संतांनी केलेल्या आणि सांगितलेल्या प्रार्थना
१. शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार)
‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
२. पू. सारदादेवी (श्रीरामकृष्ण परमहंसांच्या पत्नी) चंद्राला पुढील प्रार्थना करत असत
‘हे चंद्रा, तुझे अंतःकरण जसे शीतल आहे, तसे माझे अंतःकरण शीतल ठेव. तू जसा पवित्र आणि निर्मळ आहेस, तसे मला पवित्र आणि निर्मळ ठेव.’
३. सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांनी सांगितलेली प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, तुझी भक्ती माझ्या चित्तात दृढ होऊ दे. तुझे नाम माझ्या चित्तात रुजू होऊ दे. माझ्या साधनेतील अडथळे दूर होऊ दे. तुझ्या प्राप्तीची तीव्र तळमळ तूच माझ्यात निर्माण कर.’
साधकांनी करावयाच्या प्रार्थना
१. स्वयंसूचना घेण्यापूर्वी करायची प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, या सूचनेतील प्रत्येक शब्द तुझ्या चैतन्याने भारित होऊ दे. ही चैतन्यमय शक्ती माझ्या अंतःकरणापर्यंत पोचून माझ्यातील आळस आणि मनाप्रमाणे करणे (स्वतःचे जे दोष आहेत, ते येथे म्हणावेत) हे दोष दूर होऊ दे अन् तत्परता आणि विचारून करणे (स्वतःला अपेक्षित असलेले गुण येथे म्हणावेत.) हे गुण वाढू दे.
२. सेवा करत असतांना करायची प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, मी करत असलेल्या सेवेतील स्थुलातील आणि सूक्ष्मातील अडथळे दूर होऊ दे.’
३. रात्री झोपतांना करायची प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, झोपतांना तुझे नाम माझ्या मुखात असू दे. झोपेतही माझा अखंड नामजप चालू राहू दे. तसेच झोपेतून उठल्यावरही दिवसाचा आरंभ तुझ्या स्मरणानेच होऊ दे. अशा प्रकारे हे भगवंता, मला सतत तुझ्या अनुसंधानात ठेव.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०१६)
देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमात
राहून सेवा करणारे श्री. भालचंद्र जोशी यांना सुचलेल्या प्रार्थना !
१. भूमातेला केलेली प्रार्थना
‘हे भूमाते वसुंधरे, तू तर साक्षात माता आहेस. जन्माला आल्यापासून अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पुरवून तू मला उपकृत केले आहेस. त्यासाठी मी तुझ्या चरणी शरणागत भावाने कृतज्ञ आहे; परंतु हे भूमाते, माझ्या दिवसाचा आरंभ तुला पाय लावून करावा लागतो. या अपराधाबद्दल तू मला क्षमा कर. ‘तुझे आशीर्वाद मला सदैव लाभावेत आणि आपत्काळात तू माझे रक्षण करावेस’, अशी तुझ्या चरणी अनन्यभावाने प्रार्थना आहे.
२. आश्रमाच्या वास्तूत रहायला मिळाल्याने केलेली प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, या चैतन्यदायी वास्तूत, म्हणजे जणू तुझ्या कवचातच तू मला अगदी सुरक्षित ठेवले आहेस. त्याविषयी मी तुझ्या सुकोमल चरणी कृतज्ञ आहे. या वास्तूत राहून गुरूंना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून करवून घे. या वास्तूत राहून माझी भाववृद्धी होऊ दे. या वास्तूत मला आणि माझ्या कुटुंबियांना निरामय आनंद प्राप्त होऊ दे’, अशी तुझ्या आणि वास्तुदेवतेच्या चरणी प्रार्थना आहे.
३. भगवंताला अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी केलेली प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, माझ्याकडून होणारी प्रत्येक सेवा समयमर्यादेत, अचूक, भावपूर्ण आणि आनंदाने होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
४. स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होण्यासाठी केलेल्या प्रार्थना
अ. ‘हे भगवंता, हे दयाघना, मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
आ. हे श्रीकृष्णा, प्रतिदिन मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं दाखवून दे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी माझ्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न करवून घे. तुझा प्रत्येक गुण माझ्यात येऊ दे.
इ. ‘हे भगवंता, मला काही कळत नाही; पण मला तर तुझ्या चरणांशी यायचे आहे. अगदी शेवटपर्यंत मला तुझी साथ हवी आहे. त्यासाठी तुला अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत. ‘माझे स्वभावदोष नेमके कोणते आहेत आणि त्यासाठी मी नेमके काय प्रयत्न करावेत ?’, हेही मला कळत नाही. हे भगवंता, तूच धावत ये आणि तुला अपेक्षित असे मला घडव. तुझ्यापर्यंत येण्यासाठी तळमळीने प्रयत्न करवून घेऊन मला तुझ्या चरणांशी घे’, अशी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन याचना करत आहे.
५. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येण्यासाठी केलेल्या प्रार्थना
अ. ‘हे श्रीकृष्णा, पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या कालावधीत घडणारा प्रत्येक प्रसंग तू माझ्यासाठीच घडवत आहेस’, याची मला सतत जाणीव राहू दे. माझ्या जीवनात घडणार्या प्रत्येक प्रसंगाच्या मुळाशी जाता येऊन मला त्यातून शिकता येऊ दे. त्यासाठी तू मला सतत वर्तमानकाळात ठेव. माझी शिकण्याची वृत्ती सतत जागृत राहू दे’, अशी तुझ्या कोमल चरणी अनन्य शरणागतभावाने प्रार्थना करत आहे.
आ. हे श्रीकृष्णा, प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि प्रसंग यांच्याकडून मला शिकता येऊ दे.
इ. ‘हे श्रीकृष्णा, ‘मला सर्व कळते’, हा माझा भ्रम दूर करून मला सृष्टीतील सर्व जिवांकडून शिकता येऊ दे. त्यांच्याविषयी माझ्या मनात निरपेक्ष प्रेम आणि कृतज्ञताभाव निर्माण होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
ई. ‘हे श्रीकृष्णा, ‘मला सतत परेच्छेने वागता येऊन निरपेक्ष रहाता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे.
६. स्वतःत भाव निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रार्थना
अ. ‘हे दयाघना, माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रतीचा दृढ भाव तूच निर्माण कर’, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने भावपूर्ण प्रार्थना आहे.
आ. ‘हे भगवंता, तुला अनुभवणे आम्हाला शक्य नाही; पण शरणागती ही तू आम्हाला दिलेली भावभेटच आहे. शरणागत भावभेटीच्या माध्यमातून आम्हाला तुझे भावविश्व पुनःपुन्हा अनुभवता येऊ दे आणि तुझ्या भावविश्वात अखंड राहून साधनेतील वाटचाल गतीने करता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने कळवळून प्रार्थना करत आहे.
इ. ‘हे ईश्वरा, संत म्हणजे पृथ्वीवरील तुझी सदेह रूपे. ‘संतांची सेवा केल्यामुळे त्यांची कृपा होऊन मला तुझी प्राप्ती होणार आहे’, असा भाव माझ्या मनात सतत टिकून राहू दे’, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.
ई. ‘हे दयाघना, ‘तूच सर्व चराचर व्यापले आहेस’, हा भाव माझ्या मनात सतत असू दे’, अशी तुझ्या चरणी अनन्य भावाने प्रार्थना आहे.
उ. ‘हे भगवंता, हे दयाघना, तूच कर्ता आणि करविता आहेस. ‘चाले हे शरीर, ईश्वराच्या इच्छेने । चालविता-बोलविता हरि नारायण ॥’, असा भाव तूच माझ्यात निर्माण कर’, अशी तुझ्या चरणी अनन्य अशा शरणागत भावाने प्रार्थना आहे.
७. फुलाप्रमाणे बनता यावे, यासाठी केलेल्या प्रार्थना
अ. ‘हे श्रीकृष्णा, प्रातःकाळी कळीच्या रूपातून नारायणाचे दर्शन होते. नंतर त्या कळीचे सुंदर अशा फुलात रूपांतर होते. हे फूल सृष्टीतील सर्वांनाच त्याच्या अस्तित्वाने, सुगंधाने आणि दर्शनाने आनंद देते. ‘आपले अस्तित्व सूर्यास्तापर्यंतच आहे’, हे त्या फुलाला ज्ञात असते, तरीही ते फूल परोपकार करून सर्वांना भरभरून आनंद देत असते. अशा परोपकारी आणि स्वतः आनंदी राहून सर्वांना आनंद देणार्या फुलाप्रमाणे मला सतत प्रसन्न, हसतमुख आणि अंतर्मनापासून आनंदी रहाता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी कळवळून प्रार्थना आहे.
आ. ‘हे श्रीकृष्णा, एका दिवसाचे जीवन मिळालेले फूल सतत आनंदी राहून इतरांसाठी सर्वस्व समर्पित करते. परिस्थिती अनुकूल असो अथवा ऊन, वारा, वादळ आणि पाऊस यांसारखी प्रतिकूल परिस्थिती असो, ते फूल आनंदी आणि स्थिर रहाते. त्या फुलाप्रमाणेच कोणत्याही परिस्थितीत मलाही स्थिर ठेव’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
८. भगवंताच्या अनुसंधानात रहाता येण्यासाठी केलेल्या प्रार्थना
अ. ‘हे श्रीकृष्णा, मला सतत तुझ्याशी बोलता येऊ दे. सतत तुझ्या अनुसंधानात रहाता येऊन तुझ्याशी एकरूप होता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी तळमळीने प्रार्थना करत आहे.
आ. ‘हे श्रीकृष्णा, स्वतःच्या विचारात रहाण्यापेक्षा ईश्वरप्राप्तीच्या विचारात रहाता यावे, यासाठी सतत तुझ्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न तूच माझ्याकडून करवून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
९. आत्मनिवेदन करता येण्यासाठी केलेल्या प्रार्थना
अ. ‘हे दयाघना, भगवंता, माझ्या जीवनात आलेली कुठलीही अडचण अनन्य अशा शरणागत भावाने तुला सांगता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
आ. ‘हे श्रीकृष्णा, मला प्रामाणिकपणे, प्रांजळपणे आणि मनमोकळेपणाने माझ्या मनातील सर्व काही तुला सांगता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी अनन्य अशा शरणागत भावाने प्रार्थना आहे.’
– श्री. भालचंद्र जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.७.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
Mahabhayankar sankatatun mala vachavnarya parampujyacnhya charani majhe koti koti naman.