फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशपरत्वे सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. या सणाचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, याविषयीची माहिती या लेखातून करून घेणार आहोत.
होळी
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे; म्हणून हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि हे अपप्रकार रोखून धर्मकर्तव्य बजावा !
१. तिथी
‘देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या ५ – ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
होळी चलच्चित्रपट (Holi Videos : 2)
२. समानार्थी शब्द
‘उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.’
३. इतिहास
अ. `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना.
‘नगरातील मुलांना त्रास देणार्या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी नारद मुनि सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, ‘नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर –
सञ्चयं शुष्ककाष्ठानाम् उपलानां च कारयेत् ।
तत्राग्निं विधिवत् बुद्ध्वा रक्षोघ्नैः मन्त्रविस्तरैः ॥
ततः किलकिलाशब्दैः तालशब्दैः मनोरमैः ।
तम् अग्निं त्रिः परिक्रम्य गायन्तु च हसन्तु च ॥
जल्पन्तु स्वेच्छया लोकाः निःशङ्का यस्य यन्मनः ।
तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता ॥
अदृष्टिघातैः डिम्भानां राक्षसी क्षयम् एष्यति ।
सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशान्तिदः ॥
क्रियतेऽस्यां द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता । – भविष्योत्तरपुराण
अर्थ : वाळलेली लाकडे आणि गोवर्या यांचा ढीग रचावा. तेथे रक्षोघ्न (राक्षसांना नष्ट करणार्या) मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द करत (किलकिलाशब्दैः), मनोरम अशा टाळ्या वाजवत (तालशब्दैः मनोरमैः) अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा आनंदी शब्दांनी आणि (रक्षोघ्न) होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल. हे राजा ! फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे.
या श्लोकांत अग्नीला प्रदक्षिणा घालतांना कुठेही शिवीगाळ करावी, असा उल्लेख नाही. याउलट ‘किलकिल’, ‘मनोरम तालशब्द’ असे शब्द आले आहेत. यांचे अर्थ वर दिले आहेत.
आ. ‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.
इ. एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.
ई. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.’
उ. ‘या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी विष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ‘यर्व्य’ ऋषींनी प्रार्थना केली. भगवान विष्णूने धरतीवर पाय ठेवताक्षणीच स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली.’ (स्वर्गातून झालेली ती प्रथम पुष्पवृष्टी होय. याच कारणास्तव उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात.)
– ब्रह्मतत्त्व
ऊ. ‘पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाच्या वेळी यज्ञात प्रगटलेल्या देवतेच्या शक्तीची मारक शक्ती आणि सात्त्विकता सहन न झाल्याने वातावरणातील वाईट शक्ती प्रचंड गतीने आणि सैरभैर सुसाट धावत सुटल्या. त्यामुळे वातावरणात ठिकठिकाणी दाब निर्माण झाला. त्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या सूक्ष्म पोकळ्या भरून निघतांना वाईट शक्तींनी एकमेकांवर आदळतांना हुताशनी निनाद केला; म्हणून होळी पौर्णिमेला ‘हुताशनी पौर्णिमा’ असेही म्हणतात.’
– ‘दैनिक लोकमत’, १९.३.२०११
ए. ‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्या खेळतात.’
४. महत्त्व
४ अ. विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण
‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’
– प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
४ आ. ब्रह्मांडातील पंचतत्त्वे आणि मनुष्याच्या देहामधील
पंचतत्त्वांच्या मात्रा समान असल्याने जिवाला देवतांच्या अनुभूती येणे
‘होळीच्या दिवशी यज्ञ केल्याने ब्रह्मांडातील देवतातत्त्वांच्या लहरी कार्यरत होतात आणि यज्ञस्थळी आकृष्ट होतात. मंत्रांद्वारे त्यांना आवाहन केले जाते, म्हणजेच कार्यरत केले जाते. यज्ञात अर्पण केलेल्या हविर्द्रव्यांमुळे अग्नी प्रदीप्त होतो आणि ज्वाळांमुळे उत्पन्न झालेल्या वायूने तेथील वायूमंडल शुद्ध आणि सात्त्विक बनते, म्हणजेच वातावरण देवतांचे तत्त्व आकर्षित करण्यायोग्य होते. पंचतत्त्वांच्या साहाय्याने देवतातत्त्वांच्या लहरी वायूमंडलाच्या कक्षेत प्रवेश करतात. यज्ञ करण्याचा विचार आणि प्रत्यक्ष कृती यांमुळे जिवाचे शरीर अन् मन शुद्ध आणि सात्त्विक होते. त्यामुळे वायूमंडळाच्या कक्षेत आलेल्या देवतातत्त्वांच्या लहरींना ग्रहण करण्याची क्षमता जिवामध्ये अधिक निर्माण होते. परिणामी जीव आवश्यकतेनुसार देवतातत्त्व ग्रहण करतो. यावरून स्पष्ट होते की, ब्रह्मांडात असलेली पंचतत्त्वे आणि मनुष्याच्या देहात असलेल्या पंचतत्त्वांच्या मात्रा समान असतात. त्यामुळे जिवाला देवतांच्या अनुभूती येतात.’ – सौ. कणगलेकर यांच्या माध्यमातून, फाल्गुन शुद्ध षष्ठी, कलियुग वर्ष ५११० (२.३.२००९) दुपारी २.४५
४ इ. होळी आपले दोष, व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.
४ ई. होळी सद्गुण ग्रहण करण्याची /अंगिकारण्याची संधी आहे.
४ उ. होळी संजीवनी आहे, जी साधकांची साधना पुनर्जीवित करते.
५. उत्सव साजरा करण्याची पद्धत
देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते. होळीची रचना शास्त्रीय पद्धतीने नेमकी कशी करावी, याविषयीची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
अ. होळीची पूजा अशी करावी…
प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभ
अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.
निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदय
अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.
अ १. होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र
अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।
अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ
अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.
आ. होळीच्या दुसर्या दिवशी करायच्या धार्मिक कृती
प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।
कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥
वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ
अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.
(काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी येणार्या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)
इ. होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र
वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ
अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात. त्यामुळे हे देवी, तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो.
ई. होळीच्या दिवशीची ‘होलिका’ ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !
भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होती. होळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसिणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात; म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात, असे वरील श्लोकांत आलेच आहे.
उ. आयुर्वेदानुसार होळीचे लाभ
थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०१९)
६. होळीच्या दिवशी बोंब मारतांना शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे !
‘होळीच्या दिवशी अश्लील शब्द उच्चारणे, शिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातात. याला धर्मशास्त्रात आधार नाही. मुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाही. असे असतांना ‘शिवीगाळ करणे’ हा हिंदूंच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल ? ‘स्मृतिकौस्तुभ’ नावाच्या धर्मग्रंथात फाल्गुन मासाच्या कृत्यांमध्ये होलिकोत्सवाविषयी पुढील माहिती आहे. हे श्लोक भविष्योत्तर पुराणातील आहेत. ‘भविष्योत्तर पुराण’ म्हणजे ‘भविष्य पुराणातील उत्तर पर्व’. याला स्वतंत्र पुराण म्हणून मान्यता आहे. बोंब मारण्यामागील नेमके शास्त्र, त्यापासून होणारा लाभ आणि विकृती केल्यास होणारी हानी यांविषयीचे विवेचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा !
७. होळी पारंपारिक धार्मिक प्रथेनुसारच साजरी करा !
सध्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) यासारख्याधर्मद्रोही संघटना आणि निधर्मी राजकारणी वृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कचर्याची होळी करा’, असा चुकीचा संदेश समाजाला देतात. तसेच होळीला अर्पण केल्या जाणार्या पोळ्या गरिबांना वाटण्याचे आवाहन करतांना दिसतात. या दोन्ही गोष्टी शास्त्रविसंगत असून यातून कोणताही लाभ न होता उलट हानीच होते. हिंदूंना सणांचा आध्यात्मिक लाभ होऊ नये, यासाठी धर्मद्रोह्यांनी केलेली ही योजना आहे, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.
अ. होळी व्यतिरिक्त अन्य वेळी केली जाणारी वृक्षतोड न दिसणार्या आणि कचरा जाळण्याची बुद्धी न होणार्याअंनिससर्वच ‘सामाजिक’ (?) उपक्रम हिंदू सणांच्या भोवती का अडखळत असतात ? अंनिसनेवर्षभर होणारी अनाठायी वृक्षतोड किती वेळा रोखली ? वर्षभरात किती नवीन रोपटी लावली ?
आ. ‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाच्या लाखो प्रतींसाठी भारतातील आसाममधील तिन्सुकिया येथील एक महत्त्वाचे रान नष्ट झाले. या विषयावर तुम्ही कृती सोडाच, साधे भाष्यही न करणार्या अंनिसला होळी निमित्त होणार्या वृक्षतोडीविषयी बोलण्याचा काय अधिकार ?
इ. वर्षातून एक दिवस कचरा जाळून (तोही हिंदूंच्या सणाच्या दिवशी) असा कोणता पालट होणार आहे ? कितीअंनिसलात्यांचा परिसर, गल्ली कचरामुक्त राखण्यासाठी वर्षभर धडपडतात ?
ई. होळीमध्ये अग्निदेवतेला अर्पण करायची पोळी गरिबांना वाटायला सांगणार्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला गोरगरिबांना पोळ्या वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे जमा करून का वाटत नाही ? हिंदूंच्या सणांच्या आयत्या ‘पिठा’वर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ माराव्याशा का वाटतात ?
८. होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे !
सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतात, उदा. वाटमारी होते, दुसर्यांची झाडे तोडली जातात, मालमत्तेची चोरी होते, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, घातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतात. या गैरप्रकारांमुळे धर्महानी होते. ती रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजाचेही प्रबोधन करा. प्रबोधन करूनही गैरप्रकार घडतांना आढळल्यास पोलिसांत गार्हाणे करा. ‘सनातन संस्था’ यासंदर्भात जनजागृती चळवळ राबवते.’