अनुक्रमणिका
आयुष्याचा कालावधी मर्यादित आहे; म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्येक कृती वेळेवर करणे आवश्यक आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. वेळेचे महत्त्व
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’ पैशांची तूट प्रयत्नांनी भरून काढता येते; पण गमावलेला आजचा अमूल्य वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही. आपले निघून गेलेले एवढे आयुष्य लाखो रुपये व्यय करूनसुद्धा परत मिळवता येणार नाही, हे लक्षात ठेवा !
२. वेळेचा सदुपयोग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे जून १९०६ मध्ये ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी इंग्लंडला गेले. या कालावधीत ते अभ्यास पूर्ण करून ‘बॅरिस्टर’ झाले. हा अभ्यास चालू असतांनाच ‘मॅझनीचे चरित्र’ आणि ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे ग्रंथ लिहून पूर्ण केले. याच वेळी पुण्यातील ‘काळ’ दैनिकाचे वार्ताहर म्हणून ते लंडनहून बातमीपत्रे पाठवत होते. त्यांनी याच काळात ‘इंडिया हाऊस’च्या माळ्यावर सेनापती बापट यांच्यासह बॉम्बविद्येचे यशस्वी प्रयोग केले आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेसाठी युवकांचे संघटन केले. या युवकांपैकी एक असलेले मदनलाल धिंग्रा यांनी पुढे कर्झन वायली याला ठार मारले. वयाच्या २३ ते २६ या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकाच वेळी वरील अनेक कार्ये पार पाडली. तुम्हीही निर्धार केलात आणि ध्येयनिष्ठ असाल, तर तुमच्याकडूनही वेळेचा सदुपयोग होईल अन् भव्यदिव्ये कार्येही पार पाडली जातील, याविषयी शंका बाळगू नका !
३. वेळ वाया जाण्यास कारणीभूत दोष आणि त्यावरील उपाय
३ अ. वेळेचे गांभीर्य नसणे
निसर्गातील हवा, पाणी इत्यादी बर्याचशा गोष्टी विनामूल्य मिळतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व वाटत नाही. वेळेचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःचा वेळ वाया गेल्याविषयी किंवा इतरांना वेळ वाया घालवल्याविषयी काहीही वाटत नाही. जो वेळेचा आदर आणि योग्य वापर करतो, त्याचा वेळ आणि लोकही नेहमी आदर करतात.
३ आ. निरर्थक कृती सुखदायी वाटणे
काही जण मनोरंजन किंवा सुखप्राप्तीसाठी मोकळ्या वेळेत ‘इंटरनेट’मध्ये रमून जातात किंवा ‘व्हिडिओ गेम’ खेळण्यात मग्न होतात. यात त्यांचा बराचसा वेळ वाया जातो. कित्येक लोक अनावश्यक गप्पा मारण्यात किंवा शेजार्यांशी भांडण करण्यात वेळ वाया घालवतात.
वेळेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी आपण मनाला पुढीलप्रमाणे स्वयंसूचना देऊ शकतो.
‘वेळेचे महत्त्व नसणे, या दोषामुळे जेव्हा मी …… (आपला वेळ वाया घालवणारी कृती लिहावी.) या कृतीमध्ये निरर्थक वेळ वाया घालवत असेन, तेव्हा मला त्याची तीव्रतेने जाणीव होईल आणि मी लगेचच ………. (नियोजित कृती लिहावी.) करीन.’
३ इ. आळस
वेळेचे पालन आणि तिचा सदुपयोग न होण्यामागे आळस हा दोषही कारणीभूत ठरतो. आळसामुळे वेळेचे पालन किंवा सदुपयोग करण्याविषयीचा उत्साह घटतो आणि व्यक्ती अकार्यक्षम रहाण्यास किंवा पलंगावर सतत लोळत रहाण्यात सुख मानते. बर्याचदा दैनंदिन कामे करण्यास आळस केल्यामुळे नंतर ती कामे महत्त्वाच्या कामात आणि वेळेत व्यत्यय आणतात किंवा अधिक वेळ घेतात. उदाहरणार्थ गाडीमध्ये पेट्रोल घालण्यास आळस केल्यामुळे नंतर कुटुंबियांना अचानक रुग्णालयात नेतांना गाडीतील पेट्रोल भरण्यासाठी महत्त्वाचा वेळ द्यावा लागतो. तसेच गाडीमध्ये वेळीच पेट्रोल न भरल्यामुळे मध्येच गाडी बंद पडते. अशा वेळी ती रस्त्याच्या शेजारी ठेवून पेट्रोलपंपावर रिक्शाने जाणे, पेट्रोल खरेदी करणे आणि नंतर पुन्हा गाडीजवळ येणे, यात वेळ आणि रिक्शाने भाडे यांचा अपव्यय होतो.
आळस या दोषाचे निर्मूलन करण्यासाठी आपण मनाला पुढीलप्रमाणे स्वयंसूचना देऊ शकतो.
‘आळसामुळे मी गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठी पेट्रोलपंपावर टाळत असेल, तेव्हा मला त्याची तीव्रतेने जाणीव होईल आणि मी लगेचच गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठी जाईन.’
वरील प्रकारच्या स्वयंसूचना दिवसांतून १५ वेळा देणे अपेक्षित आहे.
४. वेळेचा सुविनियोग व्हावा, यासाठी करावयाचे प्रयत्न
४ अ. मोकळ्या वेळेचा उपयोग करणे
दैनंदिन जीवनात आपल्याला काही प्रमाणात मोकळा वेळ उपलब्ध होतो. ‘या मोकळ्या वेळेचा विनियोग कसा करावा’, हे त्या व्यक्तीवर, तसेच काळाच्या प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असते. काळाची प्राप्त परिस्थिती सतत पालटू शकते; पण व्यक्तीवर अवलंबून असलेला मोकळा वेळ आपण उपयोगात आणू शकतो. जी व्यक्ती उत्साही, ध्येयनिष्ठ आणि सकारात्मक असते, ती मोकळ्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करून घेते. याउलट चिंताग्रस्त, आळशी आणि नकारात्मक विचार असलेली व्यक्ती मोकळ्या वेळेचा दुरुपयोगच करते. मोकळा वेळ ही संपत्ती आहे. त्यातील एकही क्षण वाया घालवता कामा नये; कारण ती वेळ गमावणे, म्हणजे आपले सामर्थ्य गमावणे होय.
४ आ. नियोजित कार्ये वेळेतच पार पाडणे
नेहमीची कामे वेळच्या वेळीच करायला हवीत. विलंबाने केली, तर ती महागात पडू शकतात. आजचे महत्त्वाचे काम उद्यावर ढकलले, तर ते अधिकच कठीण वाटू लागते. अशा काम पुढे ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे बर्याच वेळा ते काम कधीच वेळेवर पूर्ण होत नाही. अशा व्यक्तीपासून यशही दूर पळते.
४ इ. घड्याळाकडे लक्ष ठेवणे
घड्याळाकडे दृष्टी फिरवून आपल्या कार्याशी संबंधित वेळेच्या प्रगतीविषयी आढावा घेतला पाहिजे. घड्याळाला आपले साहाय्यक समजून आपण कार्य केले, तर वेळेचे नियोजन करणे सहज शक्य होते.
४ ई. वेळापत्रक बनवून त्यानुसार कृती करणे
पूर्वनियोजित ठिकाणी, पूर्वनियोजित वेळी, पूर्वनियोजित पद्धतीने आणि पूर्वनियोजित लोकांच्या सहकार्याने पूर्ण नियोजित कामे करणे, याच्या विवरणाला ‘वेळापत्रक’ म्हटले जाते. ठरलेले काम जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्व ‘ते कुठल्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने करायचे’, यालासुद्धा महत्त्व आहे. उदाहरणार्थ शासकीय कार्यालयात एखादे काम असल्यास ‘ते काम करण्यास किती वेळ लागेल’, याचे विवरण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ‘ते शासकीय कार्यालय घरापासून किती वेळ दूर आहे’, याचेही विवरण तेवढेच महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाने स्वतःच्या सुविधेप्रमाणे स्वतःचे स्वतंत्र वेळापत्रक करावे. त्यामध्ये प्रत्येक दिवशी वेळेनुसार काय कृती करणार ते नमूद करावे.
कौटुंबिक, कार्यालयीन या वेळेचा योग्य वापर करणे, निरोप लिहून घेणे, कृतींची व्याप्ती काढणे, कृती करतांना सूची बनवणे, प्राधान्य ठरवणे, इतरांचे साहाय्य घेणे, एकाच वेळी विविध कृती करणे, पर्यायांचा विचार करणे यांमुळे कृती परिणामकारक होतात. वैयक्तिक आवरतांना प्रार्थना, नामजप किंवा स्वयंसूचना सत्र करणे, दूरभाषवर बोलतांना केर काढणे किंवा अन्य कामे करणे, अशा कृतींमुळे वेळेचा सदुपयोग होतो.
मनुष्यजन्म वारंवार मिळत नाही, म्हणून मानवी जीवनातील काळ हा बहुमूल्य आहे. प्रत्येकाचे आयुष्य मर्यादित आणि अनिश्चित काळ आहे. या मर्यादित आणि अनिश्चित काळातच आपल्याला मनुष्यजन्माचे सार्थक करायचे आहे. या वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करून अधिकाधिक वेळ सत्कारणी, म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून परिश्रमपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे. देवाला प्रार्थना करून नियोजन आणि कृती केल्याने कार्य वेळेत पूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल !