कुडाळ – ‘वैशाख पौर्णिमेला, म्हणजे १८ मे २०१९ या दिवशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी डिगस (तालुका कुडाळ) येथील श्री. बन्सीधर तावडे (वय ७९ वर्षे) हे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा करणारे अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्यास असलेले पू. तावडेआजोबा यांनी संतपद गाठल्याच्या आनंदवार्तेने त्यांच्यासह सर्व साधक भारावून गेले आणि सर्वांनाच भावाश्रू अनावर झाले. सद्गुरु सत्यवान कदम यांनी पू. तावडेआजोबा यांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या आनंददायी सोहळ्याच्या वेळी पू. तावडेआजोबा यांनी गुरूंप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता, तसेच सद्गुरु सत्यवान कदम आणि अन्य साधक यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले हेच जगद्गुरु आहेत ! – पू. बन्सीधर तावडेआजोबा
सन्मान सोहळ्यानंतर पू. बन्सीधर तावडे म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांचा माझ्यावर कृपाशीर्वाद आहे. माझी आज अशी अवस्था झाली आहे की, मी भारावून गेलो आहे. काय बोलू हेच मला सुचत नाही. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच मला हे संतपद प्राप्त झाले आहे. वर्ष १९९७ पासून सनातनने जे प्रेम दिले, त्यामुळे मी आज येथेपर्यंत पोचू शकलो. शेवटच्या क्षणापर्यंत मी सनातन सोडणार नाही. प.पू. डॉक्टर हे जगाचे कल्याण करणारे हिंदु राष्ट्र आणणार आहेत. वर्ष २०२३ पासून या कार्याची गती वाढणार आहे. देशात अंदाधुंदी वाढली आहे. सर्वत्र वाढलेल्या समस्या हिंदु राष्ट्रातच सुटणार आहेत.’’
साधनेच्या प्रयत्नांविषयी पू. तावडेआजोबा म्हणाले, ‘‘प्रारंभी सनातनच्या ग्रंथांचे मी वाचन करायचो. त्यातील विचार माझ्या मनावर बिंबले. गुरुपौर्णिमेच्या प्रसारकार्यात हे विचार सर्वांना सांगण्याची संधी मिळाली. सनातनमध्ये एक चांगला भाग आहे, तो म्हणजे येथे साधनेविषयीच्या शंकांचे निरसन केले जाते. त्यामुळे जिज्ञासू कृतीशील होतो. अध्यात्मात जो कृती (साधना) करतो, त्याला अनुभूती येतात. त्याप्रमाणे मी सर्व अनुभवत आहे. प.पू. डॉक्टरांनी मला प्रकाशित (आनंदी) केले. सनातनसारखी संस्था जगात कुठेही नाही. येथे कोणताही भेदभाव नाही. वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करणे, हेच संस्थेचे ध्येय आहे. प.पू. डॉक्टर हेच जगद्गुरु आहेत. त्यामुळेच ते जगाचा विचार करतात.’’
पू. तावडेआजोबांच्या आनंदात पूर्वीच्या तुलनेत वाढ झालेली आहे !
– सद्गुरु सत्यवान कदम, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
‘पू. तावडेआजोबांची यापूर्वी भेट झाली होती. तेव्हा त्यांना शारीरिक त्रासांमुळे चालताही येत नव्हते, तरीही त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद जाणवत होता. दुसर्या भेटीत त्यांच्या आनंदात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाल्याचे लक्षात आले. त्यांची प.पू. गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे. ते मनमोकळेपणाने आणि अंतर्मनातून बोलतात. सनातनचे कार्य त्यांनी तन, मन आणि धन अर्पण करून केले आहे.’
‘सनातनचा एकही शब्द असत्य असू शकत नाही’,
अशी दृढ श्रद्धा आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले पू. बन्सीधर तावडे !
‘अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्ती असलेले डिगस, सिंधुदुर्ग येथील श्री. बन्सीधर तावडे यांनी सनातनचे ग्रंथ, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्या वाचनातून अध्यात्म समजून घेतले अन् ते त्वरित कृतीतही आणले. अध्यात्माची आवड असल्याने नाम, सत्संग, सेवा आणि तन, मन अन् धन यांचा त्याग अशा टप्प्यांनी त्यांनी साधनेची सर्व तत्त्वे अंगीकारली. या सर्व टप्प्यांतून साधना करतांना ‘सनातनचा एकही शब्द असत्य असू शकत नाही’, अशी श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांची ‘दृढ श्रद्धा’ हेच त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे गमक आहे. त्यामुळे वर्ष २०१२ मध्ये ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले.
बन्सीधर तावडेआजोबा यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात धर्मकार्याची अतीव तळमळ आहे. प्रकृती अस्वास्थ्य असल्याने ते आता प्रत्यक्ष प्रसारसेवा करू शकत नाहीत; पण त्यांच्या ध्यानी-मनी सतत सेवेचाच ध्यास असतो. ‘ईश्वरी राज्य स्थापन व्हावे’, याची त्यांना एवढी तळमळ लागली आहे की, ते सतत त्या चिंतनातच गढलेले असतात. या विषयावर ते उत्स्फूर्तपणे आणि अभ्यासूपणे बोलतात.
शारीरिक आजारपण असूनही ते सतत आनंदावस्थेत असतात. दृढ श्रद्धा, त्यागी वृत्ती आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ या गुणांमुळे श्री. बन्सीधर तावडेआजोबा यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होऊन ते आता सनातनच्या ९३ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाले आहेत.
पू. तावडेआजोबा यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही अशीच शीघ्र गतीने होईल, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. तावडेआजोबांचे बोलणे भारावून टाकणारे आहे ! – पू. तावडेआजोबा यांचे सेवेकरी
‘गेले ६ मास मी त्यांच्या सेवेत आहे. त्यांचे बोलणे भारावून टाकणारे असल्याने मी त्यांची सेवा एकही दिवस चुकवली नाही. ते मला सनातनचे ग्रंथ वाचनासाठी देतात. ते वाचल्यानंतर ‘हिंदु राष्ट्र येणारच’, हे माझ्या मनावर बिंबले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे दुसरे संत नाहीत.’ – श्री. कृष्णा यशवंत मेजारे, डिगस, तालुका कुडाळ. (पू. तावडेआजोबा यांचे सेवेकरी)