‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक कि चांगली स्पंदने जाणवतात’, याचा अभ्यास करून वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास ती दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करा !

Article also available in :

‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास त्यांचा आपल्या साधनेवर परिणाम होतो. आपली साधना त्या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यात व्यय (खर्च) होते. तसेच त्या त्रासदायक स्पंदनांमुळे डोके दुखणे, मळमळणे यांसारखे शारीरिक त्रास आणि अस्वस्थ वाटणे, निरुत्साह वाटणे यांसारखे मानसिक त्रासही होऊ शकतात. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांच्या साधनेवर तर वास्तूतील त्रासदायक स्पंदनांचा अधिकच परिणाम होतो; कारण मुळातच त्या साधकांवर वाईट शक्तींना आक्रमण करणे सोपे असते आणि वास्तूत त्रासदायक स्पंदने असल्यास वाईट शक्तींना त्या साधकांवर आक्रमण करणे आणखी सोपे होते. त्यामुळे त्या साधकांची साधना अधिक प्रमाणात व्यय होते.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. वास्तूत त्रासदायक स्पंदने निर्माण होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय

१ अ. वास्तूदोष

वास्तूत काही दोष असल्यास किंवा वास्तूतील रचना सदोष असल्यास वास्तूदोष निर्माण होतात. वास्तूदोष दूर करण्यासाठी वास्तूशांती करणे, वास्तूत प्रत्येक खोलीत चारही भिंतींलगत देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे छत लावणे, असे उपाय करू शकतो. सनातनने ‘नामजप-पट्ट्यांचे वास्तूशुद्धी-संच’ उपलब्ध करून दिले आहेत.

१ आ. वाईट शक्तींचा त्रास

वास्तूतील वाईट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी वास्तूमध्ये गोमूत्र शिंपडून, उदबत्ती फिरवून किंवा विभूती फुंकरून वास्तूची प्रतिदिन शुद्धी करावी, तरीही वास्तूमध्ये त्रास जाणवत असल्यास वास्तूची नारळाने दृष्ट काढावी. वास्तूमध्ये हळू आवाजात देवाचा नामजप लावून ठेवावा.

१ इ. वास्तूतील सामानाची अव्यवस्थित रचना

वास्तूतील सामान अस्ताव्यस्त पसरले असेल किंवा ते अव्यवस्थित ठेवले असेल, तर वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे, वास्तूतील सामानाची रचना सात्त्विक करणे, तसेच ते वेळच्या वेळी जागेवर ठेवणे.

 

२. ‘वास्तूमध्ये त्रासदायक कि चांगली स्पंदने जाणवतात’, याचा अभ्यास कसा करावा ?

साधकांनी आपल्या वास्तूमधील प्रत्येक खोलीमध्ये त्रासदायक कि चांगली स्पंदने जाणवतात, याचा अभ्यास पुढीलप्रमाणे करावा.

अ. वास्तूतील प्रत्येक खोलीमध्ये डोळे उघडे ठेवून आणि मन एकाग्र करून २ – ३ मिनिटे थांबावे. तेव्हा ‘मनाला त्रासदायक जाणवते कि चांगले’, हे पहावे.

आ. डोळ्यांना त्रासदायक जाणवून डोके जड होत असेल, छातीवर दाब येत असेल आणि मन अस्वस्थ होत असेल, तर ‘ती त्रासदायक स्पंदने आहेत’, असे समजावे.

इ. याउलट डोळ्यांना थंडावा जाणवत असेल, मनाला हलके, आनंद किंवा शांती जाणवत असेल, तर ‘ती चांगली स्पंदने आहेत’, असे समजावे. काही वेळा डोक्याला जडपणा जाणवतो; पण डोळ्यांना त्रासदायक जाणवत नाही. तेव्हा ‘ती खोलीतील चांगल्या शक्तीची स्पंदने आहेत’, असे समजावे.

ई. खोलीमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास ती मंद कि तीव्र स्वरूपाची आहेत, हे जाणवणार्‍या स्पंदनांच्या तीव्रतेनुसार ओळखावे. खोलीमध्ये हलकासा त्रास जाणवत असल्यास ‘ती मंद स्वरूपाची त्रासदायक स्पंदने आहेत’, असे समजावे. त्रासानुसार आध्यात्मिक उपाययोजना कराव्या लागतील.

 

३. खोलीतील त्रासदायक स्पंदने कशामुळे निर्माण झाली आहेत, हे कसे ओळखावे ?

वास्तूमधील एखाद्या खोलीतील त्रासदायक स्पंदने उपरोल्लेखित वास्तूदोषामुळे निर्माण झाली आहेत, वाईट शक्तींच्या त्रासामुळे निर्माण झाली आहेत कि घरातील सामानाच्या अव्यवस्थित रचनेमुळे निर्माण झाली आहेत, हे जाणून घ्यावे.

अ. घरामध्ये वास्तूदोष असल्यास प्रत्येक खोलीतच त्रासदायक जाणवते.

आ. एखादी खोली नीटनेटकी असेल; पण तेथे दाब जाणवत असेल, तर तो त्रास वाईट शक्तींच्या त्रासामुळे असू शकतो. एखाद्या खोलीतील वाईट शक्तींचा त्रास त्या खोलीतील एखाद्या भागात गेल्यावर अधिक प्रमाणात जाणवतो, असेही लक्षात येते. त्यासाठी खोलीत सगळीकडे फिरून पहावे आणि खोलीतील त्रासदायक भागाची नोंद ठेवावी. खोलीतील त्या भागात आध्यात्मिक उपाय करावे लागतात.

इ. खोली अव्यवस्थित असेल किंवा सामानाची मांडणी असात्त्विक केली असेल, तर ते डोळ्यांना लक्षात येते. खोलीत पुष्कळ सामान असल्यास मोकळी जागा अल्प असते. तेव्हाही खोलीत त्रासदायक स्पंदने जाणवू शकतात. खोलीतील त्रासदायक स्पंदनांचे नेमके कारण कळल्याने उपाययोजना करणे सोपे जाते.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०१९)

2 thoughts on “‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक कि चांगली स्पंदने जाणवतात’, याचा अभ्यास करून वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास ती दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करा !”

  1. खूप महत्वाची माहिती मिळाली,

    Reply

Leave a Comment