सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आल्यावर त्यांचे त्याकडे पहाण्याचे दृष्टीकोन !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. गुरुशक्ति-प्रदान सोहळा झाल्यानंतर गुरूंच्या
महान दैवी कार्यासाठी निवड केल्याविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त होणे

‘फेब्रुवारी २०१९ मध्ये गुरुशक्ति-प्रदान सोहळा झाल्यानंतर ‘सनातन संस्थेचे साधक आणि समाजातील व्यक्ती यांचा आमच्याकडे (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे) पहाण्याचा दृष्टीकोन आपोआपच उंचावला गेला आहे’, असे त्यांना भेटून अन् त्यांचे वागणे-बोलणे पाहून आम्हाला अनुभवण्यास मिळाले. साधकांचा आमच्याप्रती असलेला भाव नेहमीच चांगला होता; परंतु आता ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून त्यांचे आमच्याकडे पहाणे, ही आमच्यासाठी गुरूंची कृपाच आहे. गुरूंच्या या महान दैवी कार्यासाठी त्यांनी आमची निवड करावी; म्हणून आम्ही दोघीही (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञ आहोत.

 

२. कुठेही न थांबता आनंद घेत पुढे पुढे जायचे आहे !

मला पुष्कळ साधक आणि समाजातील परिचित व्यक्ती विचारतात, ‘गुरुशक्ति-प्रदान सोहळ्यानंतर तुम्हाला कसे वाटते ? त्या वेळी तुमची स्थिती कशी होती ? गुरूंनी तुमच्यावर एवढी मोठी धुरा दिली आहे, तर कसे वाटते ?’ हे ऐकल्यावर देव आपल्याला यातून शिकवत असल्याचे आमच्या लक्षात आले. या सोहळ्याच्या वेळी आमची स्थिती निर्विचार होती आणि आताही तशीच आहे. हे जे काही घडले आहे, तो एक अध्यात्मातील टप्पा होता आणि यातील चैतन्य आम्हाला अनुभवायचे आहे अन् त्यातून शिकायचे आहे. त्यामुळे आमचे याकडे साक्षीभावानेच पहाणे होते. मी संत झाले, तेव्हाही मला एका साधकाने असेच प्रश्‍न विचारले होते आणि मी त्यांना ‘हा अध्यात्माचा प्रवास आहे’, असे सांगितले होते. गाडी जशी एक स्थानक आले की, ती तेथेच थांबत नाही, तर पुढच्या स्थानकाला जाते, तसेच अध्यात्मात आहे. ‘संत – गुरु – सद्गुरु’ ही सर्व या अध्यात्माच्या प्रवासातील स्थानके आहेत. आपले मुख्य ध्येय हे ‘मोक्षप्राप्ती’ आहे आणि ते आपल्या गाडीचे अंतिम ध्येय आहे; म्हणून आपल्याला तोपर्यंत थांबायचे नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पदामध्ये अडकायचे नाही, तर ‘नित्य-नूतन-सनातन’ याचा आनंद घेत पुढे पुढे जायचे आहे.

 

३. ‘आपल्याला अध्यात्मशास्त्र जगासमोर मांडून त्याचे महत्त्व समाजाला
पटवून समाजाला साधनेकडे वळवायचे आहे’, हाच आपला मुख्य उद्देश आहे !

गुरुशक्ति-प्रदान सोहळ्यामध्ये आपण विविध प्रसंगी आध्यात्मिक संशोधन केले. त्यामुळे आपण अध्यात्मशास्त्र जगासमोर मांडून त्याचे महत्त्व लोकांना सांगत आहोत. ‘महर्षि आपल्याला काय सांगतात ? प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारणभाव काय आहे ?’, हे सर्व आपल्याला शिकायचे आहे. ‘आपल्याला अध्यात्मशास्त्र जगासमोर मांडून त्याचे महत्त्व समाजाला पटवून समाजाला साधनेकडे वळवायचे आहे’, हाच आपला मुख्य उद्देश आहे.

 

४. शिष्यभावात असणे

आम्हाला गुरूंनी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ केले असले, तरी त्यांनी आम्हाला हेही शिकवले आहे की, सतत शिष्यभावात रहा ! ते स्वतः ‘परात्पर गुरु’पदी असले, तरी ते सतत शिष्यभावातच असतात. त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी साक्षीभावानेच पहात आहोत.

 

५. आता आमची आवड-निवड, स्वतःचा आनंद, असे काही उरले नसून जे आहे,
ते सर्व साधकांसाठी आहे आणि आम्ही त्याकडे ‘मायेतील ब्रह्म’ या भावानेच पहातो !

आम्हाला कोणी यज्ञविधींसाठी त्यांची साडी किंवा दागिने आवडीने परिधान करायला देतात. कोणी गजरा आणून देतात, तर कोणी आम्हाला पूजेसाठी सजवतात. भक्त जसे मंदिरातील देवीला विविध प्रकारे नटवतात वा सजवतात; पण देवीमात्र तशीच उभी असते. ती भक्तांच्या आनंदासाठी सर्व करवून घेत असते, तसेच आमचेही आहे. आता आमची आवड-निवड, स्वतःचा आनंद, असे काही उरले नाही. जे आहे, ते सर्व साधकांसाठी आहे. मायेतील हे सर्व आमच्या समवेत घडत असले, तरी आम्ही त्या सर्वांकडे साक्षीभावानेच पहात असतो आणि हेच आमचे ‘मायेतील ब्रह्म’ पहाणे होय !’

– श्री. दिवाकर आगावणे

Leave a Comment