‘डिसेंबर २०१८ मध्ये मला पुणे येथील श्री. आनंद जोग यांच्याकडे जाण्याचा योग आला.श्री. आनंद जोग यांनी ‘नॉटीकल सायन्स’मध्ये शिक्षण घेऊन ‘नेव्ही’त काम केले आहे. कालांतराने अत्तरांची निर्मिती करणे, याकडे त्यांचे लक्ष केंद्रित झाल्याने आणि त्यांना मनापासून या गोष्टींची आवड असल्याने त्यांनी ‘पर्फ्युमरी’चे विविध कोर्स केले अन् नोकरीला विराम देऊन अत्तर निर्मितीचे क्षेत्र व्यवसायासाठी निवडले. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड असल्याने त्यांनी गायनाचे शिक्षणही घेतले आहे. मागील ४ वर्षांपासून ते व्हायोलीन शिकत आहेत. त्यांना बासरी आणि पेटीही वाजवता येते. त्यांच्याकडे वर्ष १९०२ पासूनच्या शास्त्रीय संगीताचा सर्व प्रकारचा संग्रह आहे. त्यांनी हा ठेवा अतिशय चांगल्या प्रकारे जपून ठेवला आहे.
२० वर्षांपासून ते अत्तर आणि संगीत यांविषयीचा अभ्यास अन् संशोधन या संदर्भात कार्य करत आहेत. त्यांच्याशी झालेल्या भेटीत आमची संगीत आणि अत्तरे या विषयांवर चर्चा झाली. त्या वेळी श्री. आनंद जोग यांनी खालील अभ्यासपूर्ण माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे.’ – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
१. लहानपणापासून अत्तराची आवड असल्याने
इयत्ता नववीत असतांना अत्तरे बनवण्यास आरंभ करणे
आणि अन्य देशांत गेल्यावर तेथील गंधसंस्कृतीचाही अभ्यास करू लागणे
‘लहानपणापासून मला निसर्गाची आवड आहे. गंधशास्त्र किंवा सुगंध यांच्याशीही माझा लहानपणापासून संबंध आला. माझे आजोबा अत्तर वापरायचे. तेे पाहून मलाही लहानपणापासून अत्तर वापरणे आवडू लागले. मी अत्तरांच्या ठिकाणांचा बराच शोध घेतला. एका वाचनालयातील शिक्षिकेने दिलेल्या पत्त्यानुसार मी पुण्यातील ‘ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी’मध्ये (‘बी.सी.एल्.’मध्ये) गेलो. तेथे मी ‘पाओचर्स कॉस्मेटोलॉजी’ (poachers cosmetology) या सौंदर्यशास्त्राच्या (‘कॉस्मेटोलॉजी’च्या) संचातील गंधद्रव्य बनवण्याची (पर्फ्युमरीची) सगळी माहिती (फॉर्म्युलेशन्स) घेतली. मुंबईला एके ठिकाणी अत्तराची दुकाने होती. तेथून मी अत्तर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल घेतला. साधारण नववीत असतांना मी अत्तरे बनवायला लागलो. नंतर नोकरीच्या निमित्ताने अन्य देशांत गेल्यावर तेथील गंधसंस्कृतीचा मी अभ्यास करू लागलो. अशा प्रकारे माझा गंधशास्त्राचा अभ्यास चालू झाला.
२. नोकरी करून अत्तरनिर्मिती करतांना धावपळ होऊ लागल्याने
कालांतराने नोकरीला विराम देऊन ‘अत्तर बनवणे’ हा व्यवसाय चालू ठेवणे
मला नोकरीनिमित्त अन्य देशांत जावे लागायचे. मी अत्तर बनवण्यासाठी तेथे उपयोगात आणला जाणारा कच्चा माल आणून अत्तरे बनवणे चालू केले. नोकरी करून उरलेल्या वेळेत अत्तर बनवणे, असे माझे चालू होते; परंतु हे करतांना माझी धावपळ होऊ लागल्याने कालांतराने मी नोकरीला विराम देऊन ‘अत्तराचा व्यवसाय’ हे एकच ध्येय ठेवले.
३. गंधशास्त्र आणि संगीतशास्त्र यांचा
एकमेकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे दर्शवणारे प्रसंग
३ अ. कपड्यांना लावलेले अत्तर आणि ऐकत असलेले संगीत परस्पर विसंगत असल्याने मन अस्वस्थ होणे
लहानपणापासून मला शास्त्रीय संगीताचीसुद्धा आवड आहे. कामासाठी बाहेर जातांना मी शास्त्रीय संगीत ऐकायचो. एक दिवस बाहेर जात असतांना मी अत्तर लावले होते आणि एक रागही ऐकत होतो. त्या वेळी माझे मन अस्वस्थ झाले. तेव्हा ‘कपड्यांना लावलेले अत्तर आणि मी ऐकत असलेले संगीत हे एकमेकांशी जुळत नाही’, असे माझ्या लक्षात आले. मी घरी येऊन कपडे पालटले. तेव्हा मला बरे वाटले.
३ आ. कपड्यांना लावलेले अत्तर आणि ऐकत असलेले
शास्त्रीय संगीत यांचा परिणाम परस्परपूरक होऊन मन एकाग्र होणे
एकदा कामासाठी बाहेर जातांना मी बनवलेले नवीन अत्तर लावून एक राग ऐकत जात होतो. हा राग ऐकण्यात मी इतका गुंग झालो की, मला ज्या ठिकाणी जायचे होते, तेथे न जाता मी बराच पुढे गेलो. बर्याच वेळानंतर मला त्याची जाणीव झाली. त्या वेळी मी लावलेले अत्तर आणि मी ऐकत असलेले शास्त्रीय संगीत यांच्या परिणामांमुळे मी भान विसरलो होतो.
अशा प्रकारे पहिल्या प्रसंगात मी लावलेले अत्तर आणि मी ऐकत असलेला (एरवी मला ऐकायला चांगला वाटणारा) राग हे एकमेकांशी विसंगत झाले. दुसर्या प्रसंगात मी लावलेले अत्तर आणि ऐकत असलेला राग या दोघांची चांगली सांगड होऊन त्याचा चांगला परिणाम दिसून आला. यावरून ‘गंधशास्त्र आणि संगीतशास्त्र यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असून वरील परिणाम त्याचेच असावेत’, हे माझ्या लक्षात आले.
४. संगीत आणि गंधशास्त्र यांचा सखोल अभ्यास करतांना
‘संगीतशास्त्राप्रमाणे गंधशास्त्रसुद्धा अनादी आहे आणि विविध
दैनंदिन कृतींमध्ये स्वर अन् गंध यांचा अंतर्भाव आहे’, असे लक्षात येणे
त्या वेळी ‘संगीत आणि गंधशास्त्र यांचा एकमेकांशी खरोखर काही संबंध आहे का ?’, असा विचार माझ्या मनात आला. याचा अभ्यास करतांना किंवा या दोघांची समानता जोडण्याचा प्रयत्न करतांना ‘संगीतशास्त्र जसे अनादी आणि अनंत आहे, तसेच गंधशास्त्रसुद्धा अनादी आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘पृथ्वी ही पृथ्वी, आप (जल), तेज, वायु आणि आकाश या पाच तत्त्वांनी बनली आहे. पृथ्वीला ‘गंधवती’ म्हटले जाते. पृथ्वीतत्त्व ते आकाशतत्त्व (अंतिम तत्त्व) या प्रवासात शेवटपर्यंत एकेक मात्रा (तत्त्व) न्यून होत जाते. जलतत्त्वापर्यंत गेल्यावर पृथ्वीतत्त्व न्यून होते, तर तेजतत्त्वापर्यंत गेल्यावर जलतत्त्वाची मात्रा न्यून होते. असे आकाशतत्त्वापर्यंत जातांना एकेक मात्रा (तत्त्व) गळून शेवटी ज्याला स्पर्श आणि रूप नाही अन् केवळ शब्द आहेत, ते आकाशतत्त्व शेष रहाते. त्याच्याही पलीकडे गेल्यास आपण परमात्म्यापर्यंत पोचतो’, या शास्त्रानुसार लक्षात घेतले, तर बर्याच ठिकाणी गंध आणि स्वर यांचा संबंध असल्याचे आपल्याला दिसून येते.
आपण पूजादी विधी करतो. तेव्हा धूप आणि उदबत्ती दाखवतो, तसेच घंटनाद करतो. ‘नैवेद्य दाखवल्यावर देवता तो गंधरूपात सेवन करतात’, असे शास्त्र आहे. या सगळ्या एकत्रित क्रियांत स्वर (नाद) आणि गंध यांचा अंतर्भाव असतो. आपल्या आध्यात्मिक कृती श्रुतीप्रधान आहेत. आपल्याकडे मौखिक परंपरा आणि श्रुतीप्रधानता पारंपरिकरित्या चालत आली आहे. त्यामुळे स्वर आणि गंध यांचा संबंध मला प्रत्येक कृतीतच जाणवला. हा संबंध पौराणिक दृष्टिकोनातून जाणवला, तसेच वैशेषिक दर्शनातील प्रकृती आणि पुरुष यांच्या लक्षणांमध्येही पंचतत्त्वांचा उल्लेख आढळतो.
५. व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा अनुभव किंवा
अनुभूती २ किंवा ३ इंद्रियांद्वारे घेत असल्याने ‘गंध आणि स्वर
या माध्यमांतूनही अनुभूती घेता येईल’, असे अभ्यासाअंती लक्षात येणे
कुठल्याही गोष्टीचा अनुभव किंवा अनुभूती आपण २ किंवा ३ इंद्रियांद्वारे घेतो, उदा. एखादा पदार्थ सेवन करतांना आपण नाकाने त्याचा सुगंध घेतो, जिभेने चव घेतो आणि ‘तो कसा सजवला आहे’, ते डोळ्यांनी पहातो. म्हणजे ३ इंद्रियांद्वारे त्या पदार्थाची अनुभूती घेतो. एखादे नाटक बघतो. तेव्हा कान आणि डोळे या इंद्रियांद्वारे आपण तो अनुभव घेतो. ‘जर आपल्याला डोळे आणि कान, तसेच नाक आणि जीभ यांद्वारे, म्हणजे २ किंवा ३ इंद्रियांनी अनुभव किंवा अनुभूती घेता येते, तर गंध आणि स्वर या माध्यमांतूनही आपण अनुभूती घेऊ शकतो’, असे अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले. शास्त्रीय संगीतातील काही राग ऐकून मला ही प्रेरणा मिळाली.
Anant jog sir can I purchase all this attar please help me how can I purchase your attar