मिरज, २६ मे (वार्ता.) – जन्मजात विकलांग असूनही त्याचा कुठेही लवलेश जाणवू न देता सतत आनंदाच्या स्थितीत असणारे, परिस्थितीविषयी कोणतीही तक्रार न करणारे, स्वत:च्या अस्तित्वाने इतरांना साधनेला प्रवृत्त करणारे श्री. संकेत कुलकर्णी यांनी ९६ वे संतपद गाठल्याची घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २४ मे २०१९ या दिवशी येथील सनातन आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात केली. ‘आज सांगली जिल्ह्याला कोणती भेट मिळणार आहे’, याचे सर्वांनाच औत्सुक्य होते. अखेर संतरूपी भेट मिळाल्याने त्या दिवशीची सायंकाळ अधिकच चैतन्यमय झाली.
सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. शिल्पा बर्गे यांनी केले.
प्रारंभी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांकडून भावप्रयोग करवून घेतला आणि परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचा संदेश वाचून दाखवला. संदेश वाचनात श्री. संकेत कुलकर्णी यांनी ९६ वे संतपद गाठल्याचे नमूद केले असल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले. सन्मानानंतर पू. संकेत यांच्या आई-वडिलांनी, तसेच अन्य काही साधकांनी मनोगत व्यक्त केले.
दुर्धर आजारांना तोंड देत खडतर प्रारब्ध भोगणारे आणि अंतर्मनातून
साधना करून वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी संतपद प्राप्त करणारे पू. संकेत कुलकर्णी !
सांगलीतील श्री. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना जन्मापासूनच अनेक दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागले. जन्मतःच अपंगत्व असल्याने त्यांच्या कंबरेखालचे शरीर लुळे आहे. त्यामुळे त्यांना उठणे-बसणे या हालचाली करता येत नाहीत; पण कोणीतरी उठवून आधार देऊन बसवले, तर ते काही घंटे बसू शकतात. ते हाताच्या क्रिया काही प्रमाणात करू शकतात; पण हाताच्या स्नायूंमध्ये दौर्बल्य असल्याने हालचालींवर पुरेसे नियंत्रण नसते. त्यांचे बोलणे आणि उच्चार स्पष्ट नाहीत. वयाच्या २२ वर्षापर्यंत त्यांच्यावर अनेक गुंतागुंतीची शस्त्रकर्मे करण्यात आली. ‘परेच्छेने वागणे’, ‘सहनशीलता’ आणि ‘स्थिरता’ या गुणांमुळे संकेत यांनी या अत्यंत क्लेशदायी प्रसंगांनाही शांतपणे तोंड दिले. संत भक्तराज महाराज यांच्या भजनातील ‘देह प्रारब्धावरी सोडा । चित्त चैतन्यासी जोडा ॥’ ही पंक्ती त्यांनी स्वतःच्या आचरणातून जगून दाखवली.
दिव्यांग (विकलांग) स्थितीत असलेल्या संकेत यांची साधना अंतर्मनातून होत असल्याने बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. यातूनच त्यांचे वेगळेपण ध्यानात येते. तीव्र शारीरिक भोग भोगतांनाही सतत आनंदावस्थेत रहाणार्या संकेत यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.
त्यांच्या सहवासात साधकांना अनेक अनुभूती येत असून त्यांच्या देहात दैवी पालट झाले आहेत. हे सर्व त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीचे द्योतक आहे. वर्ष २०१३ मध्ये त्यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आणि नंतर अवघ्या ६ वर्षांतच त्यांनी आता संतपद प्राप्त केले आहे. खडतर प्रारब्ध भोगतांना आध्यात्मिक प्रगतीची शिखरे पादाक्रांत करून श्री. संकेत गुरुदास कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाले आहेत.
जन्मापासूनच असाध्य आजारपण मागे लागलेल्या पू. संकेत यांची सेवा-शुश्रूषा करून साधना आणि सेवा करणार्या त्यांच्या आई-वडिलांचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे.
‘पू. संकेत यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
व्यवहारात शिक्षण, तर अध्यात्मात साधना महत्त्वाची ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
पू. संकेत कुलकर्णी यांनी विकलांग असूनही अंतर्मनातून सतत परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचे स्मरण केले आणि शारीरिक अडचणींवर मात करत संतपद गाठले. यावरून व्यवहारात शिक्षण, तर अध्यात्मात आंतरिक साधना महत्त्वाची आहे, हेच लक्षात येते. पू. संकेत यांच्या उदाहरणावरून साधकांनी ‘स्वतः धडधाकट असतांना आपण किती सेवा करतो’, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. १६ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा असून त्याचा लाभ करून घेण्यासाठी सर्व साधकांनी आतापासून क्षण अन् क्षण सेवेसाठी वापरला पाहिजे. दोष आणि अहं यांची व्याप्ती काढून त्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे.
पू. संकेत कुलकर्णी यांनी केलेल्या साधनेमुळे त्यांच्या घराचे मंदिरात रूपांतर झाले आहे. आपण किती साधना करतो, यापेक्षा ती किती भावपूर्ण करतो, हे देवाला आवडते. पू. संकेत यांच्यात निर्मळता आहे, ती देवाला आवडली.
पू. संकेत कुलकर्णी यांच्यातील गुणांचा आदर्श घेऊन आपणही झोकून देऊन साधना करूया.
पू. संकेत यांना भेटल्यावर मनाच्या
स्तरावर आनंदाची स्पंदने जाणवली ! – पू. (सौ.) शैलजा परांजपे
पू. संकेत यांच्याविषयी त्यांच्या आईने लिहून पाठवलेल्या धारिका संकलनासाठी आमच्याकडे येत. त्या वाचून पू. संकेत यांना भेटण्याची ओढ लागली होती. त्यांना भेटायला गेल्यावर आपोआप हात जोडले गेले. पू. संकेत यांना भेटल्यावर मनाच्या स्तरावर आनंदाची स्पंदने जाणवत होती. भोजनगृहात गेल्यावर ‘ब्रह्मरंध्रातून पायापर्यंत शरीर कंप पावत आहे’, असे जाणवले.
आई-वडिलांनी व्यक्त केलेले मनोगत
१. सौ. सुजाता कुलकर्णी (पू. संकेत यांची आई)
पू. संकेत यांचा जन्म झाल्यावर प्रारंभी ते विकलांग आहेत, हे स्वीकारणे जड गेले; मात्र नंतर परिस्थिती स्वीकारून मी त्यांचे सर्व करू लागले. पू. संकेत यांच्याकडून पराकोटीची परेच्छा शिकायला मिळाली. ‘मला हे हवे आहे’, असे त्यांनी कधीही सांगितले नाही. त्यांच्या चैतन्याचा परिणाम घरात होत आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. फरशीचा रंग पालटत आहे. पू. संकेत यांच्या संतपदाची घोषणा झाल्यापासून माझी नि:शब्द स्थिती असून ‘काय बोलावे’, हे सुचत नाही.
२. श्री. गुरुदास कुलकर्णी (पू. संकेत यांचे वडील)
परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांची कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करावी तेच कळत नाही. काही वर्षांपूर्वी एका संतांनी ‘पू. संकेत तुमच्या कुळाचा उद्धार करेल’, असे सांगितले होते. आज झालेल्या सोहळ्यातून ते शब्द खरे ठरल्याचे लक्षात आले. मी कामावरून परत आल्यावर पू. संकेतदादा माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असत. त्यामुळे ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवत असे.