- पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन (वय ३३ वर्षे) आणि ‘दैवी बालक’ असलेला त्यांचा नातू यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !
- एकाच कुटुंबात एकाच वेळी पिता संत झाल्याचे, तसेच त्यांचे पुत्र आणि नातू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची दुर्मिळ घटना !
- अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये संतपद गाठलेले पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे पहिले हिंदुत्वनिष्ठ !
रामनाथी (गोवा) : धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन ! त्यांचा श्रीरामाप्रती उत्कट भाव आहे. अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर बांधले जावे, यासाठी तन, मन, धन आणि प्राणही समर्पित करण्याची त्यांची सिद्धता असून त्यासाठी २९ वर्षे ते झोकून देऊन न्यायालयीन लढा देत आहेत. अधिवक्ता हरि शंकर जैन म्हणजे ‘हिंदु राष्ट्रासाठी अखंड कार्यरत असलेले धर्मयोद्धा !’, असे त्यांचे वर्णन करता येईल. असे निष्काम कर्मयोगी असलेले अधिवक्ता पू. हरि शंकर जैन (वय ६५ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये दिली. धर्मरक्षणाच्या कार्यासह आध्यात्मिक वाटचालीतही पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन (वय ३३ वर्षे) आणि त्यांचा नातू चि. वृषांक (वय १ वर्षक १० मास) या दोघांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे उपस्थित हिंदुत्वनिष्ठांचा आनंद द्विगुणीत झाला. हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा सन्मान, तर अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि चि. वृषांक यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या पत्नी सौ. उमा जैन, सून सौ. डोना जैन, त्यांची मुलगी सौ. वैष्णवी दवे आणि जावई श्री. सोहम् दवे हेही उपस्थित होते.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. त्यागी वृत्ती : गेल्या ४० वर्षांपासून ते राष्ट्र, धर्म आणि समाज यांसाठी स्वखर्चाने जनहित याचिका प्रविष्ट करून लढा देत आहेत.
२. कर्तृत्ववान : काही वर्षांपूर्वी नेपाळमध्ये ‘हिंदु राष्ट्राची घटना कशी असेल ?’, याची चर्चा चालू होती. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचे श्रेष्ठत्व इतके आहे की, त्या वेळी नेपाळमधील जाणकार मंडळी हिंदु राष्ट्राची घटना बनवण्यासाठी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचे साहाय्य घेत होते.
३. दोन दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनामध्ये त्यांचे मार्गदर्शन झाले, तेव्हा अनेकांना चैतन्याची अनुभूती आली.
पू. (अधिवक्ता) हरि शंकरजी जैन यांचे मनोगत
१. परम पूज्य गुरुजींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला हा सन्मान दिला !
संतपदी विराजमान झाल्यानंतर पू. (अधिवक्ता) हरि शंकरजी जैन म्हणाले, ‘‘आजचा क्षण अतिशय आनंददायी आहे. परम पूज्य गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला हा सन्मान दिला. या सन्मानामुळे माझे दायित्व अधिक वाढले आहे. यानंतर मला अधिक तत्परतेने आणि मन लावून सेवा करायची आहे. माझ्याकडून आतापर्यंतच्या सेवेत काही न्यूनता राहिली असल्यास, ती दूर करायची आहे आणि राममंदिर निर्मितीच्या कार्यात माझे उर्वरित जीवन समर्पित करायचे आहे. माझा संत म्हणून सन्मान करण्यात येईल, अशी अपेक्षा मी कधीही केली नव्हती. उपस्थित लोकांचे प्रेम, रामभक्त आणि भगवंत यांचे आशीर्वाद, तसेच परम पूज्य गुरुजींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपा, यांमुळे हे शक्य झाले.’’
२. रामजन्मभूमीचा खटला लढण्याविषयी सीता आणि हनुमान यांचा दृष्टांत होणे
वर्ष १९९० च्या काळात रामजन्मभूमीच्या सुत्राला एवढे महत्त्व नव्हते. न्यायालयात राममंदिराचा खटला चालू होता. या खटल्यात मलाही रस होता. राममंदिराचा खटला लखनौ उच्च न्यायालयात आला असता, मला स्वप्नाद्वारे दृष्टांत झाला. यात माता सीता आणि हनुमान यांनी मला या खटल्यात सहभागी होण्याविषयी संकेत दिले. त्यानंतर ‘मला हा खटला लढवण्यास द्यावा’, अशी विनंती मी हिंदु महासभेला केली. हिंदु महासभेनेही मला हा खटला लढवण्याची अनुमती दिली. तेव्हापासून हिंदु महासभेच्या वतीने मी हा खटला विनामूल्य लढत आहे.
३. धर्मासाठी कार्य करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्यच !
धर्मासाठी कार्य करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्यच आहे. जो त्याच्या धर्माचे काम करत नाही, धर्माचे रक्षण करत नाही, तो मनुष्यच नाही. धर्माचे रक्षण करणे, हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. परम पूज्य गुरुजींच्या आशीर्वादाने मी माझे दायित्त्व अधिक निश्चयाने पार पाडीन.
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचे क्षात्रतेज
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले, ‘‘भगवंताने जेवढे मला सामर्थ्य दिले, त्यानुसार मी सेवा केली. भगवंताच्या कृपेने मी रामजन्मभूमीच्या सुत्रावर कोणतीही तडजोड केली नाही. ईश्वराच्या कृपेने सर्वोच्च न्यायालयातही राममंदिराची बाजू मांडत आहे. एकदा न्यायालयात एकाने म्हटले की, ‘ज्यांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, ते तालिबानी आहेत. तेव्हा भगवंताच्या कृपेने मी भर न्यायालयात ‘होय, तो तालिबानी हिंदु मीच आहे. मला जी शिक्षा द्यायची असेल, ती द्या. बाबरी मशीद पाडल्याचा मला अभिमान आहे’, असे जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या वेळी मला देवानेच शक्ती दिली.’’
६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केलेले मनोगत
पिताजींच्या रूपातील गुरु आणि ‘आध्यात्मिक गुरु’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
‘आज मला आश्चर्य वाटत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवलेजी यांनी मला या सत्कारास पात्र ठरवले, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. पिताजींच्या रूपातील गुरु आणि ‘आध्यात्मिक गुरूं’ची न्यूनता पूर्ण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्याच कृपेमुळे हा स्तर प्राप्त करू शकलो. राष्ट्र-धर्म कार्य करण्यासाठी पिताजींकडूनच प्रेरणा मिळाली. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी जो सन्मान दिला, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मी आणि माझे कुटुंबीय यांना पाया रोवण्याची अन् सर्व प्रकारची आहुती देण्याची संधी मिळो’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’
अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी माता-पित्यांविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता
‘न्यायालयात इतर अधिवक्ते माझ्या वडिलांविषयी बोलत असत, तेव्हा ‘पिताजी हिंदुत्वासाठी कार्य करतात’, याचा मला नेहमीच अभिमान वाटला. त्यांच्या कार्यात आईनेही प्रत्येक वेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात साहाय्य केले. पुढेही तिचे साहाय्य मिळत राहो. वडिलांनी वकिली व्यवसायाची नवी व्याख्या शिकवली. ‘धर्मासाठी लढत रहा आणि धर्माच्या रक्षणासाठी कायम उभे रहा’, ही शिकवण त्यांनी दिली.
‘हिंदु राष्ट्रासाठी कार्य करतांना कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका’, असे आवाहनही अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी उपस्थितांना केले.