सातारा येथे सनातननिर्मित धर्मरथाद्वारे धर्मप्रसार !
सातारा – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे कार्य मोठ्या निष्ठेने करत आहे. हे कार्य करत असतांना विहंगम पद्धतीने धर्मप्रसार करण्याचे तंत्र संस्थेने विकसीत केले आहे. याचाच एक भाग म्हणजे हिंदूंना धर्मशिक्षण देणारा, धर्माचरण शिकवणारा, समाजात धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा सनातनचा धर्मरथ होय. सनातननिर्मित धर्मरथ म्हणजे साक्षात चैतन्याचा प्रवाह आहे, असे गौरवोद्गार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी काढले. येथील राजवाडा परिसरात अजिंक्य गणपतिसमोर सनातननिर्मित धर्मरथ लावण्यात आला आहे. या धर्मरथाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज पुढे म्हणाले की,
१. साक्षात भगवत्स्वरूप असणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संकल्पानुरूप हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य गती घेत आहे. ग्रंथ, नियतकालिके, सामाजिक संकेतस्थळे, धर्मशिक्षण वर्ग, धर्मजागृती सभा, अधिवेशन आदींच्या माध्यमातून हे कार्य विहंगम पद्धतीने चालू आहे.
२. या कार्याला अनेक थोर साधू-संतांचे शुभाशीर्वाद असून संस्थेचे कार्य अल्पावधीतच देश-विदेशात पसरले आहे.
३. आपणही आपले धर्मकर्तव्य म्हणून सनातनच्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीच्या कार्यात तन, मन, धनाने सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य पार पाडावे.
या वेळी धर्मरथावरील साधक श्री. सागर म्हात्रे यांनी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांना धर्मरथामधील ग्रंथांची माहिती सांगितली. ११ जून या दिवशी धर्मरथ राजवाडा, सातारा येथे असणार आहे. या धर्मरथावर सनातननिर्मित ग्रंथ, देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या, प्रतिमा, उत्पादने आदींचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. तरी सातारा आणि पंचक्रोशीतील राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.