मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘पॅरेंन्टस डे’ आदी विविध ‘डे’ज भारतातही सामाजिक प्रसारमाध्यमांवर (सोशल मीडिया) उत्स्फूर्तपणे साजरे केले जात आहेत. या निमित्ताने आम्ही या माध्यमातून पालकांविषयी प्रेम, आदर व्यक्त करत असतो, असा एक सूर आहे. मदर, फादर हे शब्द इंग्रजी शब्दकोशातील आहेत. १६ जून या दिवशी ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. ख्रिस्ती पंथियांच्या प्रार्थनास्थळात (चर्च) असणार्या मार्गदर्शकास ‘फादर’, असे संबोधले जाते. या व्यतिरिक्त या शब्दाचा उपयोग कुठे करण्यात येत असल्याचे ऐकिवात नाही. ख्रिस्ती पंथियांनी पालकांना मदर, फादर, असे संबोधणे हा त्यांच्या चालीरीतींचा भाग आहे. असे असतांना येथील हिंदु धर्मियांनी ‘हॅप्पी फादर्स डे’चा सामाजिक प्रसारमाध्यमांवर घोषा लावून वडिलांना शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले. ‘हॅप्पी फादर्स डे’ या इंग्रजी वाक्याचे मराठी भाषेत भाषांतर केल्यावर ‘आनंदी वडील दिवस’, असे वाक्य बनते; पण त्याचा नेमका अर्थबोध होत नाही, तसेच ते वाचतांनाही निराळेच वाटते. म्हणजे जे अर्थशून्य आहे, त्याचाच उदोउदो केला जात आहे.
पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदेशी पार्श्वभूमी असलेल्या ‘डे’ज या पद्धतीची आवश्यकता का आहे ? असे एकदिवसीय प्रेम व्यक्त करून काय साध्य होणार आहे ? कितीजण पालकांना प्रतिदिन ‘वाकून नमस्कार’ करतात ? या भूमीशी संबंधित गोष्टी वगळून अन्य सर्व गोष्टींचा प्रचार करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यांचे आचरण करण्याची चढाओढ चालू असलेली पहाण्यास मिळत आहे. एवढे त्यांच्या विचारांचे ‘गुलाम’ झालो आहोत, याचा अभिमान वाटत आहे. अशा गोष्टी निवळ भावनिक पातळीवर केल्या जातात. तुम्ही असे ‘डे’ज साजरे करत नाही, म्हणजे कालबाह्य (आउटडेटेड) आहात, असे समजले जाते. जे भारतीय संस्कृतीचे आचरण करतात, ते जुन्या विचारांचे, तत्त्वनिष्ठ, शिष्ठ आदी आहेत. या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते.
हिंदु धर्म, भाषा, संस्कृती यांविषयी मनापासून कृतीच्या स्तरावर आदर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘डे’ज साजरे करण्यासाठी कोणीही कितीही दबाव आणला, अमूक ‘डे’ सामूहिक पद्धतीने साजरा करायचा आहे, असे सांगितले, तरी धर्माप्रती असलेली दृढ निष्ठा अशा प्रसंगांतही स्थिर रहाण्यासाठी, तसेच योग्य काय आहे ?, ते सांगण्यासाठी नक्कीच बळ देते. अयोग्य सूत्रांविषयी मी कसे बोलू ?, मला काय म्हणतील ? या विचारांना झुगारून विनम्रपणे अयोग्य गोष्टींना नकार देण्यास आरंभ केला पाहिजे. त्यामुळे योग्य काय आहे ? , हे सांगण्याची संधीच उपलब्ध होत असते. त्यामुळे काही लोकांपर्यंत, तरी योग्य काय आहे ?, ते पोचण्यास साहाय्यच होणार असते. तसेच आपलाही अभ्यास होत असतो. अन्यथा भविष्यातही विविध ‘डे’ज साजरे करण्याची नामुष्की ओढवणार, हे मात्र निश्चित असते !