‘प्रत्येक व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. संगीताच्या संदर्भातही असेच आहे. प्रत्येक व्यक्ती तिची प्रकृती आणि आवड यांनुसार संगीत ऐकत असते. अध्यात्मशास्त्राच्या या नियमाला अनुसरून विचार केल्यास रज-तम अधिक असणार्या व्यक्तीला रॉक संगीत आणि पॉप संगीत किंवा तत्सम संगीत आवडते, तर सात्त्विक व्यक्तीला शास्त्रीय संगीत अधिक आवडते. आतापर्यंत रज आणि तम युक्त संगीताची आवड असणार्या मला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताविषयी थोडेफार कळून त्याची गोडी लागली. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
१. लहानपणी ऐकलेले संगीत तामसिक अन् कर्कश असणे
आणि संगीताची आवड केवळ रज-तमात्मक संगीतापुरती मर्यादित असणे
मला लहानपणापासूनच संगीताची, म्हणजे गाणी ऐकण्याची आवड होती. आम्ही आमच्या लहानपणी जे संगीत ऐकले, ते तामसिक आणि कर्कश होते. त्यामुळे ‘संगीत म्हणजे नेमके काय ?’, ‘संगीत ऐकण्याचे कोणते लाभ आहेत ?’, ‘देवाची अनुभूती घेण्यासाठी जीवनात संगीताचे महत्त्व कसे आहे ?’, असे विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत. त्या वेळी ‘संगीत म्हणजे तशा प्रकारचे काहीतरी असते’, असेही मला कधी वाटले नाही. त्यामुळे संगीताची आवड असूनसुद्धा ती केवळ रज-तमात्मक संगीतापुरतीच मर्यादित होती. त्या काळात या संगीताचा माझ्या मनावर एवढा प्रभाव होता की, शास्त्रीय संगीत ऐकतांना मला कंटाळा येत असे आणि ‘तमोगुणी संगीतच सर्वांत चांगले आहे’, असे मला वाटत असे.
२. मुंबईसारख्या शहरात रहात असल्यामुळे ‘आधुनिकता म्हणजेच
खरे जीवन’, असा अपसमज मनात निर्माण होऊन सध्याच्या काळात
प्रसिद्ध असलेल्या आधुनिक रज-तम युक्त संगीताविषयी प्रेम निर्माण होणेे
मी मुंबईत रहात असल्यामुळे तेथील वातावरण आणि माझे मित्र यांमुळे मला लहानपणापासूनच इंग्रजी अन् हिंदी सिनेसंगीत ऐकण्याचा छंद होता. मी ती गाणी लिहून पाठ करायचो. त्या काळी आमच्या अवतीभोवती समाजात असेच चालत असे. त्याचा परिणाम माझ्यावरही होता. त्यामुळे अशीच गाणी श्रेष्ठ असल्याचे आम्हाला वाटायचेे. मुंबईसारख्या आधुनिक प्रगत शहरात रहात असल्यामुळे ‘आधुनिकता म्हणजेच खरे जीवन’, असा अपसमज माझ्या मनात निर्माण झाला होता आणि अशा प्रकारच्या संगीताची आवड हा आधुनिक बनण्याच्या माझ्या प्रयत्नांचा एक भागच होता. त्यामुळे लहानपणापासून माझ्या मनाला आपली महान भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीत किंवा वाद्ये यांची जाणही नव्हती.
३. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
मार्गदर्शनामुळेे संगीताच्या आवडीत झालेले पालट
३ अ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेतच्या दैवी
दौर्याच्या कालावधीत संगीताशी संबंधित अमूल्य माहिती आणि
साहित्य जतन करतांना संगीताकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत रामनाथी आश्रमात संगीतविषयक प्रयोग चालू झाले. तेव्हा रज-तमात्मक संगीताच्या तुलनेत सात्त्विक संगीताचा आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागला; परंतु हे सर्व पाहूनही माझ्या मनावर मात्र त्याचा काहीच परिणाम होत नसे. तेव्हा ‘मनावर सात्त्विकतेचा परिणाम न होणे, हे आध्यात्मिक त्रासाचे लक्षण असावे’, असा मी विचार केला. कालांतराने देवाच्या कृपेनेच मला महर्षींच्या आज्ञेनुसार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या दैवी दौर्यावर त्यांच्या समवेत जाण्याची संधी मिळाली. या सेवेच्या निमित्ताने मला सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंचा सहवास मिळाला. विविध दौर्यांच्या निमित्ताने सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयासाठी संगीताशी संबंधित अमूल्य माहिती आणि साहित्य जतन करण्याचे कार्य करत आहेत. तेव्हा ‘संगीत’ या विषयाकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन पालटला. ‘खरे संगीत कोणते ?’, हे जाणण्याची मला संधी मिळाली आणि त्यातून मला आनंदही घेता आला.
३ आ. देवाच्या कृपेने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
सहवासात रहाता आल्याने ‘चांगले संगीत कसे असते ?’, हे कळणे आणि
आतापर्यंत चांगले वाटत असलेले संगीत सर्वाधिक त्रासदायक असल्याचे लक्षात येणे
सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंच्या समवेत दौर्यावर असतांना माझा खर्या अर्थाने ‘संगीत म्हणजे काय ?’, याचा थोडाथोडा अभ्यास होऊ लागला. संगीत ऐकतांना त्यात ‘नेमके काय ऐकायचे ?’, हे मला कळले. ‘प्रवासातील वेळ वाया जाऊ नये’, या उद्देशाने सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू गाडीत संत भक्तराज महाराज यांची भजने, भावगीते, शास्त्रीय संगीत, तसेच भागवत कथा इत्यादी लावण्यास सांगतात. हे सर्व ऐकतांना त्या आम्हाला गाण्यातील शब्दांचा किंवा आम्ही ऐकत असलेल्या कथांचा आध्यात्मिक स्तरावरील अर्थही समजावून सांगतात. त्यामुळे ऐकलेल्या गाण्यांचा अभ्यास होऊन पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात.
३ इ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी
भारतीय संगीताची वैशिष्ट्ये सांगून त्याविषयी ज्ञान देणे
गाणी ऐकतांना सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू ते गाणे आणि त्याचे संगीत यांविषयी बरीच सूत्रे सांगतात. ‘गाण्यातील शब्दांचा अर्थ काय आहे ?’, ‘गाण्यात काही त्रुटी असल्यास त्या कोणत्या आहेत ?’, ‘गायकाचा आवाज ऐकून काय जाणवते ?’, ‘त्याच्या आवाजात अहं आहे कि भाव आहे ?’, ‘गाणे ऐकतांना भावजागृती होते का ?’, हे सर्व सांगून त्या ‘भारतीय संगीताचे वैशिष्ट्य काय आहे ?’, याविषयीही ज्ञान देतात.
३ ई. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सात्त्विक
आणि शास्त्रीय संगीतातून आनंद घेण्यास शिकवणे
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनामुळे मला ‘संगीतातील योग्य आणि अयोग्य ओळखता येऊन त्याची पारख कशी करावी ?’, हे शिकता आले. आजपर्यंत मी केवळ तमोगुणी चित्रपट संगीत आणि कर्णकर्कश पाश्चात्त्य संगीत एवढेच ऐकले असल्यामुळे प्रारंभी मला सात्त्विक असे शास्त्रीय संगीत ऐकण्यास कंटाळवाणे वाटत असे. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी ‘प्रत्येक गोष्टीमधून कसे शिकायचे आणि आनंद कसा घ्यायचा ?’, हे शिकवले. त्यामुळे ‘सध्याचे तमोगुणी सिनेसंगीत किती त्रासदायक आहे ?’, हे लक्षात आले, तसेच ‘संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते ईश्वरप्राप्तीचे साधन आहे’, हे अनुभवता आले. त्यामुळे प्रारंभी कधी न आवडणारी कंटाळवाणी वाटणारी गाणीही मला चांगली वाटू लागली.
४. संगीतातील वाद्यांचे महत्त्व
४ अ. लहानपणापासून पाश्चात्त्य संगीतातील वाद्यांची
आवड असल्याने ती वाद्येच चांगली असल्याचा अपसमज मनात असणे
मला लहानपणापासून पाश्चात्त्य संगीतातील विदेशी वाद्यांची आवड होती. ती वाद्येच चांगली असल्याचा अपसमज माझ्या मनात होता. पूर्वी मला संगीत म्हटले की, गिटार, ड्रमसेट इत्यादी वाद्येच दृष्टीसमोर यायची. तबला, पेटी इत्यादी वाद्यांचा विचारसुद्धा माझ्या मनात कधी येत नव्हता.
४ आ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत
दौर्यांनिमित्त भ्रमण करतांना भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्यांचे महत्त्व लक्षात येणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत होणार्या दौर्यांनिमित्त भ्रमण करतांना भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्यांचे महत्त्व लक्षात येऊ लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्या कृपेमुळे मला संगीताची जाण येेऊ लागली. त्यामुळे माझ्या आवडीतही पालट होऊ लागला आहे. पूर्वी मला येत असलेला भारतीय वाद्यांचा कंटाळा न्यून होऊन आता मला विदेशी वाद्यांचा कंटाळा येऊ लागला आहे. गुरूंच्या कृपेने महान भारतीय संस्कृतीतील संगीतशास्त्राची ओळख होऊन त्याविषयी जवळीक वाटून कृतज्ञता वाटू लागली आहे. माझ्यात हा पालट घडवून मला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल श्रीगुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.
(विदेशी वाद्यांचा परिणाम व्यक्तीच्या देहापुरताच मर्यादित असतो. काही वेळा तर त्यातील उच्चराचा शरीर आणि मन यांवर विपरीत परिणाम झाल्याचेही संशोधनाच्या अंतर्गत आढळून आले आहे, तर भारतीय वाद्ये अगदी पारंपारिक वाद्येही मनुष्याचे मन आणि आत्मा यांवरील रज-तमाचे आवरण काढून त्याला देवतांच्या तत्त्वाचा लाभ करून देतात. ती ऐकतांना मनःशांतीही मिळते आणि साधनामार्गावर अपेक्षित असलेली ध्यानावस्था आणि समाधी-अवस्था प्राप्त होण्यास साहाय्य होते, उदा. वीणावादन, श्रीकृष्णाचे बासरीवादन.’ – संकलक)
५. भारतीय संगीतामुळे होणारे सर्वांगीण लाभ आणि त्याचे महत्त्व
५ अ. संगीत केवळ ‘छंद’ नसून ‘परिपूर्ण उपचार पद्धत’
असल्याने त्याचा शारीरिक स्तरावर व्याधी निवारणासाठी लाभ होणे
हल्ली वातावरण पुष्कळ दूषित झाले आहे. दूषित वातावरणामुळे लोकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाच्या दूषिततेमुळे योग्य औषधोपचारही मिळत नसल्याने उपचारांच्या अभावी लोकांच्या आरोग्याची अजूनच हानी होत आहे. अशा वेळी आपल्याला नैसर्गिक आयुर्वेदिक औषधे आणि त्याच समवेत संगीताद्वारे होणारे उपचारच उपयुक्त असतात. प्रत्यक्षात संगीतामुळे अनेक रोग किंवा आजार बरे होऊ शकतात. (प्रारंभी मला हे ठाऊक नव्हते. आता मला त्याचे महत्त्व कळू लागले आहे.) त्यामुळे संगीताकडे केवळ ‘छंद’ म्हणून न पहाता ‘परिपूर्ण उपचार पद्धत’ म्हणून पाहिल्यास त्याचा खर्या अर्थी लाभ होईल.
(भारतीय संगीताचा व्यक्ती आणि पर्यावरण यांवर होणारा सकारात्मक परिणाम आणि लाभ यांविषयी बरेच संशोधन झाले असून भारतीय संगीताच्या केवळ श्रवणानेही झाडे, फुले, पक्षी इत्यादींवर सकारात्मक पालट होत असल्याचे दिसून आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या संगीतामध्ये शारीरिक आणि मानसिक व्याधी निवारण्याचे सामर्थ्य असल्याचेही आता प्रयोगाअंती मान्य करण्यात आले आहे. अन्य औषधोपचार पद्धतींप्रमाणेच ‘संगीत उपचार पद्धती’लाही रोग निवारणार्थ मान्यता मिळालेली आहे. संगीतातील विविध रागांमुळे व्याधींवर उपाय होत असल्याचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीत विभागात होणार्या वेगवेगळ्या प्रयोगाअंती सिद्ध होत आहे.’ – संकलक)
५ आ. संगीतातून आत्मानंदाची अनुभूती मिळून ईश्वरप्राप्ती होणे
संगीत हे जसे शारीरिक आणि मानसिक व्याधींवर उपयुक्त आहे, तसेच त्याचा आध्यात्मिक स्तरावरील लाभही मोठा आणि महत्त्वाचा आहे. संगीताच्या माध्यमातून आपण ईश्वरप्राप्ती करू शकतो. आपण त्यातील सुरांची अनुभूती घेऊ शकतो आणि आपल्याला सुरांच्या देवतांचे दर्शनही होऊ शकते. संगीत हे मानवाला वैखरीतून मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींमध्ये घेऊन जाणारे आहे. ते त्याला ‘नादातून अनाहत नादा’कडे नेणारे आहे. त्यामुळे संगीत हे आत्मानंदाची अनुभूती करवणारे आणि समाधी अवस्थेची अनुभूती देणारे असावे. ते आनंद देणारे आणि घेणारे असावे.
(‘पाश्चात्त्य संगीत केवळ तनाला झुलवते, तर भारतीय शास्त्रीय संगीत हे त्याही पलीकडे जाऊन मनाला खुलवते आणि आत्म्याला आत्मरंगी डुंबवते. ते पंचमहाभूतांनाही गवसणी घालणारे असल्यामुळे त्यात दिवे लागणे, मेघ वर्षाव होणे इत्यादी तेज तत्त्व आणि आप तत्त्व संबंधित अनुभूती देण्याचे सामर्थ्य आहे. यात केवळ शब्दांची मधुरता नसून हे नादब्रह्म आहे. नादब्रह्मात परब्रह्माकडे घेऊन जाण्याची त्यात क्षमता आहे. त्यामुळेच खरा कलाकार जेव्हा या नादब्रह्माच्या माध्यमातून ईश्वराला आळवतो, तेव्हा केवळ त्याच्याच नव्हे, तर श्रोत्यांच्या अंतर्यामीचा भावभक्तींचा कुंभही स्रवू लागून ते आनंदात न्हाऊन निघतात. ही किमया केवळ अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातच आहे. – संकलक)
५ इ. संगीताचा लाभ होण्यासाठी कलाकार दोष आणि अहं विरहित असणे महत्त्वाचे !
५ इ १. संगीतोपासना करणारा कला-उपासक आदर्श आणि अहं विरहित असल्यास त्याच्यावर संगीतसाधनेने ईश्वरी कृपा होणे
अशा दैवी संगीताची अनुभूती घेण्यासाठी खरा ‘कला-उपासक’च हवा. गाण्याच्या केवळ सरावाने चांगला कलाकार होता येत नाही, तर तो एक चांगले आदर्श जीवन जगणारा आणि स्वभावदोष-अहं विरहित असणारा असावा. ‘माझी कला ही माझी नसून देवाची आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठीच मी या कलेची उपासना करत आहे’, असा भाव ठेवून संगीत-उपासना करणारा असावा. असे संगीत आणि संगीतोपासना ही नक्कीच ईश्वरी कृपा देणारी होईल आणि खर्या अर्थाने या संगीताचा ठेवा भावी पिढ्यांसाठी जतन करणे लाभदायक ठरेल.
५ इ २. अहं अल्प असलेल्या कलाकाराला स्वतःच्या संगीतातून आनंद मिळून तो इतरांनाही अनुभवता येणे, यामुळेच अत्यल्प अहं असणार्या पू. केशव गिंडेकाका यांचे बासरीवादन ऐकतांना आनंदाची अनुभूती येणे
पुष्कळदा कलाकारांमध्ये अहंचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येते. या अहंमुळे अनेकदा कलाकार देवाने त्यांना दिलेल्या कलेचा उपयोग केवळ लोकेषणेची पूर्तता करण्यासाठी करतात. हल्लीच्या काळात तर अहंचे प्रमाण अल्प असणार्या कलाकारांची संख्या अत्यल्प आहे. आमच्या दौर्याच्या कालावधीत अत्यल्प अहं असलेल्या एका कलाकाराची भेट होण्याचा योग जुळून आला. ते कलाकार म्हणजे पुण्याचे प्रसिद्ध बासरीवादक पू. केशव गिंडेकाका. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंचा अंश जाणवत नाही. त्यांच्याकडे असलेल्या कलेचा त्यांना मुळीच कर्तेपणा नाही. ‘त्यांनी या कलेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेतला’, याची अनुभूती त्यांचे बासरीवादन ऐकतांना आम्हाला आली. प्रत्येक कला ही मनुष्याला देवाकडे घेऊन जाण्यासाठीचे एक माध्यम असते. पू. केशव गिंडेकाका हे याचे एक उत्तम उदाहरण आहेत. ‘मी काहीही करत नाही. मी वाजवत असलेली बासरीही माझी नसून श्रीकृष्णाची आहे. सर्व भगवंतच करतो’, असे पू. केशव गिंडेकाका सहज बोलतात. अत्यल्प अहं आणि ‘आपली कला ही देवासाठी आहे’, असा भाव ठेवून ते बासरीवादन करत असल्यामुळे त्यांचे बासरीवादन ऐकतांना आनंदाची अनुभूती येते. कोणतीही कला दोष आणि अहं यांच्या विरहित असेल, तरच त्यातून आनंद घेता येतो आणि समोरच्यांनाही तो अनुभवता येतो, हे यातून लक्षात येते.
५ इ ३. कलाकाराच्या साध्या जीवनशैलीतूनच त्याला ईश्वराचे आशीर्वाद मिळणे
पूर्वीच्या कलाकारांमधे असणारा साधेपणासुद्धा त्यांच्या कलेचे महत्त्व दाखवून देतो. पं. वसंतराव देशपांडे रात्रभर संगीताच्या मैफिली करत आणि दुसर्या दिवशी चाकरी करण्यासाठी कार्यालयात वेळेवर उपस्थित रहात असत. त्यांची राहणीही साधी असायची. ते कार्यालयात जातांना साधी पांढरी विजार आणि कुर्ता घालून जात असत. अशा प्रकारे साध्या आणि सात्त्विक जीवनशैलीतून या कलाकारांनी ईश्वराचे आशीर्वाद मिळवले. ‘स्वतःच्या साधेपणातून आनंदप्राप्ती करणे’, ही कलेची खरी उपासना आहे.
५ ई. भारतीय संगीत सकारात्मकतेकडे घेऊन
जाणारे असून ईश्वराप्रती भाव वाढवणारे असणे
आधुनिक संगीतामध्ये केवळ माया आहे. ते मनाला नकारात्मकतेकडे घेऊन जाते. ते भावनिकता वाढवणारे आहे. याउलट भारतीय संगीतामुळे निराशा येत नाही; कारण त्यामध्येे आध्यात्मिक शक्ती असल्याने आपल्याला त्याचा लाभच होतो. भारतीय संगीतामध्ये विविधता आहे. तरुण पिढीने भावनिकता वाढवणार्या आधुनिक संगीतापेक्षा ईश्वराप्रती भाव वाढवणार्या भारतीय संगीताकडे वळायला हवे.
५ उ. भारतीय संगीतातच देवतांची अनुभूती घेण्याचे सामर्थ्य असणे
पूर्वी आम्हीही रज-तम गुणी कर्णकर्कश आवाजातील संगीताच्या मागे धावत होतो; पण जेव्हा आम्हाला भारतीय संगीत आणि भारतीय वाद्ये यांचे महत्त्व कळून त्यांचा लाभ लक्षात आला, तेव्हा जाणवले, ‘खरोखरच आपल्याकडे एवढी संस्कृतीची संपन्नता असूनसुद्धा आपण दरिद्री असल्यासारखे रहात आहोत.’ प्रसिद्ध बासरीवादक पू. केशव गिंडे यांच्यासारख्या कलाकारांनी बासरीच्या माध्यमातून देवतांची अनुभूती कशी घेतली, हे जेव्हा आम्हाला शिकायला मिळाले, तेव्हा त्यांच्या बासरीवादनातून ‘खरोखरच केवळ भारतीय संगीतातच देवतांची अनुभूती घेण्याचे सामर्थ्य कसे आहे ?’, हे लक्षात आले. यातून भारतीय संगीताचे श्रेष्ठत्व आणि महानता लक्षात येऊन ‘महान अशा आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन का केले पाहिजे ?’, हे मला कळले. आज भारतीय संगीत जतन करण्यासाठी पू. केशव गिंडे यांच्यासारख्या कलाकारांची आपल्याला आवश्यकता आहे.
६. मुलांना सात्त्विक संगीताकडे वळवण्याचे महत्त्व
आजही समाजामध्ये काही लोकांना ‘त्यांच्या मुलांनी संगीत क्षेत्रामध्ये जावे’, असे वाटते; पण यामागे ‘मुलांनी अर्थार्जन करावे आणि प्रसिद्धी मिळवावी’, हाच त्यांचा उद्देश असतो. हल्लीच्या गाण्यांत स्वतःतील रज-तम वाढवण्याव्यतिरिक्त काहीच राहिले नाही. ‘मुलांनी सात्त्विकतेकडे वळावे’, असे विचार पालकांमध्ये सहसा आढळत नाहीत; परंतु सुजाण पालकांनी आपल्या पाल्यांना इतर कोणत्याही गोष्टीकडे वळवण्यापेक्षा त्यांना सात्त्विकतेकडे जाण्याचा मार्ग दाखवणे योग्य आहे. जे सात्त्विक आहे, तेच आपत्काळामध्ये टिकणार आहे. त्यामुळे संगीतक्षेत्रातील कलाकारांनी सात्त्विक; म्हणजेच आपले भारतीय शास्त्रीय संगीताकडे आणि तबला, सतार, बासरी अशी पारंपरिक भारतीय सात्त्विक वाद्ये वाजवण्याकडे वळले पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिल्यास मुलांचे भविष्यही निश्चितच उजळेल आणि त्यांच्या जीवनाचेही सार्थक होईल.’
– श्री. स्नेहल राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(‘साधनेत प्रगती झाल्याने सत्त्वगुण वाढून व्यक्तीच्या आवडीनिवडींमध्येही पालट कसे होतात’, हे श्री. स्नेहल राऊत यांच्या लेखातून शिकायला मिळते. बहिर्मुखता वाढवणार्या पाश्चात्त्य संगीताकडून अंतर्मुखता वाढवणार्या भारतीय शास्त्रीय संगीताकडे झालेला त्यांच्या संगीतविषयक आवडीचा प्रवास त्यांची साधनेत प्रगती होत असल्याचे दिशादर्शक आहे.’ – संकलक)
सध्याचे (आधुनिक) संगीत आणि (पूर्वीचे)
शास्त्रीय भारतीय संगीत यांमध्ये जाणवलेला भेद
हल्लीची गाणी अन् संगीत यांचे पूर्वीची गाणी अन् संगीत यांच्याशी तुलना केल्यावर पुढील गोष्टी माझ्या लक्षात आल्या.
अ. शास्त्रीय संगीतातील अर्थपूर्णता आणि आताच्या गाण्यातील अर्थहीनता
१. सध्या प्रचलित असलेले पाश्चात्त्य संगीत आणि प्रसिद्ध असलेली सिनेमातील गाणी ऐकतांना मला त्यांतील शब्द किंवा अर्थ या गोष्टी ठाऊक नव्हत्या. आतापर्यंत मी तमोगुणी गाणीच अधिक ऐकली होती. ‘ही गाणी अर्थहीन असून ती ऐकणार्याला मायेकडे घेऊन जाणारी आहेत’, असे मला जाणवले.
२. आता मला ‘खरे संगीत, त्यातील गाण्याचा सुंदर अर्थ आणि त्याचे आपल्या जीवनामध्ये असलेल्या महत्त्वाचे स्थान हे शिकायला मिळाले. ही गाणी ऐकतांना ती अर्थासहित ऐकत असल्यामुळे त्याविषयी मनात आपुलकी निर्माण होऊ लागली आणि ती ऐकण्याचा कंटाळा येणेही थांबले.
आ. संगीताचा परिणाम
१. हल्लीचे संगीत ऐकतांना मनात मायेच्या विचारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आनंद मिळणे, तर दूरच; उलट आपल्यावर मायेचे आवरण येऊन मन सुख-दुःखाच्या भोवर्यात अडकून रहाते.
२. याउलट पूर्वीची गाणी आणि संगीत ऐकले की, त्यातून ईश्वराप्रतीचा भाव जागृत होऊन मन आनंदी होते. पूर्वीची गाणी आपल्याला जीवनातील खरा अर्थ सांगणारी होती. ‘आपले जीवन कसे आहे ? ते कसे आदर्श असले पाहिजे ? आपल्या जीवनात भगवंताचे महत्त्व किती आहे ?’, हे सर्व पूर्वीच्या संगीतात मांडले गेले आहे.
इ. कलाकारांचे सामर्थ्य
१. पूर्वीच्या कलाकारांनी संगीताला ‘साधना’ आणि ‘ईश्वरप्राप्तीचे माध्यम’ म्हणून अंगीकारले होते. त्यामुळे त्यांनी संगीत साधनेच्या बळावर दिवे पेटवले आणि पाऊस पाडला.
२. अशा गोष्टी आजच्या लोकांना स्वप्नामध्येही करणे अशक्य आहे. कुठे ‘आराधना’ म्हणून संगीतोपासना करणारे त्या काळचे कलाकार आणि कुठे आधुनिकतेच्या नावाखाली आदर्श गोष्टींचा नाश करणारे आताचे कलाकार !
ई. कलाकारांतील अहं
१. हल्लीच्या काळात अहंचे प्रमाण अल्प असणार्या कलाकारांची संख्या अत्यल्प आहे. अनेकदा सध्याच्या कलाकारांमध्ये अहंचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येते. अहंमुळे हे कलाकार त्यांना देवाने दिलेल्या कलेचा उपयोग केवळ लोकेषणेची पूर्तता करण्यासाठी करतात.
२. भारतीय शास्त्रीय संगीत शिकतांना कलाकार गुरूंच्या चरणाशी विनम्र राहून ही कला शिकत असल्याने त्या कलाकारांमध्ये विनम्रता आढळते.
उ. लोकेषणा
१. लोकेषणा आणि धनार्जन करणे, हाच हल्लीच्या संगीताचा मुख्य उद्देश असतो.
२. भारतीय शास्त्रीय संगीत गाणार्या कलाकारांकडून या कलेकडे ‘ईश्वरप्राप्तीचे साधन’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे हे संगीत ईश्वरचरणी अर्पण केले जाते.
ऊ. संगीतामुळे होणारे लाभ आणि हानी
१. सध्या आधुनिकतेच्या वेडामुळे ‘रिमिक्स’ गाणी तरुण पिढीचे श्रद्धास्थान झाले आहे. हल्ली तर गावोगावी ही वेडगळ प्रथा वाढत चालली आहे. या गाण्यांमुळे तरुण पिढी वहावत चालली आहे. ती संस्कारहीन होत आहे. या आधुनिकतेच्या वेडामुळे आपण आपल्या परंपरा, संस्कृती आणि महान भारतीय वाद्ये यांना विसरत चाललो आहोत.
२. याउलट आपल्या महान भारतीय संगीतामुळे कित्येकांच्या जीवनात सकारात्मक पालट झाले आहेत. यावर पुष्कळ संशोधन झाले आहे आणि त्यासंबंधी अनेक उदाहरणे सर्वांसमोर आहेत. ईश्वरीय ज्ञानाचे भांडार आपल्याकडे असूनसुद्धा आपण मात्र नेहमीप्रमाणे दुसर्यांकडून उसने ज्ञान घेऊन जगण्यातच धन्यता मानत आहोत.
शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या
‘वन्दे मातरम्’ मुळे आलेली उच्च आध्यात्मिक अनुभूती !
‘वन्दे मातरम्’ या गीताविषयी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ म्हणतात, ‘‘वन्देे मातरम्’ची पहिली दोन कडवी झाली की, लगेच राष्ट्रदेवतेचे दर्शन होते. आधी राष्ट्रदेवतेचे उजवे अंग, म्हणजे उजवी सूर्यनाडी जागृत होऊन राष्ट्र सिद्ध होते. नंतर डावे अंग, म्हणजे चंद्रनाडी सिद्ध होते. देवतेचे पायापासून वरपर्यंत दर्शन होऊ लागते. पहिल्यांदा शस्त्राची प्रभावळ आणि नंतर आतील शस्त्र दिसते, म्हणजेच ‘निर्गुणातून निर्मिती होत आहे’, असे दिसते.’’