- भारतीय शास्त्रीय संगीतकार पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी मुसोलिनीला राग ‘पूरिया’ गाऊन निद्राधीन केले !
- हिंदूंच्या अद्वितीय संस्कृतीचे महत्त्व अशा प्रसंगातून अधोरेखित होते ! सूर्यप्रकाशासम दैदीप्यमान संस्कृती आणि शिकवण लाभलेल्या हिंदूंना आज त्याचा विसर पडावा, हा केवढा दैवदुर्विलास ! यावर हिंदूंना धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे जाणा !
वर्ष १९२२ ते १९४३ ही दोन दशके इटलीवर अधिराज्य गाजवणारा आणि जगात कुप्रसिद्ध असलेला हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी ! त्याला एकदा निद्रानाशाने ग्रासले. त्याने बरेच औषधपाणी केले; परंतु त्यास समाधानकारक झोप येत नव्हती. त्याच्या अनेक प्रेमिकांपैकी एक प्रेमिका बंगाली होती. तिला संगीताचे चांगले ज्ञान होते. तिने जेव्हा मुसोलिनीला भारतीय संगीतामध्ये निद्रानाशावर उपचार असल्याचे सांगितले, तेव्हा त्याने ते हसण्यावारी घेतले.
त्याच कालावधीत म्हणजे वर्ष १९३३ मध्ये भारतीय शास्त्रीय संगीतकार पंडित ओंकारनाथ ठाकूर युरोपच्या दौर्यावर होते. ते रोममध्ये पोचले असता मुसोलिनीची सदर बंगाली प्रेमिका ठाकूर यांना भेटली. मुसोलिनीच्या आजाराविषयी त्यांना सांगितले आणि त्यांना मुसोलिनीच्या बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले.
पंडित ठाकूर मुसोलिनीच्या निवासस्थानी गेले. त्यांनी मुसोलिनी याच्याकडे गायन प्रस्तुत करण्याची अनुमती मागितली. त्यांनी मुसोलिनीला त्या रात्री शाकाहारी भोजन करण्याची विनंती केली. भोजन झाल्यानंतर पंडित ठाकूर यांनी राग ‘पूरिया’चे आलाप घेण्यास चालू केले. या रागामध्ये एक चमत्कारिक प्रकार होता. पंधरा मिनिटांत मुसोलिनी झोपी गेला.
दुसर्या दिवशी ठाकूर यांना मुसोलिनीची दोन पत्रे मिळाली. एका पत्रामध्ये त्याने त्यांना ‘धन्यवाद’ दिले होते, तर दुसरे नियुक्तीचे पत्र होते. त्यामध्ये त्यांची विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती केल्याविषयी कळवण्यात आले होते. पंडित ओं कारनाथ ठाकूर यांनी मुसोलिनीचा प्रस्ताव स्वीकारला नाही; कारण त्यांना आपल्या मातृभूमीत परत जायचे होते.
त्यानंतर मुसोलिनीने ठाकूर यांना त्यांचे पाहुणे म्हणून काही दिवस ठेवून घेतले. ठाकूर यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या रागांच्या वेळी मुसोलिनीला विविध अनुभूतीही आल्या. एक दिवस ठाकूर यांनी मुसोलिनीसमोर राग ‘छायानत’ गायला. तेव्हा मुसोलिनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मुसोलिनीला सांगावे लागले, ‘माझ्या जीवनात एवढे चांगले मी कधीच अनुभवले नव्हते.’ (भारतीय संगीतातील एक राग ऐकतांना मुसोलिनीसारख्या जगातील सर्वांत क्रूर हुकुमशहाच्या डोळ्यांत अश्रू येतात, यावरून भारतीय संगीताचे अलौकिकत्व लक्षात येते ! – संपादक)
कालांतराने पंडित मदनमोहन मालवीय यांनी काशी हिंदु विश्वविद्यालयाची स्थापना केली. या विश्वविद्यालयामध्ये जेव्हा संगीत आणि कला विभागाची स्थापना झाली, तेव्हा पंडित ओंकारनाथ ठाकूर विभागाचे प्रथम अधिष्ठाता झाले. एक कलाकार आणि शिक्षकच नाही, तर प्रशासक म्हणूनही त्यांनी अपार कीर्ती मिळवली.