सात्त्विक, सहनशील वृत्ती आणि निरपेक्ष प्रीती आदी गुण असणार्या
कारवार (कर्नाटक) येथील श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) संतपदी विराजमान !
मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या श्रीमती माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगाला सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारला आणि ‘अध्यात्म प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ?’, याची शिकवण सर्वांना दिली. ‘संसारी असून देहे चित्त राहो चरणांसी’, अशी स्थिती असलेल्या आजींची अंतर्मनातून साधना होत राहिली. नम्रता, निरपेक्ष प्रीती आणि अनासक्त वृत्ती यांमुळे ‘संसारात राहूनही जलद आध्यात्मिक उन्नती करून घेता येते’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माईणकरआजी !
त्यांच्या तोंडवळ्यावरील भाव, प्रीती आणि निर्मळ आनंद या सर्व गोष्टी त्यांच्यातील संतत्वाचे दर्शन घडवतात. कारवारमधील साधक, तसेच आजींचे कुटुंबीय यांचेही कौतुक करावे, तेवढे थोडे; कारण त्यांना आजींमध्ये झालेले, तसेच त्यांच्या निवासस्थानी झालेले पालट अचूक ओळखता आले.
अल्प अहं, निरपेक्ष प्रीती आदी गुणांमुळे आजींनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे आणि त्या सनातनच्या ८६ व्या संत झाल्या आहेत.
‘पू. माईणकरआजी यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कारवार (कर्नाटक) – कर्नाटकातील एक निसर्गरम्य शहर म्हणजे कारवार ! कारवारमध्ये वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘गुरुकृपायोगानुसार साधने’विषयी मार्गदर्शन करणार्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा परात्पर गुरूंनी जे साधनेचे बीज रोवले, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. साधक आणि संत म्हणजे जणू या वटवृक्षाची फळेच आहेत. परात्पर गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधकांनी तन, मन आणि धन यांचा त्याग करून साधनेचा घरोघर प्रसार केला. त्यातून अनेक कुटुंबे संस्थेच्या कार्याशी जोडली गेली. अनेकांनी तळमळीने आणि भावपूर्ण साधना करून अध्यात्मात प्रगती करून घेतली. या कारवारला २३.४.२०१९ या दिवशी पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींच्या (वय ९२ वर्षे) रूपात एक संतरत्न लाभले. येथील एका सत्संगसोहळ्यात पू. माईणकरआजी ८६ व्या संत झाल्याचे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी घोषित केले. ही आनंदवार्ता घोषित होताच सर्व साधकांचे हात नकळत जोडले गेले आणि त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. त्यानंतर पू. रमानंददादा यांनी पू. आजींना पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र (प्रतिमा) देऊन त्यांचा सन्मान केला.
अहं अल्प असणार्या पू. (श्रीमती) माईणकरआजी !
वर्ष २०१७ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात श्रीमती माईणकरआजी प.पू. डॉक्टरांना भेटल्या होत्या. त्या वेळी त्या त्यांना वाकून नमस्कार करू लागल्या, तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आजी तुम्हाला मला नमस्कार करण्याची आवश्यकता नाही. ज्याच्यात अहं असतो, त्याने वाकून नमस्कार करणे, हेे त्याचा अहं न्यून होण्यासाठी आवश्यक असते; पण तुमची स्थिती त्याच्या पलीकडची आहे. तुमच्यात मुळातच अहं पुष्कळ अल्प आहे.’’
– कु. सोनल जोशी (पू. आजींची नात), फोंडा, गोवा.
पू. (श्रीमती) माईणकरआजींविषयी त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
१. ‘आई म्हणजे प्रीतीचा (निरपेक्ष प्रेमाचा) महासागर आहे.
– सौ. मेधा जोशी (पू. आजींच्या मोठ्या कन्या), कारवार, कर्नाटक.
२. ‘आईने लहानपणापासून आमच्यावर चांगले संस्कार केले.’
– सौ. सुधा जोशी (पू. आजींच्या द्वितीय कन्या), वास्को, गोवा.
३. ‘आज मला एवढा आनंद झाला आहे की, आईविषयी बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीत.’ – सौ. अनुराधा पुरोहित
(पू. आजींच्या धाकट्या कन्या), फोंडा, गोवा.
४. ‘आजींची प.पू. डॉक्टरांवर पुष्कळ भक्ती आहे. ‘परेच्छेने कसे वागावे’, ते आम्ही आजींकडून शिकलो. तिने सतत मनाचा त्याग केला आहे. प्रत्येक वेळी तिने आम्हाला साधनेसाठी प्रोत्साहन दिले, त्यामुळे मला पूर्णवेळ साधना करण्याची प्रेरणा मिळाली.’
– कु. सोनल जोशी (पू. आजींची नात), फोंडा, गोवा.’
पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांनी
सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी साधकांना दिलेला संदेश !
पू. आजींना साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना केल्यावर ‘गुरुदेवांना नमस्कार, परमपूज्यांना नमस्कार’, असा आरंभ करून त्या पुढे म्हणाल्या, ‘‘प.पू. डॉक्टरांच्या मनात साधकांविषयी जे प्रेम आहे, ते आपण शब्दांत व्यक्त करू शकत नाही. परमपूज्यच आपले देव आहेत. परमपूज्य जी साधना सांगतात, ती साधकांनी करत रहावी. परमपूज्य सांगतात त्याप्रमाणे भरपूर नामजप करावा.’’ ९२ वर्षांच्या पू. आजींना बोलतांना धाप लागत होती. त्यांचा आवाज अस्पष्ट होता; पण त्यांच्यातील कृतज्ञताभाव सर्वांना जाणवत होता. त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक वाक्याचा आरंभ ‘परमपूज्य’ या शब्दांनी होत होता. गुरुस्मरण त्यांच्या श्वासाश्वासात सामावले असल्याचे हे जणू द्योतक आहे.