कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम असलेले बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित यांचा सन्मान करतांना पू. रमानंद गौडा, शेजारी सौ. विजया दीक्षित
पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित आणि सौ. विजया दीक्षित यांच्यासह १. त्यांचा नातू श्री. सत्यकाम कणगलेकर, २. जावई श्री. यशवंत कणगलेकर, ३. मुलगी सौ. अंजली कणगलेकर आणि ४. नातू डॉ. अंजेश कणगलेकर
पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित आणि सौ. विजया दीक्षित यांच्यासह १. त्यांच्या मोठ्या सून सौ. अनघा जयंत दीक्षित आणि २. धाकट्या सून सौ. स्मिता प्रसाद दीक्षित

बेळगाव (कर्नाटक) – येथे २५.४.२०१९ या दिवशी झालेल्या सत्संगसोहळ्यात डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित हे सनातनचे ८७ वे संत झाल्याचे आणि त्यांच्या पत्नी सौ. विजया नीलकंठ दीक्षित यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. या कार्यक्रमाला सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा आणि बेळगाव येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पू. (डॉ.) दीक्षित आजोबांचा सन्मान पू. रमानंददादा यांनी केला, तर सौ. विजया दीक्षित यांचा सत्कार पू. गुंजेकरमामा यांनी केला. बेळगावमधील अनगोळ येथील पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित यांच्या घरी अत्यंत भावपूर्ण वातावरणात झालेल्या या सोहळ्याचा लाभ बेळगाव जिल्ह्यातील साधकांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून घेतला.

 

आयुष्यातील प्रत्येक क्षणी व्रतस्थ जीवन जगणारे पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षित आणि
‘साधना’ म्हणून पतीसेवा करणार्‍या सौ. विजया दीक्षित हे ‘आदर्श गुरु-शिष्य’ आहेत !

‘बेळगाव येथील डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित यांचे संपूर्ण जीवन आदर्शवत् आहे. आयुष्यभर तत्त्वनिष्ठतेने वागून रुग्णसेवा करणार्‍या आणि प्रसंगी रुग्णांवर विनामूल्य उपचार करणार्‍या डॉ. दीक्षितआजोबांनी सध्याच्या वैद्यकीय व्यावसायिकांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. बालपणापासून संत सान्निध्यात राहिल्यामुळे साधनेचे त्यांना जणू बाळकडू मिळाले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संतांची मनोभावे सेवा करून संतसंगाचा लाभ करून घेतला. त्यामुळे ‘निष्काम कर्मयोग’ साधतांना आजोबांची ‘ज्ञानयोग’ आणि ‘भक्तीयोग’ या मार्गांतूनही साधना होत राहिली. या वयातही त्यांना असलेली ज्ञानग्रहणाची आवड आणि त्यांची जिज्ञासा कौतुकास्पद आहे.

आजोबा सतत निर्विचार स्थितीत आणि अखंड भावावस्थेत असतात. आजोबांच्या देहात दैवी पालट झाले असून त्यांच्या अस्तित्वाामुळे त्यांच्या घरातही पालट झाले आहेत. ‘कर्म’, ‘ज्ञान’ आणि ‘भक्ती’ यांचा सुरेख संगम असलेल्या डॉ. नीलकंठ अमृत दीक्षित यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असून ते सनातनच्या ८७ व्या संतपदावर विराजमान झाले आहेत.

पू. दीक्षितआजोबांच्या साधनाप्रवासात त्यांच्या पत्नी सौ. विजया नीलकंठ दीक्षित यांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी १० ते १५ वर्षांपूर्वीच आजोबांची संतवृत्ती ओळखली आणि त्यांना ‘गुरु’ मानून त्यांची सेवा केली. आयुष्यातील प्रत्येक क्षणी व्रतस्थ जीवन जगणारे पू. दीक्षितआजोबा आणि आजी हे ‘आदर्श गुरु-शिष्य’ आहेत. असे उदाहरण अगदी विरळाच असेल ! पतीसेवाही ‘साधना’ म्हणून करणार्‍या सौ. दीक्षितआजी यांचीही आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत असून त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. या उभयतांनी केलेल्या चांगल्या संस्कारांमुळे त्यांचे कुटुंब, तसेच त्यांच्या मुलीचे सर्व कणगलेकर कुटुंबही साधनारत आहे.

‘पू. दीक्षितआजोबा आणि सौ. दीक्षितआजी या उभयतांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षितआजोबा यांना
संत घोषित केल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत

‘मी काहीच न करता माझी प्रगती कशी झाली ? प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता !’ (या वेळी भावाने ओतप्रोत भरलेल्या पू. दीक्षितआजोबा यांची भावजागृती झाल्यामुळे त्यांना अधिक बोलता आले नाही.)

 

६७ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
झाल्यानंतर सौ. विजया दीक्षितआजींनी व्यक्त केलेले मनोगत !

‘देवाला आठवतो’ आणि ‘देवाची आठवण येते’, यात भेद आहे. प्रयत्न न करताही देवाची आठवण येते, तेव्हा पुष्कळ आनंद मिळतो. आपण जरी देवाला विसरलो, तरी तो आपल्याला कधीच विसरत नाही. तो आपल्यासाठी सर्वकाही करत रहातो.

संसारीकदृष्ट्या डॉ. दीक्षित माझे पती आहेत; पण मी स्वतःला त्यांची शिष्या मानते. त्यांनीच मला अनेक गोष्टी शिकवल्या. मला काही कळले नाही, तर मी त्यांनाच विचारते आणि ते मला समजावून सांगतात. ‘पतीला गुरु मानावे’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे, त्याप्रमाणे मी त्यांना गुरु मानते. कोणाला वाटेल, ‘पती वाईट असेल, व्यसनी असेल, तर त्याला गुरु मानून कसे चालेल ?’ मला वाटते पती वाईट असला, तर असू दे. आपण तर चांगले आहोत ना, आपल्या चांगल्या आचरणाने पतीलाही चांगले वागायची प्रेरणा मिळेल. देव आपल्याकडे येईल.

 

अशी झाली डॉ. नीलकंठ दीक्षितआजोबा यांनी संतपद आणि त्यांची
पत्नी सौ. विजया दीक्षितआजी यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्याची घोषणा

बेळगावमधील डॉ. दीक्षित यांंच्या घरात सत्संगाची सिद्धता चालू झाली. सत्संगसोहळ्यात काय मार्गदर्शन मिळणार, याची जिज्ञासा वयोवृद्ध दीक्षित दांपत्यासह बेळगावातील सर्व साधकांनाही होती. ‘काय गुरुदेवांची कृपा, आपल्याला सत्संग सोहळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाचे कष्ट घ्यावे लागू नयेत; म्हणून परमदयाळू श्रीगुरूंनी रहात्या घरीच सत्संग सोहळ्याचे आयोजन केले’, यासाठी आत्यंतिक कृतज्ञता दीक्षित दांपत्याच्या तोंडवळ्यावर प्रतिक्षण जाणवत होती. पहाता पहाता सत्संगसोहळा आरंभ होण्याची वेळ झाली. चाकाच्या खुर्चीवर (‘व्हिलचेअर’वर) बसलेल्या डॉ. दीक्षित आजोबांच्या डावीकडे त्यांच्यासमवेत सावलीसह राहून त्यांची सेवा करणार्‍या त्यांच्या पत्नी सौ. विजया दीक्षित बसल्या होत्या. पू. रमानंद गौडा हे डॉ. दीक्षितआजोबांच्या उजवीकडे येऊन बसले. त्यांच्याशी काही मिनिटे अनौपचारिक बोलणे झाल्यावर पू. रमानंददादांनी ‘प.पू. डॉक्टरांनी आपल्यासाठी एक विशेष भेट पाठवली आहे. ती पाहूया !’ असे सांगितले आणि ‘एका संतांची दीक्षित दांपत्यासह गोवा येथील सनातन आश्रमात झालेल्या भेटीची चित्रफीत दाखवण्यात आली.’ चित्रफीत पाहून दीक्षित दांपत्यासह सर्वांचाच भाव जागृत झाला.

त्यानंतर पू. रमानंददादा डॉ. दीक्षितआजोबांना म्हणाले, ‘‘आजोबा, तुम्ही प.पू. डॉक्टरांना एकदा विचारले होते ना, ‘तुम्ही माझा सत्कार का करत आहात ?’ त्या प्रश्‍नाचे उत्तर असे आहे की, तुमची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली आहे. तुम्ही संत झाला आहात, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे.’ त्यानंतर पू. (डॉ.) दीक्षित आजोबांचा पू. रमानंददादा यांनी पुष्पहार घालून, तसेच प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र, शाल आणि श्रीफळ  देऊन सन्मान केला.

पू. दीक्षित आजोबांविषयी कुटुंबियांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर शेवटी सौ. विजया दीक्षितआजींनी मनोगत व्यक्त केले. त्याविषयी सांगतांना पू. रमानंददादा यांनी पू. (डॉ.) दीक्षितआजोबांची इतकी वर्षे भावपूर्ण सेवा करत असलेल्या आजींची आध्यात्मिक पातळीही मागील दोन वर्षांत ५ टक्के वाढून ६७ टक्के झाल्याचे घोषित केले. त्यानंतर पू. शंकर गुंजेकरमामा यांच्या हस्ते सौ. दीक्षितआजींचा सत्कार करण्यात आला.

 

चित्रफीत पाहून डॉ. नीलकंठ दीक्षित
आणि सौ. विजया दीक्षित यांनी व्यक्त केलेले मनोगत

१. ‘चित्रफितीच्या माध्यमातून पुन्हा गुरुदेवांचे दर्शन झाले.’– पू. (डॉ.) दीक्षितआजोबा

२. ‘आम्ही सर्व कुटुंबीय प.पू. डॉक्टरांचे ऋणी आहोत. प.पू. डॉक्टरांसोबतचे क्षण आम्हाला आयुष्याच्या अंतापर्यंत लक्षात रहातील. सर्व साधकांनीही आम्हाला खूप प्रेम दिले. प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’ – सौ. विजया दीक्षित, बेळगाव, कर्नाटक.

 

पू. (डॉ.) नीलकंठ दीक्षितआजोबा यांना संत
घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

१. ‘आचारः परमो धर्म:’ म्हणजे ‘आचार हा परम धर्म आहे’, या तत्त्वानुसार जीवन जगून अध्यात्मात प्रगती केल्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आई-बाबा (सासरे पू. (डॉ.) दीक्षित आणि सासू सौ. दीक्षित) होय. त्यांनी आयुष्यभर आचारधर्माचे काटेकोरपणे पालन केले. माझ्या विवाहानंतर त्यांच्या रूपात मला आई-वडीलच भेटले आणि आता त्यांच्या रूपात मला संत भेटले आहेत. माझ्याकडून त्यांची  अधिकाधिक सेवा होऊ दे.’ – श्री. यशवंत कणगलेकर (जावई), बेळगाव, कर्नाटक.

२. ‘माता-पिता हे प्रथम गुरु आहेत’, असे म्हणतात. आई-बाबांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यांच्यामुळे आम्ही साधनेत आलो आणि गुरुदेव भेटले. यासाठी कृतज्ञतेव्यतिरिक्त माझ्याकडे कोणताही शब्द नाही.’ – सौ. अंजली कणगलेकर (पू. (डॉ.) दीक्षित आणि सासू सौ. दीक्षित यांच्या कन्या), बेळगाव.

३. ‘आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. पू. बाबांकडून(पू. (डॉ.) दीक्षित आजोबांकडून) आम्ही साधना शिकलो, शरण जाणे शिकलो. आता मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते. त्यांची सेवा माझ्याकडून व्हावी. गुरुदेवांच्या प्रती कोटी कोटी कृतज्ञता.’ – सौ. अनघा जयंत दीक्षित (मोठी सून), बेळगाव.

४. ‘आजोबांच्या ठिकाणी मला पू. दादाजींचे (योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे), तर कधी प.पू. डॉक्टरांचे दर्शन व्हायचे. संतांचे चैतन्य वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असते, त्यामुळे मला आजोबांच्या ठिकाणी असे दर्शन व्हायचे, हे प.पू. डॉक्टरांनी मला या सत्संगसोहळ्याच्या माध्यमातून शिकवले. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.’– डॉ. अंजेश कणगलेकर (नातू), बेळगाव.

५. ‘उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही आजोळी जायचो, तेव्हा मी आजोबांना पहाटे ३ वाजल्यापासून देवपूजा करणे, झाडांना पाणी घालणे आदी नियमितपणे करतांना पाहिले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करत असत. आजोबांनी दिलेल्या प्रेमामुळे अनेक लोकांना त्यांचा आधार वाटतो. ‘डॉ. दीक्षितांच्या घरी जायचे आहे’, एवढेच सांगितले, तरी अनेक रिक्शाचालक संबंधित व्यक्तीला बरोबर आजोबांच्या घरी घेऊन येतात. माझ्यावर संस्कार करणारे आजी-आजोबा मला लाभले, त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ – श्री. सत्यकाम कणगलेकर (नातू)

६. ‘पती (पू. (डॉ.) दीक्षित) अत्यंत समाधानी आहेत. त्यांची कधीच कशाविषयी तक्रार नसते. खाणे, पिणे, औषध घेणे आदी कशाविषयीही ते कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. ते स्वतः डॉक्टर आहेत, तरीही इतर डॉक्टरांनी सांगितलेले ऐकतात. ते अत्यंत शांत असतात. हा पालट त्यांच्यात मला प्रकर्षाने जाणवतो. मला समाजसेवा करायला खूप आवडायची; पण यांच्या (पू. (डॉ.) दीक्षित यांच्या) सेवेसाठी वेळ देता यावा, यासाठी मी समाजसेवा थांबवली.’ – सौ. विजया दीक्षित (पत्नी), बेळगाव, कर्नाटक.

सौ. विजया दीक्षित यांनी त्यांचे यजमान पू. (डॉ.)
नीलकंठ अमृत दीक्षित यांची अनुभवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

 

१. नीटनेटकेपणा

‘माझे यजमान नेहमी म्हणतात, ‘एखादी वस्तू डोळे मिटून शोधली किंवा अंधारात जरी ती हवी असेल, तरी ती सहज मिळायला हवी.’ ते केवळ असे म्हणतच नाहीत, तर घेतलेली वस्तू जागेवर ठेवणे त्यांच्याकडून सहजतेने होतेे. स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणा, असे अनेक गुण त्यांच्यात आहेत. त्यांच्यात स्वयंशिस्त आहे; पण त्याचा ते इतरांना त्रास होऊ देत नाहीत. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हे त्यांच्या रक्तातच भिनले आहे.

 

२. जीवनातील प्रत्येक कृती योग्य वेळी आणि परिपूर्ण रितीने करणे

आम्हाला तीन मुले. मोठी मुलगी आणि तिच्या पाठीवर २ मुलगे. तीनही मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणासाठी अधिकोषातून कधी कर्ज काढावे लागले, तर यजमान प्रती मासाच्या एक तारखेला न चुकता अधिकोषाचा हप्ता भरण्यास जात. त्या वेळी अधिकोषातील अधिकारी त्यांचे कौतुक करतांना म्हणायचे, ‘‘यांच्यासारखे कर्ज फेडणारे असतील, तर अधिकोष कधीच बुडणार नाहीत.’’ जीवनातील प्रत्येक कृती परिपूर्ण आणि योग्य वेळी करणे, हा यजमानांचा मूळ स्वभावच आहे.

 

३. स्वतःचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेत व्यतीत करणारे आदर्श डॉक्टर !

३ अ. समाधानी वृत्ती असल्याने अधिकाराचा गैरवापर न करणे

आमचे लग्न झाल्यानंतर यजमानांनी कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी ‘आरोग्य अधिकारी’ म्हणून नोकरी केली; पण त्यांनी अधिकाराचा कधी गैरवापर करून घेतल्याचे मला आठवत नाही. ईश्‍वराने जे दिले, त्यात ते समाधानी राहून रोग्यांची सेवा करत.

३ आ. रात्री-अपरात्री पायी चालत जाऊन आणि
प्रसंगी स्वतःच्या जिवावर उदार होऊन रुग्णांची तपासणी करणे

अनेक वेळा यजमानांना रात्री-अपरात्री रुग्णांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी जावे लागे. अशा वेळी ते कोणतेही गार्‍हाणे न करता त्यांच्या सहकार्‍यासमवेत हातात कंदील घेऊन काट्या-कुट्यांतून वाट काढत पायी जात. एकदा रात्री रुग्णाला पहाण्यास जात असतांना त्यांना समोर एक नाग बसलेला दिसला. त्या वेळी ‘काय करावे ?’ हे न समजून त्यांनी पाय पुढे केल्यावर नागाने डंख मारला; पण यजमानांच्या पायात बूट असल्यामुळे काही इजा झाली नाही. नाग तेथून निघून गेला आणि यजमान रुग्णाला तपासूनच घरी परत आले. त्यांच्यातील अशा अनेक चांगल्या गुणांमुळे आमचे ज्या ज्या गावी स्थानांतर होत असे, त्या त्या प्रत्येक गावात त्यांना अतिशय आदर मिळत असे. आम्ही एका गावातून दुसर्‍या गावी निघालो की, गावातील लोक आम्हाला अश्रूपूर्ण नयनांनी निरोप द्यायचे.

३ इ. पैशांची चणचण असतांनाही रुग्णांकडून अधिक पैसे न घेणे

यजमानांनी त्यांच्या नोकरीचा १० वर्षांचा कालावधी राहिलेला असतांनाच घरातील अडचणींमुळे नोकरी सोडली आणि बेळगावला स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय चालू केला. तेव्हा मुले लहान होती आणि व्यवसायही नवीन होता. त्यामुळे घरात पैशाची चणचण असायची. असे असूनही त्यांनी कधी कोणासमोर हात पसरला नाही की, रुग्णांकडून अधिक पैसेही घेतले नाहीत. गरीब रुग्णांकडून तर ते पैसेही घेत नसत. असे रुग्ण बरे झाल्यावर त्यांच्या शेतात आलेल्या शेंगा, भाजी, गूळ आदी जे असेल, ते आणून द्यायचे. यजमानांना त्यातच समाधान वाटायचे.

३ ई. रुग्णांशी प्रेमाने बोलून त्यांची पूर्ण काळजी घेणे

रुग्णाची तपासणी करतांना यजमान त्याच्या घरच्या मंडळींची चौकशी करून त्याच्याशी प्रेमाने बोलत. त्यामुळे अनेक जण त्यांना घरच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगत आणि ‘यजमान जसे सांगतील’, तसे करतही असत. त्यांच्यातील या गुणांमुळे गावातील अनेक जण त्यांना ‘देवमाणूस’ मानतात. एखाद्या रुग्णाचा आजार अधिक बळावला असल्यास यजमान त्याला गावातील अन्य आधुनिक वैद्यांकडे पाठवत आणि तो रुग्ण बरा होईपर्यंत त्याचा पाठपुरावाही घेत. प्रसंगी त्या आधुनिक वैद्यांशी बोलूनही ते रुग्णाची चौकशी करत. रुग्ण कोणत्याही जाती-धर्माचा असला, तरी ते सर्वांना सारखेेच प्रेम देत.

३ उ. रुग्णांची सेवा करतांना कोणतीही सवलत न घेणे

यजमानांचे जीवन एका निरासक्त कर्मयोग्याप्रमाणे आहे. त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांच्याकडे येणारे रुग्ण आणि त्यांची कुटुंबे यांची सेवा करण्यातच गेले. रात्री कितीही उशीर झाला, तरी ते दुसर्‍या दिवशी वेळेवरच चिकित्सालयात उपस्थित असत. यजमानांनी कधी सवलत घेतल्याचे मला आठवत नाही. वयाच्या ८० वर्षांपर्यंत त्यांनी चिकित्सालय कधी बंद ठेवले नाही. त्यानंतर चिकित्सालय बंद केले, तरी त्यांच्याकडे नेहमी येणारे रुग्ण घरी येतच आहेत. ‘दुसर्‍या आधुनिक वैद्यांची औषधे चालू आहेत; पण तुम्हाला भेटल्याविना बरे वाटत नाही’, असे रुग्ण म्हणतात.

 

४. यजमानांनी केलेली साधना आणि संतसेवा

४ अ. चिकित्सालयात रुग्ण नसतांना धर्मग्रंथाचा अभ्यास करणे

‘वेळेचा सदुपयोग करणे’, हा यजमानांंचा विशेष गुणधर्म आहे. चिकित्सालयात रुग्ण नसतील, त्या वेळी ते एखाद्या धर्मग्रंथाचा अभ्यास करून ‘स्वतःला काय समजले ?’, ते लिहून काढत. नंतर ते काही समविचारी व्यक्तींशी या अभ्यासाविषयी चर्चा करत. अध्यात्म अन् साधना यांची गोडी असलेल्या किंवा ‘ज्यांना आवश्यक आहे’, अशा त्यांच्या रुग्णांना ते यातील काही सूत्रे सांगत.

४ आ. वयाच्या १२ व्या वर्षापासून नामजप, तसेच अनेक वर्षांपासून गुरुचरित्र पारायण आणि पूजा करणे

यजमानांच्या वडिलांनी (माझ्या सासर्‍यांनी) त्यांना वयाच्या १२ व्या वर्षापासून नामजप करायला सांगितले. त्यांचा तो नामजप आजपर्यंत चालूच आहे. प्रतिदिन संध्या आणि पूजा करणे यांत यजमानांकडून कधी खंड पडला नाही. नोकरीत असतांना आणि स्वतःचा व्यवसाय चालू केल्यावरही त्यांनी गुरुचरित्राचे अनेक वेळा पारायण केले आहे. एकदा तर सलग ७ पारायणे केली आहेत.

४ इ. घरी अनेक संतांचे येणे-जाणे असल्याने संत सहवास
लाभणे आणि यजमानांनी सर्व संतांची मनापासून सेवा करणे

माझे सासरे आध्यात्मिक वृत्तीचे होते. प.पू. सदानंद महाराज हे त्यांचे गुरु होते. त्यांची समाधी बेळगावलाच आहे. त्यामुळे त्यांच्या गुरुबंधूंचे आमच्या घरी नियमित येणे-जाणे असायचे. त्या वेळी त्यांची प्रतिदिन अध्यात्मावर चर्चा चालायची. घरी अनेक संतांचे येणे-जाणेही होते. त्यामुळे आम्हाला संत सहवास लाभला आणि संत सेवाही करायला मिळाली. यजमान त्या संतांची सेवा अगदी मनापासून करत. आम्हाला ज्या अनेक संतांचा सहवास लाभला, त्यांच्यापैकी प्रामुख्याने सांगण्यासारखे म्हणजे प.पू. गुळवणी महाराज, पू. हरिकाका गोसावी, प.पू. स्वामी भास्करानंद, पू. कलावती आई, बेळगाव येथील प.पू. काणे महाराज इत्यादी. प.पू. भास्करानंद स्वामींसमवेत यजमान ८ दिवस राहिले होते. स्वामींचे बेळगावला त्यांच्या भक्तांकडे वास्तव्य असले की, ते यजमानांना आवर्जून बोलावून घेत. प.पू. काणे महाराज यांचे घरी सतत येणे होत असे, तर यजमान पू. कलावती आईंचे ‘फॅमिली डॉक्टर’ (कौटुंबिक वैद्य) असल्यामुळे त्यांना त्यांची सेवा करण्याचेही भाग्य लाभले !

 

५. यजमानांनी केलेल्या अन्य धार्मिक सेवा

५ अ. प.पू. सदानंद महाराज यांचा चरित्र ग्रंथ संकलित करून तो प्रकाशित करणे

प.पू. सदानंद महाराज यांच्या भक्तांच्या आग्रहावरून यजमानांंनी महाराजांचे संक्षिप्त चरित्र लिहिण्यासाठी पुष्कळ परिश्रम घेतले. विविध ठिकाणी जाऊन त्यांची माहिती गोळा केली आणि ती संकलित करून ग्रंथ रूपाने प्रकाशित केली.

५ आ. गावातील काही मंदिरांचे विश्‍वस्त म्हणूनही त्यांनी सेवा केली.

 

६. ‘स्वतःचा संसार सांभाळून साधना करायला हवी’,
असे यजमानांचे विचार असल्याने मुलीच्या संपूर्ण कुटुंबाने
पूर्णवेळ साधना करण्याला त्यांचा विरोध असणे आणि नंतर प्रतिदिन
‘दैनिक सनातन प्रभात’ चे अभ्यासपूर्ण वाचन केल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन होणे

अध्यात्म आणि साधना यासंबंधी यजमानांची स्वतःची मते होती. ‘संसार सांभाळून सर्व करायला हवे’, असे त्यांना वाटायचे. ‘आपण संसारात राहून पुढे जाणार्‍यांना पाठबळ द्यायचे’, हा त्यांचा उद्देश होता. आमची मुलगी (सौ. अंजली कणगलेकर), जावई (श्री. यशवंत कणगलेकर) आणि नातवंडे (मोठा नातू डॉ. अंजेश आणि धाकटा नातू श्री. सत्यकाम) सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर ते सर्व जण सनातन संस्थेच्या सेवेत सहभागी झाले. त्या वेळी ‘असे करणे योग्य नाही’, असे यजमानांना वाटायचे. यजमानांचा मूळ पिंड रा.स्व. संघाच्या विचारधारेचा असल्यामुळे धर्मसेवा करण्यासंदर्भात त्यांचे दुमत नव्हते; पण शिक्षण, नोकरी हे सर्व सोडून साधना करण्यास त्यांचा विरोध होता. मुलीने आश्रमात जाऊन रहाणे त्यांना आवडले नव्हते; मात्र आधी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’ आणि नंतर ‘दैनिक सनातन प्रभात’ यांच्या पहिल्या अंकापासून ते आजपर्यंतचा प्रत्येक अंक त्यांनी नुसताच वाचला नाही, तर अभ्यासला. नंतर हळूहळू त्यांचा विरोध मावळत गेला. फोंड्याला ‘सुखसागर’ येथे आश्रम असतांना यजमान आणि आम्ही कुटुंबीय आश्रमात जाऊन आलो.

 

७. संत आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती कृतज्ञताभाव

७ अ. आजारपणात एका संतांशी भ्रमणभाषवरून बोलल्याने कृतज्ञता वाटणे

साधारण ८ – १० वर्षांपासून गुडघे दुखीमुळे यजमान घरातून कुठेच बाहेर गेले नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून ते अंथरुणावर पडून आहेत. कुशीवर वळण्याचीसुद्धा त्यांच्यात शक्ती नाही. मध्यंतरी त्यांना पुष्कळ बरे नव्हते. तेव्हा त्यांचे संतांशी भ्रमणभाषवरून बोलणे झाले. संतांशी बोलल्यामुळे यजमानांना त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

७ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेे यजमानांना रामनाथी आश्रमात सुखरूप घेऊन येता येणे

मुलगी आणि नातवंडे यांनी मनावर घेतल्यामुळे वयाच्या ९० व्या वर्षी यजमानांनी गोव्याच्या रामनाथी आश्रमात जाण्याची सिद्धता दर्शवली. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला यजमानांना आश्रमात सुखरूपपणे घेऊन येणे शक्य झाले. ही आम्हा सर्वांसाठी मोठी अनुभूतीच आहे.

‘परात्पर गुरुदेवांची कृपादृष्टी सर्वांवर अशीच सदैव रहावी’, अशी प्रार्थना आणि त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’

– सौ. विजया नीलकंठ दीक्षित, बेळगाव, कर्नाटक. (४.४.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment