श्रीविष्णूच्या दिव्य देहावर असलेले ‘श्रीवत्स’ चिन्ह

१. श्रीविष्णूच्या छातीवरील श्रीवत्स चिन्ह, म्हणजे ‘श्री महालक्ष्मी’चे स्थान असणे

‘महर्षि व्यासांनी श्रीमद्भागवतामध्ये लिहिले आहे, ‘वैकुंठामध्ये सर्वजण श्रीविष्णुसारखे दिसतात. केवळ एकच अशी गोष्ट की, जी केवळ श्रीविष्णूच्या देहावर आहे. ती म्हणजे ‘श्रीवत्स’ चिन्ह ! महाविष्णूच्या छातीवर उजव्या बाजूला पांढर्‍या केसांचा एक पुंजका आहे. त्याला ‘श्रीवत्स’ चिन्ह म्हटले जाते. ‘श्री’ म्हणजे ‘श्री महालक्ष्मी’ आणि ‘वत्स’ म्हणजे ‘प्रिय’. जो श्रीमहालक्ष्मीचा प्रिय आहे, तो म्हणजे ‘श्रीवत्स’. भगवान श्रीविष्णूच्या छातीवरील श्रीवत्स चिन्ह, म्हणजे ‘श्री महालक्ष्मीचे’ स्थान होय !

वक्षस्य शुक्लवर्ण-दक्षिणावर्त-रोमावली । – शब्दकल्पद्रुम

व्युत्पत्ती

वक्षस्य म्हणजे छातीवरील, शुक्ल वर्ण म्हणजे मोगर्‍यासारखा पांढरा शुभ्र रंग, दक्षिणावर्त म्हणजे उजव्या दिशेने तोंड असलेले, रोमावली म्हणजे छातीवरील केसांचा पुंजका किंवा गुंता

अर्थ

‘श्रीमहाविष्णूच्या छातीवर मोगर्‍यासारख्या शुभ्र पांढर्‍या रंगाच्या आणि उजवीकडे वळलेल्या छातीवरील केसांच्या पुंजक्यामुळे निर्माण झालेले चिन्ह’, म्हणजे ‘श्रीवत्स’ होय !

कलियुगात श्रीवत्स चिन्ह कळावे; म्हणून कमळावर आरुढ द्विभुजा लक्ष्मीचे जागृत रूप दाखवण्यात येते.

‘दशावतारांमधील कल्की अवतारामध्ये भगवंताच्या शरिरावर श्रीवत्स चिन्ह असणार आहे’, असे भागवतामध्ये म्हटले आहे.

 

२. श्रीवत्स चिन्हाची अन्य काही वैशिष्ट्ये

‘श्रीवत्स’ पदकाचे रेखाचित्र

अ. श्रीवत्स चिन्ह अष्टधा प्रकृतीचे प्रतीक आहे. श्रीवत्स, म्हणजे ‘माया’ आणि ‘माया’, म्हणजे दिसणारे सर्व ब्रह्मांड आणि जग. अष्टधा प्रकृती, म्हणजेच श्रीविष्णूची शक्ती आणि ती म्हणजेच ‘श्री महालक्ष्मी’ होय.

आ. श्रीवत्स चिन्ह म्हणून ओळखली जाणारी ती पांढर्‍या रंगाची लव, म्हणजे एकप्रकारे ज्याला ना आदी, ना अंत आहे, अशा निर्गुण परमेश्‍वराचे सगुण चिन्ह होय !

इ. भृगु महर्षींनी जेव्हा श्रीविष्णूच्या छातीवर लाथ मारली, तेव्हा श्रीविष्णूच्या हृदयात श्रीवत्स रूपाने वास करणारी श्री महालक्ष्मी वैकुंठातून निघून गेली आणि त्यामुळेच श्रीविष्णूला ‘तिरुपती बालाजी’ म्हणजे ‘श्रीनिवास’ अवतार धारण करावा लागला.

ई. या कलियुगातील सर्वांना माहीत असलेला श्रीविष्णूचा अवतार, म्हणजे ‘तिरुपती बालाजी’ आणि त्याच्या शरिरावर श्रीवत्स चिन्ह असल्याचे म्हटले जाते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट व्यक्ती किंवा संतांना मंदिराच्या वतीने देवाच्या छातीवरील श्रीवत्स चिन्हावर लावण्यात आलेला चंदनाचा लेप एका छायाचित्र चौकटीमध्ये भेटप्रसाद म्हणून देण्यात येतो. त्या चंदनाच्या लेपाकडे पाहिल्यावर लक्षात येते, ‘तिरुपती बालाजीच्या छातीवर असलेले श्रीवत्स चिन्ह, म्हणजे कमळावर बसलेली श्रीमहालक्ष्मी.’

 

३. श्रीवत्स चिन्हाचे वेगवेगळ्या ऋषींनी विविध प्रकारे केलेले वर्णन

अ. विष्णुपुराणात (अंश १, अध्याय २२, श्‍लोक ६९) पराशर ॠषि मैत्रेयीला सांगतात, ‘हे मैत्रेयी मला वसिष्ठ ऋषींनी श्रीवत्स चिन्हाविषयी सांगितले, ‘श्रीवत्ससंस्थानधरम् अनन्ते च समाश्रितम् प्रधानम् ।’ याचा अर्थ आहे, ‘सृष्टीच्या मूलतत्त्वांपैकी ‘प्रधान’ हे तत्त्व ‘श्रीवत्स’ या रूपाने श्रीविष्णूने धारण केले आहे.’

आ. ‘लक्ष्मीवल्लभ’ असे जे श्रीविष्णूचे नाव आहे, ते श्रीविष्णूने श्रीवत्स चिन्ह धारण केल्याने त्याला प्राप्त झाले आहे. ‘लक्ष्मीवल्लभ’ म्हणजे जो श्रीलक्ष्मीला प्रिय आहे.

इ. श्रीवत्स चिन्ह धारण केल्यामुळे श्रीविष्णूला ‘श्रीवत्सवक्षा’, म्हणजे ‘छातीवर श्रीवत्स चिन्ह धारण केलेला’ असे नाव आहे. श्रीमद्भागवतामध्येही अनेक ठिकाणी श्रीवत्सधारी श्रीविष्णूचा उल्लेख आहे.

ई. वत्स नावाचे एक ॠषि होते. ज्यांच्यामुळे ‘श्रीवत्स’ गोत्र उत्पन्न झाले. श्रीविष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामाचा जन्म श्रीवत्स गोत्रामध्ये झाला होता. सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचाही जन्म श्रीवत्स गोत्रामध्ये झाला आहे.

उ. श्रीमद्भागवतामध्ये सांगितले आहे. ‘श्रीकृष्णाच्या वेळी काशीजवळ असलेल्या पुंड्र देशाचा राजा पौंड्रक याने स्वत: श्रीकृष्ण असल्याचे ढोंग केले होते. त्याने श्रीकृष्णासारखे मोरपीस धारण केले होते. तो सर्व वेषभूषा श्रीकृष्णासारखी करत होता आणि हातात खोटे सुदर्शन चक्र ठेवत होता. ज्या वेळी पौंड्रकाने श्रीकृष्णावरच खोटारडेपणाचा आरोप करून युद्धासाठी आव्हान दिले, त्या वेळी श्रीकृष्ण त्याच्या महालात पोचला. भगवान श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणतात, ‘अरे मूर्खा, जो कधीही चूक करत नाही, जो शुद्ध मनाचा आहे, ज्याचे अंतकरण स्वच्छ आहे आणि जो चराचर विश्‍वात परम पूजनीय आहे, तोच श्रीवत्समुद्रा धारण करू शकतो.’ त्यानंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडून पौंड्रकाचा वध केला.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान, (१६.४.२०१९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

1 thought on “श्रीविष्णूच्या दिव्य देहावर असलेले ‘श्रीवत्स’ चिन्ह”

Leave a Comment