‘सनातन संस्थेमधील अनेक साधक, बालसाधक आणि युवा साधक पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहाण्यास येतात, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यावर केलेल्या निरपेक्ष प्रेमामुळेच ! त्यांनी साधकांवर निरपेक्ष प्रेम केले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे प्राण्यांवरही निरपेक्ष प्रेम आहे. अशी प्रीती केवळ भगवंतच करू शकतो. त्यांचे प्राण्यांवरील निरपेक्ष प्रेम दर्शवणारी काही उदाहरणे पुढे दिली आहेत . . .
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची फुलपाखरावरील प्रीती !
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आलेले फुलपाखरू ३ दिवस एकाच जागेवर बसून रहाणे
एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्तप्रक्षालन पात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी एक फुलपाखरू येऊन बसले होते. ते फुलपाखरू ३ दिवस तसेच बसून होते. चौथ्या दिवशी तेे खोलीतून बाहेर आले आणि परात्पर गुरु डॉक्टर ज्या खोलीत ग्रंथ लिखाणाची सेवा करण्यासाठी बसतात, त्या खोलीत त्यांच्या आसंदीखाली येऊन बसले. ते फुलपाखरू परात्पर गुरु डॉक्टरांनी मला दाखवले.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चमच्यात मध-पाणी घालून तो फुलपाखराजवळ
ठेवणे आणि ते पाहून कुत्र्याच्या मागे तूप घेऊन पळणार्या संत एकनाथ महाराजांची आठवण होणे
थोड्या वेळाने त्यांनी एका चमच्यामध्ये मध-पाणी भरून तो चमचा त्या फुलपाखराच्या समोर आणून ठेवला आणि ते मला म्हणाले, ‘‘बिचार्या फुलपाखराने ३ दिवस काही खाल्ले नाही.’’ हे वाक्य ऐकल्यानंतर माझा भाव जागृत झाला. थोड्या वेळाने ते फुलपाखरू उडून जवळच्या पटलाखाली जाऊन बसले. तेव्हा ‘कदाचित् त्याला फार उडता येत नसावे’, असा विचार माझ्या मनात आला. थोड्या वेळाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ते फुलपाखरू जेथे जाऊन बसले, त्या ठिकाणी पुन्हा मध-पाण्याचा चमचा आणून ठेवला. त्या वेळी मला कुत्र्याच्या मागे तूप घेऊन पळणार्या संत एकनाथ महाराजांची आठवण झाली.
१ इ. फुलपाखराने परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या आसंदीखाली प्राण सोडणे आणि
‘गुरुचरणांशी प्राण सोडण्यासाठी फुलपाखरू त्यांच्या खोलीत आले असावे’, असे वाटून भरून येणे
दुपारपर्यंत फुलपाखराने काही खाल्ले नाही. दुपारनंतर त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या आसंदीखाली प्राण सोडला. त्या वेळी ‘त्या फुलपाखराने देवाच्या चरणांशी प्राण सोडला आणि कदाचित् त्यासाठीच ते त्यांच्या खोलीत आले असावे,’ असे वाटून मला भरून आले. त्या वेळी ‘आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी ठेव’, अशी प्रार्थना करून मी परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन पाणी घालत असलेल्या तुळशीच्या मुळाशी ते फुलपाखरू ठेवले अन् त्याला नमस्कार केला.
१ ई. फुलपाखराची झोप पूर्ण व्हावी, याची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !
‘एकदा मी गुरुदेवांच्या खोलीतील सज्जात (बाल्कनीत) गेल्यावर माझे लक्ष तिथे बसलेल्या फुलपाखराकडे गेले. मी त्याला हात लावायला गेले आणि गुरुदेव म्हणाले, ‘‘त्याला हात लावू नको. ते झोपले आहे. त्याची झोप पूर्ण होऊ दे.’’ मी दोन घंट्यांनंतर फुलपाखराजवळ जाऊन त्याला हात लावला, तर त्याला उडता येत नव्हते. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. मी परम पूज्य गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘फुलपाखराला खिडकीत ठेवू, म्हणजे ऊन लागून त्याला बरे वाटेल. थंडीमुळे त्याला उडता येत नसेल !’’ (त्या वेळी थंडीचे दिवस होते.) मी फुलपाखराला खिडकीत ठेवले. थोड्या वेळाने मी त्याला हलवून पाहिले, तर त्याने पंख हलवले. हे मी परम पूज्यांना सांगितल्यावर त्यांनी त्याला आनंदाने हातावर घेतले आणि म्हणाले, ‘‘थोडे पाणी आणून दे.’’ पाणी आणून दिल्यावर त्यांनी थोडे पाणी फुलपाखराला पाजले.’
– सौ. वर्धिनी गोरल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. आश्रमाच्या समोरील रस्त्यावरून जाणार्या वासराचे हंबरणे ऐकून
ते हरवले असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात येणे, वासराचे
हंबरणे बंद झाल्यावर ‘त्याला आई भेटली’, असे वाटते’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी
सांगणे आणि त्यांच्यातील प्रीतीमुळेच त्यांना सगळ्यांची काळजी असल्याचे लक्षात येणे
आश्रमाच्या समोरील रस्त्यावरून अनेक गायी, म्हशी आणि वासरे जातात. जणू गोकुळच आहे ते ! एके दिवशी एका गायीचे वासरू जोरजोरात हंबरत होते. आमचे त्याच्या हंबरण्याकडे लक्षही नव्हते; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी ते ऐकले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘अरेरे ! ‘त्या वासराची आई त्याला मिळत नाही’, असे वाटते. बिचारे वासरू हरवले आहे.’’ त्यांनी तसे म्हटल्यानंतर वासराचा आवाज रडवेला असल्याचे आम्हाला जाणवले. त्यानंतर आम्ही आमच्या सेवेवर लक्ष केंद्रित करून सेवा चालू केली. थोड्या वेळाने त्याचा आवाज येणे बंद झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी पुन्हा त्या वासराची आठवण काढली. ते म्हणाले, ‘‘त्या वासराला त्याची आई भेटली’, असे वाटते.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या या वाक्याने ‘आपल्यातील प्रीती, संवेदनशीलता किती अल्प आहे !’, याची मला जाणीव झाली आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले देवच असल्यामुळे अन् त्यांच्यामध्ये असणार्या निरपेक्ष प्रीतीमुळेच त्यांना सर्वांची काळजी असते’, हे माझ्या लक्षात आले.
३. साधिका आश्रमातून घरी जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
तिला तिच्या घरी असलेल्या कुत्र्यासाठीही खाऊ घेऊन जायला सांगणे
आश्रमातील एका साधिकेच्या घरी कुत्रा आहे. ‘साधिका काही कारणास्तव घरी जाणार’, असे परात्पर गुरु डॉक्टरांना कळल्यानंतर त्यांनी त्या साधिकेला सांगितले, ‘‘जातांना घरच्यांच्या समवेत कुत्र्यासाठीही खाऊ घेऊन जा.’’ ‘कोणता जीव पृथ्वीवर कोणत्या कारणासाठी आला आहे ?’, हे आपल्याला ठाऊक नसते; परंतु देवाला सर्व ठाऊक असते आणि तो प्रत्येक जिवाची काळजी घेतो.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेमळ स्पर्शाने अश्वाच्या डोळ्यांत पाणी येणे
प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांनी केलेल्या अश्वमेध यज्ञाचा संकल्पविधी रामनाथी आश्रमात झाला. संपूर्ण एक वर्ष चालणार्या या यज्ञासाठी त्यांनी यज्ञीय अश्व प्रथम रामनाथी आश्रमात आणला होता. कालांतराने हा अश्व पुढील विधीसाठी बार्शी (जि. सोलापूर) येथे नेण्यात आला. एक वर्ष झाल्यानंतर ‘हा अश्व अन्य एका साधकाला देऊया’, असे ठरले. ‘तो अश्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांंना भेटवून मग साधकाला देऊया’, असा विचार करून प.पू. नाना काळेगुरुजी यांनी तो रामनाथी आश्रमात पाठवला. त्याला परत नेण्याच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले त्याला भेटायला दारापाशी गेले. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या वेळी त्या अश्वाच्या डोळ्यांतून पाणी आले.
या आणि अशा अनेक प्रसंगांतून परात्पर गुरु डॉक्टर यांची प्राणी, पक्षी, तसेच प्रत्येक जीवमात्र यांवरील प्रीती पाहून भावजागृती होते. अशा प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५. माशाच्या उलट दिशेने पोहण्याची मीमांसा करणे आणि त्यावर उपचार करण्यास सांगणे
‘रामनाथी आश्रमातील कमळाच्या कुंडामध्ये घालण्यासाठी आणलेला मासा पाहून परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला. एखाद्या छोट्या बाळाचे जसे कौतुक वाटते, त्याप्रमाणे त्यांना त्या माशाचे कौतुक वाटत होते. त्या वेळी मासा सरळ दिशेने न पोहता उलट दिशेने पोहत होता. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘मासा उलट दिशेने पोहत आहे’, हे आमच्या लक्षात आणून दिले आणि रामनाथी आश्रमातील साधक डॉ. अजय जोशी यांना मासा आणि त्याचे पोहणे दाखवण्यास सांगितले. डॉ. अजय जोशी यांना मासा दाखवल्यावर त्यांनी माशाच्या कल्ल्यांना ‘फंगस्’ (एक प्रकारची बुरशी) झाले आहे’, असे सांगितले. त्यामुळे तो पुढच्या दिशेने न पोहता मागे मागे जात होता. त्यांनी माशाच्या कल्ल्यांवरील ‘फंगस्’ काढले. त्यानंतर तो पूर्ववत पोहू लागला. गुरुदेवांच्या कृपेमुळे माशाच्या अडचणीचे उत्तर मिळाले आणि उपायही सापडला.
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१९)
६. कापडी छताच्या कोपर्यातून मांजर खाली
पडलेले पाहून त्याला लागले नाही ना, याची विचारपूस करणे
‘पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर दौर्यावर असतांना साधकांच्या घरी ज्या खोलीत निवासाला होते, त्या खोलीला कापडी छत लावले होते. त्या छतातील एका कोपर्यातून मांजर खाली पडले. हे पाहून प.पू. गुरुमाऊलींना फार दु:ख झाले. ‘त्याला काही लागले तर नाही ना ?’ हे त्यांनी आम्हाला बघायला सांगितले. ‘प.पू. डॉक्टर प्राणीमात्रांवरसुद्धा इतके प्रेम करतात, तर ते साधकांवर किती प्रेम करत असतील ?’, हे या प्रसंगातून मला शिकायला मिळाले.’
– श्री. प्रभाकर सुपल, रत्नागिरी. (२६.६.२०१६)
७. किड्यांनाही वेदना होऊ नयेत, याचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !
‘एकदा मी एका किड्याला मारतांना पटकन मारत नव्हते. तेव्हा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘किड्याला पटकन मारायचे, म्हणजे तो वेदनेने अधिक तळमळत नाही.’’
– कु. ललिता वाघ (आताच्या सौ. ललिता कदम), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या आणि अशा अनेक प्रसंगांतून परात्पर गुरु डॉक्टर यांची प्राणी, पक्षी, तसेच प्रत्येक जीवमात्र यांवरील प्रीती पाहून भावजागृती होते. अशा प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता !