कतरास ( झारखंड ) – व्यवसाय करतांना साधना आणि धर्माचरण केल्यास व्यवसायामधूनही साधना होईल. साधना केल्याने जीवनात अमूलाग्र पालट होतो, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी येथील व्यावसासिकांसमवेत झालेल्या बैठकीत केले. साधनेविषयी माहिती दिल्यानंतर श्री. गवारे यांनी चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांसह जगाला आपल्या महान भारतीय संस्कृतीची माहिती होऊन विश्वाला मार्गदर्शक ठरेल अशा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संकल्पनेविषयी उपस्थितांना माहिती दिली. या बैठकीत शहरातील सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका याची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित व्यावसायिकांना जीवनात साधनेचे महत्व, नामजप कोणता करावा इत्यादी साधनाविषयक मार्गदर्शन केले. ‘साधना केल्याने व्यावसायिक लोकांच्या व्यवसायातील अडचणी दूर होऊन अध्यात्मिक उन्नती पण झाली आहे’, असेही त्यांनी सर्वाना सांगितले.
सर्व विषय ऐकल्यावर ‘आम्हीदेखील साधना करू; मात्र आम्हाला नियमित असे मार्गदर्शन आणि सत्संग मिळायला हवा’, असे उपस्थित व्यावसायिकांनी मत व्यक्त केले. बैठकीनंतर मासातून २ गुरुवार धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे नियोजन केले. ‘यासाठी आम्ही आमच्या इतर सहव्यावसायिक मित्रांनादेखील सांगू’, असे सर्वानी सांगितले.