सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ९५ वे संतरत्न !
रामनाथी आश्रम (गोवा), २४ मे (वार्ता.) – ‘देवा, माझे मन तुला इतके शरण जावे । स्वभावदोष जाऊनी सगळे । त्याचे निष्पाप फूल व्हावे ॥’, अशी एक कवितारूपी प्रार्थना आहे. २२ मे या दिवशी साधकांना या कवितारूपी प्रार्थनेचे मूर्तीमंत रूप रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात अनुभवायला मिळाले ! शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले आणि निष्पाप, निर्मळ आणि सुकोमल असे ‘कुसुम’ ईश्वरचरणी अर्पण झाले ! या भावसोहळ्यात सनातनच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी हेे गुपित उलगडले. त्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते पू. (श्रीमती) कुसुम जलतारे यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला सनातनचे संत पू. मुकुल गाडगीळ आणि पू. महेंद्र क्षत्रिय यांचीही वंदनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाला पू. (श्रीमती) जलतारेआजी यांचा लहान पुत्र आणि रामनाथी येथील सनातन आश्रमात ध्वनीचित्रीकरणाविषयीची सेवा करणारे श्री. योगेश जलतारे, मुलगी सौ. माया पिसोळकर, भाचा श्री. अनिरुद्ध राजंदेकर, त्यांची पत्नी सौ. मानसी आणि मुले कु. श्रिया अन् चि. वामन, पू. (श्रीमती) जलतारे यांची नात सौ. मुक्ता लोटलीकर (पूर्वाश्रमीच्या श्रद्धा पिसोळकर) याही उपस्थित होेेत्या. अकोला, जळगाव आणि पुणे येथील पू. आजींचे साधक नातेवाईकही संगणकीय प्रणालीद्वारे या भावसोहळ्यात सहभागी झाले.
शांत, समाधानी वृत्ती आणि ‘स्वतःवर देवाची
कृपा व्हावी’, अशी तळमळ लागलेल्या श्रीमती कुसुम जलतारेआजी !
श्रीमती जलतारेआजी यांना व्यावहारिक जीवनात अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले; पण शांत, सोशिक स्वभाव आणि समाधानी वृत्ती यांमुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीविषयी कधी तक्रार केली नाही. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ॥’ अशा वृत्तीमुळे त्यांनी सांसारिक कर्तव्ये शांतपणे आणि देवावरील नितांत श्रद्धेच्या बळावर पार पाडली. हे करतांना त्यांनी आपल्या अपत्यांवर धार्मिक संस्कारही केले.
मूलतः सात्त्विक प्रकृती असलेल्या श्रीमती जलतारेआजी वयाच्या ६० व्या वर्षी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्या. सतत परेच्छेने वागणे, इतरांचा विचार करणे आणि ईश्वराप्रती लागलेली ओढ यांमुळे त्यांची आंतरिक साधना होत राहिली.
मायेपासून पूर्ण अलिप्त झालेल्या आणि केवळ ‘साधना’ हेच इतिकर्तव्य बनलेल्या श्रीमती जलतारेआजी यांनी वर्ष २०१२ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. मागील वर्षी, म्हणजे वर्ष २०१८ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती. अवघ्या १ वर्षात त्यांच्या आध्यात्मिक पातळीत ६ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांची पातळी आता ७१ टक्के झाली आहे आणि त्या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या आहेत.
पू. आजींनी केलेल्या संस्कारामुळे त्यांचा मुलगा (श्री. योगेश), तसेच त्यांच्या मुलीचे पूर्ण पिसोळकर कुटुंबही पूर्णवेळ साधना करत आहे.
‘पू. श्रीमती जलतारेआजी यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले