ज्ञानमार्गी असूनही नम्रता, प्रीती आणि शिकण्याची वृत्ती आदी गुणांनी संपन्न असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आणि श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक श्री. अनंत आठवले (वय ८३ वर्षे) सनातनच्या १०१ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !
रामनाथी – लहानपणापासूनच ब्रह्मज्ञानप्राप्तीचे ध्येय ठेवून अत्यंत जिज्ञासेने धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे, ज्ञानयोगी असूनही विनम्र असलेले, अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास असूनही सर्वांकडून सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असलेले आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तीर्थरूप अनंत बाळाजी आठवले (ती. भाऊकाका) (वय ८३ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा करण्यात आली. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात २७ जून या दिवशी ती. भाऊकाका यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले, सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांच्या उपस्थितीत हा भावसोहळा पार पडला. अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले हेही या सोहळ्याला काही वेळ उपस्थित राहिले. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. भाऊकाका यांच्याशी साधलेल्या सहज संवादाद्वारे पू. भाऊकाकांच्या ज्ञानभांडाराची साधकांना प्रचीती आली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. भाऊकाका यांचा श्रीफळ, शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सौ. सुनीती आठवले यांची ओटी भरून त्यांना भेटवस्तू प्रदान केली.
१. असे उलगडले संतत्वाचे गुपित !
ती. भाऊकाका कार्यस्थळी आल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बालपणीची वैशिष्ट्ये जाणून घेतली. त्यानंतर हळूवारपणे पू. भाऊकाकांच्या साधनाप्रवासाविषयी जाणून घेतले. त्यांच्या संपर्कात असलेले सद्गुरु, संत आणि साधक यांनाही ती. भाऊकाका यांच्या सहवासात असतांना काय शिकायला मिळाले ?, ते विचारले. अशा प्रकारेती. भाऊकाका आणि साधक यांच्याकडून ती. काकांच्या संतत्वाचे एकेक पैलू उलगडले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ती. भाऊकाका यांच्याविषयी लिहिलेला संदेश सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी वाचून दाखवला. या संदेशाद्वारेच ती. भाऊकाका पू. भाऊकाका झाले असल्याची आनंददायी घोषणा करण्यात आली.
२. साधकांनी अनुभवला शुद्ध ज्ञानानंद !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची ओघवती आणि सहजसुंदर वाणी अन् पू. भाऊकाका यांची शुद्ध ज्ञानाने संपृक्त असलेली माधुर्यपूर्ण उत्तरे यांमुळे साधकांना ही अनोखी पर्वणी लाभली. ईश्वराकडे नेणार्या खर्या ज्ञानाने संपन्न असलेली व्यक्ती कशी असते, ते पू. भाऊकाका यांच्या सहवासातील या काही घंट्यांमध्ये साधकांना अनुभवता आले. अहंचा लवलेश नसलेल्या आणि मधुर वाणी असलेल्या खर्या अन् शुद्ध ज्ञानातील आनंद या वेळी सर्वत्र पसरला होता.
३. पू. भाऊकाका यांच्या संतत्वाची त्यांच्या
पत्नी सौ. सुनीती आठवले यांना मिळालेली पूर्वसूचना !
पू. भाऊकाका यांच्यातील आध्यात्मिक पालटांविषयी आधी जाणवले होते का, असे विचारल्यावर सौ. सुनीती आठवले म्हणाल्या, मी एक मासापूर्वीच त्यांना तुम्ही संत झाला असाल, असे म्हणाले होते. आज घरातून इकडे यायला निघतांनाही त्यांना म्हणाले होते, आजचा सोहळा तुमच्यासाठीच असेल.
आज अत्यानंद झाला. ते संत झाले आहेत, ते मला समजले होते. सहसा जी गोष्ट माहिती असते, तिचा आनंद मिळत नाही; पण मला आज अत्यानंद झाला आहे.
४. अहंकाराचा लवलेश नसलेले पू. भाऊकाका !
४ अ. संतपदी विराजमान झाल्यानंतर तुम्हाला काय वाटले ?, असे विचारले असता ते म्हणाले, मी स्वतःविषयी विचारच करत नाही. अमूक गोष्ट अजून स्पष्ट व्हायची आहे, असे विचार असतात.
४ आ. गीताज्ञानदर्शन या सनातन-निर्मित ग्रंथावरही त्यांचे नाव लेखक अथवा संकलक असे न घेता अभ्यासक असे त्यांच्या सांगण्यावरून घेण्यात आले आहे.
सन्मानसोहळ्याच्या पूर्वी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. भाऊकाका यांच्याशी संवाद साधला. या वेळी पू. भाऊकाकांच्या शुद्ध ज्ञानयोगाची प्रचीती आली. ज्ञानयोगी असूनही प्रीतीमय असलेले, वाणीत माधुर्य असलेले पू. भाऊकाका यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास करून केवळ पांडित्य मिळवलेले नाही, तर ज्ञानयोग आचरणात आणला आहे, हेच त्या संवादातील वाक्यावाक्यांतून दिसून येत होते.
५. सद्गुरु आणि संत यांना जाणवलेली पू. भाऊकाका यांची गुणवैशिष्ट्ये
५ अ. कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचा संगम असलेले पू. भाऊकाका !
– सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात राज्य धर्मप्रसारक, सनातन संस्था
पू. भाऊकाका आणि सौ. सुनीतीकाकू यांचे मुंबईत वास्तव्य असतांना साधकांना त्यांचा सहवास लाभला. ते सतत उत्साही आणि आनंदी असतात. त्यांच्या सहवासात समोरचाही आनंदी होतो. त्यांच्या सहवासात त्यांच्यातील जिज्ञासा स्पष्टपणे लक्षात येते. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होणार्या सूत्रांविषयी ते नेहमी जिज्ञासेने जाणून घेत असत. एखाद्या सूत्राविषयी त्यांचे मत ते स्पष्टपणे सांगतात. समोरच्याला आवडेल असे बोलायचे, असे त्यांच्याकडून होत नाही. पू. काका हे कर्मयोग आणि ज्ञानयोग यांचा संगम आहेत. ते ऋषीच आहेत, असे वाटते.
आज ती. भाऊकाका संतपदी विराजमान झाल्यानंतर आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला. हे क्षण कधी अनुभवायला मिळणार, असे आम्हाला वाटत होते. हा सोहळा पहायला मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटली. सोहळ्यासाठी परात्पर गुरुदेव आणि पू. भाऊकाका कार्यस्थळी आले, तेव्हा परात्पर गुरुदेवांच्या ठिकाणी पांढर्या रंगाचा अन् पू. भाऊकाका यांच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा, असे दोन गोळे दिसत होते. ते गोळे वेगवेगळे नव्हते, तर एकच होते. संतपदाची घोषणा झाल्यानंतर सन्मान होत असतांना पू. काकांवर देवता पुष्पवृष्टी करत आहेत, असे दिसत होते. पू. भाऊकाकांकडून सर्वत्र प्रीतीचे कण पसरत आहेत, असेही दिसले.
५ आ. सर्व साधकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे पू. भाऊकाका !
– पू. (सौ.) संगीता जाधव, मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात राज्य धर्मप्रसारक, सनातन संस्था
सर्व साधकांना प्रेम देणारे ती. भाऊकाका यांच्या संदर्भात कधीतरी सर्वांना सांगायला पाहिजे, असे मला वाटत असे. मुंबई येथील वास्तव्याच्या कालावधीत पू. भाऊकाका यांनी सर्व साधकांना पुष्कळ प्रेम दिले. साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटत असे. ते स्पष्टतेने बोलत असले, तरी त्यात अत्यंत प्रीती असते. त्यामुळे समोरचा दुखावला जात नाही. त्यांच्याशी बोलतांना प.पू. गुरुदेवांचीच आठवण येत असे. त्यांच्यासह संगणकीय सेवा करणारे साधक, त्यांची अन्य सेवा करणारे साधक यांची ते प्रेमाने विचारपूस करतात. ते सतत इतरांचा विचार करतात. एखाद्या सणाच्या दिवशी साधकांना घरी उपस्थित रहाता येत आहे ना, याचीही ते विचारपूस करत. त्यांच्या सेवेत असलेले श्री. सतीश बांगर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे वृत्त वाचल्यावर ती. काकांनी त्यांना उत्साहाने आणि आनंदाने फोन केला. जसे गुरुदेवांना साधकांविषयी प्रेम वाटते, तसेच भाऊकाकांनाही वाटते.
६. साधकांनी अनुभवलेले आणि कथन केलेले पू. भाऊकाकांचे काही गुणमोती !
६ अ. पू. भाऊकाकांच्या वाणीतील मधुरता वाढली आहे ! – सौ. मनीषा पानसरे
(सनातनच्या ग्रंथांशी संदर्भात सेवा करतांना पू. भाऊकाका यांच्याशी समन्वय करणारी साधिका)
पू. भाऊकाका अत्यंत काटकसरी आहेत. सनातनच्या ग्रंथांसाठी अथवा दैनिकासाठी कोणतेही लिखाण पाठवतांना, निरोप पाठवतांना ते आवश्यक तेवढ्याच आकाराचा कागद वापरतात. गीताज्ञानदर्शन ग्रंथाची सेवा त्यांनी अत्यंत तळमळीने पूर्ण केली. ग्रंथातील लिखाणाचे व्याकरणासह सर्व बारकावे त्यांनी स्वतः लक्ष देऊन पूर्ण करून घेतले. त्यांच्यात प्रेमभाव आहे. गुरुपौर्णिमेच्या वेळी साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची सूची छापून येते, तेव्हा मला अभिनंदन करण्यासाठी सर्वांत आधी पू. भाऊकाका यांचा भ्रमणभाष येतो. या काही दिवसांत त्यांच्या वाणीतील मधुरता वाढली आहे, असे लक्षात आले.
६ आ. पू. भाऊकाकांकडून पितृवत् प्रेम मिळते ! – कु. प्रियांका
माकणीकर (पू. भाऊकाका यांच्यासह भाषांतराची सेवा करणारी साधिका)
पू. भाऊकाकांसह सेवा करतांना आनंद मिळतो. प्रत्येक सेवा ते विचारपूर्वक करतात. एकदा मला एक निरोप लिहिण्यासाठी कागद कापायचा होता, तेव्हाही त्यांनी मला त्यावर पेन्सिलने रेष ओढून त्यावरून कापायला सांगितले. जेणेकरून कागद योग्य तर्हेने कापला जाऊन त्याचे दोन्ही भाग वापरता येतील. घरातील कुंड्यांमध्ये फुलझाडे लावतांनाही त्यांना खत कधी द्यावे ? कशा पद्धतीने द्यावे ? आदी अनेक बारकावे त्यांनी जाणकार साधकांना विचारून घेतले.
पू. काका आणि सौ. सुनीती आठवलेकाकू यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांच्यासह सेवा करतांना आम्ही नवीन जागी सेवेसाठी गेलो आहोत, असे वाटलेच नाही. पू. काका आम्हा साधकांवर पितृवत प्रेम करतात. मी कधी आजारी असेन, तर ते मला भ्रमणभाष करून माझी विचारपूस करतात.
६ इ. साधिकेने भगवंताला केलेल्या प्रार्थनेला अनुरूप पू. भाऊकाका यांचे बोलणे !
एकदा सकाळी मी देवाला प्रार्थना केली, देवा, साधनेत मी कुठे थांबले आहे, ते मला सांग. माझ्या कोणत्या दोषांमुळे माझी प्रगती होत नाही, ते लक्षात येऊ दे. नंतर मी ती. भाऊकाका यांच्याकडे सेवेला गेल्यानंतर काकांनी अनपेक्षितपणे मला सांगितले, तुम्ही अमुक दोषावर प्रयत्न केल्यावर प्रगती होईल.
६ ई. शिस्त, नियोजनबद्धता अन् परिपूर्णता असलेले आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव
करणारे पू. भाऊकाका ! – सौ. कीर्ती जाधव (पू. भाऊकाका यांच्यासह सेवा करणारी साधिका)
पू. भाऊकाका काही वर्षांपूर्वी रामनाथी येथील सनातन आश्रमात आले होते. तेव्हाच त्यांच्यातील प्रीती, परिपूर्णता आदी गुणांचे मला दर्शन झाले होते. त्या कालावधीत आमचा प्रथमच परिचय होऊनही त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली. आमचा पहिल्यापासून काहीतरी परिचय आहे, असे मला वाटत होते. मी पहिल्या भेटीतच त्यांच्याशी सहजतेने बोलू शकले. ३ वर्षांपूर्वी ते गोवा येथे वास्तव्यासाठी आल्यावर त्यांच्या संपर्कात रहाण्याची संधी मिळाली; म्हणून कृतज्ञता वाटली. त्यांच्या सदनिकेतील वातावरण प्रसन्न वाटते. पू. काका आणि सौ. सुनीतीकाकू या दोघांचेही वय पुष्कळ असूनही घरात कुठेही कचरा, अव्यवस्थितपणा नाही. या वयातही त्यांचे दिवसभराचे नियोजन केलेले असते. त्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम असतो. त्यांच्याकडून शिस्त हा गुण शिकता आला.
परात्पर गुरुदेवांच्या खोलीतील देवपूजा, स्वच्छता इत्यादी सेवा करणार्या साधिका पालटल्या की, काही दिवसांनी जुन्या साधिकांना ते सांगतात, नवीन साधिकेला येथील सेवा कशी करायची ते मी सांगीन. तुमचा सेवेचा वेळ जायला नको. तसेच पू. भाऊकाका आणि सौ. सुनीतीकाकू यांचेही आहे. त्यांच्या सेवेला नवीन साधिका आल्यावर तिलाही कधी अवघडल्यासारखे वाटत नाही. गेल्या काही दिवसांपासून पू. काकांशी बोलतांना त्यांच्याकडून आनंदाची स्पंदने जाणवत आहेत. पू. भाऊकाका यांच्या दृष्टीतून प्रीतीचा वर्षाव होतो, असे जाणवते.
७. संतसन्मान सोहळ्याविषयी सनातनचे सद्गुरु आणि संत यांनी काढलेले गौरवोद्गार !
७ अ. आदर्श असलेल्या आठवले परिवाराशी आपण जोडलेले आहोत,
याचा आनंद ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, उत्तर महाराष्ट्र धर्मप्रसारक, सनातन संस्था
परात्पर गुरुदेव सर्वांसाठीच आदर्श आहेत. आज या सोहळ्यात पू. भाऊकाकांचे विचार ऐकल्यानंतर त्यांचे बंधू पू. भाऊकाका हेही आदर्श आहेत, हे लक्षात आले. हा परिवारच आदर्श आहे. अशा आदर्श परिवाराशी आम्ही जोडलेले आहोत, ही आनंदाची गोष्ट आहे. पू. भाऊकाका ज्ञानमार्गी असूनही त्यांच्यात भक्तीही आहे.
७ आ. आजचा दिवस सर्व साधकांसाठी भाग्याचा दिवस !
– पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
सर्व साधकांसाठी आज मोठा भाग्याचा दिवस आहे. या सोहळ्यात एकाच परिवारातील बंधू साधना करून अध्यात्मात कशा प्रकारे उन्नत झाले, ते अनुभवता आले. पू. भाऊकाका ज्ञानमार्गाने साधना करून संतपदी विराजमान झाले. साधकांनी सांगितलेल्या पू. भाऊकाकांच्या गुणवैशिष्ट्यांतून मला शिकायला मिळाले. हा क्षण आम्हाला अनुभवायला दिला, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !
७ इ. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ – पू. भाऊकाकांनी सांगितलेले प्रत्येक वाक्य ज्ञानमय !
पू. भाऊकाका स्वतः ज्ञानमार्गी असूनही इतरांकडून शिकण्यातला आनंद घेतात, हे या सोहळ्यातून लक्षात आले. या सोहळ्यात पू. भाऊकाकांनी सांगितलेले प्रत्येक वाक्य ज्ञानमय होते. त्यांचे मार्गदर्शन लिहून घेतांनाही मला आनंद मिळाला. पू. भाऊकाका प्रथमपासूनच ऋषिमुनींप्रमाणे आहेत; मात्र आज ते संत म्हणून घोषित झाले, असे मला वाटले.
नवीन माहिती उलगडणारी पू. भाऊकाका यांची जिज्ञासा !
एकदा पू. भाऊकाका (प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले) यांनी मला पुढील प्रश्न विचारला. आपण पूजेमध्ये अक्षतान् समर्पयामि । असे म्हणतो. येथे अक्षतान् हे पुल्लिंगी रूप आहे; पण मराठीत अक्षता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे पूजविधीमध्ये अक्षता वाहतांना अक्षताः समर्पयामि । असे स्त्रीलिंगी म्हटले पाहिजे का ? खरेतर मी यापूर्वी अनेक वेळा संस्कृतमध्ये हे वाक्य वाचले आहे; परंतु मला असा प्रश्न कधीच पडला नव्हता. पू. भाऊकाकांच्या जिज्ञासेमुळे मला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ते असे – संस्कृत भाषेत अक्षत हा शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी आहे. यामुळे अक्षतान् समर्पयामि । हेच योग्य आहे. येथे अक्षत म्हणजे न तुटलेले तांदूळ. तांदूळ हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून तांदूळ या शब्दाचे विशेषण असलेला अक्षत हा शब्दही संस्कृत भाषेत पुल्लिंगी आहे.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०१९)
अभ्यासू वृत्ती, अल्प अहं आणि ज्ञानयोगी ती. अनंत बाळाजी आठवले !
ती. भाऊ (अनंत) माझ्यापेक्षा ७ वर्षांनी मोठे आहेत. त्यांचे लहानपण मुंबईत गेले. नंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी ते कर्नाटकमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी भोपाळला नोकरी केली. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर ते मुंबईला आले. गेली ३ वर्षे (एप्रिल २०१६ पासून) ते गोव्याला रहात आहेत. त्यांचा मोठा मुलगा उत्तर भारतात नोकरी करतो, तर धाकटा मुलगा ऑस्ट्रेलियात आहे. असे असूनही त्यांना कधी एकटेपणा वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीत ते स्थिर असतात.
ती. भाऊ यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. माझ्या लहानपणापासूनच ते अभ्यासू वृत्तीचे असल्याचे मला जाणवायचे. ईश्वर आणि ब्रह्म यांना जाणण्याच्या इच्छेमुळे त्यांनी अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. जिज्ञासा आणि नवनवीन शिकण्याची वृत्ती यांमुळे या वयातही ते उत्साहाने सतत अध्ययन करत असतात.
भगवान श्रीकृष्णाला गुरुस्थानी मानून साधना करणार्या ती. भाऊ यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला. ती. भाऊंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ शाब्दिक अभ्यास केला नाही, तर गीतेतील तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ?, यासाठी प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर हे तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत पोचावे, यासाठी त्यांनी गीताज्ञानदर्शन हा अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि अनेक समर्पक अन् सुंदर उदाहरणांद्वारे त्यांनी गीतेचा भावार्थ उलगडला. आता दैनिक सनातन प्रभातमध्ये ज्ञानयोगावर आधारित त्यांच्या चौकटीही प्रकाशित होत आहे.
गीतेचा अभ्यास केल्याने ती. भाऊंची ज्ञानयोगातून साधना झाली. त्यांच्या ज्ञानयोगाला आता कर्मयोगाची जोड लाभल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. अभ्यासू वृत्ती, अल्प अहं आणि कर्तेपणा नसणे आदी गुणांमुळे ती. भाऊ आता पू. भाऊ झाले आहेत. ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते आता सनातनच्या १०१ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाले आहेत.
असे अभ्यासू वृत्तीचे, अलिप्त वृत्तीचे, सगळीकडे साक्षीभावाने पहाणारे आज संत म्हणून घोषित करण्यात आलेले मोठे भाऊ मला दिल्याबद्दल मी श्रीकृष्णचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
पू. भाऊंची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
स्वतःतील दोषांचे निवारण करणे आणि चित्तशुद्धी करणे,
हे प्रत्येक योगमार्गाचे मूळ ! – पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका)
१. सेवेचा आरंभ आणि शेवट ईश्वराला प्रणाम करून करण्याची परात्पर गुरु डॉक्टरांची शिकवण
साधकांना परात्पर गुरुदेवांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे, ती ही की, कोणत्याही सेवेचा आरंभ आणि शेवट ईश्वराला प्रणाम करूनच करायचा. जे कर्म कराल, ते मला अर्पण करा, असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करण्याने कर्माचा त्याग होतो. कर्माचा त्याग झाल्याने संन्यासाश्रमाचे आचारण होते. कर्मामुळे जी शुभ अथवा अशुभ फळे निर्माण होतात, त्यातून पाप-पुण्य निर्माण होते. पाप-पुण्याचे जिवावर बंधन येते. प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण केल्याने त्या पाप-पुण्याच्या बंधनातून मुक्त होता येते.
२. साधना वाढून स्वतःतील विकृती उणावणे आवश्यक
निर्दोषत्व आणि समत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे निर्दोष आणि सम आहेत, ते ब्रह्मातच रहात आहेत. हेच साधनेचे मूळ आहे. केवळ भक्ती, पूजा, एक लाख वेळा जप केल्याने भगवंत प्रसन्न होत नाही. साधनेने चित्तवृत्तीचा निरोध होणे महत्त्वाचे आहे. टप्प्याटप्प्याने साधना वाढते, संसारातील लक्ष अल्प होते, विकृती न्यून होते. हे आवश्यक आहे. प्रत्येक योगमार्गात हेच आहे. मन निर्दोष करणे, हेच महत्त्वाचे आहे.
सन्मानसोहळ्याच्या पूर्वी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. भाऊकाका यांच्याशी संवाद साधला. या वेळी पू. भाऊकाकांच्या शुद्ध ज्ञानयोगाची प्रचीती आली. ज्ञानयोगी असूनही प्रीतीमय असलेले, वाणीत माधुर्य असलेले पू. भाऊकाका यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास करून केवळ पांडित्य मिळवलेले नाही, तर ज्ञानयोग आचरणात आणला आहे, हेच त्या संवादातील वाक्यावाक्यांतून दिसून येत होते.
साधकांपेक्षा सर्वथा थोर असूनही साधकांना आदर देणारे पू. भाऊकाका !
१. साधिकेची क्षमा मागणे
पू. भाऊकाका साधकांना कधीकधी महात्मा म्हणतात. जो ज्ञान आचरणात आणतो, तो खरा महात्मा असतो, अशा अर्थाने ते तसे म्हणतात. एकदा एका लेखात एक सुधारणा करायची होती; म्हणून त्यांनी मला भ्रमणभाष केला. ती सुधारणा आधीच झाली असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी माझी क्षमा मागितली. संकोच वाटून मी त्यांना मी लहान आहे. माझी क्षमा मागू नका, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मी केवळ मोठा आहे. मी ज्ञानी आहे, याचा काय फायदा ? परात्पर गुरुदेव तुमच्याकडून ज्ञानानुसार आचरण करून घेत आहेत.
– कु. प्रियांका माकणीकर
२. वयाने लहान असणार्यांनाही आदरार्थी संबोधणे
पू. भाऊकाका यांच्या मनात सर्वांप्रती आदर आहे. वयाने लहान असणार्या आम्हा साधिकांनाही ते आदरार्थी संबोधतात. पू. भाऊकाका म्हणजे गुरुदेवच आहेत, असे वाटते. आम्हा साधिकांना आनंद वाटतो की, आम्हाला अध्यात्मात उन्नत असलेल्या पू. भाऊकाकांची सेवा मिळाली आणि पू. भाऊकाकांच्या मनात आदर असतो की, असे उन्नत साधक माझ्याकडे सेवेला येतात.