सर्वांत प्रथम सत्यनारायणाची कथा श्रीमहाविष्णूने नारद महर्षींना सांगितली होती. द्वापरयुगाच्या शेवटी शौनकादी सर्व ॠषि-मुनी ‘येणार्या भयावह कलियुगात मनुष्याने तरण्यासाठी कोणते व्रत करायला हवे ?’, असे सूतऋषींना विचारतात. त्या वेळी सूतऋषि ‘नैमिषारण्य’ क्षेत्रात ‘सत्यनारायणाचे व्रत’ सांगून त्याची कथाही सांगतात. अशा पवित्र नैमिषारण्य क्षेत्राचे माहात्म्य पुढे दिले आहे.
१. स्थान आणि महत्त्व
नैमिषारण्य उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) पासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यात आहे. ते गंगानदीची उपनदी असलेल्या गोमती नदीच्या डाव्या तिरावर आहे. नैमिषारण्याला ‘नीमसार’ किंवा ‘नैमिषा’ असेही म्हटले जाते. नैमिषारण्य हे सत्ययुगातील तीर्थक्षेत्र असून पृथ्वीतलावरील सर्वांत पहिले तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे नित्य ३३ कोटी देवता आणि ८८ सहस्र ऋषि-मुनी यांचा वास असतो. त्यामुळे हे सर्वांत पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी केलेले प्रत्येक कर्म फलद्रूप होतेे.
२. ‘नैमिषारण्य’ नाव पडण्याचा इतिहास
नैमिषारण्याला ‘नेमिषारण्य’, असेही म्हटले जाते. ‘नेमी’ म्हणजे चक्राची कड. या ठिकाणी ब्रह्माचे ‘मनोमय’चक्र आदळले होते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे चक्र पडले, ते ठिकाण म्हणजे ‘नेमिषारण्य !’ ज्या ठिकाणी चक्राची कड भूमीवर आदळली, ते ठिकाण ‘चक्रतीर्थ (चक्राच्या आकारातील तीर्थक्षेत्र)’ या नावाने आणि त्याच्या भोवतालचे अरण्य ‘नैमिषारण्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
२ अ. नैमिषारण्य क्षेत्रात झालेली चक्रतीर्थाची निर्मिती
विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर सर्व ऋषिमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ‘सर्व पापांपासून मुक्त होणे, अखंड साधना करणे, ज्ञान प्राप्त करणे यांसाठी, तसेच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणास्तव आध्यात्मिक विधी करण्यास योग्य ठिकाण कोणते आहे ?’, ते सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने ‘मी ‘मनोमय’ चक्र पाठवतो. ते तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. ज्या ठिकाणी ते पडेल, ते ठिकाण तुमच्या पवित्र जागेचे केंद्रबिंदू असेल’, असे सांगून ते चक्र सोडले. सर्व ऋषिमुनी त्या चक्रामागून गेले. संपूर्ण विश्वाच्या भोवती अनेक प्रदक्षिणा घातल्यानंतर शेवटी ते चक्र एका निर्जन स्थळी थांबले.
ते शक्तीशाली चक्र विजेच्या गतीने पृथ्वीवर आदळल्यामुळे पाताळ लोक दुभंगले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी उसळू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने ललितादेवीला ते मनोमयचक्र थांबवण्यास सांगितले. ललितादेवीने तिच्या दिव्य शक्तीने ते चक्र थांबवले आणि ती त्या ठिकाणी लिंगधारिणीच्या रूपात स्थिरावली. तेव्हापासून ब्रह्मदेवाचे ‘मनोमय’चक्र पडलेले ठिकाण आणि त्याच्या सभोवतालचे अरण्य ‘नेमिषारण्य’ किंवा ‘नैमिषारण्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्या ठिकाणी ते चक्र पृथ्वीवर आदळले आणि तेथून पाणी उसळले, तेच ‘चक्रतीर्थ’ बनले. हे स्थान ‘विश्वाचे केंद्र आहे’, असे म्हटले जाते. नंतर सर्व युगांतील सर्व संत आणि ऋषिमुनी यांच्या ध्यानधारणेचे ते केंद्रस्थान बनले.
३. ‘नैमिषारण्या’चे स्थानमाहात्म्य
अ. नैमिषारण्यात व्यास मुनींनी ४ वेद, ६ शास्त्रे आणि १८ पुराणे लिहिली. तेथेच त्यांनी त्यांचे प्रिय शिष्य महर्षि जैमिनी यांना सामवेद शिकवला.
आ. श्री सत्यनारायण व्रताचा आरंभ नैमिषारण्यातच झाला.
इ. हे एक शक्तीपीठ असून येथे नैमिषारण्याची प्रमुख देवता म्हणून श्री ललितादेवीची पूजा केली जाते. सोमवारी येणारी अमावास्या किंवा पौर्णिमा या तिथीला चक्रतीर्थात स्नान करून श्री ललितादेवीला अर्पण दिल्यास (किंवा हवन केल्यास) व्यक्तीकडून आयुष्यभर घडलेल्या सर्व पापकर्मांपासून तिला मुक्ती मिळते.’