सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून श्रीरामाचे भावपूर्णरित्या षोडशोपचार पूजन !
रामनाथी (गोवा) – ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी’ ही तिथी म्हणजेच विश्वाला सर्वार्थाने आदर्श असलेल्या श्रीरामाचा जन्मदिन ! या मंगलदिनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून आणि सनातनच्या विविध संतांच्या वंदनीय उपस्थितीत रामरायांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता शंखनाद आणि भावपूर्ण प्रार्थना करून रामजन्म साजरा करण्यात आला. या मंगलसमयी ‘श्रीरामाचा पाळणा’ चालू असतांना अनेक साधकांची भावजागृती झाली.
साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी रामजन्मानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रभु श्रीरामांचे षोडशोपचारे पूजन आदी पूजाविधी केले. सनातनचे पुरोहित श्री. ओंकार पाध्ये यांनी पूजाविधी सांगितला. या वेळी श्री. पाध्ये यांनी समर्थ रामदासस्वामी रचित ‘पावनदीक्षा’ आणि ‘करुणाष्टक’ म्हटले. पूजनाचा शेवट ‘रामाष्टकम्’ने करण्यात आला. पूजेच्या समारोपाच्या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेले ‘तुम ही राम हो, तुम ही कृष्ण हो । श्रीजयंत में तुम समाए हो ।’ हे भजन पूजनस्थळी लावण्यात आले होते.
श्रीरामनवमीच्या या मंगलदिनी आश्रमात श्रीरामाप्रती उत्कट भाव जागृत करणारी भजने अन् गीत रामायणातील गीते आश्रमातील ध्वनीक्षेपक यंत्रणेवर लावण्यात आली होती. साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केले होते. श्रीरामाप्रती भावविभोर करणार्या वातावरणामुळे सर्व साधकजन उत्कट भावभक्तीने न्हाऊन निघाले.
क्षणचित्रे
१. पूजनाची सर्व सिद्धता झाल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पूजनस्थळी शुभागमन झाले. त्या आसनस्थ होण्याच्या वेळी श्रीरामाच्या मूर्तीला वाहिलेले तुळशीपत्र आपोआप खाली पडले. यातून श्रीरामाने साधकांना आशीर्वाद दिल्याचे उपस्थितांना जाणवले.
२. पूजनाच्या वेळी तीव्र उष्णता असूनही अनेक साधकांना शीतलतेची अनुभूती आली.
३. श्रीरामजन्माच्या मंगलप्रसंगी जेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ श्रीरामाचा पाळणा हलवत होत्या, तेव्हा त्यांचे मुखमंडल लालसर झाले होते.
४. काही वर्षांपूर्वी सनातनच्या ६ साधकांनी मिळून गोकुळाष्टमीसाठी पाळणा सिद्ध केला होता. पुढे त्यांनी तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण केला. तोच पाळणा आजच्या रामनवमीच्या मंगलसमयी पूजेत ठेवण्यात आला होता.