सिद्ध होते; म्हणून ज्योतिषशास्त्राला खोटे म्हणणे म्हणजे ‘वेद खोटे आहेत’, असे म्हणण्यासारखे आहे. तसेच ज्योतिषशास्त्राला कायद्याचा आधार घेऊन बंदी घालणे, म्हणजे वेदांवर बंदी घालण्यासारखे आहे. लोकशाहीने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यामुळे कोणताही कायदा हिंदूंच्या धर्मग्रंथांच्या विरोधातील कायदे करू शकत नाही; म्हणून ज्योतिषशास्त्र नाकारणे म्हणजे हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य नाकारण्यासारखे आहे. त्यामुळे ‘ज्योतिषशास्त्राला विरोध म्हणजे हिंदु धर्माला विरोध !’ असेच म्हणावे लागते. (संग्राह्य लिखाण)

 

ज्योतिषशास्त्र खोटे असते, तर टिकले असते का ? – वेदमूर्ती योगेश काळेगुरुजी, सोलापूर

एखाद्या ज्योतिषाने एखाद्याच्या जीवनातील घडलेल्या घटनांविषयी सांगितले आणि त्या घटना सत्य निघाल्या, तर संबंधित व्यक्तीने ज्योतिषांवर का विश्‍वास ठेवू नये ? लाखो लोकांना आज असा अनुभव येत आहे. ज्योतिषाला थोतांड ठरवणार्‍यांनी याचाही विचार करावा. कोणतीही व्यक्ती दुसर्‍याला सदासर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. तसेच एखाद्या ज्योतिषाकडे किंवा अन्य जणांकडे लाखो लोक जातात, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी आहे. काळाच्या ओघात बर्‍याच गोष्टी नष्ट झाल्या, तरी पण ज्योतिषशास्त्र सहस्रो वर्षे टिकून आहे. म्हणजेच ज्योतिषशास्त्रात काहीतरी तथ्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. (मार्च २००७)

ज्योतिषशास्त्र – त्रिकालज्ञानी ऋषींची निर्मिती ज्योतिषशास्त्र सांगणारे सर्व ऋषी त्रिकालज्ञानी होते. अंनिसवाले वेद (धर्मशास्त्र) जाणून घेण्यापूर्वी ज्योतिषशास्त्र अभ्यासण्याचा प्रयत्न करतात; म्हणून ते त्यांना थोतांड असल्याचे भासते. ज्योतिषशास्त्राचे प्रवर्तक म्हणून ब्रह्मा, सूर्य, वसिष्ठ, अत्री, मनू, सोम, लोमश, मरीची, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगू, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पराशर अशी अठरा जणांची नावे घेतली जातात. ज्योतिषशास्त्र नाकारणे म्हणजेच ‘या अठराही महात्म्यांनी ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली भोंदूगिरी केली’, असा होतो. (संग्राह्य लिखाण)

 

ज्योतिष हे शास्त्रच ! – पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल,
निवृत्त शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन्सीएल्)

३५ वर्षांच्या संशोधनानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, ज्योतिष हे शास्त्रच आहे. हे केवळ विज्ञान नाही; कारण विज्ञानाला मर्यादा असतात. मला सांगायला अभिमान वाटतो की, मी ज्या ज्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना हा विषय पटवून दिला, त्यांना तो पटलेला आहे. मी नोबेल पुरस्कारप्राप्त १२ शास्त्रज्ञांशी संवाद साधला आणि ‘त्यांना नोबेल पारितोषिक कसे मिळाले ?’, याविषयी विचारणा केली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, त्यांना डोळ्यांसमोर काही अक्षरे दिसली अथवा काही ऐकायला आले. त्या संदर्भात त्यांनी प्रयोगशाळेत प्रयोग केल्यानंतर ते प्रयोग यशस्वी होऊन त्यांना त्यासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.

 

संविधानाने ‘ज्योतिष विज्ञान’ म्हटलेले असणे

‘काही थोड्या वैज्ञानिकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे. आता आपल्या संविधानानेच एक प्रकारे ‘ज्योतिष विज्ञान’ म्हटलेले आहे. त्यामुळे आता भारतातील कोणतेही राज्य किंवा व्यक्ती ‘ज्योतिष थोतांड आहे’, असे म्हणू शकणार नाही.’

– प्रख्यात ज्योतिषी श्री.श्री. भट, डोंबिवली, ठाणे.

 

प्रारब्धभोगाची तीव्रता न्यून करणारे अनुभूतीचे शास्त्र

ज्योतिषशास्त्र हे एक प्रकारे वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कार्यही करते. त्यामुळे मनुष्याला भविष्यातील नियोजन करण्यास साहाय्य होते. असे असतांना ज्योतिषशास्त्राविषयी अपप्रचार करून त्यावर सातत्याने आघात करण्याचा प्रयत्न केला जातोे. हा अपप्रचार खोडून काढून आपली प्राचीन शास्त्रे आणि प्रमाणित विद्या यांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. शास्त्रे ही शाश्‍वत सत्य आहेत. या शास्त्रांविषयीचे आपले ज्ञान किती सखोल आहे ? त्या शास्त्रांची व्यापकता आपण किती समजून घेऊ शकतो ? ज्योतिष हे केवळ गणितीय विज्ञान नसून ते अनुभूतीचेही शास्त्र आहे. ज्योतिषी कुंडलीवरून पूर्वजन्मांत घडलेल्या पापकर्मानुसार या जन्मात भोगाव्या लागणार्‍या दुःखाची तीव्रता न्यून होण्यासाठी काही धार्मिक विधी सांगतात. त्यामुळे प्रारब्धभोग सहन करू शकू इतकी त्याची तीव्रता न्यून होऊ शकते. (संग्राह्य लिखाण)

 

अभ्यास न करताच ‘ज्योतिष थोतांड आहे’,
असे सांगणे, हे विज्ञानाच्याही नियमात बसत नाही !

‘विज्ञानाने ज्योतिष या विषयाच्या संदर्भात काही केलेलेच नाही. त्यांचा हा विषयच नाही, तर त्यांना यामध्ये कशाला ओढायचे ? वैज्ञानिकांना म्हणू देत ना की, हा आमचा विषय आहे. त्यांना ज्योतिषाचा अभ्यास करायचा असल्यास त्यांनी तो जरूर करावा. ‘वास्तूशास्त्र’ हा विषय वास्तुविशारदाचा (आर्किटेक्चर) आहे का ? त्यांनी ते शास्त्र म्हणून अभ्यासावे आणि मगच निष्कर्ष सांगावा. अभ्यास न करताच ज्योतिष थोतांड असल्याचे सांगणे, विज्ञानाच्याही नियमात बसत नाही.’

– प्रख्यात ज्योतिषी श्री.श्री. भट, डोंबिवली, ठाणे.

 

ग्रहांचा प्रभाव दर्शवणारे शास्त्र

‘ज्योतिषशास्त्र हा धर्म आणि अध्यात्म यांचा एक स्तंभ आहे; मात्र आज काही तथाकथित धर्मशास्त्रीच ज्योतिषशास्त्राला ‘अंधश्रद्धा’ ठरवत आहेत. शास्त्र हे ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे. वेदांमध्ये असे म्हटले आहे, ‘इतर शास्त्रांना विरोध असू शकतो; पण चिकित्साशास्त्र, मंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही पदोपदी विश्‍वास ठेवण्यायोग्य शास्त्रे आहेत. ‘यत् ब्रह्माण्डे तत् पिण्डे ।’ याचा अर्थ ‘जे ब्रह्मांडात आहे, तेच पिंडात, म्हणजे मनुष्यात आहे.’  केवळ मानवावरच नव्हे, तर संपूर्ण निसर्गावरही ग्रहांचा प्रभाव स्पष्ट दिसतो, उदा. भूकंप होतात, चंद्राच्या कलेमुळेच समुद्राला भरती-ओहोटी येते. ग्रहांद्वारे ब्रह्मांडातील ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक अशा प्रकारे उत्सर्जित होत असते. याचा मानवी मन आणि मेंदू यांच्यावर प्रभाव पडतो आणि हीच ऊर्जा यश अन् अपयश यांचे कारण बनते. हाच ग्रहांचा प्रभाव ज्योतिषशास्त्र दाखवते.’

– ज्योतिषाचार्य राजेंद्र शर्मा, मुंबई, महाराष्ट्र.

 

मुहूर्त काढण्यासाठी शास्त्राची अपरिहार्यता

‘कोणतेही शुभकार्य करतांना प्रत्येक श्रद्धाळू व्यक्ती ज्योतिषशास्त्राचा वापर करते. त्याचा वापर न केल्यास सध्या शुभ मुहूर्तावर होणारे गृहारंभ, गृहप्रवेश, देवप्रतिष्ठा, मौजीबंधन, विवाह, मुंज, बारसे असे विधी कोणत्याही मुहूर्तावर (अज्ञानामुळे अशुभ मुहूर्तावरही) अवेळी होतील. चांगल्या दिवशी, चांगल्या मुहूर्तावर अथवा योगावर शुभ कर्म केले असता, त्याचे फल चांगले मिळते, ही धारणा भारतात वेदकाळापासून आहे. चांगले आणि वाईट दिवस यांविषयी वैदिकांचे काही आडाखे आहेत. कन्यादान कोणत्या नक्षत्रावर करावे, याविषयी एक मंत्र आहे. नक्षत्र चांगले कोणते आणि दिवसाच्या कोणत्या भागाला पुण्याह समजावे, यासंबंधीही वेदांत मार्गदर्शन आहे.’

– कु. प्रियांका लोटलीकर, गोवा.

 

भारतीय शास्त्रे समृद्ध भारताचा एक
प्राचीन ठेवा असल्याचे भारत शासनाचे प्रतिज्ञापत्र

वर्ष २००४ ते २००६ च्या काळात भारतातील काही उच्च न्यायालयांमध्ये आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, रत्नशास्त्र आदी शास्त्रांना अवैज्ञानिक म्हणून घोषित करण्यासाठी जनहित याचिका करण्यात आल्या होत्या; परंतु सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. या सर्व विद्या आणि शास्त्रे यांना भारत शासन एक प्राचीन शास्त्र म्हणून स्वीकारत आहे. मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेमध्येसुद्धा भारत शासनाद्वारे देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे असे नमूद करण्यात आले की, ही सर्व शास्त्रे समृद्ध भारताचा एक प्राचीन ठेवा असून भारत शासन या सर्व शास्त्रांना ग्राह्य मानते. त्यानंतर या सर्व शास्त्रांच्या विरोधातील ही जनहित याचिकासुद्धा मुंबई उच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली. (संग्राह्य लिखाण)

 

मनुष्याच्या अज्ञानामुळे जर तो शास्त्राला
प्रमाणित करू शकला नाही, तर चूक शास्त्राची नाही !

‘ज्योतिषशास्त्र हे आपल्या धर्मरक्षणाच्या कार्यात संजीवनीप्रमाणे कार्य करते; कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची सर्व कार्ये ज्योतिषशास्त्राच्या कक्षेत येतात. आधुनिक युगात भौतिकतेची पराकाष्ठा होत असतांना विश्‍वातील मापदंडही पालटत आहेत. सत्याची स्थापना होण्यास थोडा वेळ लागतो; मात्र एखादी विद्या किंवा शास्त्र यांचे प्रमाण समजून घेण्याइतपत लोकांमध्ये संयम नसतो. ज्योतिषशास्त्र ग्रहांच्या गतीवर आधारित आहे आणि गती हे कर्माचे द्योतक आहे. मग कर्माला श्रेष्ठ मानणारे विज्ञान अंधश्रद्धेचे प्रतीक कसे होऊ शकते ? एखाद्या माणसाला त्याच्यापासून १ कि.मी. अंतरावर असलेली वस्तू दिसू शकत नाही; म्हणून त्या वस्तूचे अस्तित्वच नाही का ? मनुष्यामध्ये ज्ञान अल्प आहे; म्हणून या शास्त्राच्या प्रामाणिकतेला आव्हान दिले जाऊ शकत नाही. हिंदु धर्मातील कुठल्याही शास्त्राविषयीचे कुणाचेही अज्ञान हे त्या शास्त्राचे महत्त्व कधीही न्यून करू शकत नाही.’

– ज्योतिषाचार्य राजेंद्र शर्मा, मुंबई, महाराष्ट्र.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment